नवीन लेखन...

करावे पर्यटन

डॉ. रिमा वीस दिवसानंतर आज पुन्हा क्लिनिकला आली तेव्हा किती वेगळी दिसत होती. एक वेगळाच तजेला तिच्यात दिसत होता. एक वेगळाच उत्साह दिसत होता. त्याच्याआधी पाच-सहा महिने खूपच व्यग्र गेले होते. सतत पेशंट्स बघणे, कधी या क्लिनिक तर कधी त्या क्लिनिकनला जाऊन. म्हणजे त्यात प्रवास आलाच. स्वतः ड्राइव्ह करत जायचे म्हणजे तर अधिकच, ट्रॅफिक जाम त्यात सतत क्लच, ब्रेक, अॅक्सिलेटरची थोड्या थोड्या वेळाने हालचाल, पायही दुखून जायचे, मानसिक त्रास तर केवढा! कारण उशीर एकदा झाला की पुढे सगळ्यालाच उशीर मग त्याचा ताण!

शेवटी तिने ठरवले की काही नाही आता ब्रेक हवाच नाहीतर आपल्या आरोग्यावर परिणाम व्हायचा. घरच्यांनाही हवंच होतं. मग सर्वांनी मिळून ट्रीप ठरवली. थोडे दिवस अभयारण्यात. थोडे हिलस्टेशनला मग शेवट बीचवर वेगवेगळ्या निसर्गाच्या रूपांजवळ थोडे थोडे दिवस ! पण सर्वत्र कसं हिरवंगार! शुद्ध हवा. निवांतपणा, गप्पा, वेगवेगळं खाणं, आवडीचं खाणं, फिरणं, खेळणं सर्व काही करायला मिळालं.

एक आनंदाचा ठेवा बरोबर घेऊन ती परत आली होती. ती येताना सर्वांना म्हणाली पण. ही शिदोरी आता मला पुढच्या सहा महिन्यांसाठी भरपूर उर्जा देणार आहे. जे आजच्या तिच्या चालीतून, चेहेऱ्यावरून, देहबोलीतून स्पष्ट दिसत होतं !

समीर आयटी कंपनीत उच्चपदावर कार्यरत असलेला अधिकारी ! सतत प्रोजेक्टस, मिटींग्ज, यात दिवस कसा संपायचा कळायचं नाही. पण गेले सहा महिने असेच गेले होते. त्याला जाणवू लागलं होतं की आपला उत्साह कमी होत चाललायं, कंटाळा येतोय, करायचं काम म्हणून करतोय. सवयीचंच आहे म्हणून जमतंय ! घरी गेल्यावर कधी झोपतो असं होतं. पाठ टेकली की बरं वाटतं. कोणाशी बोलावसं वाटत नाही. बायको मुलांना वेळपण देता येत नाही. बायको, तीपण नोकरी करते. पण घरी लवकर येते. तिला मला बोलायला मिळत नाही.

एका बेडवर आपण एकमेकांकडे पाठ करून झोपतो! त्याला जाणवलं की, हे बरोबर नाही. आपण काहीतरी करायला पाहिजे. शेवटी आठ दिवसांची रजा काढून फिरायला जायचे ठरवले. काही दिवस नदीकाठी काही दिवस हिलस्टेशनवर ! निसर्गाच्या सानिध्यात, पक्ष्यांच्या किलबिलाटात, विविधरंगी फुलाफळांच्या सहवासात ! वेगळंच वातावरण, मनसोक्त वेळ, निवांतपणा, मुलांबरोबर खेळ पत्नीबरोबर वेळ व मेळ! मनमुराद खानपान व भटकणे! समीर अगदी हरवून गेला. ताजातवाना झाला. पुढच्या काही महिन्यांच्या उत्साहाची शिदोरीच जणू त्याला मिळाली !

जयंतराव व वीणाताई दोघे एकामागोमाग निवृत्त झाले. मुलं त्यांच्या नोकरी संसारात वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेली. दोघेच दोघे, दिवसाचे वेळापत्रक ठरवले तरी रात्र काही महिन्यांनी खायला उठायला लागली! तोच तोच पणाचा कंटाळा यायला लागला. मध्येच मुलांकडे जायचे चार दिवस पण त्याने बरं वाटायचं. नातवंडांबरोबर वेळ जायचा. मुलं फिरवून आणायची. छोट्या पिकनीक्स अरेंज करायची. त्यामुळे फ्रेश वाटायचे. तेव्हाच त्यांना एका टूर कंपनीच्या ज्येष्ठ नागरिकांच्या टूरची माहिती कळली. त्यांनी बुकिंग केले आणि त्यांना तिथे इतकी मजा आली. समवयस्क लोक. वेगळं निसर्गरम्य वातावरण. गप्पा, खेळं! सतत मग थोडे थोडे दिवसांनी दोघे पर्यटनाला जायचे. त्यामुळे इतका बदल झाला त्यांच्यात की मुलं म्हणायची. आईबाबा, तुम्ही आमच्यापेक्षा स्मार्ट व तरूण दिसायला लागलात ! थोडक्यात काय तर पर्यटनामुळे मनाला खूप आनंद मिळतो. उर्जा मिळते. अहो नुसतं पुलंचं ‘अपूर्वाई’ व ‘पूर्वरंग’ वाचलं तरी मिळते. त्यांच्या वर्णनशैलीमुळे आपण पर्यटनाबरोबर हास्यरसात न्हाऊन जातो ते वेगळेच!

आज आपले शहरी जीवन धकाधकीचे वेगवान झाले आहे. तसेच त्यात वेग आल्यामुळे, घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा आल्यामुळे जीवन काटेकोर बनले आहे. त्यात बेसुमार गर्दी, प्रदूषण, उष्मा, वाहतुक समस्या यामुळे शहरात ताणतणाव वाढले आहेत. वेगवेगळ्या नोकरी व्यवसायातले तणाव आणखीन वेगळेच! ग्रामीण भागात वेगवेगळे तणाव असतात. संख्येने कमी असले तरी! तोचतोचपणा असतोच. त्यामुळे बदल आवश्यक असतो. पर्यटन हा बदल देण्याचे काम करतो. पर्यटन म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी जाणे, परदेशात जाणे, परगावी जाणे, मूळगावी जाणे, धार्मिक स्थळी जाणे सर्व आले !

या सर्व गोष्टी करताना आपण मनमुराद फिरतो, खेळतो, खातो, गप्पा मारतो, हसतो आणि निवांतपणा पण उपभोगतो! यामुळे नवरसाच्या भाषेत बोलायचं तर शांतरस, श्रृंगाररस, हास्यरस जोमाने पाझरतात. व शरीराचे ‘आनंदवनभुवन’ करून टाकतात. शास्त्रीय भाषेत सांगायचे तर या सर्वांमुळे म्हणजे फिरण्याचा, खेळण्याचा व्यायाम, खाण्यात, गप्पा मारण्यातील मजा, सुसंवाद यातून मेंदूतील एंडॉर्फिन, डोपामिन ही जीव रसायने जास्त प्रमाणात स्त्रवतात. त्यामुळे मेंदूतील रेटीक्युलर अॅक्टीव्हेंटींग सिस्टीम उद्दिपीत होते. त्याचबरोबर सर्व स्नायूंना व्यायाम मिळाल्याने आनंद उत्पन्न होतो. पण आरामही मिळाल्याने पॅरासिम्फथेटिक संस्था उद्दिपीत झाल्याने शांती लाभते.

एकमेकांशी संवाद झाल्यामुळे नाती फुलती रहायला, मदत होते. ग्रुपबरोबर गेल्यास मित्र मिळतात. मैत्री बहरते. विविध ऐतिहासिक ठिकाणे त्यांची माहिती वगैरे मिळाल्याने बुध्दीला चालना मिळते कोणा चित्रकाराला निसर्ग बघून, वा वेगवेगळ्या ऐतिहासिक इमारती बघून स्केचेस काढायची उर्मी उत्पन्न होते. कोणा कवीला काव्य सुचते! त्या-त्या ठिकाणी चित्रित केली गेलेली गाणी आठवतात. म्हणता येतात !

थोडक्यात स्मृती, कलाकृती, मति, शांती व आनंदाची अनुभूती या सर्वांना पर्यटनातून चालना मिळते. एकप्रकारे मनाचा विकासच व्हायला चालना मिळते!

बऱ्याचदा सहलीचा शेवट जवळ येऊ लागला की मन हुरहुर लागते. परत जाऊच नये असे वाटते इथेच रहावे असे वाटते. मला आठवतंय लहानपणी आम्ही माथेरान गेलो होतो. आमची व माझ्या मावशीची फॅमिली. पण शेवटच्या दिवशी निघायची वेळ झाली तेव्हा आम्ही दोघं व माझ्या बहिणी आम्ही अजून दोन दिवस इथेच राहू म्हणून हट्ट धरून बसलो होतो. निघावेसेच वाटत नव्हते. तिथेच एकत्र रहावे, खेळावे असे वाटत होते ! पण दैनंदिन जीवनात यावेच लागते! फक्त तेव्हा हा सर्व आनंदाचा, स्मृतीचा मेवा आपण बरोबर घेऊन आलेलो असतो!

आपण अशा ठिकाणी फोटो काढतो. पूर्वी सर्व काढायचो. आता थोड्या प्रिंट व बाकी सर्व संगणकात सेव्ह करून ठेवतो मग कधीतरी ते फोटो पाहतो. एकत्र आलो की फोटो बघतो. तेव्हा प्रत्येक फोटोमागच्या आठवणी, कथा जागृत होतात, संपूर्ण सहलच जागृत होते व आनंदाची अनुभूती देऊन जाते. अगदी कुठल्याही आजारात शारीरिक, मानसिक असा हवापालट स्थळपालट असे आनंदाचे हार्मोन्स स्त्रवण्यास मदत करतो. आनंद निर्माण झाल्याने प्रतिकारशक्ती, पचनशक्ती सर्वच वाढते. कारण आपलं मन मेंदू अंतस्रावी ग्रंथी (हार्मोन्स) व प्रतिकारशक्ती यांचा अन्योन्य संबंध असतो (Psychoneuroendocirno immune axis)
म्हणूनच पर्यटन सध्याच्या जीवनशैलीत आवश्यक आहे.

करिता देशाटन | फिरावे मुराद ।
देईल शांती । निवांतपणा ||
करिता सहल । मिळतो सहवास ।
होतो संवाद | सुरोगात ॥
करावे पर्यटन | पहावा निसर्ग |
मिळते अनुभूती । आनंदाची ||

डॉ. अद्वैत पाध्ये

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..