नवीन लेखन...

ज्येष्ठ-श्रेष्ठ (कथा)

सूर्याजीराव रविसांडे, रोजची पहाटचे संपादक आणि काका सरधोपट, रोजची पहाटचे मुख्य वार्ताहर. रोजची पहाटच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या विशेषांकाच्या तयारीच्या कामात गुंतले होते.

“काका, अखिल भारतीय ज्येष्ठ महासंघाचे अध्यक्ष श्री. गलितगात्रे यांचे अलीकडे ज्येष्ठ नागरिकांबाबत बरेच लेख येतात. ज्येष्ठांबाबत त्यांची मते फार टोकाची वाटतात नाही?”

“होय साहेब. परंतु त्यांनी मांडलेले मुद्दे दुर्लक्ष करावे असेही नसतात. ज्येष्ठांबद्दलची त्यांची तळमळ दिसते त्यातून. शिवाय झालाच तर थोडाफार फायदा आपल्यासारख्या बिनसरकारी ज्येष्ठांनाही होईल.”

“तो कसा?”

“साहेब, सध्या ज्येष्ठांना मिळणाऱ्या सवलती या मुख्यतः सरकारी निवृत्तांना, सरकारदरबारी ज्यांचा वशिला, वावर आहे अशा ज्येष्ठांनाच मिळतो. तो जर इतरांना मिळाला असता तर वृद्ध शेतकऱ्यांना गळफास घ्यावा असे वाटले नसते. त्यांनी ज्येष्ठ या संज्ञेखाली झाडून सारे वृद्ध, सरकारी/ निमसरकारी/ खाजगी यावेत असा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे माझ्यासारख्या वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, कर्तव्यपरायण, प्रामाणिक, हुषार, सचोटीने काम करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांचीही सरकारदरबारी दखल घेतली जाईल.”

“काका, तुम्ही वयोवृद्ध आहात पण आणखीही बरेच काही आहात हे माझ्या ध्यानात आणून दिलेत त्याबद्दल धन्यवाद.

“साहेब नुसते धन्यवाद नकोत. माननीय गलितगात्रे जशी ज्येष्ठांची चिंता करतात तशीच आपण माझी करावी हा अल्प हेतू मनात धरून हे धाष्टर्य केले.”

“आले लक्षात. त्यासाठीच हा विषय काढला. तुम्ही ताबडतोब त्या गलितगात्र्याची मुलाखत घ्या. आपण ज्येष्ठ की श्रेष्ठ हा विशेषांक लवकरच काढणार आहोत. ही मुलाखत त्याचे एक स्टार अॅट्रॅक्शन असेल.”

“ते आले लक्षात. पण माझ्या पात्रतेचा विचार करून आपण मला काही लाभांश देणार आहात की नाही?”

“काका, जर ज्येष्ठांना सरकारी पातळीवरून काही लाभांश मिळाला तर तुमचीही सोय नाही का होणार? शिवाय त्यांच्या मागण्यांना आपण रोजची पहाटमधून भरपूर प्रसिद्धी देऊन त्याचा पाठापुरावाही करू.”

“आले लक्षात. म्हणजे तुमच्या खिशाला काही चाट न लावता परस्पर सरकारी खिशावर हात मारता येईल. अहो सूर्याजीराव कधीतरी हा हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचा धंदा आवरा.”

काकांनी सूर्याजीरावांना स्पष्टच सुनावले. दोघांची जोडी रोजची पहाटच्या जन्मापासूनची होती. त्यामुळे एकमेकांवर तोंडसुख घेणे त्यांना काही नवीन नव्हते.

“काका, अहो पण मा. गलितगात्र्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि ते यावेच, तर तुमचा प्रश्न आपोआपच सुटेल ना, मग तो कसा सुटतो याची तुम्हाला कशाला चिंता? शिवाय यात तुमच्याबरोबर माझाही फायदा नाही का होणार? अहो, मी पण आता सत्तरी केव्हाच ओलांडलीय. बरं चला, लागा कामाला. त्या गलितपात्र्यांची मुलाखत आटपा पटापट.”

“गलितपात्र नाही साहेब गलितगात्र!”

“तेच ते! गलितपात्र काय अन् गलितगात्र काय? कुठून आणतात कोण जाणे असली विआबु नावे!”

“विआबु? म्हणजे?”

“अहो म्हणजे विचित्र आहे बुवाचा शॉर्ट फॉर्म!”

“अरेच्चा! मला वाटले विआबु म्हणजे ते सुप्रसिद्ध विनोदी लेखक वि. आ. बुवा की काय?”

“काका, कुठलाही संदर्भ कुठेही लावू नका. चला लागा कामाला.”

काका निघतात ते थेट अ. भा. ज्ये. म.च्या अध्यक्षांचे कार्यालय गाठतात. अखिल भारतीय असले तरी ज्या गल्लीत ते कार्यालय होते त्या गल्लीतील भारतीयांना ते ठाऊक नव्हते. बरीच शोधाशोध केल्यावर एका चाळवजा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या शेवटच्या दोन खोल्यात ते सापडले. काका आत शिरले. एक अत्यंत शिष्ट वाटणारे ज्येष्ठ एका खुर्चीवर बसले होते. समोरच्या टेबलावरच्या फायलींचा ढिगारा उपसत होते. काकांची चाहूल लागताच म्हणाले, ‘कोण आपण? काय हवे आहे?’ त्यांच्या आवाजातला खर्ज आणि कपाळावरच्या आठ्या पाहून काकांना काढता पाय घ्यायची इच्छा झाली,

“मी काका. काका सरधोपट. रोजची पहाटचा वार्ताहर.”

ते ऐकताच त्या वृद्धकपीच्या चेहऱ्यावरच्या आठ्या गायब झाल्या आणि त्यावर हास्याच्या मधुर लाटा पसरल्या. खर्जातला आवाज मधाळ झाला. काकांचा काकासाहेब झाला!

“अरे या या या! काकासाहेब आपले स्वागत! काय सापडले ना कार्यालय लवकर? अहो गल्लीतले शेंबडे पोरसुद्धा सांगेल इतकी ख्याती आहे आमची!”

काकांच्या मनात आले फक्त गल्लीतल्या शेंबड्या पोरालाच विचारायचे बाकी होते. उघडपणे म्हणाले, छे छे काहीच त्रास झाला नाही. अख्ख्या गल्लीत एवढा एकाच पत्ता सगळ्यांना ठावूक होता.

असणारच. अहो अगदी तळागाळापर्यंत पोचली आहे आमची संघटना. तुम्हाला सांगतो काका,अहो या चाळीसमोर जी म्हातारी भाजीवाली बसते ना तिलाच आम्ही पुढच्या वर्षापासून अध्यक्ष करणार आहोत.’

“काय सांगता?”

“काका, ती म्हातारी, आता काय वय असेल तिचं?”

“असेल साठ-सत्तर.”

“साठ-सत्तर? अहो नव्वद वर्षांची आहे ती नव्वद! पोटापाण्यासाठी अजून भाजी विकते आणि आमचे हे आमदार, खासदार, तिकडे संसदेत मौनीबाबा असतात, झोपा काढतात, भांडतात, हे आपण टीव्हीवर बघतो, तरीही त्यांनी आपल्या पगारवाढीच्या भत्ते मागण्या सर्वांनी कडबोळं करून मान्य करून घेतल्याच आहेत. त्यांना पगारवाढ, वाढवून मिळालेत. अखिल भारतीय जनता इकडे हलाखीचे जिणे जगतेय, पोटं खपाटीला गेली आहेत आणि यांना पोटं आवळायला नाड्या पुरत नाहीत! तुम्हाला सांगतो काका, पुढच्या वर्षी अखिल भारतीय ज्येष्ठांचा एक प्रचंड मोर्चा मी संसदेवर नेणार आहे, या सगळ्यांची अंडीपिल्ली बाहेर काढीन. समजतात कोण स्वत:ला?”

“खरं आहे साहेब. आपला राग समजू शकतो. बरं आपण आता आपल्या मुलाखतीकडे ”

वळू या का?”

“हो हो वळा. विचारा काय विचारायचे ते!”

“साहेब आपली ही अखिल भारतीय ज्येष्ठ महासंघटना कधी स्थापन झाली आणि आपले ध्येय काय?”

“काका, ही संघटना स्थापन होऊन फक्त पाच वर्षे झाली आहेत. मी निवृत्त झालो  तेव्हा ही स्थापना केली. तेव्हा ही एवढी एकच शाखा होती, आता पाच आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि गोवा.”

“वा! म्हणजे आदिशंकाराचार्यांनी जसे भारताच्या चारी दिशांना मठ स्थापन केले तसे!”

“होय काका. जसे बहुतेक हिंदूंना या चारही मठांची नावे, स्थाने, मठाधिपती ठाऊक नसतात पण त्यांचे काम चालू असते तसेच आमचेही आहे.”

“हे मात्र खरे. या गल्लीतील फारच थोड्यांना आपल्या या मठाची माहिती दिसते.”

“मठ नाही. कार्यालय.”

“साहेब, आपल्या ध्येय, धोरणाबाबत काही सांगता का?”

“काका सर्व प्रथम ही ज्येष्ठ संज्ञा बदलून आम्ही श्रेष्ठ ही संज्ञा मिळवणार आहोत.”

“का बरं? ज्येष्ठ का वाईट आहे?”

“काका ज्येष्ठ ही संज्ञा शिष्टला जवळची वाटते. त्यामुळे ज्येष्ठांप्रती आत्मीयता न वाटता तुच्छताच वाटते. ज्येष्ठांकडे एक अडगळ म्हणून पाहण्याची वृत्ती जोपासली जाते. त्यांना मिळणाऱ्या सवलती म्हणजे भिकाऱ्यासमोर भाकरतुकडा फेकल्यासारखे वाटते. परंतु हेच जेव्हा श्रेष्ठमधे बदलेल तेव्हा ही मंडळी आदरास पात्र होतील.”

“वा! खरोखरच एका शब्दाच्या फरकाने आपण फारच मोठे काम करणार!”

“हो. याबरोबरच श्रेष्ठ या पदाचे आम्ही वर्गीकरण करणार अहोत.”

“ते कसे?”

“काका, सरकारी नोकरीत सर्व पदांचे वर्गीकरण असते. जसे वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३, वर्ग-४ तसे आम्ही श्रेष्ठ वर्ग-१, श्रेष्ठ वर्ग-२, श्रेष्ठ वर्ग-३ असे वर्गीकरण करणार आहोत.”

“वा! हे काहीतरी वेगळेच दिसते. असे वर्गीकरण कसे त्याचे निकष काय आणि या वर्गीकरणाने आपण काय सांगू इच्छिता?”

“वा! फारच छान प्रश्न विचारलात. आपण जाणताच की सध्या साठ वर्षांवरील सर्व वृद्ध मंडळी ज्येष्ठ मानली जातात.”

अलीकडे माणसाचे आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे शंभरी गाठणारे बरेच वृद्ध आढळतात. गावोगावी साठी गाठलेल्या ज्येष्ठांची टोळकीच्या टोळकी नाक्यानाक्यावर चर्चा-संवाद करताना आढळतात, काही लोक त्याला कुत्सितपणे चकाट्या पिटणे म्हणतात ते सोडा. त्यामुळे जी ज्येष्ठ मंडळी सत्तर, नव्वदी, शंभरी गाठतात त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्षच होते.’

“ते कसे? त्यांच्या काय समस्या?”

काका साठ ते सत्तर दरम्यानचा ज्येष्ठ बराचसा मोबाईल म्हणजे चालता फिरता असतो. त्यापुढचे मात्र वयापुढे गुडघे टेकतात. डॉक्टरपुढे नाक घासतात. दिवसाला पाच पंचवीस गोळ्या गिळतात. अंथरूण पाहून पाय पसरण्याऐवजी अंथरुणावरच पसरतात अशी परिस्थिती असते. एकंदर ज्येष्ठांची संख्या लक्षात घेता एक सरकारी नोकर सोडले तर फारच नगण्य लोकांना किंवा ज्येष्ठांना म्हणा, निवृत्तीवेतनासारखा लाभ मिळतो. ज्यांना मिळतो त्यांनाही मिळणारे वेतन चढत्या वयानुसार अपुरे पडू लागते. त्यामुळे आम्ही सर्व ज्येष्ठांचे वर्गीकरण करून त्यांच्या श्रेणीनुसार त्यांना निवृत्तीवेतन, भत्ते मिळावे यासाठी लढा देणार आहोत. त्यांचे वर्गीकरण आणि वेतन असे सुचविणार आहोत.

श्रेष्ठ वर्ग ३ -६० ते ७० वर्षे.वेतन पन्नास हजार.

श्रेष्ठ वर्ग २ – ७० ते ८० वर्षे. वेतन साठ हजार.

श्रेष्ठ वर्ग ३ – ८० च्या पुढे. वेतन सत्तर हजार.

शिवाय महागाई निर्देशांकानुसार हे वेतन दर पाच वर्षांनी वाढेल.

प्रवास सवलती: सर्व प्रवास, बस, रिक्षा, टॅक्सी, विमान मोफत.

वैद्यकीय सवलती.: सर्व पंचतारंकित हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी, उपचार, औषधे, सेवा.

“तूर्तास आम्ही एवढेच साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय कशी वाटते कल्पना?”

“फारच छान. परंतु यात एक छोटीशी त्रुटी वाटते.”

“काय ती?”

“साहेब, सर्व ज्येष्ठांना त्यांची पात्रता लक्षात न घेता फक्त वय या एकाच निकषावर सरसकट असा आर्थिक लाभ देणे हे कुठल्या तत्त्वात बसते?”

“काका ज्येष्ठांचा सांभाळ करावा ही आपली संस्कृती आहे. त्यांनी उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत करावे या हेतूने ही योजना आहे. वृद्धांनी काम करावे असा नाही. त्यांचा तो अधिकारच आहे आणि मग काम हा निकष बाजूला पडतो त्यामुळे सर्वांना सारखाच आर्थिक लाभ का नाही चालणार?”

“साहेब, एक वेळ हे मान्य करता येईल पण यात आणखी एक धोका संभवतो.”

“धोका? तो कोणता?”

“साहेब वृद्धांना जर असे पैसे घर बसल्या मिळाले तर तरुणमंडळी काम न करता घरीच बसतील. आईवडिलांकडून एवढी कमाई झाल्यावर त्यांना कसली चिंता?”

“मग बरेच की! नाहीतरी सध्या बेकारांच्या टोळ्या कोण पोसतो? आईवडीलच ना? मग झालं तर.”

“पण यामुळे शासनाच्या तिजोरीवर भार पडून शासन झोपणार नाही का?”

“काका, सध्या तरी कुठे जागे आहे? आमदार, खासदार लुबाडताहेतच ना? मग ज्येष्ठांनी काय घोडं मारलंय? शिवाय तुमचा का विरोध? अहो तुम्हीसुद्धा या वयात घरी आराम करायचा तर अशी वणवण का करता? लोकशाहीत प्रत्येकाने आपापला फायदा पाहायचा. तो लोकांचा अधिकारच आहे. आदर्श लोकशाही म्हणजे तळागाळापर्यंत सर्वांना फायदा देणारी पद्धती. तो कसा मिळतो याच्याशी काही देणंघेणं नसतं लोकशाहीत.”

“वा! गलितगात्रे साहेब, आपण नुसते ज्येष्ठ नाही तर श्रेष्ठही आहात. आपल्यासारखे श्रेष्ठ या देशाची लोकशाही सर्वश्रेष्ठ करतील यात काही शंका नाही. भारत लवकरच महासत्ता होणार असे म्हणतात. परंतु आपली कल्पना साकार झाली तर महासत्ताच काय ती लवकरच महासर्वश्रेष्ठ सत्ता होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. धन्यवाद!” मुलाखत फारच गाजली. रोजची पहाटचा पाठपुरावा आणि सर्व ज्येष्ठांचा जबरदस्त रेटा यापुढे सरकार नमले आणि अखिल भारतीय ज्येष्ठ महासंघाच्या मागणीनुसार सर्व ज्येष्ठांना श्रेष्ठ पद वर्गवारीनुसार मिळाले आणि १ एप्रिल २०१० पासून सर्व श्रेष्ठांना घरपोच पेन्शन/पगार/मानधान मिळू लागले. तुम्हाला अजून मिळाले नसल्यास अ.भा.ज्ये. महासंघाशी संपर्क साधा. फोन नं. ४२०४२०४२०४२०. (फोन सेवा २४ तास उपलब्ध)

-विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..