नवीन लेखन...

जादूचे कारंजे

मी तिच्या स्वप्नात असणार. म्हणजे ती माझं स्वप्न पाहात असणार. त्याशिवाय या घटना घडणं शक्यच नाही. की मीच स्वप्नं पाहातोय? या सगळ्या घटनांची? स्वप्नांची ?

तिचं आणि माझं नुकतंच भांडणं झालेलं. आम्ही दूर एकमेकांपासून आणि झेंडे फडकावून बोलतोय एकमेकांशी खुणांच्या भाषेत. – पण हा अडथळा कसला? कुणी ऐकतंय ? गंगांधर गाडगीळ? कॉनन डॉयल? की एरिक क्लॅप्टन ? मी वेडा झालोय का? –  म्हणून म्हणतो की एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला पूर्ण समजू शकत नाही कधीच. नवीन काही घडतच नाही, सगळं घडून गेलंय आधीच. मी तिला सांगतो की ती मूर्ख आणि लहानशी आहे म्हणून. पण तिच्या काहीच खुणा नाहीत हे का ? अजूनही?

माहितीयमाहितीयमाहितीयमाहितीय….

तिचं स्वप्नं सुरूच राहतं. मी टक्क जागा. संगीत. स्वप्नातलं की मी ऐकतोय ते? की तेच आहे स्वप्नात ? की काहीच ऐकू येत नाहीय ? प्रश्‍नचिन्हांची संख्या वाढतेय. काहीतरी करायला हवं. प्रश्‍नचिन्हं संपली पाहिजेत सगळी. तिच्या स्वप्नात मी भटकतोय एकटा. आणि मी स्वतःला फाशी देणारै, दुःखी किंवा वेडा, पण एकटा !

तिच्या स्वप्नातला मी अतिशय घाबरलेला असतो. म्हणून घामानं ओलं झालेलं तिचं कपाळ. तिच्या स्वप्नात एकाएकी गुलाबावर पहाटे पडलेले सुवासिक दवबिंदू.

कारण मला कल्पना आहे, की मी खरा नाही. आहे तिच्या स्वप्नाचा एक भाग. जोपर्यंत तिला येत नाही जाग. ही अवस्था असते छान. अस्तित्व नसण्याची. कारण अस्तित्व. अस्तित्वात असणं हीच अपराधीपणाची भावना.

कदाचित तिच्या स्वप्नातला मी. तर्रर्र होईपय्रंत दारू प्यालेला, एका ट्रक खाली पडलोय् चिरडलेला. इथे मृत्यू आहे वाट पाहत. खडूच्या रेषा टायरच्या खुणा-गर्दी-दिवे लाल हिरवे-

हिरवा-धावपळ-

काळं डांबर-

पांढरे पट्टे-

शिवाय पोलिस-आणि अशा अवस्थेत का होईना ? मी स्वप्नात तिच्या.

अपघात घडतातच-त्याचं स्पष्टीकरण नसतं-निदानं स्वप्नात तरी.

लहानपणी मी एक पंचवीस पैसे किमतीचं पुस्तक वाचलं होतं, त्याचं नाव होतं- जादूचे कारंजे!

“हा रहस्यांचा बोगदा, खणायला सुरुवात. आमचे नेहमीचेच दर. अधिक वरखर्च. गोपनीय माहिती. डायरीत लिहिलेली. ही माझी स्वतःची तपासणी. नाही सार्वजनिक उलटतपासणी. काही दोष काढायचेत. घाण उपसणे. मजजवळ परवाना आहे, असल्या कामांसाठी. विद्रोह, विश्‍वासघात, यांना नेहमीच क्षमा असते. आणि कारण जेव्हा सापडेल, तेव्हा मी तुम्हाला कळवीनच. काय सापडलं तुम्हाला ? आणखी एक दिवस ? काय सापडलं तुम्हाला ? हिरावून नेण्यास? व्हिस्कीची एक क्वार्टर, आणि तू तिचं नाव उच्चारतोस. एका खिडकीवरचे पडदे निळे, आणि तिचे फिकट, मृदु डोळे. आयुष्यभरासाठी जखडलेलो. नुकसानभरपाई काहीही नाही, स्वतःच्या तपासणीत.

आतापर्यंत सगळी आवाजरहित स्वप्नं असतात. आता दूरवर एक काळोखाचा ठिपका वाजायला लागतो-ठक्-ठक्-ठक्-आणि त्याच्या भोवती शांततेचे तुकडे स्वरांनी गुंफले जाऊन काळ्या निर्वात प्रदेशात एक गाणं निनादत राहतं. विशेषतः ते शांततेचे तुकडे.

मी डायरीत बाजूच्या जागेत स्वतःसाठी सूचना लिहितो: आणखी बारीक तुकडे केले पाहिजेत. सूक्ष्म.

निर्वात प्रदेश ? टॉरिसेली ? हेच नाव आहे नं?

वितळवलेल्या सोन्याचा तयार केलेला एक प्रचंड मनोरा. त्याच्या टोकावर एक घुमट. भव्य कुत्र्याच्या छत्रीसारखं दिसणारं. घुमटावर मध्यभागी एक लंबवर्तुळाकार छिद्र. हेच ते कारंजे.

पुन्हा स्वप्नांमधे आवाज घुसतात. सूर्य दुपारचा कंटाळवाणा. मला कंत्राट मिळालंय. खूप जुनं आहे म्हणे हे कारंजं. वर घुमट असणारा एक मनोरा. यात कारंजाची रचना आहे म्हणे. आता सगळं शेवाळलेलं. प्रथम दहा दिवस तर नुसता पंपांचा आवाज, ध् ध् ध् ध् ध् ! कानडी मजूर. त्यांचा कलकलाट, ट्रक्स, वेगवेगळी यंत्र लावलेले ट्रक्स. पाणी उपसून काढल्यानंतर त्यांचे आवाज. कारंजावरचे थर हळूहळू निघतायत.

त्या लंबवर्तुळाकृती छिद्रातून वेगवेगळ्या आकाराची कारंजी उडायची. त्या छिद्राला जोडलेली एक नळी. त्या नळीला दोन फाटे फुटलेले. एक फाटा उंच डोंगरावर असलेल्या तलावाच्या तळाशी उघडतो. दुसरा एक पारा भरलेल्या दुहेरी नळीला जोडलेला. त्यापैकी एक टोक बंद. त्यात टॉरिसेलीचा निर्वात प्रदेश. तळ्यातून कारंजाला पाणीपुरवठा होतो, आणि पारा भरलेल्या नळीनं एक झडप सुरू-बंद होऊन कारंजाभोवतीची पाण्याची पातळी कमी झाली-वाढली की कारंजं सुरू बंद होतं. अशी साधी रचना. जादूचं काहीच नाही.

तिच्या स्वप्नात शिरण्यासाठी मी कपाटात शिरून पोषाख निवडतोय. शेवटी मी तिच्या प्रियकराचा वेष निवडतो. म्हणजे माझा नव्हे. सगळं विश्‍व मला पोषाख निवडण्यासाठी मोकळं असतं. कारण मी तिच्या स्वप्नाचा एक भाग असतो. आणि पूर्ण विश्‍व हा माझा एक भाग.

हळूहळू कारंजाचं कौतुक कमी झालं. ज्या राजाच्या कारकीर्दीत ते बांधलं गेलं त्याच्या 2-3 पिढ्या राज्य करून गेल्या. कारंजाची झडप गंजून काम करेनाशी झाली. त्यामुळे ते सतत उडतच रहायचं. मग तळ्याच्या तळाशी उघडणारा फाटा बंद करून टाकला. तेव्हा ते कायमचं बंद झालं.

आता कारंजाच्या मनोर्‍याभोवती क्रेन्सचे आवाज सुरू होतात. पण ते छान असतात. घर्रर्रर्र… असे, आणि हुंम्म्म्.. असा एक हुंकार मिसळलेले. अगदी खालच्या भागातले मातीचे थर ट्रकांना लावलेल्या यंत्रांनी खरडले जातायत. बोलणार्‍या आवाजांचा कलकलाट यंत्राच्या आवाजांनी झाकून टाकलाय्, पण जाणवतो. तारेवरच्या सरकत्या पाळण्यातून मी कारंजाच्या टोकाशी उभारलेल्या फलाटावर जातो. इतक्या उंचीवरून घेरी येते.

कारंजं बंद पडल्यानंतर त्याभोवती साठलेलं डबकं तसंच राहिलं, इतकंच काय, वाढत गेलं. कारंजावर मातीचे थर चढले. कारंजाचं टोकदेखील बुडून गेलं. हळूहळू लोक तिथे कारंजं होतं हेदेखील विसरून गेले. तिथे एक पर्यटकांचा तलाव तयार झाला. होड्या वल्हवण्यासाठी.

झोपलेली ती स्वप्नात स्मित करते तेव्हा स्वप्नात तिनं स्वप्नातल्या प्रियकराला आजच्या स्वप्नात सगळं देऊन टाकायचं ठरवलेलं असतं. ती त्याच्या मिठीत असते. तो तिच्या वरच्या ओठावरचा काळा तीळ खाऊन टाकायचा प्रयत्न करत असतो. तिच्या अंगाअंगातून त्याचा स्पर्श विजेच्या प्रवाहासारखा नसांमधून वाहत असतो. तो तिचं शेवटचं वस्त्र उतरवून तिला मुक्त करतो. ती त्याच्या स्पर्शात मावेनाशी होऊन टॉरिसेलीच्या निर्वांत प्रदेशात सुरू झालेलं आणि अजूनही सर्वांगावर निनादणारं गाणं ठक्…ठक्…ठक्… ऐकत राहते. तिचा प्रियकर स्वतःची वस्त्रं उतरवायला लागतो. तिच्या डोळ्यासमोर सोनेरी कारंजं झळाळून जातं. सूर्यास्त होतानाचं. सूर्य त्या प्रचंड-सोनेरी मनोर्‍यावर टेकलेला. त्या घुमटाचं चुंबन घेऊन सोन्याच्या रंगाची वर्तुळं सभोवार फेकणारा. सरते शेवटी तिचा प्रियकर स्वतःचा चेहरा उतरवून ठेवतो आणि तिच्या जवळ येतो. त्याबरोबर तिला मी दिसतो. तिच्या स्वप्नात. ती दचकून जागी होते, कपाळ दाबत विचार करते, ही जाग स्वप्नातली का खरी? तिचं स्वप्न कुणाविषयी असावं? माझ्याविषयी, प्रियकराविषयी, की पोषाखविषयी? आणि ते कारंज? त्याचं काय? स्वप्नातलं स्वप्न?

आता कारंजावरचे सगळे थर निघालेले असतात. ते सोन्याचं आहे हे कळून आलेलं असतं. त्यामुळं संरक्षण व्यवस्था असते. बंदुकधारी माणसं. सोन्यासाठी. आता दुपारचा सूर्य जास्तच कंटाळवाणा होत जातो. आता यंत्राचे आवाज नाहीसे होऊन कारंजं आणि त्या भोवतालचा निळा संगमरवरी भाग पूर्ण स्वच्छ झालेला असतो. आता कामगारांचा गलका हाच आवाज असतो. आता दुपारचा सूर्य कंटाळत कंटाळत संध्याकाळचा होतो. आता मला मी हे कंत्राट का घेतलं हे कळेनासं होतं. आता सूर्य दूरवर दिसणार्‍या त्या भव्य सोनेरी मनोर्‍याच्या घुमटावर टेकतो, त्या लंबवर्तुळाकर छिद्राचं चुंबन घेतो. प्रकाशाची हिरवी-पिवळी-जांभळी धमक वर्तुळं कारंजातून काही क्षण उडत राहातात. आता सूर्य थोडा खाली सरकतो. आता जादू संपते. आता कामगारांच्या माना पुन्हा खाली जातात. आता कुणीतरी बोलायला सुरूवात करून गलक्याची झडप उघडतो. आता कामगारांच्या गलबलाटात कारंजं पार घुमटापर्यंत बुडून जातं. आता मला तिची अंधुकशी आठवण येते.

ती माझी स्वप्नं पाहतेय, अशी स्वप्नं तिच्या स्वप्नातला मी पाहतोय अशी मूलभूत रचना असावी: अशी मी डायरीत नोंद करतो. थोडा वेळा अक्षरांकडे पाहतो. या स्वतःला सूचना असतात. आणख एक नोंद मला सुचते. मी लिहितो:

निष्कर्ष : 1) मला अस्तित्व नाही. 2) मी खरा नाही. 3) सगळे निष्कर्ष पूर्ण चुकीचे असण्याची शक्यता आहे. हा निष्कर्षदेखील त्यात धरलेलाय. 4) तू मूर्ख आहेस.

माहिती आहे. माहिती आहे. माहितीआहेमाहिती….

आजकाल तिच्या स्वप्नात अधूनमधून डोकावणारा मी हताश झालेला वाटत असतो. माझ्या डोळ्यांमधे एक पोकळी असते. निर्वात, तुम्हाला टॉरिसेलीचा निर्वात प्रदेश म्हणजे काय ते माहिती आहे? एक काचेची एक बाजूनं बंद असलेली लांब नळी घ्या. ती पार्‍यानं पूर्ण भरा. तोंडावर अंगठा दाबून धरा. एका काचेच्या वाटीत पारा घ्या. त्यात ही नळी उलटी करा. अंगठा काढून घ्या. नळीचं बंद टोक आता वर आहे, आणि उघडं तोंड वाटीतल्या पार्‍यात. अंगठा काढून घेताच बंद टोकाकडचा पार्‍याचा स्तंभ बंद तोंडापाशी खाली सरकून काही जागा रिकामी करतो. आता या जागेत काहीच नसतं. हवा देखील नाही. या जागेला टॉरिसेलीचा निर्वात प्रदेश असं म्हणतात.

सोन्याच्या कारंजाभोवतीचे बंदूकधारी ठिपके चंद्रप्रकाशात स्पष्ट दिसतात.

घराच्या आजूबाजूला डोंगर पसरलेले, घरातल्या एका खोलीत स्लॉटेड अँगल्सच्या काड्यांना मच्छरदाणी लावलेली आणि मच्छरदाणीच्या आत ती झोपलेली. खिडकीतून चंद्रप्रकाश बरोबर तिच्या चेहर्‍यावर आणि त्या चंद्रप्रकाशात तिचा चेहरा घाबरलेला, पण जास्तच सुंदर दिसणारा. तिला आता वेगळ्या प्रकारची स्वप्नं पडत असावीत. तिची छातीदेखील जास्त जोरजोरात वरखाली व्हायला लागते. मच्छरदाणीच्या जाळीतून तिच्या चेहर्‍यावर पसरलेला जाळीदार चंद्रप्रकाश रहस्यमय दिसतो.

तिच्या स्वप्नात मी असतो, आणि इतर काहीजण, बंदुकधारी. त्यापैकी एकानं बंदूक तिच्यावर रोखलेली असते आणि इतरांनी मला जखडलेलं असतं. ते प्रथम माझे कान एका तीक्ष्ण हत्यारानं फोडतात. नंतर जीभ कापतात, डोळ्यांमधे गंजलेले खिळे घालतात, आणि गंगाजल त्यात ओततात. ती मला दिसेनाशी होते. आणि ते अ‍ॅसिड माझे डोळे जाळत जाळत मेंदूपर्यंत पोहोचतं. एकजण मला लाथाडत एका तळाघरात नेतो. मला काहीच करता येत नसतं. कारण स्वप्न तिचं असतं, आणि त्यात बदल मी कसा करणार? तळघरापर्यंत त्यांचे तिच्याशी झोंबाझोंबी केल्याचे आणि तिच्या किंकाळ्यांचे आवाज पोहोचत असतात, पण माझे कान फोडल्यामुळे ते मला जाणवत नाहीत. असे बरेच दिवस जातात. ते मला हाडांमधून ऐकायला, नाकाच्या सहाय्यानं वेगवेगळी माणसं ओळखायला शिकवतात. बाहेरचं सगळं विश्‍व आपल्या शरीरातच सामावलेलं असतं असं ते मला सारखं सारखं सांगून पटवून देतात. मला बाहेरचं विश्‍व पुन्हा बघण्याची उत्सुकता असते. तेव्हा ते दार उघडतात. बाहेरचं विश्‍व-तळघराच्या बाहेरच्या बाजूला दुसरं तळघर असतं. की बाहेर एक आरसा असतो? तिथे माझ्यासारखाच एकजण असतो. तोदेखील माझ्याबरोबरच उठतो. प्रतिबिंब? आणि जेव्हा मी फटीला माझा आंधळा डोळा लावतो तेव्हा तोदखील फटीला डोळा भिडवतो. दोन आंधळे डोळे एकमेकांमधे खोल पाहतात आणि मधे निर्माण झालेल्या टॉरिसेलीच्या पोकळीत एकाएकी ते सोनेरी कारंजं झळाळून उठतं, आजूबाजूच्या निळ्या संगमरवरी जादूसहित. ती स्वप्नात किंचाळते, आणि मला ते हाडांमधून ऐकू येतं.

ठक्-ठक्-ठक्- काळोखाच्या एका बिंदूभोवती शांततेचे तुकडे गुंफन तयार झालेलं ते गाणं निनादत राहतंच अव्याहतपणे.

सूर्यप्रकाश आणि चंद्रकिरण. भरडलेले एकत्र. सवय नेहमीचीच. वातावरण बदलण्याची. मी मिळवतो कर्ज. ती कण्हते. तिला आवडतो आइस्क्रीम कोन. स्वप्नं होतात दाट. ठक्-ठक्-ठक् ! तेवढ्यात वाजतो, जवळ ठेवलेला फोन. ती आणि तिचा प्रियकर, मग मी कोण?

आता मी घेतलेलं कंत्राट पूर्ण होत आलेलं असतं. आता मी विश्‍वाचं दार उघडतो आणि त्या कपाटात शिरतो. स्वतःचा पोषाख चढवून बाहेर येतो. आता वितळून वाफ होऊन तिच्या स्वप्नात जाण्यासाठी मी तयार असतो.

उंच चढावाचा डांबरी रस्ता. उजव्या बाजूला एक पटांगण, खाली, खोलगट भागात, डाव्या बाजूला डोंगरांच्यामधे एक घर. त्यातल्या एका खोलीत स्लॉटेड अँगल्सच्या पलंगावर मच्छरदाणीत ती झोपलेली, स्वप्न पाहत. पहाट होत आलेली.

स्वप्नात ती समारंभाच्या केंद्रस्थानी असते. ती आणि ते सोन्याचं कारंजं. त्या घुमटाभोवती तात्पुरता बांधलेला फलाट उद्घाटनासाठी. उद्घाटन ती करणार असते. खाली दूरवर संगमरवरी खोलगट वाटीसारखा भाग आणि नंतर सभोवर पसरलेली प्रचंड गर्दी. तिच्यावर कॅमेरे लखलखत असतात. ती त्या घुमटावर झुकते. क्षणभरासाठी गर्दीला विसरते. त्या क्षणापुरतं ते सोन्याचं कारंजं लहान होतं. तिच्या हातात मावण्याएवढं. ती आपले पातळसे ओठ त्या लंबवर्तुळाकृती छिद्रावर ठेवते. सोन्याच्या झळाळीत तिच्या वरच्या ओठावर उजव्या कोपर्‍यात असलेला तीळ स्पष्ट दिसतो. दुसर्‍याच क्षणी कारंजं पुन्हा भव्य होतं, ती त्याच्या घुमटाशी असलेला एक ठिपका. कारंजातून तुषार वेगवेगळ्या आकारांमधे वर झेपावतात. टाळ्यांचा कडकडाट होतो. सोन्याच्या घुमटाला सूर्य टेकतो. फलाटावरच्या लोकांचे डोळे दिपतात. हिरवी, पिवळी, जांभळी धमक वर्तुळं, आणि आता तुषारांच्या आतषबाजीत सूर्यानं विणलेली एकात एक गुंफलेली एकूण सात इंद्रधनुष्यं!

 

लेखकाचे नाव :
अनिरुद्ध बनहट्टी
लेखकाचा ई-मेल :
anibanister@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..