नवीन लेखन...

शिवरायांच्या ‘छत्रपती’ या संज्ञेबद्दल माहिती

 श्री. साळुंखे यांनी ‘मराठी सृष्टी’वर, ‘मला एक प्रश्न पडलाय’ अशा शीर्षकाचा लेख लिहिला आहे, ज्यात त्यांनी ‘छत्रपती’ या शिवाजी महाराजांच्या बिरुदाबद्दल चर्चा केली आहे . प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला शिवरायांच्या ‘छत्रपती’ या अभिधानाबद्दल कुतूहल असतेंच. साळुंखे यांनी तो शब्द ‘क्षेत्रपती’ या शब्दापासून निघाला असावा असें मांडलें आहे. त्यांनी दाखवलेला अर्थ सराहनीय आहेच. शिवराय हे ‘श्रीक्षेत्र महाराष्ट्राचें’ दैवत आहे, यात शंकाच नाहीं.
 परंतु, ‘क्षेत्रपती’ या शब्दाचा अपभ्रंश ( त्यातील ‘त्र’ कायम राहिल्यास), खेत्रपती, शेत्रपती किवा छेत्रपती असा झाला असता, ‘छत्रपती’ असा नव्हे. (‘क्षेत्र’ या संस्कृत शब्दाचें मराठीत ‘शेत’ असें रूप होतें, तर हिंदीत ‘खेत’ असें होतें. पंजाबीत ‘क्षेत्रपाल’ चें ‘खेतरपाल’ असें व्यक्तिनाम होतें) . राजस्थानातील, व हिंदीभाषी प्रदेशातील, उच्चाराप्रमाणें , ‘क्ष’ चा ‘छ’ होतो. इतिहासाचार्य राजवाडे यांनी दिलेली कांहीं उदाहरणें अशी : *‘क्षत्रसार’ याचें ‘छत्रसाल’ , *लक्ष्मण चें ‘लछमन’ , *दक्षिण चें ‘दछ्.छिन’ (दच्छिन).
 ‘छत्रपती’ या शब्दाचा उगम वेगळा आहे, हें राजवाडे यांच्या लेखावरून दिसतें. राजवाडे यांचें इतिहासाच्या क्षेत्रातील महान कार्य सर्वज्ञात आहेच. परंतु, ते भाषाकोविदही होते. त्यांनी भाषा, संस्कृती, व्याकरण, लोकसमूहांचें स्थलांतर, इत्यादी विषयांवरही विपुल लेखन केलेलें आहे. ‘छत्रपती’ शब्दाच्या उगमाबद्दलच्या त्यांच्या लेखाच्या महत्वाच्या भागाचा संक्षेप मी खाली देत आहे. (संदर्भ : राजवाडे लेखसंग्रह, भाग दोन व तीन : संकीर्ण निबंध).
 [ टीप : (१) ’छत्रपति’ मधील ‘ति’ हा, संस्कृतमध्ये व तत्सम शब्दांमध्ये र्‍हस्व असतो. परंतु, आतां मराठीत हा शब्द stand-alone अशाप्रकारें लिहितांना, ‘ती’, ( म्हणजे, ‘छत्रपती’ असा), दीर्घ लिहिला जातो. परंतु, राजवाडे यांनी , तत्कालीन पद्धतीप्रमाणें, ‘ति’ र्‍हस्व लिहिलेला आहे. या सर्वांचा विचार करूनच, खाली हेतुत: , ति/ती हा, र्‍हस्व किंवा दीर्घ लिहिलेला आहे, याची नोंद घ्यावी .
(२) शिवरायांचा एकेरी उल्लेख हा केवळ लेखनसोयीसाठीच आहे. राजवाडे यांनीही तो तसाच एकेरी वापरलेला आहे ] .
 कवि भूषण याच्या काव्यात छत्रपति हा शब्द येतो. जसें, ‘छटी छत्रपति को जीत्यों’ , ‘सबै छत्रपति छाँडी’ .
 ग्रँट डफ लिहितो की, १६६४ पासून, म्हणजे शहाजीच्या मृत्यूनंतर, शिवाजीनें नाणें पाडण्यांस सुरुवात केली, व शिवाजीच्या नाण्यांवर ‘छत्रपति’ ही अक्षरें तेव्हांपासून आहेत.
(टीप : याचा अर्थ असा की, १६७४ ला, राज्याभिषेकानंतरच शिवराय ‘छत्रपति’ हें बिरुद लावूं लागले, असें नसून, वस्तुस्थिती वेगळी आहे).
 ‘छत्रपति’ हा शब्द पुरातन काळीं जंबुद्वीपात प्रचलित होता; गजपति, छत्रपति, अश्वपति, नरपति, हे राजे जंबुद्वीपाच्या दक्षिण, पश्चिम, उत्तर आणि पूर्व प्रदेशात राज्य करतात अशी पुराणांत कथा आहे ; असा उल्लेख ‘बील’ यानें केलेल्या, ‘सी यू की’ या चिनी पुस्तकाच्या भाषांतरात आलेला आहे. या पुस्तकातील ‘छत्रपति’ हा शब्द ‘क्षत्रपति’ या शब्दाचें रूपांतर होय. (‘क्षत्रपति’बद्दल आपण पुढे पहाणारच आहोत).
 ‘छत्रपति’ हा शब्द ‘छत्र’ व ‘पति’ या दोन शब्दाच्या समासानें झालेला आहे. छत्राचा जो पति म्हणजे धनी (मालक) तो, छत्रीवाला, म्हणजे छत्रपति . पण असा या शब्दाचा वाच्यार्थ रूढ नाहीं. छत्रीवाला याला ‘छत्रधारी’ असा संस्कृत शब्द आहे.
 ‘हैम’ (सुवर्णमय, सोन्याचें) छत्राचा जो पति, तो ‘छत्रपति’, हा दुसरा रूढ-अर्थ झाला. छत्रपति, म्हणजे ‘चक्रवर्ती राजा’ , ‘सम्राट’. सम्राट म्हटला की त्याला सोन्याची छत्री ही असायचीच.
 [ आपट्यांच्या कोशात, ‘छत्रपति’ याचा अर्थ ‘चक्रवर्ती, सम्राट’ असा ते देतात. जंबुद्वीपातील एका पुरातन राजाचें ‘छत्रपति’ हें नांव होतें, असेंही आपटे सांगतात ] .
 छत्रपती म्हणजे सम्राट एवढ्यानेंच या शब्दाची व्याप्ती होत नाहीं. पृथ्वीवर कोणी छत्रपती झाला म्हणजे त्या वेळीं अन्य छत्रपती संभवत नाहीं.
 आक्रांता झाली असलेली पृथ्वी छत्रपती राजाच्या शासनानें, एकछत्र होते.
‘एकछत्रा मही यस्य प्रतापाद्.भवत्पुरा’ – महाभारत, शांतिपर्व.
 ‘छत्रपत तुम शेखदार शिव’ असा शिवाजीला उदेशून ज्या पदात उल्लेख आहे, तो ‘छत्रपत’ , चक्रवर्ती स्वरूपाचा होता. ( शेखदार : पुढारी असलेला ).
 ‘क्षत्रपति’ हा शब्द फार जुना आहे. ‘क्षत्राणाम् क्षत्रपरिर् असि’ असें तैत्तिरीय संहिता सांगते. ब्राह्मण ग्रंथामध्येही क्षत्रपतिचा उल्लेख आहे : ‘क्षत्राणाम् क्षत्रपतिरसीत्याह । क्षत्राणामेवैन क्षत्रपतिं करोति ।’
(तैत्तिरीय ब्राह्मण संहिता). ‘षोइत्रपैति’ ( Shoitra-Paiti) या रूपानें तो झेंद भाषेत ( म्हणजे अति-पुरातन पर्शियन, झेंद अवेस्थाची भाषा, हिच्यात) सापडतो. ग्रीक भाषेत हा, ‘सत्रप’ (Satrap) या रूपानें अवतरला.
अलेक्झँडरच्या पश्चात जे ग्रीक अधिकारी पंजाबपासून ते आशिया-मायनरपर्यंत झाले, त्यांन ‘सत्रप’ अशी संज्ञा देतात. जुन्नर, कांहीं कोंकण किनारा, अंशत: गुजरात व राजपुताना-माळवा या भागात इ.स.पू. पहिलें शतक ते इ.स. चें तिसरें शतक या काळात राज्य करणार्‍या कांहीं, भारताबाहेरून आलेल्या, राजांना ‘क्षत्रप’ म्हणत असत. ‘सी-यू-की’ या चिनी ग्रंथातील, ‘क्षत्रपती’च्या, ‘छत्रपती’ या अपभ्रंशाबद्दल आपण आधीच पाहिलें आहे.
 ‘क्षत्र’ म्हणजे क्षत्रियाचें कुल. त्यांचा पालक, किंवा रक्षण करणारा जो, तो ‘क्षत्रपति’.
 संस्कृत ‘छत्रपति’ ; आणि संस्कृतमधील-‘क्षत्रपति’_या_शब्दापासून-अपभ्रंश-झालेला-‘छत्रपति’ ; या दोन शब्दांचा अर्थ भिन्न आहे. संस्कृत ‘छत्रपति’ शब्दाचा अर्थ ‘सम्राट राजा’ असा आहे ; तर ‘क्षत्रपति’ या शब्दापासून अपभ्रष्ट रूप होऊन निर्माण झालेला ‘छत्रपति’ या शब्दाचा अर्थ ‘क्षत्रकुलाचा पुढारी’ असा आहे. अपभ्रष्ट-रूप-असलेला ‘छत्रपति’ हा शब्द ‘सम्राट राजा’ या अर्थानें वापरला जात नाहीं.
 मुघल व दक्षिणेतील शाह्यांपुढे भारतातील सर्व क्षत्रकुलें केवळ नम्र होऊन राहिली होती. त्या शत्रूंना, (शहाजीनें, व) शिवाजीनें नरम आणलें. त्यामुळे, नुसत्या महाराष्ट्रातीलच नव्हे, तर सर्व भारतातील क्षत्रकुलें त्या अरींच्या भीतीपासून मुक्त झाली.
 शिवाजीच्या वेळी, सोन्याची छत्री व बाकीची साम्राज्याची चिन्हें फक्त दिल्लीश्वरालाच असत ; भारतातील इतर राजांना नसत. त्या पार्श्वभूमीवर, शिवरायांचें ‘छत्रपती’ हें अभिधान विशेष महत्वपूर्ण आहे.
 तेव्हां, ‘चक्रवर्ती सम्राट’ व ‘आक्रांतापासून हिंदुस्थानचें रक्षण करणारा’ ; तसेंच ‘क्षत्रकुलाचा पुढारी’ , या दोन्ही अर्थांनी शिवराय हे ‘छत्रपती’ होते, हें नि:संशय. कवि भूषण व समर्थ रामदास हे, शिवरायांना दिल्लीश्वरापेक्षाही जास्त योग्यतेचा समजत. आपणही त्यांच्याशी नक्कीच सहमत होऊं.
+ + +
– सुभाष स. नाईक . मोबाइल : ९८६९००२१२६. ई-मेल : vistainfin@yahoo.co.in

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

1 Comment on शिवरायांच्या ‘छत्रपती’ या संज्ञेबद्दल माहिती

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..