नवीन लेखन...

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Infertility in Men - From the Perspective of Ayurveda

अपानवायु कशाने बिघडतो ?

अपानो रूक्षगुर्वन्नवेगाघातातिवाहनैः । यानयानासनस्थानचङ्क्रमैश्चातिसेवितैः ।।

कुपितः कुरुते रोगान्कृच्छ्रान्पक्वाशयाश्रयान् । मूत्रशुक्रप्रदोषार्शोगुदभ्रंशादिकान्बहून् ।। अ. हृदय, निदानस्थान १६/२७-२८

रूक्ष व गुरु अन्न सेवन, वेगांचा अवरोध, अतिशय कुंथणे, गाडीघोड्यावरून प्रवास करणे, फक्त बैठे काम करणे, सतत उभे राहणे, बेसुमार चालणे अशा कारणांमुळे अपानवायु कुपित होतो. ह्याने पक्वाशयाच्या आश्रयाने होणारे मूत्राघात, प्रमेह, शुक्रदोष, मूळव्याध, गुदभ्रंश सारखे कष्टसाध्य व्याधी उत्पन्न होतात.

ग्रंथात वर्णन केलेल्या ह्या कारणांव्यतिरिक्त काळानुसार इतर कारणांचाही विचार करणे आवश्यक आहे. जसे – अति प्रमाणात मैद्याचे पदार्थ सेवन करणे, कार्बोनेटेड शीतपेयांचे बेसुमार सेवन, कंबरेचा पट्टा (बेल्ट) फार घट्ट बांधणे, अतिप्रमाणात मांसाहार करणे, घाई घाईने (न चावता) जेवण करणे, मोड आलेल्या कडधान्यांचे अधिक सेवन करणे, अकाली झोप घेणे व रात्र-रात्र न झोपणे (शिफ्ट ड्युटीज, रात्रीचे ड्रायव्हिंग मुळे) अशी अनेक कारणे अपानवायु बिघडवतात. मैद्यामुळे पाचक स्रावांना पचनयंत्रणेत येण्यास अडथळा होतो, शीतपेयांमुळे पाचकस्रावांची शक्ती कमी होते, कंबरेचा पट्टा कसून बांधण्यामुळे आतड्यांची चलनवलन गती मंदावते, मांसाहार पचण्यास जड असल्याने पाचकस्रावांना पचनास पुरेसा वाव मिळत नाही, घाईने जेवतांना अन्नाबरोबर भरपूर प्रमाणात हवा अन्नमार्गात घेतली जाते, कडधान्य पचनयंत्रणेत जाऊन आंबतात व फसफसतात, जागरणाने शरीराचे बायोलोजिकल क्लॉक बिघडते. म्हणून अपानाचे संतुलन राखण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा विचारपूर्वक वापर करावा, कोणत्याही प्रकारचा अतिरेक होत नाही ह्याची खात्री करावी.

शुक्रावृतेति-वेगो वा न वा निष्फलता पि वा ॥ अ. हृदय, निदानस्थान  १६/३८

अपानवायुचे शुक्रधातुला आवरण झाल्यास शुक्राचा अतिशय वेग येतो किंवा अजिबात येत नाही, त्याने गर्भोत्पत्ती होत नाही.

कुपित वायूची लक्षणे . . .

स्रंसव्यासव्यधस्वाप-साद-रुक्-तोद-भेदनम् ॥ सङ्गाङ्ग-भङ्ग-संकोच-वर्त-हर्षण-तर्षणम् ।

कम्प-पारुष्य-सौषिर्य-शोष-स्पन्दन-वेष्टनम् ॥ स्तम्भः कषायरसता वर्णःश्यावोsरुणोsपि वा

. . . . अष्टांगहृदय, सूत्रस्थान १२/४

स्रंस म्हणजे अवयव आपल्या नैसर्गिक स्थानापासून खाली सरकणे, व्यास म्हणजे आकारमान वाढणे, व्यध – इजा होणे, स्वाप – निश्चल होणे, रुक् – रुजा किंवा वेदना होणे, तोद – टोचल्याप्रमाणे दुखणे, भेदन – आरपार छिद्र होणे, संग होणे म्हणजे दोष साठणे, अंगभंग – विकलांगत्व येणे, संकोच – आकुंचन पावणे, वर्त – उलटणे किंवा चुकीच्या दिशेला वळणे, हर्षण – रोमांच, तर्षण – तहान लागणे, कम्प – थरथरणे, पारुष्य – कर्कशपणा, सौषिर्य – भेगा पडणे, शोष – कोरडेपणा, स्पंदन – केंद्रित स्वरूपाच्या हालचाली होणे, वेष्टन – लेप केल्याप्रमाणे संवेदना होणे, स्तम्भ – निश्चल होणे, कषायरसता – तोंडास तुरट चव येणे, वर्णःश्यावोsरुणोsपि – काळपट किंवा सूर्याप्रमाणे तांबडा वर्ण येणे.

पुरुष वन्ध्यतेबद्दल विचार करतांना ह्या प्रत्येक संज्ञेचा सखोल विचार अपानवायुच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्याकरिता पुरुष लैंगिक अवयव व पुरुषबीज ह्यातील दोषांसाठी बस्ति चिकित्सेचा नितांत उपयोग होतो हे ध्यानात ठेवावे.

अपानवायुचा संबंध मानसिक स्वास्थ्याशी निगडीत आहे. “भीतीने गर्भगळीत होणे” ही जुनी म्हण आहे. मानसिक संतुलन बरोबर असेल तर गर्भ स्थिर राहतो व बिघडल्यास तो गर्भपात घडवतो. स्वास्थ्यपूर्ण गर्भाधान होण्यासाठी पुरुषांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे महत्वाचे आहे. भीती, चिंता, क्रोध, मानसिक दडपण असतांना पुरुषांचे लैंगिक अवयव कार्यक्षम राहू शकत नाहीत. अशा अवस्थेत निरोगी व सत्ववान गर्भाधान होणे शक्य नसते. औषधी चिकित्सा करतेवेळी हा मुद्दाही लक्षात घेणे गरजेचे आहे.

थोडक्यात पंचकर्मांपैकी किमान विरेचन, नस्य आणि बस्ति चिकित्सेचा प्रयोग करावा. बीजदोष नाहीसे करण्यासाठी, बीज सामर्थ्यवान होण्यासाठी व उत्तम गर्भधारणा होण्यासाठी ह्या क्रिया आवश्यक आहेत.

आता आहाराबद्दल बघूया –

सौम्यं स्निग्धं गुरु शुक्लं मधुगन्धि मधुरं पिच्छिलं बहु बहलं घृततैलक्षौद्रान्यतमवर्णं च शुक्रं गर्भाधानयोग्यं भवति॥ . . . . अष्टाङ्गसङ्ग्रहः, शारीरं स्थानम् १ / ४

शुक्र धातूचे वर्णन – सौम्य, स्निग्ध, शुक्ल वर्ण, मधाप्रमाणे गंध असणारे, मधुर, पिच्छिल, बहु, बहल, घृत, तैल, क्षौद्र (मधाप्रमाणे) दिसणारे असे शुक्र गर्भाधानास योग्य असते. आयुर्वेदाच्या “सामान्य – विशेष” सिद्धांतानुसार शुक्रधातुच्या समान असणारे गुण त्याच्या पोषणास उपयुक्त ठरतात. विरुद्ध गुणांच्या पदार्थ सेवनाने शुक्रक्षय होतो. आहारातील घटकांचा विचार केल्यास दूध, तूप, मधुर रसाचे पदार्थ हे शुक्र धातुच्या पोषणासाठी लाभदायक होतात.

सौम्य – सोम म्हणजे चंद्र ही ह्या शब्दची व्युत्पत्ती. चंद्राप्रमाणे शीतल (ज्यामध्ये आग्नेय गुणाचा अभाव आहे). शीतल गुणांमुळे शुक्रधातूची वाढ होणे अभिप्रेत आहे. वृषणकोशाची निर्मिती करतांना निसर्गाने ह्याला शरीराबाहेर टांगलेल्या अशा स्थितीत रचले ज्यामुळे त्याला हवेशीर वातावरण मिळेल व उष्णता किंवा ऊब तुलनेने कमी मिळेल. मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ३७ सेंटीग्रेड किंवा ९८.६० फॅरनहाईट्स इतके असते. एवढ्या तापमानात शुक्रबीज जास्त काळ टिकत नाहीत. ४ सेंटीग्रेड इतक्या थंड तापमानात ठेवल्यास शुक्रबीज टिकतात परंतु त्यांचे चलनवलन स्तब्ध होते. २० सेंटिग्रेड तापमानात शुक्रबीज सर्वात जास्त काळ टिकतात व चलनवलनही अबाधित राहते. म्हणून शुक्रधातुच्या रक्षणासाठी व वाढीसाठी तापमान कमी असणे आवश्यक आहे.

स्निग्ध: शुक्रधातु व वीर्य ह्या दोन गोष्टी निराळ्या आहेत. शुक्रधातु म्हणजे प्रत्यक्ष शुक्रबीज तर वीर्य म्हणजे ज्या द्रवामध्ये ह्या बीजांचे पोषण होते तो द्रव. स्निग्धता असल्याने शुक्रबीजांचे सुयोग्य पोषण होते. रुक्षतेमुळे बीजांचे कुपोषण होण्याची शक्यता असते. शुक्रधातूचे वहन, चलनवलन उत्तम राहण्यासाठी ह्या ‘स्निग्ध’ गुणाचा उपयोग होतो.

गुरु : गुरु म्हणजे जड. पंचमहाभूतांतील पृथ्वी आणि जल महाभुते फक्त गुरु आहेत व ह्यांच्या संयोगाने मधुर रस तयार होतो. शुक्रधातु मधुर असल्याने त्यात स्वाभाविकपणे पृथ्वी आणि जल महाभूतांचे प्राधान्य असते. मधुर रसाने त्याची वृद्धी होते असा अर्थ ध्यानात येतो. पण प्रत्यक्षात मात्र मधुमेही रुग्णांमध्ये शुक्रक्षीणता आढळते हे कसे? हे कोडे उलगडण्यासाठी शारीरक्रियेचा पाया लक्षात घेणे आवश्यक आहे. मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्याचे परिणमन धातु पोषणासाठी होत नाही. इन्सुलिनला धात्वग्नि समजावे. म्हणजे ह्याठिकाणी धात्वग्नि दुर्बल झाल्याने रस-रक्तातील पोषक घटक पुढील धातूंपर्यंत पोचत नाहीत अर्थात त्यामुळे शुक्र दौर्बल्य निर्माण होते.

शुक्लवर्ण : शुक्रधातु उत्तम असेल तर त्याचा वर्ण शुक्ल म्हणजे स्वच्छ पांढरा असतो. इतर कोणत्याही धातूच्या मलीनतेमुळे काही दोष निर्माण झाला तर वर्ण बदलतो. कफाचा वर्ण शुक्ल आहे व शुक्रधातुशी त्याचे साधर्म्य आहे. सामान्यतः कफ वर्धक आहार विहाराने शुक्रवृद्धी होते.

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

1 Comment on पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..