नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तेवीस

लंबी सफर का घोडा

शरीराच्या प्रत्येक अवयवाची स्थूल आणि सूक्ष्म हालचाल निरंतर होत असते. जिथे हालचाल आहे तिथे झीज आहे. ही झीज तर होणारच असते, ती अगदी कमीत कमी व्हावी याची काळजी घेणे हे आपले काम !

कोणत्याही गाडीकडे बघा. त्याच्या बेअरींगची झीज होऊ नये याकरीता ग्रीसींग करणे, गंजू नये यासाठी त्याला ऑईलपेंट लावणे, केबल्स लवकर खराब होऊ नये म्हणून ऑईलींग करणे, त्या गाडीला धुणे, त्याच्या इंजिनमधील तेल पाणी बघणे, हे आपण करत असतोच. याला आजच्या भाषेत “मेंटेनन्स” म्हणतात. नियमितपणे, आठवणीने याचा “मेंटेनन्स” करणे महत्त्वाचे, म्हणजे गाडी वारंवार गॅरेजमधे न्यावी लागत नाही.

ज्या गाडीचा मेंटेनन्स नीट नाही, ती गाडी, त्या गाडीचे अवयव लवकर खराब होतात. मग गाडी हळुहळू आवाज करू लागते. वारंवार गॅरेजमधे न्यावी लागते. तो सांगतो, या गाडीतल्या इंजिनमधील ऑईलची लेव्हल कमी झाली आहे, ऑईल बदलले पाहिजे, ब्रेक ऑईल संपले आहे, घालायला पाहिजे. चेनमधील ग्रीस संपले आहे, गियर केबल, क्लच केबल याना तेल सोडले पाहिजे.

आपण टीव्हीवर जाहीराती पहातो, त्यातही ट्रकच्या इंजिन मधील ऑईलच्या जाहीराती मुद्दाम पहा. ज्या इंजिनमधील तेल कमी, किंवा हलक्या दर्जाचे, त्या इंजिनचे ‘मायलेज’ कमी. मग तो ट्रक लंबी सफर का घोडा बनू शकणार नाही. त्यामुळे आमच्या कंपनीचे अमुक तेल वापरा ते इंजिनमधील कचरा दूर करील वगैरे……

तसेच शरीराचे देखील आहे.

दैनंदिन जीवनात या तेलाचे अनन्य साधारण महत्व असते. शरीरावर जेवढी म्हणून छिद्रे आहेत, त्या सर्व छिद्रामधून दररोज तेल आत सोडावे. जसे नाक, कान, डोळे, मलद्वार मूत्रद्वार, योनीमार्ग, आणि सर्व घर्मछिद्रे यांना तेलाचे पूरण होणे आवश्यक असते. तर आतील सर्व स्थूल अवयव आणि सूक्ष्म इंद्रिये यांचे पोषण होत असते.

शिलाई मशीनला जशी छिद्रे असतात. त्या छिद्राच्या जवळ लिहिलेले असते. “ऑईल.” याचा अर्थ या छिद्रातून तेलाचे काही थेंब या मशीनमधे किमान आठवड्यातून एकदा तरी, सोडावेत, म्हणजे ही मशीन न झिजता उत्तम काम करेल.

जेव्हा हे मशीन कामाला येते, तेव्हा त्याला डाॅक्टरांच्या गॅरेजमधे नेले जाते. ते सांगतील की ही झीज नैसर्गिक आहे, वाढत्या वयामुळे हे असेच होणार, हे दुखणे आता गृहीत धरायचे, आता कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याची वेळ सुरू झाली हा सांधा झिजलाय बदलून टाकू, इ. इ. जे एकदा आपण गृहीत धरले की औषधे आयुष्यभरासाठी सुरू झाली किंवा कापाकापी आली.
पण हेच मशीन जर वैद्यांकडे नेले तर वैद्य सांगतील, यातील तेल संपले आहे, तेल भरले पाहिजे, तेलाची बस्ती देऊया, शिरोधारा देऊया, अभ्यंग करूया, स्नेहन स्वेदन करूया, कर्णपूरण करूया, नस्य, मन्याबस्ती, कटीबस्ती, जानुबस्ती, तेलधारा सोडूया. इ.इ.

केरळीय पंचकर्म करणाऱ्या वैद्यांकडे नेले तर तेल डोणीत ठेवूया, पंधरा लीटर तेलाने चार जणांकरवी मालीश करूया, पिझिंचिल, आदि पूरक पंचकर्म करूया, इ.इ.

चला या निमित्ताने आयुर्वेदात सांगितलेल्या या सर्व उपचारांची नावे तरी कळली !

एक लक्षात येतंय का पहा, आयुर्वेदात चिकित्सा स्वरूप उपचारामधे, तेलाचा सढळ आणि मुक्तहस्ते वापर करायला सांगितलेला आहे. इथे कंजुषगिरी करून चालत नाही. जेवढे तेल इंजिनला आवश्यक आहे, तेवढे ते दिलेच पाहिजे. जर तुम्ही दररोज “मेन्टेनन्स” करणार नसाल तर कधीतरी पंचकर्म करायला तर हवेच !

लंऽऽबी रेस का घोडा जो बनना है !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..