नवीन लेखन...

इच्छाशक्ती

शुभा आणि शाम बड़ोदा सोडून मुंबईत स्थाईक झाले. दोघांचा राजा राणीचा संसार सुरु झाला. दोघही आपल्या आई वडिलांची एकुलत एक अपत्य होती. दोघांची घर बडोद्याच्या दोन टोकाला होती. शुभा अणि श्याम इंजीनियरिंग कॉलेजात एकमेकांना भेटले. सहा वर्षाच्या ओळखी नंतर दोघांनी वयाच्या तिशीत लग्न केल. दोघांमधे फ़क्त सहा महिन्याच अंतर होत. अड़तिसाव्या वर्षी ग्रेटाचा जन्म झाला. ग्रेटा सहा वर्षाची होई पर्यन्त आयुष्य संथ चालल होत. एवढ्यात शुभाचे बाबा आजारी पडले. शुभाच्या मुंबई बड़ोदा खेपा वाढल्या. शेवटी शुभाच्या आई बाबांना त्यांनी मुंबईला आणले. पण चार वर्षात शुभाचे बाबा वारले, अणि आई कायमची शुभाकड़े रहायला आली. शुभाची आई बडोद्याला शाळेत शिक्षिका होती. लोकांच्यात वावरण्याची सवय असल्याने मुंबईला तिने मैत्रीणी जोडल्या अणि आपला वेळ बरा घालवू लागली.

ग्रेटा दहा वर्षाची झाली अणि श्यामचे बाबा वारले. श्यामची आई सुद्धा श्यामकड़े मुंबईला आली. श्यामची आई गृहिणी होती. सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारी होती. दोन्ही आज्यांसाठी शुभा आणि श्यामने समोरचा रिकामा फ्लॅट भाड्याने घेतला. आणि दोन्ही आजी एकत्र राहु लागल्या. जेवण शुभाची बाई बनवून देत होती. दूध तापवणे, चहा करणे, एवढेच काम दोन्ही आज्या करीत. दोघीत मैत्री नव्हती तर एक प्रकारची औपचारिकता होती. ग्रेटाने आईच्या आईला ‘ छोटी आजी ‘ तर बाबांच्या आईला ‘ मोठी आजी ‘ अशी नाव ठेवली होती. शुभा अणि श्याम सकाळी आणि रात्री आशा दोन फेऱ्या मारुन आपापल्या आईची चौकशी करीत अणि काळजी घेत.

एका बेडरूम मध्ये दोघींच्या कॉट समोरासमोर होत्या. दोघींची दोन आरसा असलेली कपाट, दोघींसाठी एकच राइटिंग टेबल आणि दोन खुर्च्या अस सामान होत. हॉल मध्ये एक टीव्ही, सोफा अणि चार फोमच्या खुर्च्या होत्या. दिवसभर छोटी आजी हॉल मधील सोफ्यावर बसून किंवा झोपून टीव्ही बघायची. मोठ्या आजीचा बेडरूम मधील खुर्ची वर बसून पेपर वाचणे, जप करणे, वेळेत जेवणे, दुपारची झोंप काढणे असा दिनक्रम होता. तिला टीव्ही बघायला फारसे आवडत नसे.
दोघींची एकच आवडीची गोष्ट म्हणजे, मैत्रिणीं जमवून पत्ते खेळणे. आठवड्यातून तीन दिवस त्यांचा पत्यांचा अड्डा जमायचा. छोटी आजी टेबल वर पाणी भरून ठेवणे, पत्यांचे कॅट काढून ठेवणे ही तयारी करायची. तर मोठी आजी कढईत फोडणी देऊन कांदा शिजवून ठेवायची. बाजूला भांड्यात पोहे भिजवून ठेवायची. चहाच पाणी काढून तयार ठेवायची. कप बशा , प्लेट सगळ जय्यत तयार असायच. बायका दोन वाजे पर्यन्त यायच्या. दोन तें साडेचार पत्ते कुटायचे. साडेचारला मोठी आजी पटकन पोहे अणि चहा करायची. साड़ेपाच पर्यन्त खाऊंन झाल की मंडळी परत खेळायला बसायची, ते सात वाजे पर्यन्त. अस आठवड्यातून तीन वेळा चालायचं. एखाद्या दिवशी पैसे सुद्धा लावले जायचे.
एका बुधवारी सगळ्या जणी पत्ते खेळायला बसल्या. साडेचारला चहा पिऊन झाला. कोणी एकीने पत्याचा नवीन कॅट काढायला सांगितला. मोठी आजी पटकन उठली. कॅट कपाटातून बाहेर काढला. कसा कोण जाणे पण तो कॅट उघडला गेला आणि आतील कोरे पत्ते खाली पडून विखुरले गेले. काही समजण्याच्या आतच मोठ्या आजीचा पाय त्या पत्यां वरून घसरला आणि कमरेच हाड मोडलं. पत्यावरील पावडरनी हा घात केला होता. मोठी आजी पाय घसरून पडली, आणि जस काही आयुष्यच ठप्प झाल. काही काळ मैत्रिणी पत्ते खेळायला यायच्या पण हळूहळू त्यांचं पत्ते खेळायला येणं बंद झालं. छोट्या आजीने पत्ते खेळण्यातून अंग काढून घेतल आणि ती टी.व्ही. बघण्यात अधिकाधिक रमू लागली. मोठी आजी दिवसभर झोपून असायची. शुभाने मदती साठी ओळखीत कुणी बाई मिळते का पाहिलं. नशिबाने बाई मिळाल्या.
बाई येऊन तिला आंघोळ घालणे, पॉट देणे , तिचे कपडे धुणे आणि तिला जेवण वाढणे, लागल्यास ते भरवणे, अशी काम करायची. मोठी आजी झोपून दिवस भर पुस्तक वाचायची आणि जप करायची, जमेल तेवढे आनंदी राहण्याचा प्रयत्न करायची. एक फिजिओथेरेपिस्ट एक दिवसा आड येऊ लागली. इकडे छोट्या आजीने बाहेर जाणे, फिरणे पूर्णतः बंद केले. छोटी आजी सुध्दा हळू हळू संपूर्ण दिवस गादित लोळून टी.व्ही. बघू लागली. ह्यामुळे शरीर सुस्तावाले. चरबी वाढू लागली. रहाण्यात गाबाळेंपणा येऊ लागला. रोज पाय जड़ होतात, गुढगे दुखतात, डोक दुखत, भूक लागत नाही अशा तक्रारी वाढल्या. आताशा ती उठून मोठ्या आजिला बघायला बेडरूम मध्ये सुद्धा जायची नाही. खुप दिवसांनी पत्याच्या ग्रुप मधली शोभा सबनीस एकदा दुपारी भेटायला येणार होती. मोठ्या आजीने बाई कडून चांगली नविन साडी नेसवून घेतली. केसाला तेल लावून केस घट्ट विंचरुन घेतले. तोंडाला पावडर अणि फिक्कट लिपस्टिक लावून घेतली.

ह्या उलट छोटी आजी घरातल्या गाउन वर बसून राहिली. केस विस्कटलेले. ना गळ्यात, ना कानात असा अवतार होता….माझ्या सारखी तुला नटवू का ? विचारताच ती भसकन अंगावर आली म्हणाली ‘ ती सबनीशीणच येणार आहे ना ! तिच्या समोर मिरवू ? ‘ छोटी आजीच्या वाचेला थोडा कडवटपणा आला होता. शोभा आली ती हवेत तरंगतच. मोठी आजी गादीवर झोपली होती तर छोटी आजी खुर्चीवर पाय वर घेऊन केस खाजवत बसली होती. शोभा दोन महिन्याने यूरोप टूरला जाणार होती. टूरला जायच्या तयारी पासून तिने सांगायला सुरवात केली. आपण कसे नवीन कपडे विकत घेतले, नवीन बॅग विकत घेतल्या, तिकडे गेल्यावर कशी जीन्स घालणार, रस्त्यावर उभं राहून आइस्क्रीम खाणार, तिकडच्या मोठ्या मोठ्या बागा, चर्चेस, पैंटीग बघणार, हे सांगताना तिचा आनंद ओसंडून वहात होता.

ह्यामुळे तिने दोघी आजींना पंधरा दिवसांची युरोपची टूर, त्यासाठी लागणारे पैसे, त्याची तरतूद कशी केली, मुले अन् नवरा ‘ जाच ‘ कसे म्हणाले, तिथल्या देशांची नवे, तेथील प्रेक्षणीय स्थळे, सांगितली. अन् हो ही लेडीज स्पेशल टूर आहे. दोन्ही आजींचे डोळे विस्फारले. ती बोलताना ‘ अग शीला ‘ असं म्हणून छोट्या आजीशीच बोलत होती. तिला म्हणाली काही महिन्यांनी परत टूर आहे. आपल्या बाकीच्या मैत्रिणी त्या टुरला जाणार आहेत, तू सुद्धा विचार कर आणि जाच. मरायच्या आधी प्रत्येकाने एकदा तरी यूरोप पाहायलाच हवा. बँकेतील ठेवीचे पैसे थोडे तरी स्वतःच्या आनंदा साठी खर्च कर ’.
शोभाने आपला मोर्चा मोठ्या आजीकडे वळवला. मोठ्या आजीकडे म्हणजे सुरू कडे बघून म्हणाली ‘ तू नुसतं ऐक,आता तू गादीला खिळली आहेस , त्यामुळे फक्त अनुभव घे आणि देवाकडे माग, ह्या नाहीतर पुढच्या जन्मी नक्की यूरोप दाखव. पण काळजी करू नकोस, मी आज मुद्दाम तुझ्यासाठी आले. मी ठरवले आहे प्रत्येक ठिकाणाहून तुला विडिओ कॉल करून तुला यूरोपचे दर्शन घडवीन. हो पण अर्धे पैसे द्यावे लागतील, बसल्या बसल्या युरोप बघायला मिळाला म्हणून. तिघीही हसल्या. नीता निघून गेली.

मोठी आजी मंद हसली. तिच्या डोळ्याच्या कडां वरून पाणी ओघळले. ती मनात म्हणाली पुढचा जन्म कोणी बघितला, ह्या जन्मातच इच्छा ठेवीन, असे म्हणून ती पाठ फिरवून झोपली. हीच ती पहिली ठिणगी होती. शोभा चार तास बसून ह्या दोघींना यूरोपची स्वप्न दाखवून गेली. शोभा गेल्यावर दोन्ही आजीनं मध्ये संवाद घडला. छोट्या आजीने मी काही युरोपला जाणार नाही, मला आता एवढी दगदग झेपणार नाही असे सांगून टाकले. हळूहळू मोठया आजीने वाचन बंद केले. ती भिंती कडे तोंड करून झोपून राहू लागली. शोभानी किंवा घरी काम करणाऱ्या बाईंनी विचारलं हल्ली अशी का झोपतेस, तर जप करते असं सांगू लागली. फिजिओथेरेपिस्टची ट्रीटमेंट मात्र न कंटाळता घेऊ लागली. कितीही पाय दुखला तरी निर्धाराने सांगितलेले व्यायाम करू लागली. जेवण खाण, व्यायाम, एकटीच पत्याचा पेशन्स मांडू लागली.

हे करत असताना मात्र स्वतःशी सकारात्मक संवाद सुरु केला. तीच स्वतःच रुटीन सुरु झालं. स्वतःच जग उभं राहील.
बाईने अंघोळ घातली, ब्रेकफास्ट भरवला की मोठ्या आजीची मान भिंतीकडे वळत असे. मग ती स्वतःच्या कोशात जाई. ती मनाने रोज बाहेर पडे आज ती एका ट्रॅव्हल एजन्सीकडे पोचली. आपली युरोपची टूर बुक केली. ह्या येवढ्या प्रवासानी मोठी आजी मनाने दमली, गादीत पडली, अन् खुशीवर झोपली. जाग आली तेंव्हा तिला एकदम प्रसन्न वाटल. आजचा व्यायाम खूप छान झाला, हे असे म्हणत फिजिओथेरेपिस्ट सुध्दा खुश झाली होती. म्हणाली तुमची प्रगती चांगली आहे. अशीच प्रगती राहिली तर तुम्ही उड्या मारू शकाल. आजी खुदुखुदू हसली. आता मोठ्या आजीच्या मनाची लगबग सुरु झाली. कितीतरी मानसिक काम होती. कपड्यांची खरेदी करणे, एक केबिन बॅग, एक मोठी बॅग विकत घेणे, बागेत जीन्स शर्ट, स्कर्ट, टॉप्स भरणे, गॉगल, टोपी, चॉकलेट, औषध, केबिन बॅगेत भरणे, चांगले बूट…मोठाली बकेट लिस्ट झाली. मनाला क्षणाची उसंत नव्हती. मन किती वेळा देहातून बाहेर पडून दुकान फिरून येत होत. येऊन दमून खुशीत झोपत होत. मनाने टूरची पूर्ण तयारी केली. आता मन विमानात बसायला उत्सुक होते.

पायात हळूहळू जोर येऊ लागला होता. फिजिओथेरेपिस्टने श्याम आणि शुभाला वॉकर आणायला सांगितला. दोघांनाही आश्चर्य वाटले. सतत भिंतीकडे तोंड करून झोपून राहणाऱ्या मोठ्या आजीने एवढी प्रगती कशी केली ? त्यांचा विश्वासच बसत नव्हता. हे सगळे बघून मात्र छोट्या आजीवर तसू भरही परिणाम होतं नव्हता. छोट्या आजीने आता पर्यंत बिछाना घट्ट धरला. आज मोठ्या आजीच्या मनाला विमानात बसायचे होते. आज खरा प्रवास सुरु होणार होता. पहिले ठिकाण लंडन होते.आजीचं मन लंडनच्या हीथ्रो एअरपोर्टला उतरलं. लंडन आय मध्ये बसून, थेम्स नदीवर फिरलं, राणीचा पॅलेस बघून, नयनरम्य बागा बघून दमून परत आलं. मोठी आजी शरीराने ताजीतवानी होऊन आणि मनाने दमून खुशीत झोपली. उद्या पॅरिस… दुसऱ्या दिवस शनिवार होता. श्यामला सुट्टी होती. तो फिजिओथेरेपिस्ट आल्यावर आजीला बघायला आला. आज ती फिजिओथेरेपिस्टच्या मदती शिवाय उठून बसली. आजीची प्रगती अचंबित करणारी होती. फिजिओथेरेपिस्ट म्हणाली ‘ हे केवळ मनाच्या प्रबळ इच्छेनेच होऊ शकत. प्रबळ इच्छाशक्ती आणि परिश्रम दुसरे काहीही नाही.’
श्यामला आनंद झाला आणि आपल्या आईचा अभिमान वाटला.

मोठ्या आजीला हे सगळे कधी जातात आणि मी पॅरिसला पोचते असं झालं होत. ते गेले. अन् ही पॅरिस मध्ये येऊन धडकली. मन आयफेल टॉवर वर जाऊन आईस्क्रीम खाऊन आलं. पॅरिसच्या रस्त्यानं वर नाचुन आलं. आज झोप तर छानच लागली. असा मनाचा प्रवास चालूच राहिला उद्या स्विझर्लंड येथील माऊंट टिटलीस,आणि स्विझर्लंडची प्रख्यात चॉकलेटची फॅक्टरी बघायची होती. तर परवा, टॉवर ऑफ पिसा बरोबर तिरक होऊन फोटो काढायचे होते, अरे हो आज रोम…. रोम मधील स्टेडियम, कलोसीअम, रोमच फेमस कारंज बघायचा होत. त्या कारंजात तीच मन एक रुपयाचं नाणं देखील टाकून आलं. उलटे बसून ह्या कारंज्यात नाण टाकलं की मनातली इच्छा पूर्ण होते, तिला माहित होत. तिने कुस बदलली अन् मन व्हेनिसला गंडोला बोटीत बसल, शॅम्पेन पिऊन, ‘ दो लब्जो की है दिल की कहानी ‘ हे गाणं तिने त्या नावड्या सोबत म्हंटल. हा मोठ्या आजीचा रोजचा कार्यक्रम झाला होता. ती आज भारतात तर उद्या लंडन, तर परवा फ्रांसला तर कधी रोमच्या रस्त्यांवर मनाने भटकू लागली. मनाला वेळेचं काळाच बंधन नव्हतं. ते मुक्तपणे भटकत होत. मोठी आजी आता सदैव आनंदात राहू लागली, त्यामागचं गुपित तिने कोणाला देखील कळू दिल नाही.

आता शोभा यूरोप टूरला होती. तिने म्हंटल्या प्रमाणे सरूला म्हणजे मोठ्या आजीला प्रत्येक ठिकाणाहून विडिओ कॉल केला. शोभाने सरूला पॅरिस येथील आयफेल टॉवर, स्विझर्लंड येथील माऊंट टिटलास, चॉकलेट फॅक्टरी, पिसा येथील टॉवर ऑफ पिसा, रोम मधील स्टेडियम, कलोसीअम, व्हेनिसची गंडोला बोट इत्यादी ठिकाण विडिओ कॉल करून दाखवली. शोभाच्या लक्षात आलं मोठी आजी अजून झोपूनच होती. इकडे, आज फिजिओथेरेपिस्टने वॉकर काढून टाकायला सांगितला. आणि मोठी आजी आधारा शिवाय दहा पावलं चालली. उद्या वीस, परवा तीस मग शंभर आणि आता मोठी आजी घरातून खाली उतरून बागेत फेऱ्या मारू लागली. ते सुद्धा काठी शिवाय. लोक तिच्याकडे बघून मिरॅकल झालं असं म्हणू लागले. कोणी ह्याला देवाची कृपा असं देखील म्हणाले. खर कारण तर मोठ्या आजीची यूरोप पाहण्याची दुर्दम्य इच्छा शक्ती हेच होत. ह्या एकमेव ध्यासाने प्रेरित होऊन मोठ्या आजीने आपलं सगळं लक्ष बर होण्यावर केंद्रित केलं.

संपूर्ण बरं झाल्यावर मोठ्या आजीने श्याम आणि शुभाला समोर बसवलं आणि म्हणाली ‘ श्याम तुझ्या बाबांनी जे काही पैसे ठेवले आहेत त्यातील तिन लाख रुपये मला पाहिजेत, मला यूरोप टूर करायची आहे. माझ्या टूरच बुकिंग कर.
शोभा काही दिवसांनी आपल्या ह्या दोन मैत्रिणींच्या घरी त्यांना आणलेल्या भेट वस्तू द्यायला आणि परत एकदा यूरोप टूरच्या स्मृतींना उजाळा द्यायला आली. ह्या काळात तिने दोघींना आपण बनवलेले वेगवेगळ्या ठिकाणांचे विडिओ पाठवले होते. घर बसल्या त्यांनाही आनंद मिळावा म्हणून. पण घरी आल्यावर तिला वेगळीच परिस्थिती दिसली. छोट्या आजीने अंथरूण धरलं होत. ती बाहेरच्या हॉल मधील सोफ्यावर झोपली होती. शोभाला वाईट वाटलं आता ह्या घरात दोन्ही आजी दोन गाद्यात झोपल्या असतील. तिच्या डोळ्यासमोर पूर्वीचे पत्ते खेळतानाचे दिवस आले. आणि तिला वाईट वाटले. आता परत पत्त्याचा डाव होणे नाही, खरंच परिस्थिती एवढी कशी बदलली. छोट्या आजीशी थोडा वेळ बोलून ती आतील खोलीत मोठ्या आजीला भेटायला गेली. जाताना तिच्या मनात धाकधूक होती. तीन महिने बेड वरच झोपून असलेली मोठी आजी किती विकलांग झाली असेल हा विचार तिच्या मनाला चाटून गेला.
खोलीत गेल्यावर शोभा अचंबित झाली. एका कोपऱ्यात दोन बॅगा भरून ठेवल्या होत्या. त्यावर जीन्स आणि टी – शर्ट ठेवला होता. त्यांची लेबल्स सुध्दा कापली नव्हती. तिने केस माने पर्यंत कापले होते आणि त्याचे छोटेसे पोनीटेल बांधले होते. तिने शोभाला बघितले आणि उठून तिला चक्क मिठी मारली.

मोठी आजी म्हणाली ‘ तुझ्या डोळ्यांनी बघितलेला यूरोप बघायला आज मी प्रत्यक्ष चालले आहे. तू माझ्या मनात टाकलेल्या यूरोप दर्शनाच्या छोट्या ठिणगीचा वणवा झाला. ‘ मरायच्या आधी प्रत्येकाने एकदा तरी यूरोप पाहायलाच हवा ‘. ‘ नोकरीत मिळवलेले पैसे थोडे तरी स्वतःच्या आनंदा साठी खर्च कर, ह्या तू छोट्या आजीला सांगितलेल्या वाक्याने माझ्या मनात यूरोप बघायची इच्छा दृढ झाली. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मी बरी झाले. श्यामला सांगून मी टूर बुक केली.आणि आज रात्री दोन वाजताच्या विमानाने टूरला चालले आहे. पंधरा दिवसाने यूरोप टूर करून परत येणार. खरतर शाम मला सोडेल, पण तू मला गाडीने एअरपोर्टला सोडायला यावे असे सांगायला मी तुला फोन करणारच होते. तू पाठवलेले विडिओ मी विमानात परत एकदा बघीन, असं म्हणून मोठ्या आजीने शोभाचा हात प्रेमाने आपल्या हातात घेतला. मोठी आजी मनाने म्हणजे इच्छाशक्तीने युरोपला कधीच जाऊन आली होती. आता फक्त शरीर जाणार होत. मनाची सोबत तर होतीच.

मिताली वर्दे

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..