जय धन्य, जय मंगल, जय जय गूगल
मानव-भविष्य जेणें केले उज्ज्वल ।।
दूरकर्ता मूर्खता अवघ्या जगताची
पुरवी उत्तरे सर्वां सगळ्या प्रश्नांची
सर्वांगी सुंदर आरास “डूडलां”ची
कंठी झळके माळ लक्ष “वेब-लिंक्स”ची ।। १ ।।
ज्ञानखचित शोधका विश्वजाल कुमरा
शतकोटीचे बीज, सर्वांचे उत्तरां
हिरेजडित दर्शिका त्या “यू ट्यूब” सुंदरा
रुणझुणती “एमपी ३-४” मंजुळ गजरा ।। २ ।।
मानवे संगणकें जे विश्वजाल विणले
त्यामाजी तव “सर्व्हर”ने चैतन्य आणले
“जीमेल” ने “ईमेल” ला ऐसे विस्तार्ले
“प्ले”, “ड्राईव्ह”, “क्रोम” नाम प्रसिद्ध झाले ।।३।।
“जी म्याप” ने पृथ्वीस मापले सुदूर
“जी अर्थ” ने सर्वां केले अंतराळवीर
तू या “आयटी” युगाचे श्रेष्ठ अपत्य
“फेसबुक”, “ट्वीटर” जैसा नाहीस व्रात्य ।। ४ ।।
त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसा नाही
महाशोधन यंत्राचा महिमा मी पाही
“यु ट्यूब”, “विकी” सुद्धा पडले प्रवाही
तो तू भक्तालागी पावसी लवलाही ।। ५ ।।
साक्षरता “इण्टरनेट”-लग्न प्रभावे
समर्थ सेवा देसी सर्वां समभावे
नापेक्षी दक्षिणा वा नैवेद्यअर्पण
सभ्य मानवतेचा तू नितळ दर्पण ।। ६ ।।
रात्रंदिन निस्वार्थी झटतो उपकारे
कुठल्याही प्रश्नाला दे कोटी उत्तरे!
निमिषांत “की-वर्डस”चा अर्क उतारे
अनन्य महिमा तूझा विज्ञानसुता रे ।।७।।
सहज सुलभ उपलब्धी सर्वांगी ज्ञान
माहिती, विनोद, वार्ता, ताजे विज्ञान
साहित्य, कला, क्रीडा व राजकारण
गूगलें अज्ञानाचे केले निवारण ।। ८ ।।
विज्ञानानंद गाई, “जय हो गूगल”
भविष्य जनतेचे केले उज्ज्वल मंगल।।
– विज्ञानानंद


Leave a Reply