नवीन लेखन...

बृहन्महाराष्ट्रातील संस्कृती वैभव – गणेशोत्सव

जगाच्या पाठीवर माणूस जिथे जातो तिथे आपली संस्कृती सोबत घेऊन जातो. भारतीय आणि त्यातही मराठी माणूस तर नक्कीच यात मागे नाही. त्यामुळे मराठी माणूस कुठेही असो, गणपतीबाप्पाची पूजा घरात हमखास होणार आणि सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा होणारच.

मराठयांनी एकेकाळी दिल्लीवर राज्य केले. दिल्ली, पानिपत, सोनीपत, कर्नाल, कुरुक्षेत्र या परिसरात मराठीजनांचे वंशज कायमचे स्थिरावले. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख या परिसराला आधीच झाली आहे. मराठीजनांनी या परिसरातील स्थानिक संस्कृती स्विकारल्यानंतरही महाराष्ट्रातील सण, उत्सव आणि परंपरा पाळल्या जात होत्या. भाषा बदलली, मात्र परंपरा कायम राहिल्या. आद्यदैवत गणराय हा फक्त मराठी माणसाचेच श्रद्धास्थान नाही. भारतात सर्वत्र आणि परदेशातही अनेक ठिकाणी त्याची पूजा होते. दिल्लीही त्याला अपवाद कशी असेल?

१९३० ते १९४० या दरम्यान भारतीय रेल्वेच्या सेवेत रुजू झालेली अनेक मराठी कुटुंब दिल्लीत स्थायिक झाली. त्यांच्यासोबत मराठी सण, परंपरा आल्याच. याचवेळी त्यांनी गणेशोत्सवाची परंपराही सोबत आणली. दिल्लीत कामधंदा आणि राजकारण या दोन्हीसाठी मराठी माणसांची संख्या वाढल्यावर महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव ही उत्सव संस्कृतीही इथे रुजायला लागली.

सुरुवातीला मराठी बांधव येथील जुनी दिल्ली, करोल बाग, पहाडगंज अशा परिसरात स्थिरावले आणि त्यानंतर शहराच्या इतर भागांमध्ये. आतातर दिल्लीच्या उपनगरांमध्ये आणि राष्ट्रीय राजधानी परिसरामध्येही मराठी कुटुंबांच्या संख्येत मोठी भर पडली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सव समितीसह येथील जवळपास ४० गणेशोत्सव मंडळांमधे आयोजित करण्यात येणारा सार्वजनिक गणेश उत्सव हे परस्पर परिचयाचे प्रभावी माध्यम ठरत आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरीसाठी दिल्लीत वास्तव्य करणारे मराठी लोक या काळात एकत्र येतात. त्यामुळे उत्साह आणि आनंद घेवून येणारा गणेशोत्सव म्हणजे दिल्लीत महाराष्ट्राची संस्कृती जपणारा उत्सव ठरत आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रातून येणार्‍या मराठी माणसाने जसा गणेशोत्सव उत्तर भारतात आणला तेवढेच श्रेय या उत्सवाला राष्ट्रीय उत्सवात परिवर्तित करण्यात महाराष्ट्रात नोकरी-व्यवसाय करणार्‍या उत्तर भारतीयांनाही जाते. दिल्लीत हजारो पंजाबी, बंगाली, पूर्वोत्तर राज्ये, दक्षिणेतील राज्ये इथल्या सगळ्यांच्या घरात, कॉलनीत गणेशोत्सवाची धूम असते. सुखकर्ता – दु:ख हर्ता ही गणेशाची आरती देखील भाषिक बंधने ओलांडून उत्तरेत रुजली आहे.

सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी १९६० पर्यंत हा उत्सव जुन्या दिल्लीचा काही भाग, करोल बाग, पहाडगंज आदी ठिकाणी होत असे. मात्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशानंतर त्यांच्या पुढाकाराने दिल्लीमध्ये महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना झाली. दिल्लीतले महाराष्ट्राचे हे पहिले अधिकृत शासकीय कार्यालय, त्यामुळे सहाजिकच त्याला महत्त्व आले ते राज्याचा चेहेरा म्हणून. १९६२ मध्ये दिल्लीत महाराष्ट्र सांस्कृतिक समितीची स्थापना यशवंतराव चव्हाण यांनी केली आणि या समितीच्या मार्फत १९९५ पर्यंत दिल्लीतील गणेशोत्सवात दिल्ली व परिसरातील मराठी बांधवांना तसेच अन्य राज्यातील मंडळांना गणेशोत्सवात विविधांगी कार्यक्रम देण्याचे कार्य सुरु होते. १९९५ पासून हेच कार्य पुढे अनेक मंडळांसोबतच सार्वजनिक उत्सव समितीने सुरु केले. लोकमान्य टिळकांनी ज्या संकल्पनेतून गणेशोत्सव सुरु केला ती विविधतेतून एकात्मता, आणि संघटन वाढविण्याची भूमिका, या ठिकाणची मंडळे आजच्या काळातही पार पाडतात. मूर्ती आणि सजावट यापेक्षा या काळातील कार्यक्रमांवर व मराठी जणांच्या एकत्रित येण्यावर या ठिकाणी भर दिला जातो.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर राज्यातील असा कोणताच गाजलेला कलाकार नसेल ज्याने या व्यासपीठावर आपली कला साजरी केली नाही! दिल्लीमध्ये सुप्रसिध्द गायक सुधीर फडके, गीतकार ग.दि. माडगुळकर, सुप्रसिध्द वक्ते राम शेवाळकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर, विंदा करंदीकर,ऐतिहासिक कादंबरीकार रणजीत देसाई, शिवाजी सावंत,वसंत बापट, मंगेश पाडगावकर, प्रसिध्द गायक कुमार गंधर्व, भारतरत्न भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, जोत्स्नाताई भोळे, प्रसिद्ध गायिका महाराष्ट्र भूषण जयमाला शिलेदार, राम मराठे, डॉ.विश्वास मेंहदळे, रामदास फुटाणे, फ.मु. शिंदे, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, प्रसिध्द कथाकार गो. नी. दांडेकर शंकर पाटील, व. पु. काळे, प्रसिद्ध विनोदी लेखक द.मा. मिरासदार, अशोक नायगावकर, कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग, संगीतकार श्रीनिवास खळे, शिरीष कणेकर, लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर, सुरेखा पुणेकर, माया जाधव, लता पुणेकर नृत्यामध्ये सुचेता भिडे, झेलम परांजपे, आदी वेगवेगळया क्षेत्रातील दिग्गजांनी आतापर्यंत गणेशोत्सव व त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली आहे.

या जागतिक ख्यातीच्या कलाकारांच्या कलेचा आस्वाद घ्यायला भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देखील हजेरी लावली आहे. जवळपास सर्वच महामहीम राष्ट्रपतींनी आपआपल्या कार्यकाळात ‘श्री’ चे दर्शन घतले आहे.

दिल्लीतील विसर्जन हे देखील एक वेगळा अनुभव देते. दिल्लीतली सारी मंडळं आपल्या मराठी बाण्यासह लाल किल्याच्या साक्षीने एकत्र येतात. … ढोल, ताशे, झांजपथक, लेझीम अशा माहोलात मराठी नऊवारी घातलेल्या सुवासिणी, फेटे घातलेले मराठे, आणि त्यासोबत दांड-पट्टा, तलवार-बाजी आदींच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले जाते. यमुनेच्या पात्राकडे जाणार्‍या रस्त्यांना गुलाबी करीत ‘श्री’ ची स्वारी निघते… आणि त्या ऐतिहासिक पात्रात विसर्जित होते.

महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाच्या दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरातील कार्यालयाच्या दालनात या काळात गणेश मुर्ती व पुजेच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्री केली जाते. येथे पंजाबी, बंगाली, मल्याळी, कश्मीरी, बिहारी, गुजराथी, कानडी आणि विदेशी नागरिकांकडूनही श्रीं च्या मूर्तीची खरेदी होते. महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबई पुण्यात काही काळ वास्तव्य केलेल्या बहुतांश भारतीयांच्या घरात या काळात गणपतीबाप्पा विराजमान होतात.

मराठी संस्कृतीच्या जतनासाठी या दहा दिवसांच्या काळात दिल्लीतील ४० गणेशोत्सव मंडळासोतबच महाराष्ट्र सदन, महाराष्ट्र परिचय केंद्र, सार्वजनिक उत्सव समिती, महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाज, दिल्ली महाराष्ट्रीय शिक्षण व सांस्कृतिक संस्था, दिल्ली मराठी समाज बिल्डींग ट्रस्ट, शारदा संघ, नूतन मराठी विद्यालय, बृहन्महाराष्ट्र मंडळ, मराठा मित्र मंडळ, राणी लक्ष्मीबाई भगीनी समाज, वनीता समाज, श्री. विठ्ठल मंदिर संस्थान, श्री. दत्त विनायक मंदीर, पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ यांची भूमिका आणि तळमळही महत्वाची आहे.

— निनाद अरविंद प्रधान
(संदर्भ: नवी दिल्ली येथील मित्रमंडळी तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त माहिती)

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..