नवीन लेखन...

दिलखुलास – प्रवीण दवणे

प्रवीण दवणे… वक्ते, साहित्यिक, मराठीचे अध्यापक आणि एक मनमोकळं व्यक्तिमत्त्व. जे त्याच्या छायाचित्रातून जाणवत राहते…

पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण, अनेक कवितासंग्रह, नाटकांचं लिखाण, तब्बल सवाशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठीची गीतरचना, अडीचशेहून अधिक कॅसेटस्साठी दोन हजांहून अधिक भावगीतं आणि भक्तिगीतांचं लिखाण, सतत दौऱयावर राहून दर्दी प्रेक्षकांची गर्दी खेचणाऱया कार्यक्रमांचा सूत्रधार आणि सुमारे चार दशकं मराठीचे खमके अध्यापक म्हणून ओळख मिळवलेले आणि कुसुमाग्रजांची एक वेगळीच जवळीक लाभलेला तसंच त्यांच्या नवनवीन कविता खुद्द ज्यांनी त्यांना वाचून दाखवल्या तो भाग्यवान साहित्यिक म्हणजे प्रवीण दवणे.

ते साहित्य क्षेत्रात येण्यासाठीचा टर्निंग पॉइंट ठरला तो त्यांच्या शाळेत साजरा केला गेलेला शिक्षक दिन. डोंबिवलीतील स. वा. जोशी हायस्कूलला अकरावीला असताना त्यांनी शिक्षक दिनानिमित्त दहावीच्या वर्गासाठी मराठीचा तास घेतला होता. त्यांच्या शिकवणीचं विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भरभरून कौतुक केलं आणि इथेच त्यांना त्यांच्यात लपलेल्या सुप्त गुणांची वेगळी अशी ओळख झाली. त्यांनी मराठीचा ध्यासच घेतला आणि पुढे साहित्याचा वसाच जपण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं.

बघता बघता त्यांच्या लिखाणाला गती आली आणि वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी ‘मंथन’ ही पहिली कादंबरी लिहिली. या कादंबरीच्या लिखाणानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. ‘दिलखुलास’, ‘परीसस्पर्श’, ‘प्रकाशाची अक्षरे’, ‘रे जीवना!’, ‘सावर रे’, ‘शब्दमल्हार’, ‘सूर्यपूजक कुसुमाग्रज’ अशा पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण त्यांनी केलं. आर्ताचे लेणे, आनंदाचे निमित्त, भूमीचे मार्दव, दत्ताची पालखी, एक कोरी सांज असे अनेक कवितासंग्रह त्यांचे आजवर प्रसिद्ध झाले आहेत तर आई परत येते, प्रिय पप्पा अशा अनेक नाटकांसाठीचं लिखाणदेखील त्यांनी केलं आहे. सावर रे, दिलखुलास, लेखनाची आनंदयात्रा, वय वादळ विजांचं हे त्यांचे कार्यक्रम आजही दर्दी रसिकांची गर्दी खेचतंय.
मराठी साहित्यात आपला वेगळा असा ठसा उमटवलेल्या प्रवीणजींचं एक वेगळं पोर्ट्रेट मला टिपण्याची संधी मिळाली. त्यासंबंधित त्यांच्याशी बोलून मी ठरल्याप्रमाणे त्यांच्या घरी गेलो.

घरात शिरताचक्षणी लगेचच लक्ष वेधून घेत ते त्यांच्या यशाचा आलेख सांगणाऱया कित्येक ट्रॉफीजची केलेली आरासवजा मांडणी. शेकडो पारितोषिकांनी नटलेली ही मांडणी प्रवीणजींच्या यशाचा आलेख स्पष्ट सांगतात. अनेक सिनेमांची छायाचित्रं असलेली, नामांकित संस्थांची नावं असलेली, अनेक नामांकित आणि मानाच्या अशा पुरस्कारांनी सजलेल्या या ट्रॉफीज नुसत्या पुनः पुन्हा बघत राहाव्या अशाच. याच ट्रॉफीजच्या पुढय़ात प्रवीणजींना उभं राहण्याची मी विनंती केली आणि यशाच्या या खुल्या शिदोरीसोबत त्यांचे काही मुद्दाम ब्लॅक अँड व्हाईट फोटो मी टिपले. कृष्णधवल छायाचित्रांनी त्यांचा हा इतिहास आणखीनच जिवंत वाटत होता. हे फोटो टिपत असतानाच माझ्या मनात एक प्रश्न डोकावत होता. प्रवीणजी त्यांचं लिखाण कुठे बरं करत असतील या प्रश्नाचं उत्तर थेट त्यांनीच मला दिलं. त्यांनी मला त्यांच्या लिखाणाच्या खोलीत नेलं.

या खोलीत त्यांचं एक लिखाणाचं टेबल होतं. मागून मंद प्रकाश डोकावत होता, तर टेबल ज्या भिंतीला लागून ठेवलं होतं त्यावर एक बोर्ड होता. या बोर्डावर प्रवीणजींना ऊर्जा देणाऱया देवदेवतांची छायाचित्रं होती. टेबलाच्या एका बाजूला अनेक कागदं तर खिडकीवर एका कोपऱयात लिखाणाचं साहित्य आणि इतर बाबी विखुरलेल्या होत्या. हे सारं चित्र प्रवीणजींसोबत कॅमेऱयात कैद करण्यासाठी मी प्रवीणजींना त्यांच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली आणि त्यांनीही लगेचच हातात लेखणी घेऊन नेमकं ते कसं लिखाण करतात त्याची एक झलकच मला दाखवली.

गेली अनेक दशकं सतत आपल्या लिखाणातून आपला वेगळा असा आदर्श नव्या पिढीसमोर घालून दिलेल्या साहित्यिकाचं असं पोर्ट्रेट टिपायला मिळणं हे माझ्यासाठी सोन्याहून पिवळंच असं होतं.

प्रवीणजींचा हा फोटो माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा होता. हा फोटो नैसर्गिक कसा वाटेल याकडे माझा कल होता आणि म्हणूनच ड्रमॅटिक लाइटिंग न करता नैसर्गिक प्रकाशात हा फोटो कसा टिपता येईल यासाठी मी झटत होतो. हा फोटो टिपताना त्यांच्या मागून खिडकीतून येणारा मंद प्रकाश आणि खोलीत असलेला प्रकाश यांचा ताळमेळ जुळत नसल्याने मागून येणाऱया प्रकाशाचा छायाचित्रणाला त्रास होत होता.

खिडकी बंद केली तर प्रकाशाचा स्रोत अडवला जाईल आणि फोटो नैसर्गिक येणार नाही. आणि खिडकी उघडी ठेवली तर त्यातून येणाऱया प्रकाशाचा ग्लेअर छायाचित्रात येईल अशी परिस्थिती होती. अगदी क्षणार्धात यावर तोडगा काढून या फोटोसाठी फ्लॅश म्हणजेच अनैसर्गिक लाइट वापरण्याचं मी ठरवलं. फ्लॅश लाइटची तीव्रता बाहेरून येणाऱया प्रकाशाशी मिळतीजुळती ठेवून प्रकाशयोजना केली आणि हा नैसर्गिक वाटेल असा फोटो टिपण्यात मला यश आलं. दिलखुलास साहित्यिकाचा दिलखुलास अंदाज या दिवशी मी कॅमेराबद्ध केला.

धनेश पाटील
dhanauimages@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..