नवीन लेखन...

धर्मांतराने दलितांना काय दिले ?

ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध लेखक आणि दलित चळवळीतील कार्यकर्ते श्री लक्ष्मण माने यांनी दलितांच्या धर्मांतराबाबत लिहिलेला हा अभ्यासपूर्ण लेख. धर्मांतराची कारणे नक्की कोणती ते यामध्ये वाचा. एक नव्हे हजार कारणे दिली आहेत मातंग समाजाने धर्मांतर करण्यामागे !

लक्ष्मण माने हे भटक्या समाजातील आहेत पण त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आहे …!


मी डाव्या विचारांच्या चळवळीत ३०-३५ वर्षांहून अधिक काळ सामान्य कार्यकर्ता म्हणून काढले आहेत. धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ, सेक्युलर, अशा मित्रांच्या खांद्याला खांदा लावून मी २५-३० वर्षे काम केले. अलीकडे जेव्हा मी व माझ्या भटक्या विमुक्त समाजातील सहकाऱ्यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा निर्णय केला, तेव्हा अनेकांचे कान टवकारले. अनेकांच्या नजरा विस्फारल्या. काहींना आता लक्ष्मणचं हे काय नवंच खूळ, असं वाटत होतं; तर काही मित्र कुत्सितपणे म्हणत होते, आता काय लक्ष्मण ‘नमो तत्स.’ मी म्हणायचो ‘जसं होईल तसं’. एक कम्युनिस्ट नेते कैक वर्षांचे माझे मित्र. ते मित्र मला म्हणत होते, ‘काय होणार तुझ्या या धर्मांतरानं?

आपण सारी सेक्युलर मंडळी. धर्माकडे पाठ करून उभी असलेली. बरं ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचं तरी काय झालं? तर तुझ्या जाण्यानं नेमकं काय होईल?’ तेव्हा त्यांना मी शांतपणे म्हणालो, ‘होय आपण सारे सेक्युलर, तुम्ही मराठा सेक्युलर, भाई वैद्य ब्राह्माण सेक्युलर, जनार्दन पाटील कुणबी सेक्युलर, बाबा आढाव मराठा सेक्युलर, जनार्दन वाघमारे माळी सेक्युलर आणि मी कैकाडी सेक्युलर. असा आपला सेक्युलॅरिझम आहे. सेक्युलर म्हणण्यात तुमचे काय जातं? जातीचे सर्व फायदे तुमच्या ताटात पडतातच. ते तुम्ही कधी नाकारलेत? समाजाची वास्तविक प्रतिष्ठा जातीच्या उतरंडीनुसारच मिळते ना? मी सेक्युलर कैकाडीच रहाणार असेन, तर तुमचा सेक्युलॅरिझम माझ्या आणि माझ्या समाजाच्या काय कामाचा? आणि जे आधी धर्मांतरित झाले त्यांच्याबद्दल म्हणाल तर मी दोनच गोष्टी तुम्हांला विचारतो. एक महार मला असा दाखवा जो मेलेली ढोरं ओढतो आणि मेलेल्या ढोराचं मांस खातो. मी त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देतो आणि असा महार दाखवा की ज्याला सांगावं लागतंय की पोरगं शाळेत घालं. त्यालाही एक लाख रुपये देतो.’ या प्रश्नाचं उत्तर मी काही गंमत म्हणून दिलं नव्हतं.

धम्मचक्र प्रवर्तन अभियानामध्ये भंडाऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी प्रत्येक सभेत विचारत होतो, एक महार असा दाखवा जो मेलेल्या ढोराचं मांस खातो व मेलेले ढोर ओढतो. त्याला एक लाख रुपये बक्षीस देतो. आजतागायत असा महार मला भेटलेला नाही. काय अर्थ या घटनेचा?

कोणत्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी या हिंदू धर्माचा त्याग केला होता.

(मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे ३०, ३१, मे व १ व २ जून १९३६ साली चार दिवस झाली. ‘मुक्ती कोन पथे?’ या नावानं बाबासाहेबांचं भाषण प्रसिद्ध आहे).

१९३६ साली ते म्हणाले, ‘सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे, स्पृश्य हिंदूनी मारहाण केल्याची उदाहरणे सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. उंची पोशाख घातल्यामुळे, दागदागिने घातल्यामुळे, पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे, जमीन खरेदी केल्यामुळे, जानवे घातल्यामुळे, मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे, पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदूस जोहार न घातल्यामुळे, शौचाला जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे, पंचाच्या पंगतीत चपाती वाढल्यामुळे, अशा कितीतरी कारणाने अमानुष अत्याचार, जुलूम केले जातात. बहिष्कार घातला जातो. प्रसंगी जाळपोळीला सामोरं जावं लागतं. मनुष्यहानी होते.

मोलमजुरी मिळू द्यायची नाही. रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही. माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी अस्पृश्य लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हांपैकी पुष्कळांना असेल. परंतु असे का घडते?

याचे कारण स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजांतील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे. हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या आगळिकीचा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे, या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी उदाहरणे वर दिलेली आहेत, त्यावरून एक बाब उघडपणे सिद्ध होते; ती ही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता, म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे, उंची पोषाख घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो, उंची पोषाख करतो, तांब्याची भांडी वापरतो, घोड्यावरून वरात नेतो, तो वरच्या वर्गापैकी कुणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा?

या रोषाचे कारण एकच आहे; ते हेच की अशी समतेची वागणूक त्याच्या मानहानीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात, अपवित्र आहात, खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलात तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील. पायरी सोडली तरी कलहाला सुरुवात होते, ही गोष्ट निविर्वाद आहे.

मी अगदी लहान होतो, तेव्हा मी पाहिलं आहे, गावोगाव महारवाड्यांवर बहिष्कार चालू होते. माणसांना गावात येऊ दिले जात नव्हते, पाणवठे बंद होते, पिठाची गिरणी बंद होती, किराणामालाची दुकाने बंद होती. गावोगावच्या महारांनी, म्हणजे पूर्वाश्रमीच्या दलित जनतेने बाबासाहेबांकडून धम्म दिक्षा घेतली होती. तराळकी, येस्करकी नाकारली होती. निरोप्याचे काम नाकारले होते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली निहित कर्तव्यं गावगाड्यात करावी लागणारी सर्व कामं मग, लाकूड फोडणे असेल, ढोर ओढणे असेल, सांगावा सांगणे असेल, हे सारे नाकारले होते. हे एका अर्थाने मोठे बंडच होते.

शेकडो वर्षांपासून घरातील देव्हाऱ्यात पूजलेल्या ३३ कोटी देवांच्या प्रतिमा एका रात्रीत नदीत भिरकावून दिल्या. मरीआई लक्ष्मीआईची मंदिरं ओस पडली. सारे गंडे-दोरे, गळ्यातल्या माळा, डोक्यावरचे केस सर्व काढून फेकून दिले. गावागावात, वस्तीवस्तीत बुद्धवंदना निनादू लागली. सर्व आखाडे, देवळे, विठ्ठलमंदिरांचे बुद्ध विहारात रूपांतर होऊ लागले.

त्यांच्या नावापुढील जात व धर्म जाऊन ‘बौद्ध’ असे लिहिले गेले. मुलांची, घरांची, गावांची, रस्त्यांची, संस्थांची नावे बदलली. सर्व समाज तरारून उठला. सापाने कात टाकावी, तशी कात टाकून सळसळून उभा राहिला. एक नवी अस्मिता घेऊन हा समाज अन्याय, अत्याचार, जूलूम याच्या विरोधामध्ये ठामपणे उभा राहिला. चाणी, बोटी, पड, हाडकी, हाडोळा ही गुलामीची सारी प्रतिके या समाजाने भिरकावून दिली. बुद्धकालीन इतिहास व बौद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब सर्वत्र दिसू लागले.

माझी पिढी या सर्व घटनांची साक्षीदार आहे. बौद्ध स्थापत्यकला नवीन घरांवर विराजमान होऊ लागली. बुद्ध जयंती धूमधडाक्यात साजरी होऊ लागली. सामूहिकरीत्या लोक दारू सोडू लागले. जत्राखेत्रांवर होणारा प्रचंड खर्च, कोंबड्या-बकऱ्या बळी देणे, अंगात येणे या विरुद्धचे काहूर उसळू लागले.

लग्नविधी, नामकरणविधी, अत्यंविधी बदलले, लग्न-मरणातला बँड गेला. डफडं गेलं. हालगी गेली. गावाची चाकरी-सेवा गेली. समाज गावगाड्यातून बाहेर पडला. अंगारे-धुपारे-बुवा-बाबा मागीर् लागले. पोतराजांनी अंगावरली आईची वस्त्रं धडप्यात गुंडाळून नदीला सोडली. आपल्या मनुष्यत्वाचा शोध सुरू झाला. गुलामगिरीच्या आभूषणांना चूड लागली. लोकांनी खेडी सोडा, शहरांकडे चला हा मंत्र स्वीकारला आणि लोक गावगाड्याच्या नरकातून, या गुलामगिरीच्या जोखडांमधून बाहेर पडले.

ईश्वराच्या जोखडातून बाहेर पडले. कर्मकांडाच्या लफड्यातून बाहेर पडले. कालपर्यंत अंगात येणारी मरीआई कायमची नदीत विसजिर्त केली म्हणून काही आईचा कोप झाला नाही. कुणीही प्लेग, पटकी, कॉलरा या रोगांनी मेले नाहीत. कोणालाही हाग-वक झाली नाही. गपगुमान अंगातले देव पळून गेले. लोक दास्यातून मुक्त होऊ लागले.

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र मनोमनी या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार केला. आज या समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के इतके विक्रमी आहे.

आज ५० वर्षांनंतर अॅड. शंकरराव खरात, डॉ. भालचंद मुणगेकर आणि डॉ. नरेंद जाधव हे महाराष्ट्रातल्या नामवंत पुणे, मुंबई, औरंगाबाद या विद्यापीठांचे कुलगुरू झाले. युनिव्हसिर्टी गँट कमिशनचे आजचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात साऱ्या देशातल्या उच्च शिक्षणाची धुरा सांभाळीत आहेत; तर डॉ. भालचंद मुणगेकर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य आहेत. डॉ.रेंद जाधव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते रिर्झव्ह बँकेचे सल्लागार होते. शेकडो लोक पीएच.डी. झालेले आहेत. हजारो लोक डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, आकिर्टेक्ट आहेत. हजारो लोक प्राध्यापक आहेत आणि प्राथमिक- माध्यमिक शिक्षकांचा तर सुळसुळाटच आहे. समाजाचे क्रीम समजल्या जाणाऱ्या आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांमध्ये डझनाने अधिकारी या आंबेडकरी समाजातले आहेत. अभिमान वाटावा असा मध्यमवर्ग, उच्चमध्यम वर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आहे.

वेश, भूषा, भवन, भाषा सारे बदलून गेले आहे. आज ‘वाडावो माय भाकर येस्कराला’ हे इतिहासजमा झाले आहे.

आय.ए.एस. आय.पी.एस., यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी.,या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये देशात एक नंबरला ब्राह्मण आहेत आणि दोन नंबरला पूवीर्चे महार आणि आताचे बौद्ध आहेत. विद्वततेच्या सर्व क्षेत्रांमध्ये या दोन समाजांचीच स्पर्धा सुरू आहे. सर्वाधिक ब्राह्मण मुलींनी पूर्वास्पृश्य असलेल्या या समाजातील तरुणांशीच आंतरजातीय विवाह केल्याचे दिसेल. रोटी-व्यवहाराची तर क्रांती झालीच पण बेटी-व्यवहाराची क्रांती या समाजात घडते आहे. बेटी-व्यवहार आपल्या बरोबरीच्या माणसांशी होतो.

साहित्याच्या क्षेत्रातही दलित साहित्याने आपला स्वतंत्र इतिहास निर्माण केला आहे. दलित कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, निबंध, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनादि क्षेत्रांतील कार्याने भल्याभल्या सरस्वतीपुत्र म्हणवणाऱ्यांना तोंडात बोटे घालायला लावले आहे. केवळ लिहिलेच नाही, तर आपला वाचकवर्गही त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत. दलित साहित्य आणि दलित जाणीव, दलित चळवळ आणि अलीकडे आंबेडकरी चळवळ ही देशातल्या अन्य कोणत्याही प्रांतात निर्माण होऊ शकली नाही. ती महाराष्ट्रातच निर्माण झाली; याचे कारण स्वत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि अस्मिता यांची पेरणी ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या आंबेडकरी भूमीतच देशातले पहिले साहित्यातले बंड मराठीमध्ये झाले.

लोक विनोदाने म्हणतात, ‘ब्राह्मणांनी मटण महाग केले आणि दलितांनी पुस्तके महाग केली’ ब्राह्मणाघरी लिवणं, कुणब्याघरी दाणं आणि महाराघरी गाणं हे आंबेडकरवाद्यांनी खोडून टाकले.

आता दलिताघरी लिवणं आणि बामणाघरी गाणं असे नवे सूत्र मांडायला हरकत नाही. दीक्षाभूमीवर लागणारी पुस्तकांची दुकाने, गावोगाव भरणारी साहित्य संमेलने आणि त्या प्रत्येक साहित्य संमेलनाच्या बाहेर थाटलेली पुस्तकाची दुकाने, सीडी, कॅसेट्स यांची लागणारी दुकाने हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे. तीर्थक्षेत्रावर हार, तुरे, माळा, नारळ, कुंकू, बुक्के, शेले, दुपट्टे, चादरींची रेलचेल असते. पण तिथे दीक्षाभूमीवर नानाप्रकारच्या हजारो ग्रंथांची झालेली गदीर् दिसते. हिंदू तीर्थक्षेत्रावरून हिंदू बंधू पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बंधू हज यात्रेवरून ‘आब-ए-जमजम’ आणतात, आमचे बौद्ध बंधू मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन जातात. ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने.

ही ज्ञानाकांक्षा हेच धम्माचे सार्मथ्य आहे.

नमो बुध्दाय…… जय भिम !!!!!!

लक्ष्मण माने

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..