नवीन लेखन...

दत्ता दिगंबरा

 

!!दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! दत्त दयाळा दिगंबरा, करुणा मूर्ती दिगंबरा!!

हे शब्द कानी पडले की मन कसे प्रसन्न होते एक नवचैतन्य निर्माण होते. दत्त गुरूंची प्रसन्न तेजस्वी हासरी आश्वासक मूर्ती नजरेसमोर येते आणि क्षणभर जीवनातील साऱ्या कष्टांचा, दुःखांचा विसर पडतो आणि मन दत्तमय होऊन जाते. दत्तप्रभुं बद्दल काय लिहावे. हे स्वरूपच इतके विशाल आहे की आपली लेखणी अपुरी पडावी.

हल्ली देवाच्या, श्रद्धेच्या नावाखाली आपल्या भावनांशी खेळणारे कितीतरी संधी साधू आपल्याला दिसतात. गृहस्थाश्रमाचा, संसाराचा त्याग करा म्हणजे तुम्हाला मुक्ती मिळेल. संसार म्हणजे माया आहे त्यात गुंतू नका असा सल्ला ते देत असतात आणि स्वतः मात्र स्वार्थाच्या मागे लागून माया गोळा करण्यातच मग्न असतात. खरंच संसारातील कर्तव्याचा त्याग करून,पळपुटेपणा करून मुक्ती मिळेल का? मला तरी तसं वाटत नाही. दत्तप्रभू मात्र आपल्याला कधीच अशी शिकवण देत नाहीत कारण आपण एखाद्या संकटात सापडलो की ते आईच्या मायेने धावत येतात आणि आपल्यावर मायेचा वर्षाव करतात आणि आपल्याला त्या संकटातून मुक्त करतात म्हणूनच आपण त्यांना गुरुमाऊली संबोधतो.

बाह्यस्वरूपी महाराज बैरागी असले तरी साऱ्या विश्वाची त्यांना काळजी आहे. खरं तर दत्तरूप म्हणजे तरी काय ब्रम्हा, विष्णू, महेश या तीन शक्तींचे एकत्रित रूप. ब्रह्मा म्हणजे सृष्टीचे जनक. विष्णू म्हणजे पालक आणि महेश म्हणजे संहारक( मानवाला त्रास देणाऱ्या दुष्ट शक्तींचा संहार). भक्तांच्या कल्याणासाठी दत्तप्रभूंना रोजच संघर्ष करावा लागतो. म्हणूनच वरवर शांत वाटणाऱ्या दत्त प्रभूंच्या मूर्ती कडे नीट न्याहाळून पाहिले की हा संघर्ष प्रकर्षाने जाणवतो. दत्त प्रभूही आपल्याला जीवनाकडे विशिष्ट नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन देत असतात.

दत्तांच्या अवतीभवती प्राणीजीव (गाय कुत्रा) विसावलेले दिसतात. म्हणजे ते आपल्याला प्राणीमात्रांवर प्रेम करण्याची शिकवण देतात. मग रुप, अवतार कोणतेही असोत.

दत्त प्रभूंची वस्त्रेही किती साधी. ना कसली आभूषणे फक्त रुद्रांक्षाच्या माळा. अर्थातच रुद्राक्षाचे महत्व पट वून देण्याची गरज नाही हे सर्वज्ञात आहे. या सगळ्याचा अर्थ हाच होतो की माणसाने आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्यात.

महाराजांच्या पादुकाही हेच सांगतात की आळसपणा झटकून चलनवलन करावे म्हणजे शरीर निरोगी राहील. म्हणूनच तर गुरु पादुकांच्या नुसत्या दर्शनाने शरीरात नवशक्ती निर्माण होते.

दत्तप्रभू आणि माधुकरी यांचही एक नातं आहे. माधुकरी मागणं ह्याचा खरा अर्थ हाच होतो की दुसऱ्यांकडे जे ज्ञान आहे, सदगुण आहेत त्याचं मागणं करणं आणि माधुकरी वाढणं म्हणजे आपल्या जवळ जे काही चांगलं आहे ते निस्वार्थ भावनेने दुसऱ्याला देणे. (गाणगापुरात गेल्यास याचा अवश्य लाभ घ्यावा). दत्तप्रभू स्वतः भिक्षा मागून ती प्राणीमात्रांना देतात, त्यांची भूक क्षमवतात म्हणूनच जेथे दत्तक्षेत्रे आहेत तिथे अन्नक्षेत्रे(भंडारा)चालवली जातात अशा अन्नक्षेत्रांसाठी जरूर आपल्या कुवती प्रमाणे दानधर्म करावा.

अशा तऱ्हेने दत्तप्रभूंची विविध रूपे अवतार पाहायला मिळतात. आजही कुठल्या ना कुठल्या रूपात ते आपल्याला भेटतात .आपल्या मनीषा पूर्ण करतात. योग्य मार्ग दाखवतात पण हे रूप ओळखण्यासाठी आणि ते जाणून घेण्यासाठी साधनेची, निष्ठेची, भक्तीची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नितांत श्रद्धेची व सबुरीची गरज आहे.

ज्या दिवशी आपल्या आंतरिक मनाला दत्तप्रभूंच्या या स्वरूपाची ओळख होईल त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने त्यांचे निस्सीम भक्त होऊ.

चला तर त्यासाठी प्रयत्न करू आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गक्रमण करू आणि सर्वांना चांगली बुद्धी लाभो अशी प्रार्थना दत्तप्रभुं जवळ करु.
!!श्री गुरुदेव दत्त!!
!!शुभमं भवंतु !!

सौ रेवती प्रशांत शिंदे. आगाशी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..