नवीन लेखन...

चित्रकार ओकेंच्या पाऊलखुणा

मुंबई ही हरवून गेलेल्यांची नगरी आहे. इथे मनापासून आत्म्यापर्यंत अनेक गोष्टी रोज हरवतच असतात. अशावेळी १६ फेब्रुवारीला कुणी “ओके? नावाचा माणूस हरवला आहे ह्या बातमीचं फारसं | कुणाला वाटलं नसणार, पण ज्यांची कुणाची “ओके? नावाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ओळख होती, त्यांचा मात्र क्षणभर का होईना, काळजाचा ठोका चुकला असणार. पण मग वाटलं, “ओकेंना मनात येईल तेव्हा ट्रेकिंगला, तेदेखील विशेष करून हिमालयात जायची लहर यायची. तसंच तर काही झालं नाही ना? तसं “ओके’चं वर्षांचे) झालं होतं. स्मृतिश्रंशाच्या विकाराने त्यांना वेढलं होतं हे सगळं खरं, पण वाटलं, शेवटी सगळं जरी खरं असलं तरी ती कलावंताची कुडी आहे आणि तसंच झालं. २ मार्चला ‘ओके’ सापडले!

कलावंताच्या कलेने बोलावं, कलावंताने बोळू नये, कलेतून त्याची ओळख व्हावी, तसं “ओके’ म्हटलं की, डोळ्यापुढे त्यांनी रेखाटलेली कितीतरी जिवंत रेखाचित्र डोळ्यापुढे येतात. मात्र “ओके” व्यक्तीचं चित्रं डोळ्यापुढे येतच नाही. कारण ‘ओकें चा स्वभावच तसा होता. पुढे पुढे करण्याची गोष्ट दूरच राहिली, पण साधं चार शब्द बोलणं “ओकें’च्या बाबतीत मुश्कील होतं. हे इतकंच कशाला, ही चित्रं ओकें’चीच आहेत याची माहिती प्रारंभी ना. ग. गोरे यांच्याप्रमाणे अनेकांना नव्हती. मात्र एकदा का “ओकें”च्या रेषेची ओळख पटली की, मग मात्र हजारभर चित्रांच्या ढिगातून त्यांचं चित्र उठून दिसायचं. त्यासाठी चित्रावरचं नाव पांहण्याची गरज नसायची.

पण हा “ओके? हा काय नाव प्रकार शा होता? ओक आडनावाचा हा अपभ्रंश असावा असं काहीजण म्हणत (तेव्हा शामराव ओक या लेखकाने “’ओकासा’ या टोपणनावाने काही लिखाण केलं होते. त्याचा हा परिणाम असावा.) प्रत्यक्षात मात्र गोट अशी होती की, वासुदेव नरसिंह शेणॉय यांनी वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी पहिलं चित्र काढलं तेव्हा त्याखाली आपलं नाव टाकण्याऐवजी आपल्या साऊथ कॅनरामधील गावाचं म्हणजे ‘ओळरलंके’मधलं पहिलं व शेवट अक्षर मिळून ओ. के. अशी टाकली आणि त्याचंच पुढे “ओके? ही लख्ख नाममुद्रा झाली ती कायमचीच.

साऊथकॅनरावा तत्सम प्रदेशातून शेणॉय वगैरे मंडळी येतात ती हॉटेलच्या गल्ल्यावरच बसायला. तसा हा वासुदेव नरसिंहदेखील आला, पण चित्रकलेच्या वेडाने त्याने जे. जे. आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला, पण १९४२च्या स्वातंत्र्यलढ्याच्या हाकेने ह्या तरुणाचं चित्त कॉलेजातून निघून चळवळीवर जडलं. युसुफ मेहेरअल्लीसारख्यांच्या प्रेमात तो पडला. परिणामी चार्ल्स जेरॉला या जे. जे. आर्ट स्कूलच्या प्रिन्सिपॉलने ह्या तरुणाला बाहेरचा रस्ता दाखवला. ह्या तरुणाने तेव्हापासून डिग्री-डिप्लोमाकडे पाठ फिरवली ती कायमचीच. मात्र चित्र काढता काढता आपली ‘ओके’ आद्याक्षरच एखाद्या किताबाप्रमाणे करून दाखवली.

बेचाळीसच्या चळवळीने हा तरुण सोशालिस्ट-राष्ट्र सेवा दल मंडळीच्या संगतीत आला तो कायमचाच. पुढे सानेगुरुजींनी “साधना? साप्ताहिक सुरू केलं. दर आठवड्याला एखाद्या आंतरराष्ट्रीय ख्यात व्यक्तीवर ते लिहीत असत. आजदेखील फोटोच्या बाबतीत आपल्याकडे एकंदरीत रडारडच दिसते. चटकन फोटो मिळत नाहीत, मग

सत्तेचाळीसच्या सुमारास हा आरडाओरड किती तीव्र असेल हे लक्षात यावं. अशावेळी श्रीरंग वरेरकरांसारखे तेव्हा झपाटलेले तरुण फक्त “ओकें’ना शुक्रवारी गाठत आणि सांगत, ‘जर्मन महाकवी गटे’चं चित्र हवं आहे किंवा सुंदर चित्रकर्ती अमृता शेरेगिलची छबी हवी आहे. ही मागणीपूर्ती करणारं “ओके’चं काम इतकं हुकुमी असे की, कुठून कुठून रेफरन्स पाहून त्याचं रेखाचित्र जय्यत तयार असे. म्हणजे फक्त चित्र उचलायचं आणि त्याचा ब्लॉक करून सोमवारी पाठवायचा एवढंच काय ते काम उरे. हा उरक आणि हुकमीपण “ओके’नी शेवटपर्यंत पाळलं. ओकेकडून वेळेत चित्रं आलं नाही असं कधीच झालं नाही.

प्रभावी लाइन प्रोट्रेट

रेखाचित्रे काय सगळेच चित्रकार काढतात. ह्यापुढे देखील काढतील, पण ‘ओके’चं वैशिख््य म्हणजे त्यांनी लाइन पोट्रेट हा प्रकार सुरू केला. ह्या प्रकाराला थांबणं, खाडाखोड वगैरे प्रकार नाही. काय करायचं ते एकदाच, एकाच फटक्यात करायचं ही “ओके’ची खासियत झाली. लोकमान्य टिळकांचा करारीपणा त्यांच्या मिशासकट उभा केला तो “ओके? यांनीच. सलिम अलीचं निर्व्याज हसू ओकेनी रेखाचित्रात जसं नेमकं पकडलंय तसं कुणालाच जमलं नाही. ऐन आणीबाणीत जयप्रकाशांची हाक जशी नेमकी जाणत्या लोकांपर्यंत पोहोचली तेच काम “ओके? यांच्या त्यांच्या चित्राने-पोस्टर्सनी केलं. अमृता प्रितमचं “ओके”नी इतकं नाजूक रेखाचित्रं काढलंय की पूछो मत! हे चित्र मी मुद्दाम साहिर लुधयानवीला एकदा नेऊन दिलं. साहिर-अमृताच्या मुग्ध प्रेमाची तोपर्यंत खूप चर्चा होऊन गेली होती. ते चित्र पाहताच क्षणभर साहिर पाहतच राहिला आणि अल्फाजचा तो बादशहा म्हणाला, ‘काश! मै ऐसा आर्टिस्ट होता तो…

ओकेच्या प्रत्येक व्यक्तिचित्राची, त्यांची म्हणून एक खूण असायची, खासियत असायची, ज्याचा मोह कुणालाही पडायचा. इतकंच कशाला, कित्येक चित्रकारांनादेखील ह्या स्टाइलची भुरळ पडली होती. “ओकें’नी मराठी साहित्यिकांचीदेखील व्यक्तिचित्रं काढली होती. ज्याचा पुढे पुण्याच्या “आनंद पुस्तक मंदिर’ने सेट काढला, जो चांगलाच लोकप्रिय ठरला. आज खेड्यापाड्यातून, शाळाशाळातून साहित्यिकांची चित्रं दिसतात ती “ओके” यांचीच. ह्या प्रभावातून मराठीतील एका चित्रकारप्रकाशकाने त्या त्या लेखकांची पुस्तकं काढताना त्यावर लेखकांची व्यक्तिचित्रं रेखाटली. तीदेखील चांगळी होती, पण जो तो त्यांना म्हणायचा, “ही ‘ओके’स्टाइल तुमची चित्रं छान आहेत हं!”

एकदा मीदेखील ह्या प्रकाशक चित्रकाराचं कौतुक केलं तेव्हा ते चित्रकार म्हणाले, ‘ते ठीक आहे, पण “ओके’सारखा जिवंतपणा नाही जमत हो. ओके ते ओकेच. चित्रात प्राण ओततात.

ओकेंचं मोठेपण हे असं होतं. शिवाय ह्या मोठेपणातदेखील त्यांचा साधेपणा किती असावा?

कित्येक राष्ट्रसेवादलातल्या लोकांना हेच तर “ओके? हे कित्येक वर्षांनी माहीत व्हायचं! शैलीकार रवींद्र पिंगे हे पूर्वायुष्यातले सेवादल सैनिक. त्यांच्याकडे यद्ययावत सेवादलीयांची आतली-बाहेरची कुंडली चित्रगुस्तासारखी तयार असते, पण “ओके’च्या बाबतीत ते म्हणतात, त्यांच्याबद्दल चार ओळी लिहिण्याइतपतच मला माहिती आहे. समोरासमोर कधी आलोच तर स्मितहास्याच्या पलीकडे कधी मी गेलो नाही.

ह्याचं कारण ओकेंचा साधेपणा आणि मितभाषीपणा. तुम्ही त्यांच्याशी पंचवीस वाक्य बोलल्यावर ते फार तर मान हलवणार आणि आणखी पंचवीस बोलल्यावर ते ‘हो? किंवा “नाही? एवढंच बोलले तर बोलणार. हा त्यांचा स्वभावच होता.

केवळ व्यक्तिचित्रापुरतेचे “ओके’ मर्यादित नव्हते. वर्षातून निदान एकदा तरी त्यांना हिमालयाची हाक ऐकू यायची की “ओके’ कॅमेरा घेऊन चालले हिमालयात ट्रेकिंगला! उत्तमोत्तम रंगीत चित्रांच्या त्यांनी स्लाईडूस करून ठेवल्या होत्या. संगीताचा कान त्यांचा तयार होता. उत्तमोत्तम संगीत असलेल्या कॅसेटचं भांडार त्यांच्याकडे होतं.

जोगेश्वरीच्या त्यांच्या घरात अखंड संगीत चालू असायचं आणि त्याच्या जोडीला ओकेंचा चित्र काढता हात सुरू असायचा.

ह्या आत्ममग्नतेतून ओकेंनी किती चित्रं केली असतील ह्याची गणना नसेल. साप्ताहिक ‘साधना? आणि “साधना प्रकाशन? या निम्म्याहून अधिक पुस्तकांची कामं ओकेंच्या चित्रांनी व्यापली असतील. मात्र ओकेंनीदेखील त्याचा कधी हिशोब ठेवला नाही. नाही म्हणायला ओकेंचं कुठेतरी एकत्रित काम असावं म्हणून त्यांचे मित्र वसंत वडके, प्रभूभाई संघवी, श्रीरंग वरेरकर आदी मंडळींनी एकत्र येऊन १७ ऑक्टोबर १९८७ रोजी ओकेच्या सत्तरी निमित्ताने “आधुनिक भारत के निर्माता? हा ओकेंनी काढलेल्या सहासछ चित्रांचा संच काढला आणि तो हातोहात संपला. ही सुटी चित्र मात्र अजूनही मिळतात. (शाहीर लिलाधर हेगडे यांच्याशी संपर्क साधावा.) त्याच्या आगेमागेच आर्टिस्ट सेंटरला त्यांच्या चित्राचं प्रदर्शन भरलं होतं, ज्याचं उद्‌घाटन पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते झालं होतं. तसंच एक प्रदर्शन डोंबिवलीला पांडुरंग विद्यालयात आवर्जून भरवलं गेलं होतं. दोन्ही ठिकाणी ओके आवर्जून हजर होते, पण जणू आपण तिसऱ्याच कुणाच्यातरी प्रदर्शनाला हजर राहिलो आहोत अशी तटस्थता! हा त्यांचा जन्मजात स्वभावच होता.

नियती की भोग

वयोपरत्वे ओकेंचं काम हळूहळू कमी होत गेलं. त्यांची प्रकर्षाने आठवण आली ती ज्येछ पत्रकार-संगीततज्ज्ञ रामकृष्ण बाक्रे यांच्या पहिल्या(२८ डिसें. ९७) स्मृतिदिनी. बाक्रेच्या ‘बुजुर्ग’ ह्या व्यक्तिचित्राच्या पुस्तकात ओकेंची काय प्रत्ययकारी रेखाचित्रं आहेत. जणू एक स्वतंत्र संगीताची मैफलच सुरू व्हावी असे संगीतातील एकेक दिग्गज या संग्रहात आहेत. बाक्रे यांच्या दुसऱ्या संगीतविषयक पुस्तकात ‘भिन्न षडूज’मध्ये मात्र ओकेंची रेखाचित्र नाहीत. हे असं कसं? चौकशी करता कळलं, हल्ली ओकेना स्मृतिभ्रंशाच्या विकाराने ग्रासलंय. त्यांच्या हातून काम होत नाही.

मग एकदम बातमी आली ती १६ फेब्रुवारीला बेपत्ता झाल्याचीच, पण कसेतरी २ मार्चला ते सापडले. तो प्रसंगदेखील किती भीषण आहे?

एक वृद्ध गृहस्थ बाहेर पडले. मध्यरात्र झाली. तो त्यांना जाग आली. त्यांच्या लक्षात आलं, आपण फूटपाथवर आहोत. त्यांनी खिशातली किल्ली काढली आणि बाजूच्याच दुकानाच्या कुलुपाला लावून ते उघडायचा प्रयत्न करू लागले. आजूबाजूच्या पोरांनी चमकून विचारलं, “आजोबा, काय चाललं आहे?”

“मी गावाहून मुंबईला शिकण्यासाठी आलो आहे आणि मामांच्या घरी चाललो आहे…”

मग बऱ्याच बोलाचालीनंतर जवळच एक ओळख निघाली आणि लक्षात आलं, हे म्हातारबुवा भिकारी, चोर नसून स्मृतिभ्रंशाचे शिकार झालेले आहेत… पण कुठलीतरी ओळख निघाली. मग त्या ओळखीच्याकडे म्हातारबुवांना नेलं. ते म्हातारबुवा ओके होते! पण तेथूनदेखील मध्यरात्रीच ते ‘गुल’ झाले! तोपर्यंत ओकेंच्या घरी धावाधाव, शोधाशोध चाळू झाली. वर्तमानपत्रात बातम्या-फोटो…

“हे कोण ओके?… ही काय भानगड”… नाना शंका-कुशंका. तेवढ्यात एक फोन ‘पोलिसांशी संपर्क साधा, तुम्हाला कळेल.’ दरम्यान, ओकेंना मदर तेरेसांच्या “आशादान? संस्थेत हलवण्यात ‘ आलं होतं!

एकदाचे ओके सापडले. पण अशा एकाकी “ओके”ना ठेवायचं कुठे? वृद्धाश्रमाची कल्पना पुढे आली. मग तेथूनच पनवेलच्या “शांतीवनात? नेण्याचा प्रस्ताव आला. तेथे ओके पोहोचले खरे, पण लगेचच म्हणजे २० मार्च १९९८ला ते अनंताच्या प्रवासाला निघालेले होते…

सत्‌शील कलावंताच्या वाट्याला अशी वणवण का यावी? हे भोग म्हणायचे की नियती? दीर्घायुष्य हा शाप असतो का? हे सगळे असले प्रश्न अशा वेळी वांझोटे, व्यर्थ असतात. सत्य एकच-अटल एकाकी शेवट हेच खरं. हे सगळं मनात येताना आठवलं, ओके यांनी केलेलं पुलंचं गणगोतचं मुखपृष्ठ. समोर अथांग रस्ता पसरला आहे आणि त्यावर अनेकांच्या पाऊलखुणा दिसतात. चेहरे मात्र नाही. त्या पावलात आता ओकेंचंदेखील पाऊल आहे. हे तेव्हा कधी जाणवलं नव्हतं. आता मात्र तीव्रतेने जाणवतंय…

रविप्रकाश कुलकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..