नवीन लेखन...

भविष्यात कृमी-कीटक खाण्याची वेळ कोणावर न येवो !

|| हरि ॐ ||

सामान्य माणसाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा. परंतू जगाच्या पाठीवर झपाटयाने वाढणार्‍या लोकसंख्येकडे पाहता त्या भविष्यात पुऱ्या करणे किंवा मिळणे/मिळविणे कुठल्याही देशातील शासनकर्त्याला दुरापास्त होणार आहेत. कारण काही गरजा नैसर्गिक स्त्रोतातून तर काही त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांतून पुरवाव्या लागतील. शेवटी त्याचे उत्पादन आणि उपलब्धता नैसर्गिक स्त्रोतावर अवलंबून आहे आणि त्यात वाढणार्‍या लोकसंख्येच्या मागणी आणि पुरवठा यांच्या व्यस्त गणितात ते बसणारे नाही. असो.

नुकताच संयुक्त राष्ट्रसंघटनेचा अहवाल प्रसिद्ध झाल्याचे दिनांक १८ मे २०१३च्या दैनिक प्रत्यक्षमध्ये वाचण्यात आले. मुख्य म्हणजे जगाच्या पाठीवर झपाटयाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या अन्नटंचाई, कुपोषण व प्रदूषणासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी खाण्यात कीटकांचा समावेश करावा असे आवाहन अहवालात करण्यात आल्याचे वाचून एकीकडे कुतूहल वाटले तर दुसरीकडे भविष्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या संकटाचे पडसाद अश्या मथळ्याच्या बातमीने सावध करते झाले. असो.
माणसांच्या गरजा कधीही कमी होणार नाहीत कारण माणसाचा हा सहज स्वभाव आहे आणि कितीही मिळाले तरी त्याची हाव पूर्ण होणार नाही. या हव्यासाचे मानसशास्त्र आणि बाजारातील जीवघेणी स्पर्धा लक्षात घेऊन उत्पादक जाहिरातीतून विविध प्रलोभने माणसांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला माणूस बळी पडतो आणि त्यातूनच साठेबाजी, भ्रष्टाचार आणि नफेखोरी जन्मास येते. असो.
अहवालात असे म्हंटले आहे की जगातील तब्बल दोन अब्ज नागरिकांनी आपल्या खाण्यात यापूर्वीच कृमी-कीटकांचा समावेश केला असून, ही गोष्ट पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे नमूद केले आहे. किटकांमध्ये प्रथिने व खनिजांचे प्रमाण मोठे असल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कदाचित म्हणूनच जगात बरेच नागरिक भूक, कुपोषण आणि प्रदूषणापासून दूर आहेत की काय? संयुक्त राष्ट्रसंघटना व एफएओ यांच्या शिफारशींवर अमेरिकेतील हेरिटेज फौंडेशनच्या इंटरनॅशनल रेग्युलेटरी अफेअर्सचे फेलो ब्रेट शॉफर यांनी केलेली टीका उपहासात्मक वाटते. कारण ते म्हणतात “त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये कीटकांचा समावेश करावा व स्वत: उदाहरण घालून द्यावे” याचा अर्थ त्यांनी पोकळ बडबड करून नये तर कृती करून दाखवावी असे त्यांच्या वक्तव्यावरून तरी वाटते! अन्नटंचाई, कुपोषण व प्रदूषणासारख्या समस्यांच्या मुळाशी जाऊन कोणी अभ्यास करणार आहेत की नाही? का अशा अनाहूत सल्याचे आणि समर्थनाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर उगाचच गोडवे गाईले जाऊन नकोत्या गोष्टींना अवास्तव महत्व दिले जाते. किटकांमध्ये प्रथिने व खनिजांचे प्रमाण मोठे असेलही पण काही कृमी कीटक उदा. फुलपाखरू, पर्यावरणाला आणि शेती उत्पादनाला मदतसुद्धा करणारे आहेत. म्हणून त्यांची जपणूक आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. जेवताना आपण ताटाच्या बाजूला काही ताटातील अन्नपदार्थ बाजूला काढून ठेवतो आणि ताटाभोवती पाणी फिरवितो की जेणे करून जेवतांना ताटात जमिनीवरील मुंग्या, झुरळे किंवा किटक तोंड घालू नयेत तर त्यांनी टाटाच्या बाजूला काढून ठेवलेल्या अन्न खावे, पण भविष्यात कदाचित पुढील प्रमाणे दृश्य बघावे लागेल. चक्क डाव्याबाजूला झुरळाची चटणी, भुंग्याचे कालवण, मुंग्यांचा असाच कुठलातरी च्यानीज प्रकार वा क्या बात है. या सर्वांचे अन्न म्हणून सेवन करण्याची वेळ येणार की काय? असे का होत आहे? होणार आहे? काही इलाज नाही का? असो. पुन्हा एकदा झपाटयाने वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येचा वसुंधरेवर सर्वार्थाने कसा विपरीत परिणाम होतो हे बघणे आवश्यक आहे म्हणजे अश्या अनावश्यक गोष्टींचा विचार करतांना अहवाल कसा तोकडा आहे हे कळेल. एकीकडे बालमनावर पाठ्यपुस्तकांतून संस्कार केले जातात की उघड्यावरील माश्या बसलेले, किडा, मुंगी झुरळ यांनी तोंड लावलेले पदार्थ खाऊ नका! पण येथे तर चक्क कृमी-कीटक खा असा अहवाल सांगतो आहे कारण ते पर्यावरणाला मदत करतात आणि त्यांच्यात प्रथिने आणि खनिजांचे प्रमाण मोठे असते. मग यांच्या पायाला चिकटलेले जीवजंतू पोटात गेल्यास काय प्रथिने आणि खनिजे मिळणार आहेत? आणि पोटात कसले साम्राज्य निमार्ण करणार आहे? माणसांच्या मुलभूत गरजा भागविण्याच्या नादात प्रदूषण आणि पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कळत न कळत गावा गावांचे शहरीकरण आणि शहरांचे बकालीकरण करतांना नैसर्गिक मर्यादांचे उलंघन होत आहे. सिमेंटची जंगले वसवताना झाडे आणि जंगले उध्वस्त केली जात आहेत. याने निसर्गाचे चक्र बदलत चालले आहे. कुठे अती पाऊस तर कोठे अवर्षण आणि वणवे पेटत आहेत. उद्या कदाचित जमीन राहिलीच तर शेती करण्यास माणूसच उरणार नाही. कारण तो गावापासून लांब नोकरीच्या शोधात शहराकडे जात आहे. शेतात काम करण्यास माणूस मिळाला नाही तर अन्नधान्य पिकवणार कसे? यासाठी आत्तापासूनच भविष्यात यंत्राने शेती कशी करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आपल्या देशात चढ उताराची जमीन आहे लांबच लांब शेते नाहीत. यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करावे लागेल.
रोज वाढणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण आणि नैसर्गिक स्त्रोतांचे अल्प प्रमाण यापुढे मागणी-पुरवठ्याचे व्यस्त गणित भूक, कुपोषण आणि प्रदूषणावर मात करण्यास असमर्थ ठरणार आहेत. येणार्‍या काळात वाढत्या लोकसंख्येला आळा घातला नाही तर माणसाला जीवन जगण्यासाठी पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक स्त्रोत कमी पडतील.
परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा योग्य उपयोग करून आपण अन्नधान्य पिकविण्यास शिकलो त्यात सुधारणा करत करत चांगले प्रथिन आणि खनिजयुक्त अन्न पिकविण्यास शिकलो, संपन्न झालो. पण असे असताना आपणावर असे कृमी-कीटक खाण्याची वेळ का यावी? अंतर्मुख होऊन वरील गोष्टींचा विचार केल्यास आपण कुठेतरी अमर्यादांचा मुक्तपणे आणि आपल्या मर्जीप्रमाणे दुरुपयोग करतो आहोत असे आढळेल. निसर्गाचा नियम ‘जीवो जीवस्य जीवनम्’ असला तरी बिचारी जनावरे, पशु, पक्षी, कृमी-कीटक यांचाही विचार होणे गरजेचे आहे. नियंत्याने त्यांना आपल्यासारखे मन, बुद्धी व कर्मस्वातंत्र्य दिले नसले तरी आपल्याला आहे ना? आपणच त्यांचा विचार करायला नको का?
जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..