आज, साठी ओलांडलेल्या पिढीने खूप काही गमावलंय.. आणि जे मिळालंय.. ते तडजोड करुन स्वीकारलंय… काळ बदलला, मात्र मन पुन्हा पुन्हा त्या रम्य भूतकाळातच जातं…
पार्टीमध्ये ‘चिअर्स’ करुन, ग्लासला ग्लास भिडवायला शिकलो, मात्र ‘वदनी कवळ घेता’ म्हणायचं असतं.. ते विसरलो….
वे
लकम ड्रिंक म्हणून, माॅकटेल प्यायला शिकलो, मात्र जेवण सुरु करण्यापूर्वीचं.. आचमन घेणं विसरलो..
हक्का नुडल्स, ट्रिपल शेजवान काट्याने गुंडाळून तोंडांत कोंबताना, अस्सल चवीची.. शेवयांची खीर विसरलो..
हाताने वरण-भात, ताक-भात खाण्याची लाज वाटू लागली परंतु काट्या चमच्याने पुलावाची शिते गोळा करुन खाताना, फुशारकी वाटू लागली..
पावभाजीवर.. जादा अमूल बटरचा आग्रह धरु लागलो, मात्र वाफाळलेल्या वरण-भातावरची तुपाची धार विसरलो..
बिर्याणी, फ्राईड राईस, जिरा राईस खायला शिकलो, पण ‘वांगी भात, मसाले भात, मुगाची खिचडी म्हणजे नक्की काय असतं?’ या नातवाच्या प्रश्नावर निरुत्तर झालो..
एकेकाळी पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलेबीवर ताव मारण्याचे विसरुन गेलो, आता मात्र जेवणानंतर स्वीट डिश म्हणून दोनच गुलाबजाम व चमचाभर आईस्क्रीमवर समाधान मानू लागलो..
दोन्ही हात वापरुन ब्रेड, पाव खाऊ लागलो, मात्र आईने शिकविलेला ‘एकाच हाताने जेवावे’ हा संस्कार.. विसरुनच गेलो..
‘सॅलड’ या भपकेदार मेनूमधील झाडपाला मागवून खाऊ लागलो, पण कोशिंबीर, चटण्या, रायते हद्दपार करुन बसलो..
इटालियन पिझ्झा, पास्ताची ऑनलाईन ऑर्डर होऊ लागली, मात्र अळूची पातळ भाजी, भरली वांगी, बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली..
मठ्ठा, ताक, सार हे शब्दच विसरुन गेलो, पण जेवणानंतर फ्रेश लेमन, सोडा का नाही? हे बिनधास्तपणे विचारु लागलो…
साखर भात, लापशी, गव्हाची खीर इतिहास जमा झाली अन् स्वीट म्हणून आईस्क्रीम, फालुदाची.. गुलामी स्वीकारली…
मसाल्याचे वास तसेच ठेवून पेपर नॅपकीनने हात व तोंड पुसू लागलो, मात्र जेवणानंतर हात स्वच्छ धुवून, खळखळून चूळ भरणं.. विसरुन गेलो..
थोडक्यात, आरोग्याच्या सर्व सवयी सोडून देऊन, पाश्र्चात्यांचं अनुकरण करत, स्वास्थ्य बिघडवून कमी वयातच शारीरिक व्याधींना बळी पडू लागलो..
‘जुनं ते सोनं’ समजून घेतलं तर अजूनही वेळ गेलेली नाहीये.. पण ‘सुरुवात कधी करायची?’ इथंच गाडी अडलेली आहे.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२२-५-२२.
Leave a Reply