नवीन लेखन...

अर्धनारीश्वरस्तोत्रम् सार्थ

श्रीमद आदिशंकराचार्यांनी रचलेले हे अर्धनारीश्वर स्तोत्र शिव आणि शक्ती यांचे एका शरीरात कल्पिलेल्या संयुक्त रूपाचे स्तोत्र आहे. शिव हा लिंगभेदापलिकडे, अप्रकटित, स्वरूपविहीन चेतना आहे तर शक्ती ही प्रकटित ऊर्जा आहे. शिव आणि शक्ती हे अविभाज्य, एकरूप आहेत. अर्धनारीश्वर हा शब्द अर्ध+नारी+ईश्वर असा बनलेला असून मूर्तिविद्येमध्ये अर्धनारीश्वर मध्यातून दुभागलेला अर्धा पुरुष व अर्धी स्त्री स्वरूपात दाखवला जातो.

आचार्यांनी या स्तोत्राची रचना इन्द्रवज्रा/उपेन्द्रवज्रा वृत्तात केली आहे.


चाम्पेयगौरार्धशरीरकायै कर्पूरगौरार्धशरीरकाय ।
धम्मिल्लकायै च जटाधराय  नमः शिवायै च नमः शिवाय ॥ १ ॥

मराठी- जिचे निम्मे शरीर चाफ्यासारखे/सुवर्णासारखे गोरेपान आहे, ज्याचे निम्मे कापरासारखे शुभ्र; जिच्या केसांची वेणी मस्तकाभोवती आटोपशीर बांधली आहे, तसेच ज्याच्या जटा गुंडाळल्या आहेत, अशा (अर्धनारी) पार्वती व शंकराला मी नमस्कार करतो.

निम्मी तनू चंपक फूल गोरी
निम्मी तशी कापुर शुभ्र सारी ।
खोपा कचांचा नि जटांस बांधी
मी तारिणी आणि हरास वंदी ॥ १     (तारिणी-पार्वती)


कस्तूरिकाकुङ्कुमचर्चितायै चितारजःपुञ्जविचर्चिताय ।
कृतस्मरायै विकृतस्मराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ २ ॥

मराठी- जिच्या शरीरावर कस्तूरी आणि कुंकू लेपले आहेत, तर ज्याच्या शरीरावर चिताभस्माचे पट्टे ओढले आहेत, जिने मदनाला कार्यान्वित केले आहे, तर ज्याने मदनाचा नाश केला आहे; अशा (अर्धनारी) पार्वती व शंकराला मी नमस्कार करतो.

कस्तूर कुंकूम तनूस लेपी
पट्टे चिताभस्म शरीर व्यापी ।
कामा करी सज्ज, वधी तयाला
माझा नमस्कार उमा हराला ॥ २


झणत्क्वणत्कङ्कणनूपुरायै पादाब्जराजत्फणिनूपुराय ।
हेमाङ्गदायै भुजगाङ्गदाय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ३ ॥

मराठी- जिचे पैंजण रुणुझुणू आणि कंकणे किणकिण करीत आहेत, ज्याच्या पदकमलावर पैंजण म्हणून नाग विराजत आहे; जिच्या दंडावर सोन्याची वाकी आहे तर ज्याच्या दंडावर सर्पाची वाकी आहे, अशा (अर्धनारी) पार्वती व शंकराला मी नमस्कार करतो.

येई ध्वनी घुंगरु पाटल्यांचा
वेढाहि पायावर पन्नगाचा ।
सुवर्ण वाकी नि भुजंग वेटी      (वेटी- वेटोळे,कडे)
प्रणाम दुर्गा-शितिकंठसाठी ॥ ३   (शिति- निळा)


विशालनीलोत्पललोचनायै विकासिपङ्केरुहलोचनाय ।
समेक्षणायै विषमेक्षणाय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ४ ॥

मराठी- जिचे नेत्र मोठ्या निळ्या कमळाप्रमाणे आहेत, ज्याचे  नेत्र फुललेल्या कमळासारखे आहेत, जिचे नेत्र समसंख्य आहेत, ज्याचे नेत्र विषम संख्य आहेत, अशा (अर्धनारी) पार्वती व शंकराला मी नमस्कार करतो.

विशाल डोळे कमळे निळीसी
प्रफुल्ल पद्मासम नेत्र त्यासी ।
डोळे जिला दोन कि तीन ज्याला
माझा नमस्कार उमा हराला ॥ ४

टीप- येथे सम ईक्षण व विषम ईक्षण असे शब्द पार्वती व शिवाच्या संदर्भात योजले आहेत. सम व विषम हे सरळ गणिती अर्थाने घेतल्यास पार्वतीचे दोन व शिवाचे तीन डोळे असा अर्थ होईल. तथापि ‘सम’ शब्द निःपक्षपाती, सर्वाभूती समान, शांत असा व ‘विषम’ शब्द (शंकराने तिसरा डोळा उघडून निरपराध मदनाचे भस्म केले असल्याने) तिस-या नेत्राला उद्देशून उग्र असाही घेता येईल. सुंदर स्त्रीच्या नेत्रांना नेहेमी कमळांची उपमा दिली जाते. शंकराचे तीन डोळे सूर्य,चंन्द्र व अग्नी दर्शवितात. त्याही अर्थाने ते असमान आहेत असे म्हणता येईल.


मन्दारमालाकलितालकायै कपालमालाङ्कितकन्धराय ।
दिव्याम्बरायै च दिगम्बराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ५ ॥

मराठी- तिने मंदार फुलांची माळ आपल्या केसात व्यवस्थित माळली आहे, तर त्याचा गळा मुण्डक्यांच्या माळेने शोभिवंत झाला आहे. तिचे कपडे स्वर्गीय सुंदर आहेत, तर तो वस्त्राविना (सर्व दिशांचेच वस्त्र पांघरून बसला) आहे, अशा (अर्धनारी) पार्वती व शंकराला मी नमस्कार करतो.

मंदार माथा गजरा विराजे
गळ्यात मुंडी नर हार साजे ।
स्वर्गीय, वस्त्रे, दिशाच ज्याला
माझा नमस्कार उमा-हराला ॥ ५


अम्भोधरश्यामलकुन्तलायै तडित्प्रभाताम्रजटाधराय ।
निरीश्वरायै  निखिलेश्वराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ६ ॥

मराठी- जिचे केस पाण्याने संपृक्त ढगांप्रमाणे काळे आहेत, ज्याच्या जटा तेजस्वी विजेप्रमाणे तांबुस आहेत; जिच्यापेक्षा दुसरा कोणीही श्रेष्ठ नाही तर जो सर्व जगाचा स्वामी आहे, अशा (अर्धनारी) पार्वती व शंकराला मी नमस्कार करतो.

संपृक्त मेघांसम केस काळे
जटा रुपेरी जणु वीज खेळे ।
कुणी न मोठा दुसरा, नियंता
उमेस शंभूस प्रणाम आता ॥ ६


प्रपञ्चसृष्ट्युन्मुखलास्यकायै समस्तसंहारकताण्डवाय ।
जगज्जनन्यै जगदेकपित्रे नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ७ ॥

मराठी- जी जगताची  उत्पत्ती, जतन, प्रगती यांचे नृत्य करते, जो सर्व जगताचा नाश करणारा कराल नाच करतो, जी संपूर्ण जगाची माता आहे, तर जो जगताचा पिता आहे, अशा (अर्धनारी) पार्वती व शंकराला मी नमस्कार करतो.

निर्माण नृत्या करि जी जगाच्या
जो नाच नाशा करतो जगाच्या ।
माता पिता एकच जे जगाला
प्रणाम माझा गिरिजा हराला ॥ ७


प्रदीप्तरत्नोज्ज्वलकुण्डलायै स्फुरन्महापन्नगभूषणाय ।
शिवान्वितायै च शिवान्विताय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ८ ॥

मराठी- तेजस्वी खड्यांमुळे दीप्तिमान झालेले सोन्याचे डूल जिने घातले आहेत, तर चंचल मोठे साप हेच ज्याचे दागिने आहेत, जी सदाशिवात पूर्ण मिसळून गेली आहे, जो गौरीमध्ये पूर्ण मिसळून गेला आहे, अशा (अर्धनारी) पार्वती व शंकराला मी नमस्कार करतो.

तेजे मणीमंडित डूल शोभे
ज्या दागिना चंचल साप लाभे ।
हरासवे जी, सह ज्यास श्वेता         (श्वेता- पार्वती)
उमेस शंभूस प्रणाम आता ॥ ८


एतत्पठेदष्ठकमिष्टदं यो भक्त्या स मान्यो भुवि दीर्घजीवी ।
प्राप्नोति सौभाग्यमनन्तकालं भूयात्सदा तस्य समस्तसिद्धिः ॥ ९ ॥

मराठी- असे हे इच्छिलेल्या गोष्टी प्रदान करणारे आठ श्लोक जो भक्तिपूर्वक पठण करील, तो या पृथ्वीवर दीर्घायुष्य, मानमरातब मिळवील, त्याला अनंत काळपर्यंत सद्भाग्य प्राप्त होईल आणि त्याला नेहेमी सर्व सिद्धी प्राप्त होतील.

जो इष्टदायक या आठ श्लोकां
गाई तया मान मिळेल लोकां ।
दीर्घायु सद्भाग्य अनंत काळा
सदैव सिद्धी मिळती तयाला ॥ ९

॥ असे हे श्रीमत् शंकर भगवान यांनी रचलेले अर्धनारीश्वरस्तोत्र संपूर्ण ॥

— धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

ardha-narishwar-stotra with marathi translation

मराठी भावानुवाद : श्री धनंजय बोरकर
स्तोत्र गायन : अनघा बोरकर

Ardhanareeshwar Stotr – Sanskrit & Parallel Marathi

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

2 Comments on अर्धनारीश्वरस्तोत्रम् सार्थ

  1. अप्रतिम!!

    सुरेख काव्य आणि भाषांतरही तितकेच मधुर!
    मला वाटले होते की ही एंजिनीअर मंडळी अगदीच रुक्ष असतात की काय.
    पण हे धनंजयबुवा बोरकर अगदी अजब दिसताहेत.

    आता हे बुवा इंजिनिअरच.
    बहुतेक काव्य गायनाचे संकलन आणि
    पडद्यावर केलेले त्याचे परिक्षेपण त्यांनीच केलेलं असावे.
    सोपे काम नाही. तीन गोष्टी तीन गतीने प्रक्षेपित केल्या आहेत.
    शाब्बास!

    अनघाताईंचे कविता वाचन सुस्पष्ट आणि मधुर आवाजात झाले आहे.
    हल्ली संस्कृतचे एव्हढे चांगले उच्चार कोठे ऐकायला मिळतात?

    कोणत्याही साहित्यामध्ये दोन भाग असतात:
    शब्द आणि त्याच्या अनुशंगाने येणारे विचार.
    येथील शब्द तर मोहक आहेतच —
    पण शंकर-पार्वतीच्या एक्सवरूप मूर्ती
    अगदी खोल विचार करायला लावणारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..