अपघातांची मालिका कधी संपणार ?

विश्लेषण
अपघातांची मालिका कधी संपणार ?
– अभय अरविंद
ताज्या रस्ते अपघातांमध्ये ‘सारेगामापा’ स्पर्धेतील लक्षवेधी गायक राहुल सक्सेना, अपूर्वा गज्जला, गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रितम मते असे अनेक मान्यवर जखमी पडले. गणेशोत्सवाच्या धामधुमीत राज्यात रस्ते अपघातात अनेकांनी प्राण गमावले. अशा अपघातांना रस्त्यांची दुरवस्था, चालकांचा बेदरकारपणा कारणीभूत ठरत असला तरी अपघात टाळण्यासाठी प्रशासन फारसे काही करत नाही हेही खरेच. ही परिस्थिती कधी बदलणार?

देशाच्या विकासासाठी दळणवळणासारख्या पायाभूत सुविधांवर भर द्यावा लागतो. आजकालच्या गतीमान युगात तर दळणवळणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे रस्ते बांधणीबरोबरच हवाई किवा अन्य मार्गावर वाहतुकीच्या अधिकाधिक सोयी उपलब्ध करुन देण्याबाबत प्राधान्याने विचार केला जातो. पण देशात रस्त्यांवरुन प्रवास करणार्‍यांची संख्या तुलनने मोठी आहे. शिवाय या मार्गावरून मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे महामार्ग तसेच राज्यमार्गांवर वाहनांची संख्या वाढत आहे. त्यातही अलीकडे स्वत:चे वाहन असणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत भर पडत आहे. अशा परिस्थितीत प्रशस्त आणि चांगल्या रस्त्यांची गरज प्रकर्षाने जाणवते. पण याबाबत आजवर करण्यात आलेले प्रयत्न तोकडे पडले आहेत. किंबहुना, रस्तेबांधणी किवा सुधारणांसाठी सरकारी पातळीवर किती प्रयत्न केले जातात हा संशोधनाचा विषय ठरतो.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

राज्यात विविध ठिकाणी घडणार्‍या अपघातांमध्ये रस्त्यातील वाहनांच्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे. साहजिकच या अपघातात मृत्यूमुखी पडणार्‍यांची तसेच जखमी होणाऱ्यांची संख्या मोठी असते. विशेष म्हणजे यातील बहुतांश अपघातांना रस्त्यांची दूरवस्था वा अन्य बाबी जबाबदार असतात असेही दिसून आले आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात येऊनसुध्दा रस्ते सुधारणांवर लक्ष दिले जात नाही. एखादा मोठा अपघात घडल्यावर हळहळ व्यक्त केली जाते. त्याविषयी चर्चा होते पण पुन्हा परिस्थिती ‘जैसे थेच असते. यावेळी गणेशोत्सवाच्या धामधूमीत विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 18 जणांना प्राण गमवावे लागेल. तर इतर अनेकजण जखमी झाले. जालना येथील कार्यक्रम आटोपून परत निघलेल्या कलावंतांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यात ‘आयडीया सारेगमप’ च्या नुकत्याच पार पडलेल्या पर्वातील अंतिम फेरीत पोहोचलेल्या गायक राहूल सक्सेना आणि अपूर्वा गज्जला हे दोघे गंभीर जखमी झाले. तर साऊंड रेकॉर्डिस्ट उदय दंताळे यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यात टॅक्सी आणि दुधाचा टँकर यांच्यात टक्कर होऊन त्यात 17 जण ठार झाले. अन्य एका अपघातात भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यच्या कन्या पंकजा पालवे आणि प्रितम मते या जखमी झाल्या. अपघातांची ही मालिका पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही.

तसे दररोज कोणत्या ना कोणत्या रस्त्यावर किरकोळ अपघात घडत असतात. त्याची ना कोठे चर्चा होते ना दखल घेतली जाते. तरिही अशा अपघातांमधील हानी लक्षात घेता त्यांना आळा घालणे गरजेचे आहे. अलीकडे शासनाने खासगीकरणातून काही राष्ट्रीय मार्ग नव्याने तयार केले आहेत. प्रशस्त आणि सुंदर अशा या रस्त्यावरुन विना अडथळा प्रवास करणे शक्य होत असल्याने वाहनांचा वेग अधिक असतो. अशा परिस्थितीत वाहतुकीच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. मात्र, याबाबतही फारसे समाधानकारक चित्र दिसत नाही. तरीही टोलची वसुली सुरूच राहते. शिवाय काही वेळा चालकांचा निष्काळजीपणाही अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

सर्वसाधारणपणे दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची दूरवस्था होते. मात्र, त्यांची दुरूस्ती वेळेवर केली जात नाही. त्यात यावर्षी राज्याच्या बहुतांश भागात सतत पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे बहुतांश रस्ते खराब झाले आहेत. जागोजागी पडलेल्या खड्डयांमधून वाहन चालवणे कठीण होत आहे. शिवाय खड्ड्यांचा नेमका अंदाज न आल्यास अपघाताची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा ठिकाणी रस्ते दुरूस्तीची कामे वेळेवर हाती घ्यायला हवीत. विशेष म्हणजे अशा कामांवर खर्च केल्याचे दाखवले जाते. पण प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था कायम असते. एकाच रस्त्याची सतत आणि अनेकवेळा दुरूस्ती केल्याचा चमत्कारही पहायला मिळतो.

खरे तर रस्ते बांधणी, दुरूस्ती आदी कामे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतात. पण अलीकडे यातील बहुतांश कामे खासगीकरणातून दिली जात आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे फारसे काम राहिलेले नाही. अशा परिस्थितीत आहे ते कामही नीटपणे आणि वेळेवर होत नाही. मग या खात्याचा उपयोग काय असा प्रश्न पडतो. राज्यातील विविध रस्त्यांवरुन प्रवास केला तर हे खाते अस्तित्वात आहे का अशी शंका येण्याइतपत परिस्थिती आहे. जवळच्या संबंधितांना रस्त्यांची कामे देणे, त्याचा दर्जा न तपासणे, कामावर देखरेख नसणे यामुळे कंत्राटदारांचा मनमानी कारभार सुरू असतो. मात्र, या कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. त्यातल्या त्यात शहरातील रस्त्यांच्या सुधारणांकडे थोडेबहुत लक्ष दिले जाते. पण ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्याकडे ना शासनाचे लक्ष आहे ना सार्वजनिक बांधकाम खात्याचे. यामुळे अशा रस्त्यांवरील अपघातांची मालिका सुरू आहे. ही जिवित हानी कधी आणि कोण थांबवणार याचे समाधानकारक उत्तर आज तरी देता येत नाही हे आणखी एक दुर्दैव म्हणावे लागेल.

चौकट

चित्र बदलणे कठीण : विक्रम बोके

गेल्या दहा वर्षात विविध रस्त्यांवरुन धावणार्‍या आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आणि अतिवेगवान गाड्यांची संख्या बरीच वाढली आहे. अशा गाडया उन्मत्त तरुणांच्या ताब्यात आल्यास बरेचदा वेगाची नशा चढत. अशा परिस्थितीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होत आहेत. रस्त्यांवरील अशा वाढत्या अपघातांना खराब रस्ते जबाबदार आहेत तितकेच कायद्याचे किंवा वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणारेही जबाबदार ठरतात. वाहतुकीचा परवाना देतानाही पुरेशी काळजी घेतली जात नाही. वाहतुकीचे नियम माहित नसणारे बिनदिक्कतपणे वाहन चालवताना दिसतात. गतीमान आणि सुरळीत वाहतुकीसाठी दृतगती महामार्गाची निर्मिती करण्यात आली. पण या मार्गावरून बेशिस्तीने वाहन चालवणार्‍यांची सं’या मोठी आहे. मी स्वत: दृतगती महामार्गाचे नियोजन बराच काळ पाहिले आहे. अलीकडेच बेदरकारपणे गाडी चालवणार्‍या एका चालकाने आपले वाहन माझ्या वाहनाला घासून नेले. आता काय होणार या कल्पनेने त्यावेळी अंगावर काटा आला होता. सर्वत्र व्यापलेल्या भ्रष्टाचाराने या क्षेत्रातही मोठा शिरकाव केला आहे. रस्तेबांधणी, दुरूस्ती तसेच वाहतुकीसंदर्भातील विविध कामांमध्ये भ्रष्टाचार आढळून येत आहे. त्यातून कामांचा दर्जा घसरतो आणि अपघातांना आमंत्रण मिळते. अशा अपघातांमध्ये जखमी होणार्‍या तसेच दुर्दैवी मृत्यू अनुभवणार्‍या सर्वसामान्यांशी या यंत्रणेचे काही देणे घेणे नाही. सुसंस्कृत आणि खर्‍या अर्थाने समाजाभिमुख लोकप्रतिनिधी निर्माण होत नाहीत तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही.

(अद्वैत फीचर्स)

— अभय अरविंद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....