
अंबे महात्रिपुरसुंदरी आदि माये ।
दारिद्र्य दुःख भय हारुनि दाविपाये ।
तुझा अगाध महिमा वदती पुराणी ।
योगेश्वरी भगवती वर दे भवानी ।।
अंबाजोगाई बीड जिल्ह्यातील एका तालुक्याचे गाव म्हणजे भाविक भक्तांचे स्थान जगन्माता योगेश्वरी होय. देवीच्या स्थापनेचा कालावधी पुरातन असून याविषयी ऐतिहासिक उल्लेख प्राचीन शिलालेखात असलेल्या जोगाईचे माहेर या ठिकाणी आढळतो. अंबाजोगाई गावाच्या मधोमध वाहणाऱ्या जयंती नदीच्या पश्चिम तीरावर सदर मंदिर वसले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार यादवकालात इ. सन १७२० मध्ये नागोजी त्रिमल व शामजी बापूजी यांनी केला. इ. सन १८०० मध्ये सभामंडप पूर्ण होऊन मंदिरावर कळसही विराजमान झाला. सिंघण यादवांचा सेनापती खोलेश्वर याने आपले सैन्यदल इथे ठेवून गावाचा विकास केला. हे मंदिर उत्तराभिमुख असून दोन परकोट असलेले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी दक्षिण दिशेला नगारखान्याची व्यवस्था असलेले विस्तीर्ण महाद्वार व ध्वजस्तंभ आपले लक्ष वेधून घेतो. महाद्वारातून प्रवेश करताना समोरच दिसणाऱ्या तुळशीवृंदावनाने मन मोहित होते. या मंदिरात ध्यानधारणा लेखन, अभ्यास व पारायण करण्यासाठी अनेक ओवऱ्या बांधलेल्या आहेत. पूर्वी अनेक साधुसंतांनी या मंदिरात येऊन देवीची ध्यानधारणा केली आहे. प्रसिद्ध असलेल्या मोराची ओवरीत बसून कृष्णदयार्णवांनी हरिवरदा हा ग्रंथ शब्दबद्ध केला. मंदिरात जाण्यापूर्वी पूर्व व उत्तर महाद्वारासमोर असलेल्या दीपमाळा आपले स्वागत करतात. मंदिराचे बांधकामाचे वेळी वापरण्यात आलेल्या दगडी चिऱ्यांची रचना आणि सुंदर असलेल्या कोरीव कामामुळे मंदिर आकर्षक बनले आहे.
मंदिरातील योगेश्वरीची मूर्ती तांदळा स्वरूपाची आहे. तीन फूट उंच व दोन फूट रुंद असा हा तांदळा चार फूट उंचीच्या चौथाऱ्यावर ओंकार स्वरूपात विराजमान झाला आहे. तांदळा शेंदूरचर्चित असून देवीची स्फटिकयुक्त नजर आपले मन वेधून घेते. भालप्रदेशावरचे पिंपळ पान त्याच्याखाली चंद्रकोर, त्यावरील लालभडक कुंकुमतिलक, मस्तकावर चांदीतील केवड्याची वेणी आणि कानात असणारी मत्स्यभूषणे देवीचे सौंदर्य खुलवतात.
देवीपुढे तेवत असलेल्या दोन मोठ्या समया जणू काही भक्तांना उपदेश करतात की, आमच्यासारखे तेजस्वी व्हा. मातेचे दर्शन घेऊन उजव्या हाताने जाऊ लागताच महाकाली आणि तुळजाभवानीचे दर्शन घडते. सभामंडपात विघ्नहर्ता गणपती आणि केशवराजाची उपस्थिती असून येथे देवीची भोगमूर्ती आहे. मध्यभागी असलेल्या घंटेभोवती भाविक भक्त नवसाचे पाळणे आणि नारळाची तोरणे बांधतात.
देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर एक भले मोठे यज्ञकुंड नजरेस भरते. इथे वेळोवेळी शतचंडीचे हवन होत असते. देवीच्या स्नानासाठी असलेले सर्वेश्वर तीर्थ तसेच पश्चिम द्वारापाशी बांधलेले मायामोचन तीर्थ पहावयास मिळते. संरक्षणासाठी पश्चिम दिशेस रुद्र भैरव व महारुद्र अशी दोन मंदिरे दृष्टीस पडतात.
रोज पहाटे येथे नित्योपासनेस आरंभ होतो. प्रातःपूजा झाल्यानंतर मध्यान्ह पूजेच्या वेळी देवीला नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर कुटलेला विडा देवीने भक्षण केल्यानंतर तो विडा भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्यात येतो. संध्याकाळी प्रदोष पूजा झाल्यानंतर रात्री देवीची शेजारती होते. चांदीच्या मखरात विराजमान झालेल्या ह्या आदिमातेच्या चांदीच्या पादुका असून त्यावर धार्मिक विधी दुपारचे आतच केले जातात. याच वेळी शहात्तर पुतळ्याची माळ देवीला घातली जाते. तांदळारूपी असलेल्या मातेला साडी चोळी नेसविण्याचे अवघड काम येथील क्षेत्रोपाध्याय मोठ्या कुशलतेने करतात. योगेश्वरीचा अवतार दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा होय. अवतार दिवसानिमित्त मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला घटस्थापना झाल्यानंतर पौर्णिमेला शतचंडी हवनाची पूर्णाहुती होते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत नवरोत्सव भाविक उत्साहपूर्ण भक्त साजरा करतात. भक्तांच्या श्रद्धेनुसार ईश्वराशी जीवाचा संयोग करणारी शक्ती म्हणजे योगेश्वरी होय.
अंबाजोगाई ही कोकणस्थांची कुलदेवता देशावर कशी आली, त्यासंबंधी एक आख्यायिका सांगितली जाते.
महर्षी परशुरामांचे वास्तव्य कोकणात असताना त्यांच्यासमोर समुद्रातून चौदा तरुणांची प्रेते वाहत आली. त्या प्रेतांना बाहेर काढून परशुरामांनी योगसामर्थ्याने जिवंत केले. आता जिवंत झालेल्या तरुणांचा विवाह करुन त्यांना सन्मार्गी लावावे, असा विचार करून परशुरामांनी कोकणप्रांती मुली पाहाण्यास सुरुवात केली; परंतु मृत झालेल्या जिवंत तरुणांना कोणीही आपली मुलगी देईनात, यास्तव या तरुणांना घेऊन परशुराम अंबाजोगाई ज्याचे पूर्वीचे नाव आम्रपूर येथे आले. तेथील ग्रामस्थांनी परशुरामांना अशी अट घातली की, आम्ही या तरुणांना जावई करून घेतो; परंतु त्यांनी आमच्या योगेश्वरीला कुलस्वामिनी म्हणून मानले पाहिजे. परशुरामांनी ही अट मान्य केल्यामुळे या तरुणांचे विवाह थाटामाटात पार पडल्यानंतर लग्नाचे वऱ्हाड कोकणात गेले आणि दरवर्षी आपल्या कुलदेवताचे दर्शन घेण्यासाठी अंबाजोगाईला येऊ लागले. अशा तऱ्हेने कोकणवासीयांची देवता अंबाजोगाई झाली.
योगेश्वरी ही कुमारिका का राहिली, याविषयीची आणखी एक दंतकथा सांगितली जाते. ब्रह्मदेवाच्या वरामुळे उन्मत्त झालेल्या दंतासुर राक्षसाने देवादिकांना छळण्यास सुरुवात केली असता देव दंतासुराच्या जाचातून मुक्त होण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले, ‘जोगाई या स्थानी शिवाची आराधना करणारी योगेश्वरी तथा अंबा कुमारी आहे. विवाह होण्यापूर्वीच ती दंतासुराचा वध करील. ‘ देवांना काळजी पडली की लवकरच योगेश्वरीचा विवाह परळी गावच्या वैजनाथाशी होणार असल्यामुळे ती सौभाग्यवती होईल, मग दंतासुराचा वध कशी करणार? त्या वेळी नारदमुनींनी सांगितले, ‘काळजी करू नका. मी तिचा विवाह वैजनाथाशी होऊ देणार नाही.’
वर वैजनाथ आणि वऱ्हाडी मंडळींचा मुक्काम परळी गावी होता. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी वैजनाथाचा विवाह योगेश्वरीशी अंबाजोगाई गावी होणार होता हे समजल्यावर नारदमुनी आदल्या रात्री परळी गावी आले आणि त्यांनी आपल्या मधुर वाणीने कीर्तन करून वन्हऱ्हाडी मंडळींना मध्यरात्रीपर्यंत जागवले. झोपेचा अंमल चढल्यामुळे वैजनाथासह सर्वजण पहाटे न उठता उशिरा उठले. त्या वेळी सूर्य डोक्यावर आला होता विवाहाचा मुहूर्त टळून गेल्यामुळे वैजनाथ व वऱ्हाडी अंबाजोगाईला गेली नाहीत. एका अर्थाने हा विवाह मोडला. वैजनाथ विवाहासाठी का आले नाहीत या काळजीने योगेश्वरी त्रस्त असताना नारदमुनी प्रविष्ट झाले आणि योगेश्वरीची माफी मागून म्हणाले, तू कुमारिका असल्यामुळे तुझ्या हातून दंतासुराचा वध होणार आहे. यास्तव हा विवाह होऊ शकला नाही. कृपाकरून देवांच्या आणि साधुसंतांच्या कल्याणासाठी तू दंतासुराचा वध करावास ही इच्छा. नारदमुनींच्या आज्ञेनुसार देवीने युद्धात दंतासुराचा वध केला. आजही वैजनाथ आपल्याशी विवाह करण्यास येईल, या आशेने ही वाट पहात आहे.
योगेश्वरीचा वैजनाथाशी विवाह न झाल्यामुळे तिला पूर्णावस्था प्राप्त झाली नाही म्हणून अंबाजोगाई हे देवीचे अर्धे पीठ मानले जाते. देवी कुमारी राहिली तरी आपण कुमारी न रहाता चांगला पती मिळावा यासाठी कुमारी देवीची उपासना करतात.
भगवान शंकराच्या तेजापासून निघालेली शक्ती म्हणजे योगेश्वरी होय, असे विद्वान अभ्यासकांचे मत आहे; तर भक्त म्हणतात, पार्वतीच्या शक्तीने निर्माण होऊन जगाला प्रकाशित करणारी चैतन्य शक्ती म्हणजे योगेश्वरी- जी सर्व देवदेवतांमध्ये अंतर्भूत झालेली योगिनी आहे. भक्तांच्या आवडीनुसार नानाविध रूपे घेऊन प्रगट होते आणि त्यांची मनोकामना पूर्ण करते.
धन्य अंबापूर महिमा विचित्र । पार्वती अवतार योगिनी क्षेत्र ।
दंतासूर मर्दोनि केले चरित्र । सिद्धांचे स्थळ ते महापवित्र ।
जयदेवी जयदेवी जययोगेश्वरी । महिमा तुझा न कळे वर्णिता थोरी ।।
Leave a Reply