नवीन लेखन...

अकल्पित (भाग – 1)

मलबार हिलच्या नारायण दाभोळकर रोडवरच्या श्रीमंत वस्तीत ही वीस मजली इमारत. या इमारतीच्या विसाव्या मजल्यावरील पाचहजार चौरस फुटाचा हा अलिशान टेरेस फ्लॅट माझ्या मालकीचा आहे. मी आज एक तीस वर्षांचा तरुण उद्योजक आहे. संपूर्ण देशभर माझ्या उद्योगाचे जाळे पसरले आहे. हे सर्व वैभव मी माझ्या हुशारीने कमावले आहे. अर्थात माझ्या आईचा फार मोठा सहभाग आहे. नव्हे, आज मी जो काही आहे तो तिच्यामुळेच.

माझे वडील लहानपणीच वारले असे आईने मला सांगितले. आमचे घराणे सरदार सूर्यवंशी यांचे. आमचे साताऱ्याजवळ भोकरे येथे संस्थान. सातारा सांगलीकडे आमची हजारो एकर बागायती जमीन. पाचगणीला एक राजवाड्यासारखा भव्य बंगला आणि स्ट्रॉबेरीची मोठी बागायत. आई तिकडेच राहते.

आता तुम्ही म्हणाल, अहो एवढे गर्भश्रीमंत, एवढी मोठी इस्टेट आणि दौलत आहे मग यात तुमचे कर्तृत्व ते काय?

सांगतो. माझ्या आईला आमचे चुलते म्हणजे श्रीमंत चंद्रकात राजे आणि आईच्या सासूबाई राजमाता लक्ष्मीदेवी यांनी मी लहान असतानच खरंतर माझा जन्म होण्यापूर्वीच, राजवाड्यातून बाहेर काढले असे आईने मला सांगितले.

अगदी नेसत्या वस्त्रानिशी. बऱ्याच कोर्टकचेऱ्या झाल्या तेव्हा कुठे पाचगणीची इस्टेट तिला मिळाली पण बाकी सगळ्यावर पाणी सोडायला लागले. हे का व कसे झाले हे तिने मला अजूनही सांगितले नाही किंवा हा विषय काढलेला पण तिला आवडला नाही. काढलाच तर योग्य वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला सर्व सांगेन. एवढे बोलून ती विषय संपवते. मी पण फार चौकशा करत नाही. कशाला तिला दुखवायचे?

असो, जुने राजे राजवाडे इस्टेटीच्या भांडणातून रावाचे रंक झाल्याची पुष्कळ उदाहरणे आहेत. पण माझ्या आईने मात्र जेवढे मिळाले ते राखलेच पण वाढवलेही आणि मलाही उत्तम शिक्षण दिले.

आता मी जो आहे तो तिच्यामुळेच. माझ्या लग्नासाठी पुष्कळ मुली सांगून आल्या. अगदी हात धुवून मागे लागल्यात म्हणा ना. आईपण तयार आहे. पण त्या आधी मला माझ्या लहानपणापासूनची सर्व हकिकत एकदा सांगेन म्हणते. मी बरेच वेळा तिला विचारले पण तुम्ही अजून लहान आहात, वेळ आली म्हणजे मी स्वत: होऊन सांगेन म्हणायची. पण परवा तीच म्हणाली की मी आज मुंबईला येईन आणि तुला सगळा इतिहास सांगेन.

तर, मी आज इथे टेरेसवर बसून बागेत मद्याचे घुटके घेत ती यायची वाट पहाता आहे. आमच्या आईला रात्रीच्या प्रवासाची भारी आवड. कधीही प्रवासाला निघाली म्हणजे संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावरच. म्हणजे पाचगणीहून संध्याकाळी निघायचे ते रात्री दहा अकरा वाजता इथे पोहोचायचे हा तिचा नियम. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे दिवस लवकर मावळतो. म्हणजे आज ती दहा वाजेपर्यंत येणार.

आता रात्रीचे दहा वाजून गेले आहेत. गच्चीवर इतक्या उंचीवर थंडगार वारा सुटला आहे. आज बहुधा अमावस्या असावी. दाट काळाभोर अंधार पसरलेला आहे. समोर एरवी दिसणारा अथांग सागर आता अंधाराच्या पोकळीत लुप्त झाला आहे. एका प्रचंड काळ्या पोकळीत ती तरंगतो आहे असे वाटते. या पोकळीत असंख्य चांदण्या चमचमताहेत. एका बाजूला चौपाटीपासून कुलाब्यापर्यंत अर्धवर्तुळाकार रस्ता, त्यावरील दिवे, जाणाऱ्या येणाऱ्या मोटारींचे दिवे आणि इमारतीमधील दिवे यांचे एक अप्रतिम दृश्य दिसते आहे. ही दिमाखदार आरास आणि काळ्याभोर आकाश पोकळीतील असंख्य चांदण्या, थंडगार वारा यांचे एक अजबच वातावरण आणि त्याला समुद्राच्या घनगंभीर आवाज या पार्श्वभूमीवर मी एक क्षुद्र जीव आहे असे मला वाटत होते. या अजस्त्र पसाऱ्यात आपले स्थान काय? असे चमत्कारिक विचार माझ्या मनात फेर धरत होते.

आता रात्रीचे अकरा वाजून गेले होते. मला थंडी वाजायला लागली. आता वाट न पाहता आत जावे आणि जेवण करावे आणि उद्या आईची गोष्ट ऐकावी असे ठरवून मी सखारामला आमचा नोकर, हाक मारली आणि म्हणालो, “सखाराम, चल आवर हे सगळं. टेरेसवरचे दिवे मालव आणि माझे जेवण लाव. मी येतोच स्नान करून.” सखारामने सांगितल्याप्रमाणे कामाला सुरुवात केली. मी क्षणभर डोळे मिटून घेतले. माझ्या डोळ्यापुढून माझे गतआयुष्य झरझर सरकू लागले.

मला कळू लागले तसे मी आणि माझी आई एवढेच मला आठवते. आम्ही पाचगणीला रहात होतो. पाचगणीच्या सेंट थॉमस कॉन्व्हेंटमध्ये माझे शिक्षण झाले. लहानपणापासून माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये चारचौघांपेक्षा काहीतरी वेगळेच आहे याची मला जाणीव झाली. विशेषत: माझी नजर अत्यंत भेदक आहे आणि माझ्या नजरेला नजर देणे भल्या भल्यांना मुष्किल जाते असा मला वेळोवेळी अनुभव येत गेला.

अगदी लहानपणीचा शाळेतला एक प्रसंग मला आठवतो. मी तेव्हा चौथीत होतो. माझे नाव अजित. इंग्रजी नाव अजितराजे सूर्यकांतराजे सूर्यवंशी. म्हणजे इंग्रजी आद्याक्षरे ए.एस.एस.!

आता नावाची पण काय गंमत असे पाहा. नाव ठेवताना या नावामुळे काही घोटाळा होईल असे लक्षातही येत नाही. माझा एक मित्र आहे रविंद्र. त्याचे नाव रविंद्र विरेंद्र झोपे म्हणजे र.वि.झोपे! म्हणजे रवीला पण झोपवणारे हे नाव किती हास्यास्पद वाटते नाही?

तसेच माझे हे नाव. वर्गात हजेरी लावताना मॅडम म्हणाल्या, ए.एस. सूर्यवंशी?” मी म्हणालो, ‘प्रेझेंट मॅडम’ एका चलाख मुलाच्या लक्षात माझ्या नावाची गंमत आली. तो शेजारच्या मुलाच्या कानात कुजबूजला आणि तो त्याच्या शेजारच्या कानात कुजबुजला! झाले, अख्ख्या वर्गात ते पसरले! तास संपल्यावर मॅडम बाहेर पडल्या. आणि सर्व वर्गच ओरडायला लागला. ॲ‍स! ॲस! अस! आणि सगळे माझ्याकडे पाहून जोरजोरात हसायला लागले! क्षणभर ते का हसताहेत ते मला कळेना पण नंतर लक्षात आले की माझ्या नावाची टिंगल उडवताहेत. मग मात्र मी जाम भडकलो. ताडक्न उठलो आणि काड्कन एका मुलाच्या मुस्कटात भडकावली. सारा वर्ग क्षणार्धात गप्प झाला! मग त्या मुलाची आणि माझी चांगलीच जुंपली. मी मुळातच डबल हाडापेराचा, दिसायला वयाच्या मानाने जरा थोराडच. मी त्याला यथेच्च बुकलून काढले. दुसऱ्या मॅडम वर्गात आल्या तेव्हा आमची मारामारी संपली. माझा एकंदर रूद्रावतार आणि माझ्या नजरेतील आग पाहून पोरं जाम टरकली. त्या मुलाने प्रिन्सिपॉलकडे तक्रार केली. आम्हाला त्यांनी बोलावले. मी त्यांना झालेला प्रकार सांगितला आणि त्यांच्याकडे डोळे रोखून पाहत राहिलो. त्यांनीही माझ्या नजरेस नजर भिडवली आणि रागाने पाहू लागले. पण थोड्याच वेळात त्यांनी नजर खाली केली. त्यांच्या नजरेत भीती जाणवली मला. आम्हाला समज देऊन पुन्हा असा प्रकार होता कामा नये असा दम देऊन परत वर्गात पाठवले.

परत वर्गात असा प्रकार झाला नाही. पण बाहेर मात्र मुलं लांबून लांबून माझ्याकडे हात करून आपापसात काहीतरी खुसखुसायचे. मला समजायचे ते काय म्हणत असतील पण जोपर्यंत माझ्या तोंडावर कुणी काही बोलत नव्हते तोपर्यंत मी काही करू शकत नव्हतो. परंतु पुढे मला चिडवायचे प्रकार बंद झाले पण त्याचे कारण मात्र वेगळेच होते. माझ्या नजरेचा आणखी एक चमत्कार माझ्या ध्यानात आला पण तो नेमका काय असावा हे मला कळेना.

त्याचे असे झाले. एकदा स्वत: मॅडमच मला भर वर्गात ‘ॲ‍स’ म्हणाल्या. कारण खरं अगदी क्षुल्लक. मी होमवर्कची वही विसरल्याचं. मी चूक कबूल केली आणि उद्या दोन्ही दिवसांचं होमवर्क घेऊन येतो म्हणालो. पण त्या संतापी बाईंनी मला वर्गात शेवटच्या बाकावर तास संपेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा केली. मी निमूटपणे जाऊन उभा राहिलो. मनातून खूप रागावलो होतो. बाकावर उभा राहून मॅडमकडे रोखून पाहत होतो. त्यापण रागाने माझ्याकडे पाहत होत्या. असे पाहत असतानाच एकाएकी त्या प्रचंड घाबरल्या. वर्ग सोडून तशाच . प्रिन्सिपॉलकडे धावल्या. कोणालाच कळेना त्यांना एकाएकी काय झाले. थोड्या वेळाने मला प्रिन्सिपॉलनी बोलावले. माझी आईपण तिथे होती. ती प्रिन्सिपॉलना म्हणाली, ‘हे पाहा साहेब, मी आपले आणि मॅडमचे सर्व सांगणे ऐकले. माझ्या मुलाने होमवर्क आणले नाही हा गुन्हा मला मान्य आहे. पण तो आपल्या नजरेने धाक दाखवतो हे मला मान्य नाही. तसे असते तर तो आज इतकी वर्षे इकडे येत आहे. मी पाचगणीत एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे. माझ्या मुलाने काहीही गैरप्रकार केलेला नाही असे असता तुम्ही त्याच्यावर भलते सलते आरोप करता हे मला मुळीच मान्य नाही. माझा मुलगा आपणहून कधीही कोणाला त्रास देत नाही. किंवा दंगामस्तीही करत नाही. झाल्या प्रकारामध्ये त्याचा काहीही दोष नाही. तरीही यापुढे मी शिस्त पाढायला त्याला सांगेन. इतक्या लहान मुलाशी वागताना आपणही समजून घ्यायला पाहिजे असे मला वाटते. आईचा एकंदर रूबाब आणि आमच्या घराण्याचे नाव याचा बराच दबाव त्यांच्यावर पडला. त्यानंतर मात्र माझ्या वाटेला जायचे बंद झाले.

मी घरी गेल्यावर आईला विचारले, “माझ्याकडे माझ्या डोळ्यांकडे पाहून त्यांना कसली भीती वाटते? मी तर काहीही केले नाही. तेव्हा ती म्हणाली, “अहो तुम्ही सूर्यवंशी सरदार घराण्यातले आहात. तुमच्या नजरेला नजर देण्याची हिमंत करणाऱ्याचे असेच व्हायचे. तुम्ही अजून लहान आहात. योग्य वेळ आली म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगेन. पुढे माझ्या असे लक्षात यायला लागले की माझ्या नजरेत काहीतरी अद्भूत शक्ती आहे. त्यामुळे कुणी माझ्या नजरेचा सामना फार वेळ करू शकत नाही. ही शक्ती जसे माझे वय वाढत गेले तशी जास्त जास्तच वाढत गेली. इतकी की तिच्या प्रभावाने एक फार भयंकर प्रकार घडला. तो असा, मी शाळा कॉलेजचे शिक्षण संपवून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. लिंबाच्या पाल्यापासून काही विशिष्ट प्रक्रियेने मी एक तेल विकसित केले. त्याला निरनिराळ्या व्यवसायातून प्रचंड मागणी येऊ लागली. मी त्याचे जागतिक पेटंट घेतले आणि बघता बघता माझा धंदा अफाट वाढला. माझी जगातल्या शंभर अति श्रीमंतात गणना होऊ लागली.

माझ्या नजरेतील शक्ती इतकी वाढली की फार वेळ माझ्या नजरेचा सामना करणे अशक्य होऊ लागले. कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये मी पाऊल टाकताच एक प्रकारचा सन्नाटा पसरायचा. माझे बोलणे अत्यंत सडेतोड, मुद्देसूद, त्याच्या विरुद्ध बोलणे एक तर मला आवडत नसे आणि माझा मुद्दा मी इतक्या ठामपणे मांडत असे की तो खोडून काढणे कुणाला शक्य होत नसे. या उपर जर कोणी फारच ताणायला लागला तर मी माझी नजर रोखून पाहू लागताच बोलणारा त् त् पपकरू लागायचाच. मी आईला ही गंमत सांगायचो तेव्हा तीखदखदून हसायची. म्हणायची, “अजित राजे, आता तुम्ही खरे खरे सूर्यवंशी झालात?”

“म्हणजे?” मी विचारायचो, तेव्हा ती म्हणे, “आता तुम्हाला सगळं सांगायलाच पाहिजे. लवकरच सांगेन मी.”

एकदा एक विदेशी उद्योजक आमच्या मिटिंगमध्ये बसला होता. माझे बोलणे संपल्यावर आपल्या गोऱ्या कातडीचा रूबाब दाखवायला तो मला ज्ञान शिकवायला लागला. मी थोडावेळ ऐकून घेतले. इतर लोकांनी म्हणजे कमिटीच्या इतर सदस्यांनीही थोडावेळ ऐकले आणि मग त्यांनाही आता मी काय करतो त्याची उत्सुकता लागली.कारण मला असा विरोध आवडत नाही. शिवाय मुद्दा सोडून वायफळ बडबड मी खपवून घेत नाही हे त्यांना माहीत होते. माझ्या नजरेच्या चाबकाचा फटकारा त्यांनी अनुभवला होताच! त्याची बडबड संपेना तसे सगळे अस्वस्थ झाले. जागेवरच चुळबूळ करू लागले. जेव्हा अती झाले तेव्हा मी टेबलावर हात आपटून गरजलो, “मिस्टर ॲ‍न्डरसन, जस्ट लुक हियर!” माझा इतका संताप यापूर्वी कधी झाला नव्हता. माझे डोळे जणू अंगार ओकत होते! तो माझ्याकडे पाहू लागला. त्याने माझ्या नजरेस नजर भिडवली आणि तो रोखून माझ्याकडे पाहू लागला. माझ्यासारख्या एका देशी माणसाने भर मिटिंगमध्ये आपला असा चढ्या आवाजात पाणउतारा करावा याने तो थरकाप कापू लागला. पण माझ्या डोळ्याला डोळा भिडवून पाहू लागताच तो थरथर कापून त् त् प् प् करायला लागला. त्याच्या कपाळावर घामाचे टपोरे थेंब जमा झाले. त्याला प्रचंड घाम फुटला. रुमालाने तो घाम टिपू लागला आणि एकदम छातीवर हात दाबून खुर्चीतच कलंडला! सगळे धावले. पण त्याचा खेळ तिथेच खलास झाला! अर्थात यात माझा काहीच दोष नव्हता.

क्रमश:

— विनायक अत्रे.

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..