नवीन लेखन...

दुर्मीळ खजिना गवसला

A Rare Treasure Found - Lokrajya

रविवारचा दिवस होता. त्यादिवशी माझी न्यूज शाखेत सुट्टीच्या दिवशीची ड्युटी होती. दुपारी साधारण दोन वाजण्याच्या सुमारास लोकराज्य शाखेतला फोन वाजू लागला. सुट्टीच्या दिवशी कोण असेल अशा विचारात थोड्या अनिच्छेनेच फोन घेतला. पलिकडील व्यक्ती बोलू लागली, मी ग्रंथपाल रवींद्र नलावडे बोलतोय, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील धोलवड या गावातून. मला केंद्रेंना बोलायचंय. मीच बोलतोय म्हटल्यावर अगदी आनंदात येऊन ते सांगू लागले. अहो काही वर्षापूर्वी मी तुम्हाला बोललो होतो की,आमच्या ग्रंथालयात लोकराज्यचे खूप जुने अंक आहेत. सध्या आम्ही ग्रंथालय नवीन जागेत हलविण्यासाठी सर्व पसारा काढला आहे आणि त्यात लोकराज्यचे खूप जुने अंक आहेत. जुने म्हणजे कोणत्या वर्षाचे अंक आहेत असे विचारल्यावर ते म्हणाले, 1947, 1950, 1952 अशा वर्षाचे अंक आमच्याकडे आहेत. 1947 हे वर्ष ऐकून मी उडालोच. अरे याच वर्षी तर लोकराज्यची सुरूवात झाली होती. म्हणजे लोकराज्यच्या पहिल्या वर्षाचे अंक ! मार्च 1947 साली लोकराज्य सुरू झाल्याचे ज्ञात आहे. मात्र सुरूवातीच्या काही वर्षांचे अंक उपलब्ध नाहीत. कार्यालय विविध ठिकाणी स्थलांतरित होत असताना मधल्या काळातील काही अंक सापडत नाहीत. मंत्रालयातील केंद्रीय ग्रंथालयात 1956 पासूनचे अंक उपलब्ध आहेत. मात्र त्यापूर्वीचे अंक नाहीत. लोकराज्यचे प्रारंभिक स्वरूप कसे होते याविषयीचा काही पुरावा नाही. म्हणून 1947 हे पहिले वर्ष ऐकताच मी रोमांचित झालो. पाठोपाठ मला रवींद्र नलावडेंचे कौतुक वाटले, कारण काही वर्षांपूर्वी मी या गावात गेलो होतो. माझा पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये असतानाचा मित्र भूषण राक्षे याचे हे गाव. त्याच्यासोबत त्याच्या गावी गेल्यावर त्याने मला आवर्जून हे ग्रंथालय दाखविले होते आणि तिथल्या पुस्तकांविषयीही सांगितले होते. त्यावेळी ग्रंथपालाशी बोलताना लोकराज्यचा उल्लेख आला असता आमच्या ग्रंथालयात लोकराज्यचे खूप जुने अंक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र किती जुने ते निश्चित नव्हते. तरीही जेव्हां केव्हां तुम्ही ग्रंथालय आवराल आणि लोकराज्यचे अंक मिळाले तर संपर्क करा असे सांगून मी तिथून निघालो होतो. आणि आता इतक्या वर्षानंतर तो संदर्भ लक्षात ठेवून ग्रंथपालांनी संपर्क केला होता. मी लगेच रवींद्र नलावडे यांचा मोबाईल नंबर घेतला. त्यांना सर्व अंक वेगळे काढून ठेवण्यास सांगितले आणि हे अंक नेण्यासाठी तुमच्या गावाला नक्की येईन, असे आश्वासन देऊन फोन ठेवला.
लोकराज्यचे 1956 पासूनचे अंक मी ग्रंथालयात अनेकवेळा चाळले होते. मात्र त्यापेक्षाही जुने प्रारंभीचे अंक मिळणार म्हणून मी जरा जास्तच आनंदात होतो. मनात विचारांची गर्दी जमली होती. लोकराज्यची मोठी परंपरा नजरेसमोर येत होती. लोकराज्य हे केवळ नियतकालिक नाही तर तो आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार आहे. गेल्या सहा दशकात लोकराज्यने खूप काही अनुभवले आहे. देशाच्या स्वातंत्र्याची पहाट, संयुक्त महाराष्ट्रासाठी पेटलेला रणसंगर, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा मंगलकलश, ध्येयासक्त नेत्यांची कारकीर्द, पानशेतचा प्रलय, कोयनेचा भूकंप, याच कोयनेने दिलेल्या विजेचा पहिला प्रकाश किरण, नव महाराष्ट्राची पायाभरणी, अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणारी हरितक्रांती, आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी चाललेली दिग्गजांची धडपड, लातूर-किल्लारीची आपत्ती, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांपासून दहशतवादी हल्ल्यापर्यंत, पंचायत राज-सहकार-रोजगार हमी योजना-महिला आरक्षण-माहितीचा अधिकार यांसह विविध क्रांतिकारी निर्णयातून देशात अग्रेसर ठरलेल्या महाराष्ट्राची घोडदौडड एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासात अभूतपूर्व ठरलेली सारीच परिवर्तने-आवर्तने लोकराज्यने खूप जवळून अनुभवली आहेत. याच मालिकेतील आणखी काही पाने चाळायला मिळणार या भावनेने मी सुखावून गेलो.
पुणे जिल्ह्यात लोकराज्यचे दुर्मीळ अंक उपलब्ध असल्याची माहिती आमचे महासंचालक श्री.प्रमोद नलावडे व संचालक श्री.प्रल्हाद जाधव यांना सांगितली. त्यांना तर अधिकच आनंद झाला. आता तू लगेचच पुण्याला जाण्याचे नियोजन कर आणि अंक मिळव असे त्यांनी सांगितले. सोबतच पुढील सहकार्यासाठी आमच्या पुणे कार्यालयाला सूचना देखील केल्या.
22 फेब्रुवारीला संध्याकाळी पुण्याला पोहचलो. सकाळी लवकर धोलवडला जायचे नियोजन केले. सकाळी आठ वाजता गाडी धोलवडच्या दिशेने निघाली. पुणे-नाशिक महामार्गावर चाकणमार्गे खेड-राजगुरूनगर-मंचर-नारायणगाव-आळेफाटा आणि तिथून ओतूर असा हा प्रवास. धोलवड गाव ओतुरपासून चार किलोमीटर अंतरावर कल्याण-अहमदनगर मार्गावर आहे.
प्रवासात मनात प्रचंड उत्सुकता होती. कसे असतील लोकराज्यचे प्रारंभीचे अंक? ते सुस्थितीत असतील का? त्याला वाळवी तर लागली नसेल ना? ते वाचता येतील का? असे अनेक प्रश्न मनात येत होते. दुपारी 11 वाजता आम्ही धोलवडमध्ये पोहोचलो. आधुनिक पद्धतीने केल्या जाणार्‍या समृद्ध शेतीने नटलेला हा परिसर. जेमतेम 3 हजार लोकवस्तीचे गावही तसेच टुमदार आणि सुंदर. पाहता क्षणीच प्रेमात पडावं असंच. प्रसिद्ध लेखक आणि कार्यकर्ते अनिल अवचट यांच्या ‘जगण्यातील काही’ या पुस्तकात धोलवड गावचा ओझरता उल्लेख आहे. हे गाव मुख्यत: प्रसिद्ध आहे ते या गावचे ग्रामदैवत असलेल्या मळगंगा देवीसाठी. पुष्पावती नदीच्या काठावरील संगमरवरी बांधकामातील हे मंदिर हजारो लोकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. खळाळत वाहणारी पुष्पावती आणि काठावरील मळगंगा मंदिर यामुळे हा परिसर पावित्र्याने भारावून गेलेला आहे. देवीच्या दर्शनाला आलेले भाविक, मंदिरातील मंद, मंजुळ घंटानाद आणि हवेच्या सुखद झुळकींमुळे मन प्रसन्न होऊन जाते. दरवर्षी तीन दिवस मळगंगा देवीची भव्य यात्रा भरते. याकाळात पुणे-मुंबई व इतरत्र नोकरी-व्यवसायानिमित्त विखुरलेले धोलवडकर न चुकता हजेरी लावतात.
पुष्पावतीच्या पाण्यामुळे येथील काळ्याभोर सुपीक जमिनी सोनं पिकवित आहेत. ऊस, कांदा, केळी, द्राक्षे, गहू, हरभरा, भुईमूग, पालेभाज्या अशी विविध पिके इथला शेतकरी घेतो. जवळच असलेल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामुळे या परिसरात समृद्धी आली आहे. वारकरी परंपरा जपणारे हे गाव पुरोगामी विचाराचे आहे. हे गाव हागणदारीमुक्त आहे. गावाला निर्मलग्राम पुरस्कार मिळाला असून लवकरच गावचा समावेश इको व्हिलेज योजनेत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी या जन्मस्थळी शिवजयंतीला नियमितपणे मशाल घेऊन जाणारे हे गाव शिक्षण आणि विकासाच्या माध्यमातून महाराजांना जणू श्रद्धांजली वाहते आहे.
आम्ही थेट ग्रंथालयात पोहोचलो. ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीत वरच्या मजल्यावर हे ग्रंथालय आहे. ग्रामोन्नती सार्वजनिक मोफत वाचनालय. जुन्या बांधणीची ही दगड आणि लाकडाचा वापर असलेली कौलारू छपराची इमारत मनात ठसणारी आहे. ग्रंथपाल रवींद्र नलावडे वाट पाहत होते. 50 वर्षाचे हे अपंग गृहस्थ. पण उत्साह एखाद्या तरुणाला लाजवणारा. जाताक्षणीच त्यांनी लोकराज्यचा गठ्ठा पुढ्यात टाकला. हळुवार हातांनी पहिला अंक उचलला. माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. लोकराज्य वर्ष पहिले शनिवार, तारीख 20 डिसेंबर 1947 मुंबई सरकारच्या प्रसिद्धी खात्याचे प्रकाशन मास्टहेडच्या वरच्या बाजुला ‘यतो धर्मस्ततो जय:’ तर खालील बाजुस ‘बहुजन समाजाच्या कल्याणासाठी झटणारे पत्र’ अशा ओळी. 65 पावसाळे पाहिलेला हा अंक पाहून मी हरखून गेलो. उत्साहाने सर्व अंक चाळू लागलो. त्यापेक्षा जुने नोव्हेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबर चे अंक मिळाले. त्यांनी मग अजून काही गठ्ठे काढले. त्यात अजून अंक मिळाले. 1948 साली महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर त्यांच्या अस्थिकलशाचे नाशिक येथील गोदावरी घाटावर विसर्जन झालेल्या घटनेचे वार्तांकन करणारा अंक भावूक करून गेला. याच अंकात तत्कालीन मुंबई प्रांताचे पंतप्रधान बा.गं. खेर यांचा गांधीजींना श्रद्धांजली वाहणारा हस्तलिखित संदेश आहे. त्यानंतर मग 1950, 1952, 1954, 1958 या वर्षांतील जवळपास 100 अंक मिळाले. (लोकराज्य त्याकाळी साप्ताहिक होते.) त्यातील काही अंक वाळवी लागलेले, जीर्ण झालेले असले तरी बहुतांश अंक सुस्थितीत आहेत. इतकी वर्षं अडगळीत राहूनही या अंकाचे मूळ रूप कायम आहे. या सर्व शोधात 1947 ते 1958 या काळातील अंक मिळाले. तिथेच बसून त्या अंकाची वर्षवार विभागणी केली. हळुवारपणे त्याची बांधणी केली आणि सर्व गठ्ठे बॅगेत ठेवून दिले.
दुर्मिळ अंक हाती लागले. पण माझ्या मनात एक प्रश्न वारंवार येत होता की, या ग्रंथालयाची स्थापना 1979 सालची, मग येथे 1947 सालापासूनचे अंक कसे? या प्रश्नाचे मला मिळालेले उत्तर जितके मनोरंजक तितकेच आश्चर्यकारक आहे. झाले असे की स्वातंत्र्यापूर्वी या परिसरातील बरीच मंडळी कामानिमित्त मुंबईला गेली होती. त्यामध्ये या गावातील सीताराम लक्ष्मण नलावडे उर्फ बापू हे बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये तर रूख्माजी धोंडिबा मुंढे हे भाऊच्या धक्क्यावर कामाला होते. ते कामगाराचे नेतृत्वही करत असत. त्यांचा तत्कालीन वरिष्ठ कामगार नेत्यांशी चांगला संपर्क होता. वाचनाची मुळातच आवड असलेल्या या कामगारांची ही आवड इथे अधिकच विकसित झाली. विविध वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके ही मंडळी विकत घेऊन वाचू लागली. वेगवेगळ्या अंकाचा संग्रह होत गेला. हे सर्व अंक पेटीत जतन करून ठेवले जात. अशा काही पेट्या जमा झाल्या. त्याला ‘पेटी ग्रंथालय’ हे नाव पडले. काळ पुढे सरकत गेला. मुंबईसारख्या ठिकाणची जागेची अडचण पाहता ह्या पेट्या ठेवणे जिकीरीचे झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर गावोगावी शाळा उघडू लागल्या. शिक्षणाचे वारे सर्वत्र वाहू लागले. तेव्हा या मंडळींनी विचार केला की, आपल्या गावातील शाळेत जर ही पुस्तके, नियतकालिके पाठविली तर मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तिथून मग या अनमोल ग्रंथसंपदा असलेल्या पेट्यांचा प्रवास धोलवड गावाकडे सुरू झाला. बरीच वर्षं या ग्रंथांनी शालेय विद्यार्थ्यांची वाचनाची तहान भागविली. पुढे 1979 साली ग्रामपंचायतीने ग्रंथालय सुरू केले. तेव्हा हे साहित्य ग्रंथालयाकडे आले. तिथे ते उत्तररित्या जतन झाले. लोकराज्यचे अंकही जसेच्या तसे राहिले. अशा रीतीने मुंबईहून सुरू झालेल्या अंकाचा प्रवास आता पुन्हा त्याच दिशेने सुरू झाला. एका अर्थाने वर्तूळ पूर्ण झाले आहे.
सर्व अंक हाती पडताच आमचे महासंचालक श्री.प्रमोद नलावडे यांना फोन केला. सर्व वर्णन ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला. आपण हे अंक योग्यप्रकारे डिजिटाईज्ड रूपात जतन ठेवू असे त्यांनी सांगितले. सध्या लोकराज्यचे डिजिटायजेशन सुरु आहे. महासंचालनालयाच्या वेबसाईटच्या माध्यमातून ते आधुनिक रुपात वाचकांना मोफत उपलब्ध करुन दिले जात आहेत. ज्या माणसाने हे अंक जतन करून ठेवले त्यांना मला व्यक्तिश: धन्यवाद द्यायचे आहेत, असेही ते म्हणाले. मग ते ग्रंथपाल नलावडे यांच्याशी ते बोलले. आमचे संचालक श्री. प्रल्हाद जाधव यांना ही बातमी सांगताच त्यांना झालेला आनंद अवर्णनीय होता. त्याचवेळी त्यांनी मला सूचना केली की, त्या लोकांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. म्हणून तू त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार कर. लगेच ग्रंथपाल श्री.रवींद्र नलावडे आणि धोलवडचे सरपंच अशोक नलावडे यांचा सत्कार करण्यात आला. गावातली मंडळी देखील आनंदी होती. आमच्याकडे बरीच वर्षं राहिलेले साहित्य आता योग्य ठिकाणी जात आहे, अशीच सर्वांची भावना होती. अखेर सर्वांचा निरोप घेतला. गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. येताना मनात आलेल्या अनेक शंका-कुशंकांना पूर्णविराम मिळाला होता. लोकराज्यची दुर्मिळ दौलत घेऊन मी परत चाललो होतो. एखादा माणूस पिशवी भरून सोनं घेऊन जाताना त्याला जो आनंद होत असेल, तसाच मला झालेला आनंद नक्कीच त्यापेक्षा कमी नव्हता.
किरण केंद्रे
सहायक संचालक (माहिती)
मंत्रालय
मोबाईल : ७३०३४२८५५५

Avatar
About किरण केंद्रे 4 Articles
किरण केंद्रे हे महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागात कार्यरत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..