नवीन लेखन...

माना न माना !

हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या खूप वाढत गेल्या. त्याचे संकलन व आकलन करणे बुद्धीमान समजल्या गेलेल्या माणसाला देखील आवघड जाऊ लागले. परंतु मानव हा सदा प्रयत्नशील व चौकस असून त्याचा हा सत्य शोध सुरु आहे.

यातूनच प्रश्नांची एक मालिका निर्माण झाली. तो कोण ? मी कोण ? अर्थात कर्ता कोण व माझी भूमिका कोणती? हे महत्वाचे प्रश्न निर्माण होतात. अभ्यासक आले. चिंतन झाले. भाष्य झाले. अनेक विचारवंत निर्माण झाले. बघून जाणून अनूभवून वेगवेगळी सुत्रे निर्माण झाली. चौकटी आखल्या. ज्यांत त्यांचे तत्वज्ञान काठोकाठ भरविण्याचा प्रयत्न झाला. कित्येकजण साक्षात्कारी होते. त्यांच्या मुखातून पडलेले सर्व हेच सत्य वाटून कित्येकाना ते पटत गेले. एक महान व्यक्ती म्हणून त्यांची लोकानी पाठपूरवणी केली. त्यांना मान्यता दिली. ही विद्वत्तेची किमया अनेक जणाना प्राप्त होत गेली. तसे त्यांचे विचार ऐकण्यासाठी व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आपणासही कांही मिळेल कां ह्या कल्पनेने बराच वर्ग त्याचा पाठ पुरावा करीत गेला.

प्रत्येक साक्षात्कारी व्यक्तीमध्ये सत्य व त्याची जागृती तीच होती. साध्य कोणते ध्येय कोणते याला सर्वानी मान्यता दिली. ते एक सत् चित् व आनंदा याचे स्रोत आहे. मात्र त्यांने ती जाणून घेण्याचा मार्ग, रचना मात्र भिन्न होत्या. येथेच एका संभ्रमी अवस्थेचा जन्म झाला. प्रत्येकाला दोन टोके दिसू लागली. जे मिळवायचे ते एक. व ते कसे मिळवायचे ते दुसरे. मात्र भिन्नतेने जो जन्म दिला तो ते साध्य करण्यासाठी जो मार्ग आहे त्याचा. भिन्नता ही असणारच. उंच शिखरावर एक तेजस्वी मनोहर ठिकाण दिसत असेल, तर तेथे जाण्याचे निश्चितच अनेक मार्ग असणारच. ह्यांत शंकाच नाही.परंतु त्याच अनेक मार्गाच्या भिन्नतेमुळेच सर्वांच्या विचारांमध्ये विखुरता निर्माण केली गेली. कुणाचा योग्य मार्ग, चांगला, सुलभ व ध्येया जवळ त्वरित नेणारा असेल ह्यावर आपापली बुद्धी प्रगल्भतेनुसार टिपणी होऊ लागली. सर्व खेळांची हीच गोम बनली. लोकांच्या संभ्रमामुळे प्रत्येकजण साध्याला तर नजरेसमोर ठेवीत होता. सारी शक्ती ही साधनेमध्येच घालू लागले. तेथेच घाण्याच्या बैलाप्रमाणे गोल गोल फिरु लागला. त्याचा प्रवास तर बराच झालेला परंतु त्याला कळले नाही की साध्य कोठे आहे.

आपण जे करतो ते प्रत्येकाला योग्यच वाटत असते. मग ते लहान मूल का असेना. त्याला वाटते माझेच बरोबर आहे. वरिष्ठ जाणकार हे मग कसे मागे राहतील. त्याना त्याच्या प्रत्येक कृतीचे योग्य म्हणूनच समर्थन करणे मनास उचित वाटते. जर प्रेरणेचा स्रोत हा अंतर्यामी असेल तर त्याचा उगम देखील सत्य आनंद ह्या ब्रह्मा निर्मीत शक्तीमधूनच होत असतो. म्हणूनच प्रत्येकाला आपली कृती योग्य व निश्चित व्हावी वाटत असते. त्याचे हे वाटणे एका हद्दीपर्यंत बरोबर असते.

२ येथे एक जाणीव व्हावी.गंगा जेंव्हां गंगोत्री मुखातून उत्पन्न होते, ह्या भूतलावर येण्यासाठी झेप घेते, तेंव्हां ती अत्यंत पवित्र निर्मळ व पर्यावरणरहीत असते. चांगुलपणांची सारी महान तत्वे त्यांत निगडीत झालेली असतात. परंतु जेव्हां ती आपला मार्ग सागराच्या दिशेने जाऊ लागते. तेंव्हां तीचा संबंध अनपेक्षीत मुल्यांबरोबर येतो. ज्यांत इतर नद्या, पर्वतावरचे वाहून आलेले पाणी, नाले इतकेच काय नदीकाठी वसलेले गांव वसत्यांचे नको असलेले सांडपाणी, एक नव्हे अनेक दूषित पाण्याचे साठे हे त्या प्रवाहामध्ये मिसळले जातात. गंगेच्या उगमस्थानाचे जल व महासागरामध्ये विलीन होण्यासाठी गंगासागर किनारी आलेले जल ह्यांत प्रचंड भिन्नता असणारच. कदाचित् धार्मिक पावित्र्याची संकल्पना एकच हे मान्य केले तरी वैज्ञानिक समर्थन हे मान्य करील काय? जर जल चाचणी केली गेली तरी पाण्याच्या गुणधर्मांत खूपच तफावत असेल.

विचार आत्मिक तेजा पासून चेतावले जातात. त्यांत मुळ स्रोत म्हणून सत्याचा, तपाचा, भाग उत्पन्न झालेला असतो. त्या विचारांचा प्रवाह उगमस्थाना पासून मेंदूपर्यंत, तेथून स्वर यंत्र, जीभ इत्यादी साधनांमधून पार करीत ते बाहेर पडून इच्छीत स्थळापर्यंत पोहचतांत. त्यांत प्रचंड प्रमाणात मिश्रण होणारच. तो व्यक्त होत असतांना आजू बाजूचे, परिस्थीतीचे, संस्काराचे, दृश्य अदृष्य कल्पनांचे अनेक पैलू, अनेक अघात त्या उत्पतीत सामील होतात. त्याचे रुप हे देखील प्राथमिक सत्यापासून खूपच अंतरावर असणार. जसे गंगेच्या धार्मिक पावित्र्या बद्दलच्या कल्पना, तिचा उगम व तिचा शेवट ह्यामध्ये एकच कल्पिला गेला आहे. त्याच प्रमाणे प्रत्येकाला आपला विचारच योग्य आहे. हा जो अट्टाहास त्याच्या मनी येतो, त्याचेपण मुळ हेच आहे. कुणीही ह्यावर चिंतन करीत नाही, की माझ्या विचार शक्तीची उत्पत्ती व शेवट यांचे रुप कोणते.

जर खूप आत्मचिंतन केले, सभोवतालचे अवलोकन केले, तर प्रत्येकाच्या आग्रही मुळ स्वभावांत सुधारणा होऊं शकेल. अनेक व्यक्ति ह्या असले चिंतन करीत नाहीत. व त्याना पटेल तेच कार्य हाती घेतात. त्यांत झोकून देतात. उत्पन्न होताना जी चेतना असते तीचे रुप व्यक्त होताना व त्याहून भिन्न दुसऱ्या व्यक्ती पर्यंत पोहंचतना जाणवते. हे एक सत्य. परमेश्वरी संकेतापासून मानवी गुणधर्मामध्ये त्याचे रुपांतर होत जाते. मुळ दया क्षमा शांती प्रेम आनंद अशा बहूरुपी चक्रामधून त्यावर राग लोभ अहंकार याचा प्रभाव पडतो.

उत्पत्ती, स्थिती व लय ह्या चक्रामधील दोनच भाग – उत्पत्ती व लय हेच सत्य आहेत. स्थिती अर्थात जीवन हे सारे विचारावर, कल्पनेवर आधारलेले आहे. त्यामुळे ते सतत सुख दुःखाच्या गुंत्यात अडकलेले असते. तेच जीवन प्रवाहाचा खेळ खेळते. रोज बदलते. वेगळे होते. सभोवतालच्या परिस्थितीच्या लाटेवर आरुढ असते. आपले सारे प्रयत्न तपश्चर्या ही केवळ ह्या मार्गावरच केंद्रीत झालेली असते. कारण हा काळ प्रत्येकजण जाणतो, अनुभवतो, सत्य आहे हे समजतो.

३ आपणाला स्वतःला केव्हांच उत्पत्तीचा व लयाचा अनुभव येत नाही. तो येणार देखील नाही. दुसरे जे केवळ बघतात, जाणतात आणि ते एक ज्ञान म्हणून व्यक्त केले जात असते. तेच आपण फक्त मानतो. ते अनुभवने शक्यच नाही. आपल्या जीवनाशी फक्त स्थितींचा संबंध येतो. उत्पत्ती व लय हे दोन भाग आपण घेण्याच्या पलीकडे म्हणूनच आपल्यासाठी काल्पनिक ठरतात. जे खऱ्या अर्थाने सत्य असते. त्यापासून आपण दूर राहतो. स्थिती हे तत्व असत्य,भौतिक, नाशवंत ठरविले, तेच आपण अनुभवतो.

आपला प्रत्यक्ष संबध, जो सत्य भाग म्हणजे उत्पत्ती व लय आहे त्याचा आपण अनुभव घेऊ शकत नाही. तांत्रिक दृष्ट्या संबध असतो कारण ही तुमच्या जीवनाची सुरवात व शेवट असते. मान्य. परंतु ते म्हणजे तुम्हाला समज नसता व समज पूर्ण गेली असता. ज्याचा तुमचा जाणत्या काळाचा संबंध येतो तो स्थितीचा काळ फक्त सत्य सोडून असत्याचाच पाठपुराव्याशी येतो.

सत्य हे ईश्वराचे प्रतिक bवा अंशात्मक ईश्वरी चेतना आहे. ती बाजूस रहाते. तुम्ही ती घेतलेली. स्वतः असलेली नाही. केवळ चालू राहण्यसाठी ( Carry on ) बाळगलेली शक्ती आयुष्याची पाऊलवाट चालतात. सारे आयुष्य असत्याच्या संपर्कांमध्ये. कसे मिळणार सत्य त्यातून ? तुम्ही जे अंशात्मक सत्य बाळगता त्याच्या स्फुरलेल्या लाटा ( Spiritual Waves ) जेव्हां बाहेर येण्याचा प्रयत्न होतो, त्याच क्षणी ते असत्य ह्या वातावरणाशी स्पर्श करुं लागतात. भौतिक वातावरणामध्ये त्यांचा स्पर्श होतो. कसे जाल तुम्ही त्या सत्याकडे. एक जबरदस्त कोंडी निर्माण झालेली आहे. सत्य ह्या आत्मिक केंद्र बिंदूला थोडे देखील सोडले की असत्यामध्ये गुंडाळले जातात. बाह्य स्थिती हे सर्व सत्य होऊंच शकत नाही. सत्य फक्त एकच आणि ते म्हणजे तुमचा अंतरात्मा. ह्याच केंद्रबिंदूवर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. हेच एक असे सत्य जवळ आहे जे तुम्ही बाळगल्यामुळे अनुभवतां येणे शक्य आहे. ध्यान अवस्था प्राप्त करा हे म्हणतात. विचाररहीत मनाची स्थिती हेच ध्यान. अत्यंत अवघड गोष्ट आहे. सुक्ष्मात सूक्ष्म अशा चेतनेने मनाला उद्युक्त केले जाते. मनाएवढे चंचल आज पर्यंत तरी ह्या सृष्टीवर दुसरे माध्यम निर्माण झाले नाही. ही ज्ञानमार्गातील संकल्पना आहे.

मनाचे शांत होणे म्हणजेच त्या सत्याजवळ जाणे. हा साधा हिशोब केलेला आहे. याचा अर्थच असा की त्या ईश्वराला बघण्यासाठीस फक्त एकच मार्ग शांत मन. हेच त्याला बघू शकते. भेटू शकते. कां ? फक्त शांत मनच कां ? कारण त्याच्यातला थोडासा देखील चंचलपणा हा त्या सत्याच्या केंद्र बिंदूपासून त्वरीत खूप दूर नेऊन सोडतो. किती कोंडी केलेली आहे ह्या मार्गानी. ज्ञानानी त्याला जाणा म्हणजे काय ? आत्मचिंतन करा हेच ना. हे करीत असताना मनाभोवतालची सारी वैचारीक झाकणे Covers of the Mind बाजूस करावयाची असतात.

भक्ती करा म्हणतात. येथेही भावनांची अशीच गर्दी केली जाते. मनावर एक वेगळीच छटा निर्माण होते. सत्य हे त्यानेही झाकोळते. विचाराने, ज्ञानाने, भक्तीने त्या ईश्वराजवळ गेलो. एक मात्र सत्य आहे की अनेक व्यक्तीमधून, एखादाच त्या आत्मतत्वाजवळ जाऊ शकतो.- परंतु फक्त जवळ- एकरुप होऊंच शकत नाही.

४ शिवाय ज्ञानीजनांना, भक्ताना देखील अहंकाराच्या भिंती उभारुन अडचणी केल्याच आहे. ईश्वर एकच असून शक्तिमान, अनंत, अविनाशी, निर्गुण, निराकार आहे. तो उत्पत्ती, स्थिती लय ह्या त्रिगुणात्मक शक्तीच्या बाहेर आहे. अनेक महान गुणधर्मानी परिपूर्ण असलेला. ही धारणा जगातल्या सर्व मार्गदर्शकानी अर्थात् धर्म संस्थापकांनी, विद्वान पंडीतांनी मान्य केलेली संकल्पना. जे पिंडी ते ब्रह्माडी समजले गेले. त्याच तत्वज्ञानाने प्ररित होऊन प्रत्येकामधल्या आत्म्याला अंशात्मक त्या ईश्वरी रुपाचे स्थान मिळाले आहे. तो प्रत्यक्ष ईश्वर मात्र आपल्या वैचारिक झेपेपासून अनंत योजने दुर आहे ह्यात शंका नाही. परंतु त्यानेच ही प्रत्येकासाठी सोय करुन ठेवलेली आहे. की त्याच्यापर्यंतचा मार्ग हा जरी केवळ अशक्य असला तरी प्रत्येकजण त्याला आत्मकेंद्रात जाणऊ शकतो. त्याच्या संपूर्ण शक्तीची, अस्तित्वाची न सुटणाऱ्या कोड्याचे प्रतिबिंब समजू शकेल. प्रखर सुर्याला उघड्या नजरेने कुणीच बघूं शकणार नसलो तरी रंगीत काचा. पाण्यातील प्रतिबिंब ह्या माध्यमातून अवलोकन करणे सुसह्य ठरते. तसेच हे आत्मचिंतन त्याच्या सान्निध्याजवळ, प्रतिबिंबाजवळ घेऊन जाऊं शकते. परंतु हा मार्ग अत्यंत खडतर असतो. ज्ञान, भक्ती, कर्म मार्ग भगवतगीतेमधले मार्गदर्शन व तसा अनुभव घेण्यास मदत करील.

कित्येकजण हिमालयांत जाऊन गंगोत्री अर्थात गंगेच्या उगमस्थानी जाऊन पवित्र जलाची साठवणूक करतात. देव्हाऱ्यांत ठेवतात ह्यामागची तात्विक बैठक समजली पाहीजे. आत्मचिंतनातून अर्थात ईश्वरी प्रतिकात्मक केंद्रातून उत्पन्न झालेल्या विचारांची देखील इतक्याच तात्विक बैठकीवर स्थापना झाली पाहीजे. हे केंव्हां शक्य होइल जेव्हां सारी माध्यमे पावित्र्याचाच आधार घेतील. मन पवित्र, देह पवित्र वाणी पवित्र आणि सारा सभोवताल देखील पवित्र. हेच सत्य आणि आनंदाचे मुळ असेल. पावित्र्याची व्याख्या काय व कोणती हे अर्थात तुमचा अन्तरात्माच सांगेल. दुसऱ्याचे ऐकून होणार नाही.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..