नवीन लेखन...

ऐरणीच्या देशा

प्रत्येक व्यक्ती ही कुटुंब, गाव / शहर व देश यांची घटक असते. आपले दैनंदिन जीवन व्यतित करीत असताना आपण काही नियमांनी या तिन्ही पातळींवर बांधलेले असतो. आयुष्यात संधी तसेच समस्या, अडचणी प्रकट होत राहतात. परिस्थितीचे आकलन करून आपण संधीचा वापर करतो तर अडचणींचे निराकरण करतो. हे करत असताना नियमांच्या चौकटीत राहावे लागते. कुटुंबाचे नियम असतात, शहर व देश यांचे कायदे असतात. स्वतः व कुटुंब या पातळीवर, बाधित घटक व निर्णय घेणारे घटक मर्यादित असतात. पण गाव / शहर आणि देश या पातळीवर जेव्हा समस्या उद्भवतात, तेव्हा अनेक अंगांनी विचार करावा लागतो. उपायांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करावी लागते.

समस्यांचे निवारण करताना आपण योग्य तेथून मदत घेतो. उदाहरणार्थ, आजार, दुखणे यासाठी डॉक्टरांची मदत, दुरुस्तीसाठी तंत्रज्ञाची मदत आपण घेत असतो. दृष्टीदोष बारा करण्यासाठी आपण हृदयरोगतज्ञाकडे जात नाही, तो डॉक्टर असला तरी. आपल्याला डोळ्यांनी नीट दिसत नाही ही समस्या वैयक्तिक पातळीवर ओळखणे सोपे असते. पण शहरापुढील अडचणींचे मूळ कशात आहे हे सहजासहजी समजू शकत नाही. व्यापक विचार करून ते शोधावे लागते. एकदा ही निश्चिती झाली की उपाय ठरविता येतात. आपल्या देशात समस्या अगणित आहेत. त्यामुळे गुंतागुंत जास्त आहे. काही बाबतीत समस्येचं मूळ शोधणं सोपं नाही. जिथे समस्या व तिचे मूळ सुस्पष्ट आहे तिथे तरी उपाय लागू पडल्याचे दिसले पाहिजे. पण पुष्कळ ठिकाणी अंमलबजावणी तोकडी पडते.   कारणे काहीही असोत. उत्तरदायीत्व न जुमानणारे हे अशा उपायांना बाधा आणतात.

जिथे समस्या व तिचे मूळ याविषयी संदेह असतो तिथे, थातुरमातुर उपायांची मलमपट्टी केली जाते. काहीतरी कृती घडते आहे असे भसविले जाते. यामुळे अशी परिस्थिती काही काळाने पुन्हा उद्भवते. मराठी पत्रकारितेत याची, “… प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे” अशी बातमी बनते. ही ऐरण अनेक प्रश्नांना आपल्या पाठीवर वागवीत असते. रंगमंचावर जसा संवाद म्हणणार्‍या कलावंतावर प्रकाशझोत पडतो, तसा वेगवेगळा प्रश्न प्रकाशझोतात येत राहतो. आपली भूमिका झाली की कलाकार मंचावरून ‘Exit’ घेतो. पण ऐरणीवरच्या प्रश्नांना ‘Exit’ चा दरवाजा सहसा दिसत नाही.

‘ऐरण’ या शब्दाचा जोडीदार आहे ‘घण’. हे दोघे एकमेकावाचून निरुपयोगी. ऐरणीवर असलेल्या प्रश्नावर योग्य जागी घण पडला तर उपाय यशस्वी होऊ शकतो. पायाला गँगरीन झाले असताना हात कापणे हा उपाय असु शकत नाही. तसे झाले तर घाव भलत्याच ठिकाणी पडला असे म्हणावे लागेल. ‘आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी’ हा वाक्प्रचारही पत्रकारितेत खूप प्रसिद्ध आहे. आपल्या देशात या दोन वाक्प्रचारांचा वापर करता येण्यासारखी परिस्थिती वारंवार उद्भवते. उदाहरणार्थ, ‘… घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे’, ‘… बुडून झालेल्या मृत्यूंमुळे जलपर्यटन पुन्हा ऐरणीवर आले आहे’, ‘… पेपरफुटीमुळे बोर्डाच्या क्षमतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे’. अशा असंख्य घटना सर्व क्षेत्रांना स्पर्शून जातात. घण व ऐरण यांची जिथे भेट होते तिथे समस्येचं योग्य कारण असलं तरच उपयोग असतो. समस्या तशीच राहण्याची कारणं पुढीलप्रमाणे असु शकतात.

१. समस्येचं मूळ समजलेलं नाही, त्यामुळे घावही नाही (अज्ञानात आनंद).

२. समस्येचं मूळ समजलेलं आहे, पण उपाय शोधण्याची इच्छा नाही (वैचारिक दारिद्र्य).

३. समस्येचं मूळ समजलेलं आहे, उपाय करण्याची इच्छा आहे, पण घाव वर्मी बसत नाही (सदोष अंमलबजावणी).

४. समस्येचं मूळ समजलेलं आहे, पण उपायाचं नाटक करायचं आहे. समस्या ऐरणीच्या एका बाजूला व घाव दुसरीकडे पडत आहे (उपायाचा आभास).

पावसाळ्यात मुंबईत ठराविक ठिकाणी पाणी साचणे, रेल्वे रुळ पाण्याखाली जाणे या गोष्टी दरवर्षी घडाव्याच लागतात. बोअरवेलमधे लहान मूल अडकणे, सेलिब्रिटीजना विशेष सवलती मिळणे यांची बातमी व्हावीच लागते. त्यांना ऐरणीवर यावेच लागते. काही प्रश्न सोडविण्यासाठी नसतात. तसे झाले तर काम काय राहील घण मारणाराला?

अव्यवस्था दूर केली तर सामान्याचे जीवन सुखी होईल, पण अव्यवस्थेमुळे ज्यांना रोजगार मिळत होता ते बेकार होतील. गुटका खाउन कितीही मेले तरी चालतील, पण गुटक्याचा कारखाना बंद झाला तर जे बेकार होतील त्यांचे काय? रस्ते चांगले झाले तर गॅरेज कशी चालतील? गाडीचे सुटे भाग बनविणारांनी काय करायचं? शाळेतच शिक्षण मिळालं तर क्लासवाले उपाशी राहतील त्याचं काय? अशा प्रकारे एक प्रश्न सोडवताना दुसरा उद्भवेल. म्हणजे प्रश्न आहेच. ‘मग आहे तो प्रश्न तसाच राहिला तर काय बिघडले’ ही वृत्ती बळावते आहे. अशा परिस्थितीत गळ्याशी आल्यावर धावाधाव करणे आले. आपल्या देशापुढील समस्या कोणत्या क्रमाने व कशा सोडवायच्या हा मोठा प्रश्न आहे. सुजाण नागरिकत्व अंगी बाणल्याशिवाय कोणतेही उपाय निरुपयोगी ठरतील, आणि हेच सर्वात कठीण आहे.

खूप वर्षांपूर्वी ‘साधी माणसं’ या मराठी चित्रपटातील एक गीत प्रसिद्ध झाले, ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे …’. पण आता, ‘ऐरण, घण व समस्या’ यांचा समन्वय साधता आला नाही तर म्हणावे लागेल, ‘ऐरणीच्या देशा तुला प्रश्न प्रश्न पडू दे …’.

 

– रवि गांगल

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..