नवीन लेखन...

गंगा आरती -एक दिव्य अनुभूती

“‘जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी”’…….. प्रसाद सावकारांच्या धीरगंभीर व भावपूर्ण आवाजातले गीत कानावर पडले अन रस्त्याने चालता चालता मी क्षणभर मधेच थबकले. काही काही गीतांमध्ये भाव व अर्थ असा भरलेला असतो की आपली भावसमाधी लागून जाते. अगदी लहानपणीच ऐकलेली सगर राजाच्या भगीरथ नामक पुत्राने साक्षात स्वर्गीची गंगा नदी पृथ्वीतलावर आणली ही कथा काय किंवा शंतनूबरोबर त्याची पत्नी बनून संसार करणारी आणि आपल्या ७ मुलांना जन्मतःच प्रवाहात समर्पित करून मुक्ती देण्या-या गंगेची कथा काय या गाण्यासारख्याच लहानपणापासून आठवणीत राहिल्या आहेत. जन्मभराचे पातक एका स्नानात धुवून काढणा-या गंगा नदीची महती तिच्या भोवतीचे वलय अधिकच दाट करते. पण या गंगामैयाच्या भेटीचा योग यायला खूप वर्षे जावी लागली आणि त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा तो आला, तेव्हा मन भरून पावले.

हिमालयाच्या वेगेवेगळ्या शिखरांच्या कुशीत उगम पावलेल्या… नव्हे त्या शिखरांचे प्रवाही रूपच असणा-या ५-६ नद्यांचा संगम होत होत गंगा नदी आकाराला येते. हिमालयाच्या नंदादेवी, त्रिशूल व कामेत या हिमशिखरांच्या कुशीतून धावत येणा-या अलकनंदेचा संगम जेव्हा धौलीगंगा(विष्णूप्रयाग), नंदाकिनी(नंदप्रयाग), मंदाकिनी(रुद्रप्रयाग), भागीरथी(देवप्रयाग) व पिंडार(कर्णप्रयाग) या नद्यांशी होतो, तेव्हा या सर्वांचे वेगवेगळेपण संपुष्टात येऊन एकत्रित प्रवाहाला गंगामैयाचे रूप प्राप्त होते. या सर्व नद्या हिमालयातून निघाल्याने पवित्र आहेतच, पण त्या सर्व नद्यांची शक्ती व पावित्र्य गंगेत एकवटल्यानंतर तिच्या महानतेला एक वेगळेच रूप येते. हिमालयाच्या कडेखांद्यावरून निघाल्यावर गंगेचा प्रवाह सुमारे २५० किमी प्रवास करून हृषीकेश पर्यंत असलेली हिमालयाची साथ सोडून हरिद्वारमध्ये गंगा मोकळ्या क्षेत्रात येते व तिथपासून तिचा विस्तारही वाढतो. हिमालयाचे बर्फ वितळून झालेल्या पाण्यामुळे गंगेचे पाणी कमालीचे थंडगार असते. त्यात स्नान करणा-या भाविकांच्या श्रद्धेचे खूपच कौतुक वाटते.

हृषीकेश, हरिद्वार येथील ब-याच ठिकाणांना भेट दिल्यानंतर आता आमचा महत्त्वाचा कार्यक्रम होता तो गंगातीरावर होणारी साग्रसंगीत आरती. गंगेच्या अत्यंत पवित्र मानल्या जाणा-या ‘हरकी पौडी ’ या घाटावर ही आरती संपन्न होते.ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात राजा विक्रमादित्याने त्याच्या ’भर्तारी’ या भावासाठी हा घाट बांधला आहे.भर्तारीने विष्णूला प्रसन्न करून घेण्यासाठी या जागी गंगेच्या काठावर बसून घोर तप केले होते.त्याची तपश्चर्या सफल झाली व विष्णू त्याला या ठिकाणी प्रसन्न झाले.भगवान विष्णूंची पावले त्या घाटावर उमटली आहेत व गंगा आरतीच्या वेळी भगवान विष्णू तिथे येतात असे आजही लोक मानतात. म्हणून या घाटाला हर की पौडी म्हणजे’ हरीची पावले’ किंवा ‘हरीच्या पाय-या’ असे म्हणतात व त्या ठिकाणच्या गंगेच्या आरतीला विशेष महत्व देतात.आम्ही तिथे होतो तो दिवस होता त्रिपुरी पौर्णिमेचा. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा सायंकाळचे पाच वाजले होते. आरतीची वेळ होती ६ची. माझी कल्पना आरती देवळात होत असणार अशीच होती. आजूबाजूला व समोर बरीच देवळे दिसत होती, त्यापैकी नक्की कोणत्या देवळात आरती असेल याविषयी मनात तर्क चालले असतानाच आम्ही आमचा मुलगा गौरीकुमार व सून प्रद्न्या च्या बरोबर आमच्यासारख्या ब-याच लोकांच्या तांड्यामागोमाग चालू लागलो… दूर दिसणा-या त्यातल्या त्यात मोठ्या देवळाकडे.

अजून सूर्यप्रकाश सर्वत्र पसरलेलाच होता, त्यामुळे आजू बाजूचे बरेच काही दृष्टीक्षेपात येत होते – पहावेसे व न पहावेसे असेही. समांतर असणा-या दोन घाटांपैकी फारशी देवळे नसलेल्या,गंगेच्या प्रवाहाच्या मधोमध बांधलेल्या प्रशस्त, दोन्ही बाजूस पाय-या असणा-या रस्त्यावरून आम्ही चालत होतो. गाडी दूरवर पार्क करून पायीच गंगेच्या घाटावर जावे लागते.त्यामुळे त्या रस्त्यावर प्रथम लागली ती हातगाड्यांवर, टेबलांवर दुतर्फा उभारलेली विविध दुकाने. छोटी मोठी चिनी बनावटीची खेळणी लहान मुलांना व आपोआपच त्यांच्या आईवडिलांना आपल्या कडे खेचून घेत होती. मुले खेळण्यांच्या दुकानांकडे आकर्षित होऊन तिकडे धावत होती, तर ती गर्दीत चुकू नयेत म्हणून त्यांचे आईबाप डोळ्यात तेल घालून मुलांमागे जात होते. त्यांच्या सोबत असणारे वृद्ध मात्र नुसतेच कासावीस होऊन त्यांच्या गतीशी जास्तीत जास्त जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्या वृद्धांना आकृष्ट करायला चुरमुरे, फुटाने, बत्तासे, पेढे, गोडी शेव परातीत मांडून माशा हाकलणारे दुकानदार, ’ओ चाचा, ओ मौसी,परशाद लेके जाना’ म्हणत ओरडून बोलावत होते. त्या हाका ऐकून व ती भरलेली ताटे पराती पाहून आजींना शेजा-या पाजा-यांना द्यायच्या प्रसादाची आठवण होत होती, तर आजोबांना कट्ट्यावरच्या मित्रांची ! साहजिकच वृद्ध पावले तिकडे वळत होती. शेजारच्या दुकानातून गरमागरम जिलेबीचा गोडसर सुवास आसमंतात पसरत होता, तर कुठे भल्या मोठ्या कढईत्ल्या उकळत्या तेलात इतरांच्या क्षुधाशांतीसाठी वडे, समोसे, भजी आपल्या जीवाची पर्वा न करता उड्या मारत होती. त्यांचा चुर्रर्र असा आवाज तरुणाईचे पाय त्या दुकानाकडे वळवत हिता. या सगळ्या गर्दीमधूनच ’ए गरमागरम मसालेदार चाय” म्हणून चहाकॉफीवाला आमंत्रण देत होता. आरती सुरू व्हायच्या आत खानपान सेवा उरकून घेण्याकडेच ब-याच जणांचा कल दिसला. या सर्वांमागे उघड्यावरचा संसार कसाबसा पडदानशीन करण्याच्या खटपटीत असणा-या ताडपत्री, गंजलेले तुटके पत्र्याचे तुकडे, फातक्या वस्त्रांचे आच्छादन ल्यालेल्या झोपड्या झाडांच्या सोबतीने कशाबशा उभ्या होत्या. त्याच्या आसपास बागडणारी उघडी, मळलेली मुले पाहून मनात कासावीस होत होते. गंगामैयाच्या साक्षीने खाण्याचे पदार्थ अर्धवट टाकणारी माणसे व तेच अन्न खाऊन पोट भरणारी माणसेही एकत्र वावरत होती. अर्धवट खाऊन टाकणा-यांकडे व ते उचलतांना त्याला चिकटलेली अस्वच्छता कशीबशी दूरकरून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करणा-या लेकरांकडे गंगामैय्या सारख्याच निर्विकारपणे पहात होती.

आम्ही त्या गर्दीतून वाट काढत पुढे सरकलो तर एकदम विस्तीर्ण जागा लागली. त्यापुढे दुस-या मुख्य घाटावर नेणारा पूल होता. सेवेकरी व गंगा सेवा समितीचे लोक झाडलोट करून स्वच्छता करत होते. त्यातल्याच काही जणांकडे स्वयंसेवकाचे काम असावे कारण ते येणा-या लोकांना गंगेच्या डाव्या घाटाच्या पाय-यांवर बसायला सांगत होते.त्यांचा आदेश इतका आग्रही होता की, ‘आरती कोठे संपन्न होणार, देऊळ कोणतं, या पाय-यांवर का बसायचं’ वगैरे प्रश्न मनात उद्भवण्याअगोदर आम्ही इतरांबरोबर तिथे बसलो देखील.

५-७ लांबलचक पाय-या असणारा हा घाट बसल्यावर वेगळाच वाटायला लागला. प्रवाहापासून दोन पाय-या सोडून तिसरीवर आम्ही बसलो होतो. मागच्या तीन पाय-याही पाच मिनिटांच्या अवधीत पूर्ण भरून गेल्या. स्वयंसेवक “पादत्राणे काढून त्यावरच बसा, आरतीचे वेळी कोणाच्याही पायात चपला बूट असू नयेत” अशी वारंवार विनंती करीत होते. त्याही पेक्षा आधीच्या लोकांनी गंगेत पाय बुडवूनच घाट चढलेला असल्याने या आदेशाचे तंतोतंत पालन होत होते. प्रवाहानजीकच्या दोन पाय-या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायम मोकळ्याच राहतील याची काळजी ,दक्षता, सेवासमितीचे लोक वरचेवर घेत होते. अद्यापही उजेड होता त्यामुळे प्रवाहात वेगाने वाहून जाणारी पाने, काद्या, काटक्या, कागद, तुटक्या चपलाइतकेच काय मेलेली कुत्री मांजरी सर्व स्वच्छपणे दिसत होते व गंगा स्वच्छ करायला हवी याची निकडही जाणवत होती. पाण्याचा रंगही करडा, तपकिरी, काळपट – थोडक्यात सांगायचे तर ‘नितळ व पारदर्शक’ सोडून कसलाही दिसत होता. हृषिकेशमधले स्वच्छ, नितळ व निळसर पात्र सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकताना पाहिले होते. त्यामुळे तिथे झालेली गंगेत स्नान करण्याची तीव्र इच्छा इथले पाणी पाहिल्यावर ‘पाय बुडवून पहावा’ एवढीही राहिली नाही. आमच्यासारखे बरेच लोक कुतूहलाने, भक्तिभावाने इकडेतिकडे पहात होते. जिकडे नजर टाकावी तिकडे लहान मुले, मध्यम वयीन उत्सुक तरूण आणि गंगामैय्याच्या स्वाधीन कधी होता येईल याची वाट पहाणारी वृद्ध मंडळी अशा सगळ्याच लोकांची सरमिसळ दिसत होती. जरीच्या साड्या, भारी भारी पोशाख, रंगीबेरंगी पंजाबी सूट व टी शर्ट अगदी धोतर- नऊवारी साडीला खेटून बसले होते.

आम्ही बसलो होतो त्याच्या पैलतीरी म्हणजे ‘ हरकी पौडी’ वरकाही ठिकाणी ६-७ तर एका भागात १०-१२ पाय-या असणारा सुरेख बांधलेला घाट होता. ६-७ पाय-यांवर इकडच्या सारखेच भाविक बसले होते.दुस-या भागात मधोमध एका चौथ-यावर एक देऊळ म्हणजे मोठा देव्हारा होता – त्यात गंगेची मूर्ती असावी असा अंदाज केला.

आता सूर्य आपला पसारा आवरून विश्रांतीसाठी निघाला. बघता बघता संधिप्रकाश पसरला व त्याची शोभा डोळ्यात साठवेपर्यंत आकाश काळेभोर झाले सुद्धा ! त्रिपुरीचा चंद्र आपले पूर्ण गोलाकार तेजस्वी बिंब दाखवत त्याच्या सख्या चांदण्यांना घेऊन आकाशाच्या काळ्याभोर पडद्यामागून दृश्यमान झाला व आपोआपच “वाहवा” असे उद्गार उमटले. आता नदीचा प्रवाह वेगळाच दिसू लागला. लाटांवर छोटी छोटी बिंबे नाचू लागली. नदी एखादी चंदेरी झालरीची साडी पांघरल्यासारखी दिसू लागली. काठावरील दुकानातील, देवळातील दिवेही पात्रात प्रतिबिंबित झाले अन पलिकडे एकदम वेगळीच हालचाल जाणवायला लागली.

समोरच्या मोठ्या देव्हा-यासमोर नदीपात्राकडे तोंड करून १०-१२ पुरोहित एका रांगेत उभे ठाकले. त्यांच्या पुढे आजच्या पूजेचे व आरतीचे यजमान जोडपे व त्यांच्याकडून सर्व विधी करवून घेणारे गुरुजी. धीरगंभीर आवाजात एका सुरात सर्वांनी मंत्रॊच्चाराला सुरुवात करताच वातावरण भारून गेले. कुजबूज एकदम थांबली व सर्वजण पूजेचे विधी शांतपणे पाहू लागले. श्रीसूक्तासहित गंगेला गंगाजलाचा अभिषेक करण्यात आला,साडीचोळीची ओटी अर्पण करून नीरांजन उदबत्ती ओवाळून पूजेची सांगता झाली. मंत्र म्हणणारे गुरुजी पाय-या चढू लागले. म्हटले “उठा, झाली गंगेची सुप्रसिद्ध आरती”. पण आसपासचे कोणीच उठताना दिसेनात. तेवढ्यात पुन्हा समोरून आवाज आला “आता आपण गंगालहरीतील काही श्लोक म्हणून प्रार्थना करू या.” पाठोपाठ सुवाच्च व सुस्वर आवाजात श्लोक पठण सुरू झाले आणि अचानक लाटा वाढताहेत ,पाणी उचंब्ळतेय असा भास होऊ लागला. पंडितराज जगन्नाथ नाटकातील भालचंद्र पेंढारकरांचे अखेरचे ‘जय गंगे भागीरथी’ कानात घुमू लागले, गंगेचे पाणी दर श्लोकाला एकएक पायरी चढत, शेवटच्या श्लोकाला जगन्नाथ पंडितांना कवेत घेऊन जात आहे असे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले अन अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले.
गंगालहरीचे पठण संपत होते तोवर घाटांवरच्या वेगवेगळ्या देवळात मोठमोठ्या ज्योतींच्या समया उजळल्या जात होत्या. स्तोत्र पूर्ण होताच त्या समया घेऊन सेवेकरी अगदी खालच्या पायरीवर उतरले व टाळ झांजांच्या साथीने सुरू झाली गंगेची महा आरती. आता पलिकडच्या घाटावर फक्त तेजस्वी ज्योतींचे दीप खालीवर होताना व गोलाकार फिरताना दिसत होते. त्यांच्या तेलवातींचा देवघरात येणारा चिरपरिचित सुवास आसमंतात भरून राहिला होता. लाटांवर आता या ज्योतींच्या प्रतिबिंबांचीही भर पडली. नदीचे एक वेगळेच रूप आता दिसत होते.

आरती संपताच विश्वशांतीसाठी प्रर्थना व गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने करावयाच्या प्रयत्नांची शपथ घेऊन झाली. खूप भारावल्यासारखे वाटत होते. आजवर जी आरती दूरदर्शनवर कधीतरी पाहिली होती, ती प्रत्यक्षात अनुभवता आली याचा अतिशय आनंद वाटत होता. आता उठून परत फिरण्याच्या विचारात होतो तोच लाटांवर नाचत छोट्या छोट्या प्रकाशज्योती येताना दिसू लागल्या. मोठ्या मजेशीर दिसत होत्या. त्या पाण्यावर कशा तरंगताहेत याचे आश्चर्य जवळ आल्यावर निवले. सकाळी हृषिकेशला व मघाशी इथेही रस्त्याच्या कडेला पानांचे केलेले द्रोण व होड्या, त्यात फुलांची आरास,व त्यावर तुपात थबथबलेली फुलवात विकायला ठेवलेले पाहिले होते.

पाण्यात नाच गंगा आरती – एक दिव्य अनुभूती

— अनामिका बोरकर, (दूरभाष: ९८१९८६९०९०)
२ श्री राजराजेश्वरी कृपा, दातार कॉलनी,
भांडूप (पू), मुंबई ४०० ०४२

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..