नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग नऊ

आपली पचन प्रक्रिया कशी चालते, ही समजून घेण्यासाठी, हे क्रियाशारीर सोपे करून, ढोबळमानाने सांगण्याचा हा प्रयत्न आहे. वास्तवाशी याचा डिट्टो संबंध असेलच, असे नाही. आपल्याला कुठे लेखी परीक्षा द्यायची नाहीये.

लाळेचे काम फक्त तोंडापुरतेच मर्यादित असते. नंतरची पचनाची जबाबदारी लाळेची नाही. मुळात अल्कलाईन नेचरची म्हणजे अल्कली ( क्षार ) गुणधर्म असलेली ही लाळ जेव्हा पोटात जाते, तेव्हा पोटात वाढलेल्या पित्ताला कमी करते आणि लाळेचे अस्तित्व संपते.

म्हणजे जेवढी लाळ जास्त तेवढेच तोंडातून सुरू होणाऱ्या पचनाला मदत होते. म्हणून जेवढे चर्वण जास्त तेवढे पुढे पोटातील पचन सुलभ होते.

भारतीय परंपरेमधे जेवणानंतर मुखशुद्धी खाल्ली जाते, ती याच कारणासाठी! घाई घाईने जेवताना, चावताना जी लाळ कमी पडते, त्याची पूर्तता या मुखवासाने पूर्ण केली जाते. मुखवास ही वेगळी टीप होईल. इथे फक्त उल्लेख आलाय म्हणून सांगितले.

जेव्हा आपल्याला ताप येतो, तेव्हा तोंडाची चव निघून जाते, भूक कमी होते. या शरीराकडून निर्माण होणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत. ताप आल्यावर शरीरातील अग्निची स्थिती बदलते. कोष्ठातील अग्नी, कोष्ठ सोडून बहिर्गम होतो, तेव्हा भूक लागत नाही. अशावेळी जर आपण अन्न सेवन केले तर ते पचतच नाही. म्हणजेच ताप आल्यावर भूक न लागणे, ही शरीराकडून आपोआपच केली जाणारी प्रक्रिया पुढची गुंतागुंत टाळण्यासाठी केलेली एक प्रतिबंधात्मक उपाययोजनाच आहे.

अशावेळी भूक नसताना जेवणे हे रोगाला निमंत्रण देणे असते. आयुर्वेदानुसार भूक लागणे हा एक वेग आहे. शरीराकडून केली जाणारी प्रक्रिया आहे. तिला वेळीच ओळखून सन्मानाने, आदर राखत न जेवणे हे हितकर असते. यालाच शास्त्रीय भाषेत, ज्वरादौ लंघनम् कुर्यात ! असे म्हटलेले आहे. म्हणजे तापाच्या सुरवातीला एखादा दिवस लंघन करावे. उदरगुहेचा द्वारपाल असलेल्या तोंडात जोपर्यंत लालास्राव निर्माण होत नाहीत, तोपर्यंत आतमधे कोणालाही सोडायचे नाही. आत (पोटा) मधे अग्नीची पुनः स्थापना झाली की, त्याच्याकडून संदेश येतो, “आता जेवायला हरकत नाही”, तेव्हाच जेवावे. (प्रकृतीनुसार हे लंघन कसे करावे, हे बदलते असते. इथे वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा. )

लाळ जेवढी गिळता येईल तेवढी गिळावी. काही जणांना खूपच लाळ सुटते, त्यांनी तुरट चवीचा वापर जेवणानंतर अवश्य करावा. झोपेत लाळ गळण्याचा संबंध कृमीशी असू शकतो, किंवा खून दमलेल्यामुळेदेखील जेव्हा झोप लागते, तेव्हा तोंडातून लाळ गळते, हा रोग नाही. केवळ दंतमंजन वापरले तरी हे लक्षण कमी होते.

शरीराकडून काही प्रतिक्रिया या रोगसूचक असतात, तर काही नैमित्तिक असतात. जेवणानंतर तासाभरात ढेकर येणे स्वाभाविक असते. पण दिवसभर ढेकरा येणे हे पचन बिघडल्याचे लक्षण आहे.

बोटाला जरा कुठेही जखम झाली की लहानपणी लगेच बोट तोंडात जायचे, त्याला लाळ लागायची, ओठांनी जखम दाबून धरली जायची आणि जखम बरी देखील व्हायची. सर्व प्राणीमात्र आपले शरीर जीभेने म्हणजे लाळेनेच स्वच्छ करतात.

मी असं अजिबात म्हणत नाही की, आपणही आपले शरीर असेच चाटत बसावे. पण लाळेमधल्या या शक्तीवर अजून संशोधनाला वाव आहे.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..