नवीन लेखन...

दोन देशीचा संसार

( पूर्वप्रसिद्धी – ‘क्रीडांगण’ दिवाळी अंक -२०२५ [संक्षिप्त स्वरूपात] )

आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करावे हे प्रत्येक होतकरू क्रिकेटपटूचे अंतिम ध्येय, स्वप्न असते. फार थोड्या नशीबवान खेळाडूंच्या या स्वप्नाची पूर्तता होते. पण तुम्हाला माहीत आहे का की असेही काही मोजके क्रिकेटपटू आहेत की जे केवळ एका नाही तर चक्क दोन देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेत. कौटुंबिक स्थलांतर, शिक्षण वा नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशगमन, स्वदेशात संधीचा अभाव, विदेशातर्फे खेळण्याची सुसंधी, राजकीय परिस्थिती अश्या विविध कारणांनी क्रिकेटपटू दोन देशांसाठी खेळताना दिसले आहेत.

२० व्या शतकाच्या अखेरपर्यंत अश्या खेळाडूंची संख्या खूप कमी होती. या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की १९७१ सालापर्यंत फक्त कसोटी क्रिकेट खेळले जाई आणि ते खेळणाऱ्या संघांची संख्या केवळ ७ होती. तद्नंतर वन-डे क्रिकेट खेळले जाऊ लागले आणि २००५ सालानंतर टी२० क्रिकेट. नवीन सहस्त्रकाच्या पहिल्या दशकात टी२० क्रिकेटचा वेगाने प्रसार होऊ लागल्यावर ‘ICC’कडून अनेक देशांना ‘सहयोगी’ (Associate) देशांचा दर्जा मिळाला आणि अश्या खेळाडूंची संख्याही वाढीस लागली. सध्या १२ देशांना ‘पूर्ण सदस्यत्व’ (Full Membership) आहे तर तब्बल ९६ देशांना ‘सहयोगी सदस्यत्व’ (Associate Membership) आहे. ‘पूर्ण सदस्यत्व’ असणारे संघ कसोटी, वन-डे आणि टी२० असे तिन्ही प्रकारचे सामने खेळू शकतात. (सध्या ‘पूर्ण सदस्यत्व’ असणारे संघ म्हणजे – भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, आयरलॅंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वे). तर ‘सहयोगी सदस्यत्व’ असणारे संघ मुख्यत: टी२० खेळतात आणि त्यातले अधिक चांगले खेळणारे काही ठराविक संघच ‘एकदिवसीय’ सामने खेळू शकतात. अर्थात ‘सहयोगी सदस्य’ देशांकडून खेळण्याची संधी मिळणे हे, ‘पूर्ण सदस्य’ देशांतर्फे खेळायला मिळण्याच्या तुलनेत थोडे कमी कठीण असते.

१८७७ साली पहिला कसोटी सामना खेळला गेल्यापासून आत्तापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून ४६ क्रिकेटपटू दोन देशांसाठी खेळले आहेत. सुरवातीच्या १८७७ ते १९१२ या कालखंडात असे सात खेळाडू दिसतात. यातील ५ खेळाडू “इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासाठी” (बिली मिडविंटर, बिली मरडॉक, जॉन जेम्स फेरीस, सॅमी वुड्स, अल्बर्ट ट्रॉट) खेळले; तर २ खेळाडू “इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसाठी” (फ्रँक हर्न, फ्रँक मिचेल). कालांतराने १९३२ ते १९५६ या अवधीत असे ५ क्रिकेटपटू आढळतात. त्यामध्ये सिनीयर पतौडी हे “इंग्लंड आणि भारतासाठी” खेळले तर गुल मोहम्मद, अब्दुल कारदार आणि अमीर इलाही हे तिघेजण आधी भारतासाठी खेळल्यावर १९४७ साली फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानसाठी खेळले. सॅमी गुलेन हा यष्टीरक्षक “वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड”साठी खेळला.

यानंतर १९७० ते १९९४ दरम्यानच्या काळात दोनच खेळाडू दोन देशांसाठी खेळले. जॉन ट्रायकॉस “दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वेसाठी” खेळला, तर केपलर वेसल्स “ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके”साठी. मात्र २००५ सालानंतर आजतागायत ‘टी२०’ क्रिकेटमुळे या यादीत तब्बल ३२ खेळाडूंची भर पडली आहे. (यातील काही प्रमुख खेळाडू म्हणजे – अॅन्डरसन कमिन्स, गेरान्ट जोन्स, एड जॉइस, बॉईड रॅनकीन, ल्युक रॉंकी, व्हॅन डर मर्व, कोरे अॅन्डरसन, गॅरी बॅलन्स, मार्क चॅपमन, टिम डेव्हिड, ज्यो बर्न्स इत्यादी).

या ४५ खेळाडूंमधल्या खालील काही विशेष लक्षणीय क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकणे रंजक ठरेल :–

बिली मिडविंटर :

दोन देशांसाठी ‘कसोटी’ खेळणारा ‘मिडविंटर’ पहिला क्रिकेटपटू ठरला. इंग्लंडमध्ये जन्मलेला बिली नवव्या वर्षी ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला होता. १८७७ सालच्या इतिहासातल्या पहिल्यावहिल्या कसोटीत, मध्यमगती गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज असणारा ‘बिली’ ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडविरुद्ध खेळला आणि डावात ५ बळी घेणारा पहिला गोलंदाज बनला. पहिल्या २ कसोटीनंतर तो १८८१-८२ या काळात इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी खेळला. यानंतर परत तो ऑस्ट्रेलियाकडे आला आणि १८८३ ते १८८७ दरम्यान इंग्लंडविरुद्ध ६ कसोटी खेळला. अश्या प्रकारे ठराविक दोन देशांसाठी आणि फक्त त्याच दोन देशांविरुध्दही खेळणारा तो आजवरचा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने एकूण १२ कसोटीत २४ बळी मिळवले.

बिली मरडॉक :

यष्टीरक्षक-फलंदाज असणारा ‘मरडॉक’ १८७७ ते १८९० या काळात ऑस्ट्रेलियासाठी १८ कसोटी खेळला ज्या सर्व इंग्लंडविरुद्ध होत्या. यातील १६ मध्ये त्याने नेतृत्व केले. यानंतर तो इंग्लंडमध्ये स्थायिक झाला आणि १८९२ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक कसोटी खेळला. त्याने एकूण १९ कसोटीत २ शतकांसह ९०८ धावा केल्या. कसोटीत द्विशतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला तसेच कप्तान असताना शतक करणारा पहिला खेळाडू देखील. याशिवाय कसोटीत बदली खेळाडू म्हणून मैदानावर असताना झेल घेणाराही तो पहिला खेळाडू आहे. १८८२ साली इंग्लंड दौऱ्यावर असताना त्याच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दारुण पराभव केला आणि ‘इंग्लंड-ऑस्ट्रेलिया’ कसोटी मालिकांना ‘द अॅशेस’ ही संज्ञा प्राप्त झाली.

इफ्तेकार अली खान पतौडी :

हरयाणातल्या ‘गुरुग्राम’जवळील ‘पतौडीसंस्थानचे नवाब असणारे ‘इफ्तेकार’ लाहोरनंतर ऑक्सफर्ड येथील महाविद्यालयात उच्च शिक्षण घेऊ लागले. बरोबरीनेच तेथील स्थानिक क्रिकेटमध्येही उच्च दर्जाची कामगिरी केल्याने त्यांची १९३२-३३ सालच्या (पुढे ‘बॉडीलाइन’ म्हणून कुप्रसिद्ध ठरलेल्या) अॅशेस मालिकेसाठी इंग्लंडतर्फे निवड झाली. पदार्पणातच सिडनी येथे त्यांनी शतक ठोकले. पण कप्तान ‘जार्डीन’शी शरीरवेधी गोलंदाजीच्या योजनेबाबत मतभेद झाल्याने पुढील मेलबर्न कसोटीनंतर त्यांना वगळण्यात आले. यानंतर १९३४ साली एक कसोटी खेळल्यावर ते पुन्हा इंग्लंडतर्फे खेळले नाहीत. याच दरम्यान १९३२ आणि १९३६ साली भारताकडून इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी होती पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. अखेर १९४६ साली इंग्लंडविरुद्ध ते तीन कसोटी खेळले आणि तिन्हीमध्ये भारताचे नेतृत्व केले. एकूण ते ६ कसोटी खेळले पण पदार्पणाच्या शतकाव्यतिरिक्त त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली.

अब्दुल हफिज कारदार :

लाहोरचा ‘कारदार’ डावखुरा फिरकी गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज होता. भारतासाठी ३ कसोटी खेळल्यावर फाळणीनंतर तो पाकिस्तानसाठी २३ कसोटीत खेळला. तो पाकिस्तानचा पहिला कर्णधार होता आणि सर्व २३ कसोटीत त्याने नेतृत्व केले. पाच देशांविरुद्ध त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ खेळला आणि त्या सर्वांविरुद्ध निदान एक तरी विजय मिळवला. निवृत्तीनंतर तो पाक क्रिकेट व्यवस्थापनात शिरला आणि तिथेही आपला दबदबा निर्माण केला. यामुळे कारदारला पाकिस्तानी क्रिकेटचा ‘कुलपुरुष’ म्हणून ओळखले जाते. अखेरच्या काळात पाकिस्तानचा ‘स्वित्झर्लंड’मधील राजदूत म्हणून नियुक्ती होण्याचा बहुमान त्याला लाभला.

जॉन ट्रायकॉस :

ग्रीक वंशाच्या ‘ट्रायकॉस’चा जन्म इजिप्तमध्ये १९४७ साली झाला. त्याचे कुटुंब १९४८ साली ऱ्होडेशियात स्थायिक झाले. त्याच्या वडिलांचा मोठा व्यवसाय ऱ्होडेशिया आणि शेजारच्या दक्षिण आफ्रिकेत बहरला. त्याकाळी क्रिकेटवर्तुळात ऱ्होडेशिया हा दक्षिण आफ्रिका संघटनेचाच एक प्रांत होता. त्यामुळे ऑफ स्पिनर म्हणून प्रगती करणारा ‘जॉन’ लवकरच आफ्रिकेसाठी खेळण्यासाठी पात्र ठरला. १९७० साली तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ कसोटी खेळला पण त्याच्या दुर्दैवाने तेव्हाच आफ्रिकेवर वर्णद्वेषी धोरणामुळे बंदी घातली गेली, जी पुढे २१ वर्षे चालली. याचदरम्यान १९८० साली ऱ्होडेशियाचा ‘झिंबाब्वे’ देश झाला आणि जॉन झिंबाब्वेसाठी खेळू लागला. तेव्हा झिंबाब्वे फक्त आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेट खेळू शकत होता. यामुळे जॉन झिंबाब्वेसाठी १९८३ ते १९९२ दरम्यान ३ विश्वचषकांसह २७ वन-डे सामने खेळला. त्याच्या नशिबाने १९९२ साली झिंबाब्वेला कसोटी दर्जा मिळाला आणि तो वयाच्या ४५ व्या वर्षानंतर आणखी ४ कसोटी खेळला. त्याच्या १९७० आणि १९९२ च्या कसोटी खेळण्यादरम्यान २२ वर्षे २२२ दिवसांचा खंड पडला, जो एक जागतिक विक्रम आहे. आपल्या पुनरागमनाच्या १९९२ सालच्या पहिल्याच कसोटीत त्याने ५० षटके टाकत सचिन, कपिल, अझर असे भारताचे ५ गडी बाद करत ठसा उमटवला.

केपलर वेसल्स :

दक्षिण आफ्रिकेत १९५७ मध्ये जन्मलेला ‘वेसल्स’ डावखुरा सलामी फलंदाज होता. त्याकाळी मायदेशातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी नसल्याने टोनी ग्रेग, अॅलन लॅम्ब, रॉबिन स्मिथ असे अनेक गुणी आफ्रिकन क्रिकेटपटू इंग्लंडमध्ये स्थायिक होत असताना, वेसल्सने मात्र ऑस्ट्रेलियाची वाट पकडली. तो १९७७ ते ७९ दरम्यान ऑस्ट्रेलियात वादग्रस्त ‘पॅकर सिरिज’ अंतर्गत खेळला आणि पुढे तिथेच स्थायिक झाला. १९८२ साली ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणारा तो पहिला आफ्रिकी क्रिकेटपटू बनला आणि त्या कसोटीत त्याने इंग्लंडविरुद्ध शतक ठोकले. १९८६ पर्यंत तो २४ कसोटी आणि ५४ वन-डे खेळला आणि मग अचानक निवृत्ती घेऊन आफ्रिकेला परत गेला. १९९१ साली आफ्रिकेवरची बंदी उठल्यावर त्याची संघात आपसूक निवड झाली आणि तो बंदीनंतरचा आफ्रिकेचा पहिला कसोटी कर्णधार बनला. तसेच १९९२ च्या वन-डे विश्वचषकातही तो आफ्रिकेचा कर्णधार होता. त्याआधी बंदी उठल्यानंतरच्या १९९१ सालच्या पहिल्या ऐतिहासिक भारत दौऱ्यात “एकदिवसीय सामन्यांत दोन देशांसाठी खेळणारा” तो पहिला खेळाडू बनला. आफ्रिकेसाठी तो एकंदर १६ कसोटी आणि ५५ एकदिवसीय सामने खेळला.

इऑन मॉर्गन :

आक्रमक डावरा फलंदाज आणि यशस्वी कर्णधार असणाऱ्या ‘मॉर्गन’चा जन्म ‘आयरलॅंड’मधल्या डब्लिन येथे झाला. आयरिश वडील आणि इंग्लिश आई यांचा हा मुलगा आधी २००६ ते २००९ या काळात आयरलॅंडसाठी २३ वन-डे खेळला. आयरलॅंडकडून प्रथमश्रेणी द्विशतक झळकावणारा मॉर्गन पहिला क्रिकेटपटू होता. यानंतर त्याने इंग्लंडसाठी २००९-२०२२ दरम्यान १६ कसोटी, २२५ वन-डे आणि ११५ टी२० सामने खेळले. मॉर्गन २०१० सालचा टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा सदस्य होता. दोन देशांसाठी एकदिवसीय शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू होता. तसेच १०० टी२० सामने खेळणारा तो इंग्लंडचा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला. २०१९ च्या वन-डे विश्वचषकात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध ५७ चेंडूत शतक ठोकले जे विश्वचषक सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजाने केलेले सर्वात जलद शतक आहे. याच डावात त्याने १७ षटकार खेचले जो जागतिक विक्रम आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडने प्रथमच २०१९ साली आत्तापर्यंत हुलकावणी देणारा एकदिवसीय विश्वचषक एका अविस्मरणीय (मूळ सामना बरोबरीत सुटल्यावर, सुपरओव्हर देखील ‘टाय’ झालेल्या) अंतिम सामन्यानंतर जिंकला. कप्तान मॉर्गनला इंग्लंडच्या पांढऱ्या चेंडूच्या खेळात सुधारणा करण्याचे आणि त्यांची विचारप्रक्रिया बदलण्याचे श्रेय दिले जाते.

दोन देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंबाबतच्या काही उल्लेखनीय बाबी :-

→ आत्तापर्यंत दोन देशांसाठी १७ खेळाडू ‘कसोटी’, १६ खेळाडू ‘एकदिवसीय’ आणि २० खेळाडू ‘टी२०’ क्रिकेट खेळले आहेत.

→ २० क्रिकेटपटू असे आहेत की ते ज्या दोन संघांसाठी खेळले ते दोन्ही ‘पूर्ण सदस्यत्व’ असणारे संघ आहेत.

→ ‘अल्बर्ट ट्रॉट’ याने १८९५ साली आपल्या पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियासाठी खेळताना इंग्लंडविरुद्ध एका डावात ४३ धावांत ८ बळी घेतले आणि दोन्ही डावांत मिळून एकदाही बाद न होता ११० धावा केल्या.

→ यष्टीरक्षक ‘गेरान्ट जोन्स’ सर्वाधिक ३४ कसोटी (इंग्लंडसाठी) खेळला आहे.

→ ‘इऑन मॉर्गन’ सर्वाधिक २४८ वन-डे, सर्वाधिक ११५ टी२० आणि एकूण सर्वाधिक ३७९ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

→ हाँगकाँगमध्ये जन्मलेला अष्टपैलू ‘डरमॉट रीव्ह’ १९८३ च्या विश्वचषकासाठीच्या पात्रता फेरीच्या स्पर्धेत हाँगकाँगसाठी खेळला. पण त्या सामन्यांची अधिकृत आंतरराष्ट्रीय सामने म्हणून नोंद झाली नाही. पुढे रीव्ह इंग्लंडसाठी ३ कसोटी आणि २९ वन-डे सामने खेळला.

→ ‘ग्रॅमी हिक’चा १७ व्या वर्षी १९८३ सालच्या वन-डे विश्वचषकासाठी झिंबाब्वेच्या संघात समावेश झाला होता पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. नंतर इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यावर तो इंग्लंडकडून ६५ कसोटी आणि १२० वन-डे सामने खेळला.

→ डावखुरा वेगवान गोलंदाज ‘डर्क नॅनेस’ हा पहिला क्रिकेटपटू ठरला ज्याने “दोन देशांसाठी (नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया) ‘टी२० क्रिकेट” खेळले.

→ ४६ पैकी केवळ ९ जण तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेत आणि त्यातील फक्त ‘बॉईड रॅनकिन’ (आयरलॅंड, इंग्लंड) हा वेगवान गोलंदाज “दोन्ही देशांसाठी तिन्ही प्रकारचे क्रिकेट” खेळलाय.

→ ४ खेळाडूंनी दोन देशांसाठी ‘एकदिवसीय’ विश्वचषक खेळला आहे – केप्लर वेसल्स (ऑस्ट्रेलिया, द.आफ्रिका), इऑन मॉर्गन (आयरलॅंड, इंग्लंड), एड जॉइस (इंग्लंड, आयरलॅंड), अॅन्डरसन कमिन्स (वेस्ट इंडिज, कॅनडा).

→ ५ खेळाडूंनी दोन देशांसाठी ‘टी२०’ विश्वचषक खेळला आहे – डर्क नॅनेस (नेदरलंड, ऑस्ट्रेलिया),  कोरे अॅन्डरसन (न्यूझीलंड, अमेरिका), मार्क चॅपमन (हाँगकाँग, न्यूझीलंड), व्हॅन डर मर्व्ह (द.आफ्रिका, नेदरलंड), डेव्हिड वीसा (द.आफ्रिका, नामीबिया).

→ महिला क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ९ खेळाडू दोन देशांसाठी खेळल्याची नोंद आढळते – निकोला पेन, रोवान मिलबर्न, बेर्नाडीन बेझौडनहाऊट, किम गार्थ, चमानी सेनेविरत्ने, दीपिका रसंगीका, महिका गौर, कॅन्डेसी अॅटकिन्स, माहेविश खान.

*(सारी आकडेवारी ३१-०७-२०२५ पर्यंतची)

सद्यकाळातील ‘टी२०’ क्रिकेटची वाढती लोकप्रियता आणि सामन्यांची वाढती संख्या, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटने’चा वाढता व्याप आणि जगभरातल्या विशेषत: भारतीय उपखंडातील क्रिकेटप्रेमी लोकांचा वैश्विक संचार यामुळे अश्या “दोन देशांत क्रिकेटचा संसार” मांडणाऱ्या खेळाडूंची संख्या आगामी काळात भरपूर वाढत जाणार यात काही शंका नाही.

*(सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)

– गुरुप्रसाद दि पणदूरकर  (माहीम, मुंबई)

Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 38 Articles
माजी बँकर, मुक्त लेखक. विविध संकेतस्थळे, दिवाळी अंकांतून क्रिकेटविषयक, बँकिंगसंबंधी व व्यक्तिचित्रणात्मक लेखन. विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद. या शब्दकोड्यांना अनेक दिवाळी अंक, हिंदुस्थान पोस्ट साप्ताहिक यांमधून प्रसिद्धी. मराठी साहित्य, खेळ (क्रिकेट), भारतीय इतिहास यांमध्ये विशेष रुची.
Contact: Twitter

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..