नवीन लेखन...

बबुआ, जनता भारी है !

 
काहीही न करता 15 वर्षे निवडून येण्याचा अनुभव लालूंच्या गाठीशी होता पण आपल्याला या जनतेनं कसं फसवलं याचं आश्चर्य त्यांच्या मनात मावेनासं झालं होतं. त्यातल्या त्यात आता घरी कसं जायचं याची चिंता त्यांना सतावत होती. कारण राबडीदेवींना दोन ठिकाणी उभं करून एकाही ठिकाणाहून निवडून आणू न शकल्याने घरात स्वागत कसं होतंय याची त्यांना काळजी लागून राहिली होती !पाटण्याच्या राजदच्या कार्यालयात सन्नाटा पसरला होता. कालपर्यंत फॉर्मात असलेले लालूप्रसाद आपल्या आलूसारख्या फुगलेल्या गालावरचे हसू विसरून कपाळाला हात लावून बसले होते. विधानसभेच्या निवडणुकीत बिहारच्या मतदारांनी आपली एवढी धोबीपछाड कशी आणि का केली हा गहन प्रश्न त्यांना सुटता सुटत नव्हता. खरे तर आपल्याला बिहारची नस न् नस माहीत असल्याचा त्यांचा दावा होता. या जनतेला कधी, कसं मूर्ख बनवायचं याचे सारे हातखंडे त्यांना पाठ होते. काहीही न करता 15 वर्षे निवडून येण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता पण आपल्याला या जनतेनं कसं फसवलं याचं आश्चर्य त्यांच्या मनात मावेनासं झालं होतं. त्यातल्या त्यात आता घरी कसं जायचं याची चिंता त्यांना सतावत होती. कारण आपण पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणू शकलो नाहीच पण आपल्या राबडीदेवींना दोन ठिकाणी उभं करून एकाही ठिकाणाहून निवडून आणू शकलो नाही. तेव्हा आधी आपल्या घरात आपल स्वागत कसं होतंय याची त्यांना काळजी लागून राहिली होती. कसंही स्वागत झाल तरी घरी तर जावंच लागणार आहे. एकदाच काय ते ‘खमंग स्वागत’ होऊन जाईल. पुढं सुरळीत होईल, असा समज करून घेत लालूजी पुढे निघाले.

राबडीदेवींची समजूत काढता येईल पण त्या सुशीलकुमार शिदेंना तोंड कसं दाखवावं याची त्यांना फारच चिंता होती. त्याला कारणही तसंच होतं. 2004 मध्ये त्यांच्या गावी, म्हणजे सोलापुरमध्ये शिंदे यांच्या

पत्नीचा पराभव करून नवखा भाजपा उमेदवार विजयी झाला होता आणि त्यानंतर आपण सुशीलकुमारांना ‘काय हे? पत्नीलाही निवडून आणू शकत नाही’ असं शंभरदा तरी टोकलं होतं. आता कुठं गाठ पडली तर तोंड चुकवण्याखेरीज काही इलाज नाही. न चुकवावं तर शिंदे टोमणा मारल्याशिवाय राहणार नाहीत. आपली फजिती होणार! खरं तर फजिती नावाचा प्रकार सौम्य वाटावा इतका झटका लागला आहे. नानी याद आ रही है !

बिहारमध्ये दुसरीकडे काँग्रेसचीही भलतीच वाताहत झाली. लालूंचा काँग्रेसबाबतचा अंदाज खरा ठरला. ही मरायला टेकलेली पार्टी आहे असे त्यांचे म्हणणे होते. 2009 मध्ये काँग्रेसला लोकसभेच्या पाच जागा देऊ केल्या होत्या. अनेकांनी प्रश्न विचारले. पाचच का ? त्यांना हेही माहीत नाही की, पाच माणसं कशाला लागतात. खांदा द्यायला चार आणि मडकं धरायला एक ! आपण हा हिशेब लोकसभेच्या निवडणुकीत सांगत होतो. म्हणजे बिहारमधल्या काँग्रेसच्या अंत्ययात्रेची ती तयारी होती. पण आता तर कमालच झाली. काँग्रेसला पाच आमदारही मिळेनासे झाले आहेत. चार आणि तेही आमदार. आता या चौघांच्या खांद्यावर आपल्या राजद पक्षाचीच खटिया ठेवण्याची वेळ आली आहे !

लालू म्हणजे पत्रकार परिषद गाजवणारा नेता. त्यांना आता पत्रकार परिषदेची भीती वाटायला लागली आहे. जनतेची स्मरणशक्ती फार अल्प असते. तेव्हा जनता काँग्रेस की ‘खटिया खडी करनेका’ किस्सा विसरली असेल व पण पत्रकारांची याददाश्त भारी असते. त्यात भर म्हणजे जबानही तेज असते. तेव्हा एखाद्याने हा ‘खटिया का किस्सा’ आता कसा काय वाटतो असं विचारलं तर काय उत्तर देणार? अशा चिंतेत लालूजी व्यग्र असतानाच तिथे रामविलास पासवान आले. तेही दाढी खाजवत खाजवत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते पण दोघांच्याही खोल डोळ्यात ही जनता म्हणजे काय असते याचं कुतुहल दाटून आलं होतं ! याच जनतेने 1977 मध्ये आपल्याला सर्वाधिक मतांनी निवडून येणारा खासदार होण्याचा मान दिला होता पण ऋण मानण्याऐवजी फसवून राज्य करायला लागलो की ती आपल्याला कशा लाथा घालते याचा अनुभव त्यांना येऊ लागला होता…

तिकडे भाजपाच्या गोटात मात्र आनंदाला भरतं आलं होतं आणि जनता दल युनायटेडच्या गोटात तर लाडूंचं मुक्त वाटप चाललं होतं… या दोन्ही पक्षांना आनंद झाला असला तरीही त्यात एक विस्मय होता. जनतेला आपण भरभरून सहकार्य आणि भरघोस पाठिंबा मागितला होता पण जनता एवढं मनावर घेऊन असा नको नको वाटावा इतका पाठिंबा देईल असं वाटलं नव्हतं ! हा पाठिंबा खरे तर जीव गुदमरून टाकणारा आहे… पण काय करणार ? शेवटी जनता जनार्दन आहे. ‘अल्ला देता है तो छप्पर फाडके देता है’ या उक्तीचा एवढा रोकडा अनुभव येईल असं वाटलं नव्हतं. या दोन्ही पक्षांच्या गोटात आपल्याला जनतेनं एवढा पाठिंबा दिलाच कसा याचं राहून राहून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं !

भाजपाच्या नेत्यांना तर सतत पराभव आणि अनामत रकमा जप्त होण्याची सवय… बिहारमध्ये नेहमी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच जागा यायच्या. आता तर 102 जागा लढवल्या आणि 91 जिंकल्या असा रेकॉर्ड ब्रेक स्ट्राईक रेट नोंदवून आपण सर्वांच्या डोळ्यात अंजन घातलं आहे. अजून थोड्या जागा जिंकल्या असत्या तर लढवलेल्या जागांमध्ये काही अपवाद वगळता सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकण्याचा विक्रम नोंदवता आला असता, असं पक्षाचे नेते सांगू लागले ! लालूप्रसाद यांना तर हा विजय इतका झोंबला आहे की त्यांनी विजयाबद्दल नितीशकुमार यांना बधाई दिली पण ‘भाजपाको बधाई नही दूँगा’ असं म्हणून आपण किती कोत्या मनाचे आहोत हे दाखवून दिलं. अर्थात त्यातली खदखद समजण्यासारखी आहे. अडवाणींचा रामरथ कोणाला अडवता आला नाही पण आपण तो

अडवला अशा बढाया मारणार्‍या लालूंचा रथ आता आम्ही अडवला आहे. अडवाणींचा रथ अडवल्यामुळे भाजपाचा रथ काही अडला नव्हता पण आता लालूंचा रथ भाजपामुळे असा काही अडला आणि रुतून बसला आहे की आता तो बाहेर पडणंही मुष्कील आहे !

हे सगळं झाल पण आता हे सारं असं का घडलं याचा काही बोध झाला नाही. लालू आणि पासवान या दोघांनी या मागचं रहस्य शोधून काढण्याचं आश्वासन दिलं आहे. अर्थात हे कारण शोधता शोधता आणि सापडेपर्यंत या दोघांची युती टिकली तर ! ते रहस्य काहीही असलं तरी त्यामागे जनता आहे. ही जनता आज आपल्याला असं भरभरून देत आहे पण तिच्या अपेक्षा पुर्‍या केल्या नाहीत तर हीच जनता आपल्यालाही लालू, पासवान आणि राहूल यांच्यासारखी टप्पल मारायला कमी करत नाही. आता तिनं छप्पर फाडके दिलं आहे; त्यामागचं गूढ कारण समजलं नाही तरी काही हरकत नाही पण, हीच जनता इतकीच मन:पूर्वक कंबरेत लाथही घालत असते हे लक्षात ठेवावं म्हणजे झालं !

(अद्वैत फीचर्स)


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..