नवीन लेखन...

दाभोलकरांची हत्या अन् तपासाची दिशा….

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्टला वर्ष पूर्ण होईल. त्यांच्या हत्येचा तपास अजून सुरूच आहे. पोलिसांना अजूनही खुनी सापडलेले नाहीत. महाराष्ट्र पोलिसांची मान यामुळे शरमेने खाली गेली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

एक व्यक्ती जो अंधश्रद्धेच्या जोखंडातून अवघा महाराष्ट्र बाहेर काढण्यात प्रयत्न करतो, त्या व्यक्तीच्या तपासाला एक पोलिस अधिकारी त्याच अंधश्रद्धेची मदत घेतो, ही त्यापेक्षाही लाजीरवाणी गोष्ट काही दिवसांपूर्वी घडली होती. पोळ नावाच्या पोलिस अधिकार्‍याने दाभोळकरांच्या भुताला बोलावून खून कुणी केला, हे सांगायला लावण्याचा जो उपद्व्याप केला आणि त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची जी छि थू झाली ही अत्यंत गंभीर बाब आहे. तरीही वर तोंड करून त्या अधिकार्‍याने आपण तसेच केलेच नाही आणि उलट ज्या मॅगेझिनने त्याला तोंडघशी पाडले त्याच मॅगेझिनवर खटला ठोकण्याचेही धाडस त्या अधिकार्‍यात आले. यावरून निर्लज्जपणा असावा तो किती, असा प्रश्न पडतो.

कोण होते हे दाभोलकर, कसे जगले याची माहिती पोलिस आणि राज्यकर्त्यांना नाही असे अजिबात नाही. पण नेहमीची उदासिनताच दाभोलकरांच्या मारेकर्‍यांच्या पथ्यावर पडते आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील एरव्ही मारे पोलिसांच्या फुशारकीच्या गप्पा झाडत असतात. प्रत्यक्षात एका खुनाचा तपास लागू शकत नाही, हे दुर्दैव आहे.

आतापर्यंत अनेक चित्रपटांत दाखवलंय. घटना घडून गेले की, पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत घटनास्थळी येतात. उरले सुरले म्हणजे मृतदेह उचलण्याचे किंवा संशयितांना हातकड्या ठोकण्याचे काम करतात. चित्रपटांतून पोलिसांची उडविली जाणारी ही टिंगल वास्तवाला धरूनच असते,असे आता म्हणावे लागेल. त्यामुळेच अशा दृश्यांवर आक्षेप घेण्याच्या भानगडीत पोलिस पडत नाहीत, अशीही सामान्यांची खात्री पटेल. दाभोलकरांच्या हत्येचे तरी काय झाले मृतदेह उचलून नेण्यापलिकडे पोलिसांनी केलं तरी काय आजपर्यंत..? हत्या कुणी केली माहीत नाही, पण प्लँचेटसारखे कारनामे करून त्यांची अवहेलना करण्याचे बरे सुचले!

गेले वर्षभर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर तातडीने खुन्यांना पकडावे म्हणून आंदोलने केली. कुठे कोण उपोषणाला बसले, कुठे निदर्शने झाली… पण त्याचे ना पोलिसांना, ना सरकारला सोयरसुतक. कार्यकर्त्यांच्या मनातील आग धुमसतेच आहे. आता तर अपेक्षा सोडून द्यावी इथपर्यंत परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी किमान पेपरात तरी बातम्या येत होत्या, महिना उलटून गेला तरी तपास नाही, दोन महिन्यांनंतरही सापडेना मारेकरी… आता पेपरातही एक ओळही दाभोलकरांच्या तपासाविषयी येत नाही. जोपर्यंत माध्यमांचा दबाव होता, तोपर्यंत पोलिस किमान तपास सुरू आहे, असे तरी सांगत होते. आता कुणी विचारायलाच तयार नाही म्हटल्यावर त्यांनीही तपास सोडून दिला की काय, असा संशय येऊ लागला आहे.

असो, दाभोलकरांच्या प्रथम पुण्यस्मरणी तरी किमान त्यांचे मारेकरी सापडावेत, अशी प्रार्थना करूया….

— श्री.मनोज भानुदास सांगळे उर्फ मनोज सांगळे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..