नवीन लेखन...

कुकरू

सकाळ झाली.
त्याने भराभर आंघोळ केली. दोन वाट्या पाणी प्यायला.
थोड्याच वेळात त्याने एक कचकचून शिटी वाजवली.
या आवाजाने बाबांची झोप चाळवली.
शिटी ऐकून त्याचे इतर मित्र मैत्रिणी गोळा झाल्या. मग त्याला ही चेव चढला.
त्याने पुन्हा एकदा शिटी वाजवली!
बाकीच्या मित्रांनी पण शिटी वाजवायचा प्रयत्न केला. पण कुणालाच जमलं नाही.

त्याने आता जोरात शिटी नाही तर लागोपा” दे दणादण शिट्या वाजवायला सुरुवात केली.
एकापाठोपाठ एक शिट्या.. .. तो इतक्या जोरात वाजवू लागला की त्याच्या कानातून वाफाच येऊ लागल्या!!
त्याचे मित्र घाबरले.

बाबा संतापून ओरडले,“डोकं फिरलं, कान किटले माझे! त्याच्या पहिल्या त्या शिट्या बंद कर पाहू.”

आईने धावत जाऊन गॅस बंद केला आणि कुकरच्या शिट्या बंद झाल्या.
आईने धुसफुसणारा कुकर बाजूला ठेवला आणि भाजी चिरायला घेतली.
कुकरच्या बाजूला कढई होती.

कढई म्हणाली,“काऽऽय आज पण बाबांचा ओरडा खाल्लास ना?
तू शिटी न वाजवता मस्त शीळ वाजव.. “धूम मचा दे धूऽऽम..” म्हणजे मग तुला कोण ओरडणार नाही.”
“अगं शीळ आणि शिटी मधे चमचा आणि काटा चमचा इतका फरक आहे!
“ज्याचा कोंडमारा होतो तोच शिटी वाजवतो” ही चिनी म्हण तू ऐकली नाहीस वाटतं? शीळ वाजव म्हणे..”

“अरे पण तू शीळ का वाजवत नाहीस? ते तरी सांग.” कढई म्हणाली.

सेफ्टी व्हॉल्वमधून थोडीशी हवा सोडत कुकरने विचार केला.
आतल्या आत गास्केट घट्ट करुन पाहिलं आणि म्हणाला,“तुम्हा उघड्या तोंडाच्या लोकांना नाही समजणार ते. म्हणजे “वाफ सोडूंना” आमच्या म्हणजे ‘वाफ पकडूंच्या’ अडचणी समजणं जरा कठीण.”
परात म्हणाली.“एऽऽ कुकरू जरा सोपं करुन सांग रे.”
वाफ सोडत कुकर हसला आणि म्हणाला,“अगं आमच्या डोक्यावर मध्यभागी शिटीचं सतत टांगतं वजन असतं!
तर दुसऱ्या बाजूला तो सेफ्टी व्हॉल्व डोक्यातच घुसलेला असतो.
आणि गळ्याभोवती त्या रबरी गास्केटचा फास असतो.
माझ्या पोटातलं पाणी उकळू लागलं की वाफेचं “धूम मचा दे..” सुरू होतं. अशावेळी तोंड बंद करुन अन् गळा आवळून मला गरम वाफेचा धूम धमाका सहन करावा लागतो!”

“अगं बाई गऽऽ! तरीपण तू आमच्याकडे पाहून शिट्या मारतोस?
कमालच आहे तुझी!” रागाने कडकडत कढई म्हणाली.

खिन्नपणे कुकर म्हणाला,“खरी गोष्ट तुम्हाला माहितच नाही. सर्वांना वाटतं मीच शिट्या मारतो!”
“चुकलंच माझं.” असं कढई ने म्हणताच.. ..
परात म्हणाली,“असू दे. अगं “घरं म्हंटलं की कुकरला कढई लागायचीच” अशी या माणसात एक म्हण आहे म्हणे.
बोल रे तू कुकरू..ऽ

“ही वाफ आमच्या पोटात गरागरा फिरते. आम्हाला पीड-पीड पीडते. पार डोक्यात शिरते. आणि मग तिचं समाधान झालं की शिट्या वाजवत पळून जाते!! लोकांना वाफ दिसत नाही तर शिट्या दिसतात याचं मला वाईट वाटतं.”
म्हणजे थोडक्यात काय,’तुमचा जीव घुसमटतो तेव्हा यांचा भात शिजतो.” असं कढईने म्हणताच कुकरने गरम वाफेचा सुस्कारा सोडला.
कुकर पुढे बोलू लागला,”पाहिलंत ना, रोज सकाळी ते बाबा माझ्यावर खेकसतात. जसं काही मी त्यांच्याकडे पाहूनच शिट्या मारतोय!
अहो, मोठ्या माणसांकडे पाहून शिट्या वाजवायला मी काय “टपोरी” आहे का?
चांगले शिकले सवरले असून ही त्यांना एव्हढं पण समजत नाही?” कमालच आहे.
पण कढई बाई मी तुमचा त्रास पाहतो तेव्हा तर माझं गास्केट सुध्दा ढिलं पडतं!”
परात म्हणाली,“खरंय तुझं कुकरू. अरे आपल्याला वेळच्यावेळी आंघोळ घालून चांगलं चकाचक स्वच्छं तरी करतात.
हिच्यात एकदा तळणी झाली की पुढचे दहा दिवस ही नुसती तेलकट मेणचट असते.”
“अगं सतत तोंडात तेलाची गुळणी धरुन बसायचं म्हणजे टू मच! त्यामुळे कधीकधी मला फ्रस्टेशनच येतं बघ.. .. ”कढईला पुढे बोलू न देताच कुकर म्हणाला,“अहो कढई बाई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. म्हणजे तुम्हाला तुमच्यातली जादू कळलीच नाहिए.ठ
पोटातलं तेल डुचमळत कढईने कुकरकडे पाहिलं.

परात तिला समजावत म्हणाली,“अगं माझ्यातल्या पोळ्या, याच्यातला भात किंवा वरण आणि तुझ्यातले बटाटेवडे, सामोसे, भजी, कटलेट असल्या गोष्टी जर या माणसांच्या समोर ताटात ठेवल्या तर.. ..”
“तर आमच्यातल्याच गोष्टी फक्त ताटात शिल्लक राहतील आणि तुझ्यातल्या गोष्टी एका क्षणात त्यांच्या पोटात जातील!!
काही जणं तर आणखी पाहिजे म्हणून भांडतील.
अगं परातीत गोष्टी मळतात तर माझ्यात शिजवतात.
पण.. तुझ्यातून गोष्टी “तळून-सुलाखून” बाहेर पडतात.
“ज्यांना चवीने खातात ते कढईतूनच येतात” असं आपल्यात म्हणतात ते काही उगीच नाही.”

कुकरचं हे बोलणं ऐकताच कढईला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.
कढईतलं तेल खदखदू लागलं.

इतक्यात.. आई कढईकडे पाहात म्हणाली,“आज संध्याकाळी भात पोळी खाण्यापेक्षा मस्त वडे आणि भजी चापून खाऊया. काऽऽय कशी आहे आयडिया?”

मुलांनो.. असं आईने विचारताच घरातल्या सर्वांनी काय सांगितलं असेल असं वाटतंय तुम्हाला?

— राजीव तांबे.

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..