नवीन लेखन...

व्याधिक्षमत्वाचा विचार (असा सुद्धा)

व्यास क्रिएशनच्या आरोग्यम दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला वैद्य अरुणा टिळक यांचा लेख


कठलाच भारतीय ‘२२ मार्च २०२०’ ही तारीख यापुढे विसरणार नाही. मुक्तपणे सर्वत्र संचार करणारे सर्व लोक एका आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वतःला कोंडून घेऊ लागले. त्या चार भिंती त्याच्यासाठी संरक्षक कवच बनल्या. आम्हा डॉक्टरांना दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत होते, त्यावेळी तो रस्त्यावरील शुकशुकाट, निर्मनुष्य रस्ते, एकही गाडी नाही, ट्रॅफिक नाही अशी भयाण शांतता, भयाण सन्नाटा आयुष्यात पूर्वी कधीच अनुभवला नव्हता. या काळात या रोगापासून वाचण्यासाठी घरात बसा, स्वतःचे व्याधिक्षमत्व वाढवा हे दोनच परवलीचे शब्द होते. मग ते कसे वाढवावे याचा विचार आहारातून करताना स्वयंपाकघराचा विचार हा अपरिहार्य ठरतो ना. मग ते ‘स्वयंपाकघर वास्तुशास्त्रानुसार कसे असावे?  या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्टींचा खूप बारकाईने विचार केला होता. ज्याठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश आहे त्याठिकाणी कुठलेही जीवाणू विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे स्वयंपाकघरात मोठी खिडकी असणे आवश्यक आहे. स्वयंपाक करताना, आग्नेय ( दक्षिण व पूर्वे मधील) दिशा ही अग्नितत्त्वाची, अग्नी देवाची आहे त्यामुळे तिथे गॅसची शेगडी असल्यास उत्तम. तसेच अग्नितत्त्वाला लागून पाणी नसावे. अग्नी व पाणी परस्पर विरोधी तत्त्वे असतात म्हणून ते जवळ नसावे. स्वयंपाकघरात काळा, निळा, हिरवा असे गडद रंग असू नयेत त्यामुळे तिथे Negative energy वाढते. रात्रीची खरकटी भांडी रात्रीच घासावीत. तशीच खरकटी ठेवू नयेत. नाहीतर त्यावर जीवजंतू राहू शकतात. झोपताना पूर्वी सर्व बायका स्वयंपाकघर नीट आवरून, चुलीला शेण-पोतेरे घालून सर्व आवरल्यावरच झोपत असत. तुम्ही म्हणाल या सर्वांचा इथे काय विचार? पण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी रहाते, तिथेच आरोग्य वास करते हे नक्की.

आजच्या ‘इंच नि इंच (जागा) लढवू’च्या काळात स्वयंपाकघर हे छोटे असते. अशावेळी तिथे Ventilation वातानुकूलन हे योग्य असणे गरजेचे आहे. कारण तो अन्नाचा, धुराचा वास तसाच राहिला तर खोकला येणे, श्वासाला त्रास होऊ शकतो.

आपण वर्षानुवर्षे ज्या गोष्टी करत आलो आहोत त्याने आपले शरीर वाढते. आजाराशी सामना करते. रोग होऊ नये म्हणून शरीराकडून जो प्रयत्न केला जातो त्याला रोगप्रतिकारक शक्ती म्हणतात. तसेच, समजा रोग झालाच तर तो बरा करण्याची क्षमता असते. त्याला immunity – व्याधिक्षमत्व म्हणतात.

आयुर्वेदानुसार उत्तम व्याधिक्षमत्वासाठी पुढील गोष्टींची गरज असते. १) योग्य आहार २) योग्य व्यायाम ३) पुरेशी विश्रांती ४) पचनशक्ती (रोगा: सर्वेऽपि मंदेग्नौ – कोणताही रोग – मंद झालेल्या पचनशक्तीमुळे होतो.)

अन्न शिजविताना आपल्याला प्रथम अग्नीची जरूरी असते. त्यानंतर विचार होतो, तो भोजनपात्राचा, ज्यात जेवण शिजवले जाते. ज्या पात्रात आपण अन्न शिजवतो त्या भांड्याचे गुणधर्म त्या अन्नात येतात. सोने, रुपे (केवळ राजांसाठीच असत), कासे, पितळी, लोखंडी, तांबे या धातूंची भांडी वापरावीत. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवल्यानंतर ४ तासात ते पाणी पिण्यासाठी शुद्ध होते. लोखंडाचा तवा, कढई वापरल्यामुळे शरीराला आवश्यक लोह मिळते. पितळेची पातेली वापरताना त्याला कल्हई नक्की असावी. पण या lockdown च्या काळात ते शक्य नसेल किंवा एरवीसुद्धा शक्य नसेल तर पातेल्यात अन्न शिजवल्यानंतर दुसऱ्या पातेल्यात काढून ठेवावे. म्हणजे अन्न कळकत नाही. आपण हल्ली जी nonstick ची भांडी वापरतो, त्यात कमीत कमी तेलाचा वापर होतो, पण त्या भांड्याचे coating जर गेले असेल तर ती भांडी अनारोग्यकारकच होतात. हल्ली मातीची भांडी वापरण्याची फॅशन, किंवा status झाले आहे; पण ते खरेच आरोग्यदायी आहे. यात शिजवलेले अन्न चविष्ट, रुचकर तर लागतेच पण ते आरोग्यदायी सुद्धा असते. त्यामुळे व्याधिक्षमत्व म्हणजे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित समन्वय.

यामुळे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आज immunity booster ची गोळी खाल्ली की, उद्या मी सर्व रोगांच्या विरुद्ध लढण्यासाठी सज्ज झालो असे होत नाही. ती आपण दररोजच्या सात्त्विक अन्नातून मिळवायची असते.

श्रीमद्भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायात म्हटले आहे:

आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः ।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहारा: सात्त्विकप्रियाः । (१७.८)

आयुष्य, सत्त्व, बल, आरोग्य, सुख व प्रीती याची वृद्धी करणारा, सुरस, स्निग्ध शरीरात अधिक काळ रहाणारा, मनास आल्हाददायक असा आहार सात्त्विक वृत्तीच्या लोकांना प्रिय असतो. असा आहार आपणसुद्धा घेणे अपेक्षित आहे.

आता आपण ज्या ठिकाणी अन्न शिजवतो ती जागा स्वच्छ हवेशीर, नीटनेटकी असावी. स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचा फोटो/ टाईल्स लावावी, तिचं एखादे स्तोत्र भिंतीवर लावावे. स्वयंपाक सुरू करताना ते स्तोत्र जरूर म्हणावे. त्यामुळे तुम्ही बनवलेले अन्न रुचकर बनते. अन्नाला पुरवठा येतो. हा स्वानुभव आहे. याचा जरुर प्रत्यय घ्या. स्वयंपाकघराचे नियोजन करताना रोजच्या वस्तू/कमी वापरातील वस्तू, साठवणीचे पदार्थ, भाज्या, फळे ठेवण्याच्या जागा या अशा ठेवा, की जेणेकरून अन्नाचा कमीत कमी नाश व जास्तीत जास्त वापर होईल.

अन्न शिजवताना आपण विष्णुसहस्रनाम किंवा देवीचे स्तोत्र म्हटलेत किंवा तुमच्या मोबाईलवर लावलेत तरी तुम्ही बनवलेल्या अन्नाला नक्कीच अप्रतिम चव येते. ते अन्न सात्त्विक लहरींनी भरून जाते. असे प्रसादाचे अन्न खाल्ले तर त्या अन्नाचे सुयोग्य पचन होते – उत्तम आहाररसाची निर्मिती होते, खाल्लेले अन्न अंगाला लागते व आपली प्रतिकारशक्ती, व्याधिक्षमत्व नक्कीच वाढण्यास मदत होते. घरामध्ये जेव्हा घरातील आई, आजी, गृहिणी हे अन्न शिजवते तेव्हा, ‘माझ्या घरातल्यांना हे अन्न उपयोगी पडू दे, त्यांची शारीरिक, मानसिक वाढ चांगली होऊ दे’ असे विचार असतात, त्यामुळे जरी ती दमली असली, आजारी असली तरीसुद्धा ‘माझ्या कुटुंबासाठी मी हे करत आहे’ हा विचार सतत तिच्या मनात असतो. याऐवजी जेव्हा काही घरात स्वयंपाकी, आचारी येतो, तेव्हा काय होते ! तो जर अनेक घरात काम करत असेल, दमला असेल, आजारी असेल तर ते काम उरकण्याकडे त्याचा कल असतो. तो बाहेरून आलेला असतो, त्याच्या घरातील काही त्रास असला, आजार असला तर त्या सगळ्या भावना त्या अन्नात उतरतात, तुमच्या भावनांचे परिणाम पाण्यावर जास्त होतात.

आपण व्याधिक्षमत्व वाढविण्यासाठी या गोळ्या घ्या, हे काढे घ्या असे सतत ऐकत आलो आहोत, काय आहेत हो त्या गोष्टी, आपण नीट बघितले तर हे सगळे पदार्थ स्वयंपाक घरातील मसाल्याच्या डब्यातील आहेत.

मोहरी थोड्या मात्रेत दीपक, पाचक, उत्तेजक आहे.

काळी मिरी उष्ण आहे, तिखट आहे, भूक चांगली लागते. शरीरातील कफ कमी होतो. दमा, खोकला, ताप यात उपयोगी. खोकल्यासाठी मिरी चूर्ण+मध+ तूप देतात.

हळद हळद काहीशी तिखट, कडवट आहे, उष्ण, रुक्ष आहे. कफ, पित्त कमी करते. हळदीचा धूर नाकाने ओढल्यास सर्दी कमी होते. गरम पाण्यात किंवा मधातून घेतल्यास खोकला जातो.

धणे तुरट, कडवट, तिखट असतात. उलटी, दमा, खोकल्यावर उपयोगी.

लवंग कडू, तिखट, पचनास हलकी, थंड. भूक लागते, पचन होते, तोंडाची चव परत येते.

तमालपत्र पचायला सोपं, गोड, किंचित तीक्ष्ण. पचन सुधारते, भूक वाढते. अपचन, पोट फुगणे – दुखणे यावर उपयोग.

दालचिनी उष्ण आहे, भूक लागून पचन सुधारते. वाताचे अनुलोमन आहे. पोटदुखी, उलटी वर उपयोगी आहे.

वरील सर्व पदार्थांचा वापर आपण दररोजच आपल्या आहारात वर्षानुवर्षे करत आलो आहोत. त्यामुळे आपले व्याधिक्षमत्व उत्तम रहाण्यासाठी स्वयंपाकघर हे उत्तम साहाय्यकच ठरते.

वैद्य. अरुणा टिळक
पूर्णा क्लिनिक,
वाघबीळ नाका, ठाणे (प),
९८२१४७८८८४
arunatilak@gmail.com

(व्यास क्रिएशनच्या आरोग्यम दिवाळी २०२० च्या अंका मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..