(इ. स. पूर्व ६०० – इ.स. ३००)
बुद्ध धर्माचा बुद्ध आणि महावीर यांच्या तत्व विचाराचा अत्यांतिक प्रभाव ज्या कालखंडावर जाणवतो तो कालखंड म्हणजे बुद्ध जन्म शतक इ. स. पूर्व ६०० ते गुप्त राजवटीचे आधी म्हणजे इ. स. ३०० पर्यंत होय. यालाच आरंभिक इतिहास कालखंड म्हटले आहे. या कालखंडात विश्वकर्मा समाजाच्या कला कौशल्यात जे बदल घडले, ते त्यांच्या कला कौशल्यातूनच स्पष्ट करणे महत्वाचे आहे. बुद्धाच्या आणि महावीरांच्या तत्व प्रभावाने समाजात वेगळी सामाजिक जाण निर्माण झाली. त्यांचा परिणाम धर्म विचार, कला कारागीरी व भाषा या मूलभूत सांस्कृतिक मुल्यांवर पडला तरी परंतु परंपरेने चालत आलेले वैदिक मत, वैष्णव मत, शैव मत, शाक्त मत, सौरमत आणि मंखलिपुत्त गोसालाचे आजीविकमत आपापल्या परीने राज्यकर्त्यावर व समाजावर प्रभाव गाजवितच होते. सम्राट अशोकाने अंगीकार केल्यानंतर धर्म प्रचारासाठी स्तूप, विहार, स्तंभ निर्माण करविले, व त्यावर बुद्ध धर्माचे सिद्धांत, सदाचार, नैतिकता व धार्मिक गोष्टी कोरल्या. मौर्याचे उत्तराधिकारी शुंग वैदिक धर्माचे उपासक होते तरी ते बौद्ध धर्माप्रति सहिष्णु असल्याचे दिसून येते. कारण त्यांच्या शासन काळात भारहुत, मथुरा, बौधगया, सांची येथे अनेक बौद्ध स्तूपांची निर्मिती झाली. उत्तर-पश्चिम भारतावर शासन करणारे युनानी शासक बौद्ध धर्माचे समर्थक होते. मेनेण्डर (मिलींद) या युनानी राजाने आपल्या ताम्र मुद्रांवर धर्मचक्राचे चिन्ह अंकित केले होते. यवन राजा धर्म देवाचा पुत्र इन्द्राग्निदत्त याने नाशिकची १७ वी गुहा खोदविली. व त्यात चैत्यगृह आणि जलाशय बनविले. त्याच प्रमाणे पल्हव आणि तक्षशिला, मथुरा व पश्चिम भारताच्या शक क्षत्रपानी बौद्ध धर्माच्या उन्नतीसाठी मोठेच योगदान दिले. कुशान सम्राट कनिष्काने तर चौथ्या बौद्ध संगतीचे आयोजन केले होते. सातवाहन नरेश वाशिष्टीपुत्र पुलुमावीने बौद्धांच्या भद्रायणी शाखेला शासन खर्चाने गुहा खोदून दिली.
शिल्पकलेवर जैनांचा प्रभावही असाच वाढला होता. खारवेल ने हाथीगुफा खोदविली. त्यातील अभिलेख तर ‘णमो अरहंतान’ या शब्दाने सुरु होतो. खारवेलची राणी मंचपुरीने कलिंग देशाच्या जैन भिक्षुसाठी उदयगिरी पहाडावर गुहा खोदविल्या. इसवीसनाच्या आरंभी मथुरेत जैन धर्माचा अधिक प्रचार झाला होता. तेथील आयागपट्ट लेख तसेच जैन मूर्तीलेख याची साक्ष आहे. इ. स. च्या दुसऱ्या शतकापर्यंत गुजरात मध्येही जैन धर्म चांगलाच प्रसार पावला, हे तेथील जुनागढच्या शिलालेखावरुन समजून येते. कुशान काळातील अनेक जैन प्रतिमावरील लेखावरुन जैन धर्माचा प्रभाव सर्वत्र जाणवतो. आजीवकाच्याही संप्रदायाला सम्राट अशोकाचा नातू दशरथ यांनी संरक्षण दिले होते आणि त्यांच्यासाठी सुद्धा गुहा खोदून दिल्या होत्या.
वैदिक तत्वाचीही परंपरा पूर्वापार चालत आली होती. मौर्य युगानंतर शुंग सातवाहन काळात वैदिक धर्माला प्राधान्य आले. पुष्यमित्र शुंगाने दोन अश्वमेघ यज्ञ केले होते. कुशान शासकांनी वैदिक यज्ञाच्या स्मृति म्हणून मथुरा सारख्या ठिकाणी स्तंभलेख कोरवीले होते.
वैष्णव मताला पांचरात्र किंवा भागवत धर्म सुद्धा म्हटल्या गेले आहे. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापर्यंत या मताचा प्रभाव भारताबाहेर युनानी प्रदेशात पसरला होता.युनान राजा ऐंटिअल्काइडिस (अंतलिकित) याने तक्षशिला निवासी हेलिओदोरला विदिशाचा राजा भागभद्रच्या दरबारात राजदूत म्हणून पाठविले होते, त्याने विदिशात बेसनगर येथे विष्णुमंदिरासमोर एक गरुडध्वज स्थापण केला. बेसनगराच्या शिलालेखावरुन समजते की युनानी शासक भागवत धर्मी होते. युनानी शासक अगाथाक्लीज च्या एका मुद्रेवर वासुदेव, विष्णु तसेच बलरामाच्या मूर्त्या कोरल्या आहेत. सातवाहनाचा नाणेघाट शिलालेख व चिन्नगंजय अभिलेखावरुन असे समजते की भागवत धर्म दक्षिण भारतातही पसरला होता. व लोकप्रियही झाला होता. पुढे भारतीय संतांमुळे हा धर्म तर कमालीचा लोकप्रिय ठरला.
पशुपती शिव आणि लिंग याच्या उपासना अगदी सिंधु संस्कृतीपासून चालत आल्या होत्या. परंतु शुंगकालापासून लिंग पूजा स्पष्ट रुपाने दृष्टीस पडते. भाटा जि. अलाहाबाद येथील अभिलिखित शिवलिंग इ. स. पूर्व दुसऱ्या शतकाचे आहे. उज्जयनीच्या शुंगकालीन अनेक नाण्यावर शिवाची विविध रुपे अंकित आहेत. कुशान सम्राट विमकैडफाइसेसच्या नाण्यावर नदीसह त्रिशुलधारी शिव आहे. मथुरेतील क्षत्रपकालीन एका शिलालेखात शिवाचे मंदिर आणि मूर्ती निर्मितीचा उल्लेख आहे. तक्षशिलेतील उत्खननात सापडलेल्या इ. स. पूर्व पहिल्या शतकातील कास्य नाण्यावर शिवमूर्ती असून त्यावर ब्राह्मी व खरोष्टी लिपीत ‘शिवरक्षितस’ असे लिहिले आहे, तर पल्हव शासक ‘गोंडोफर्नीज’ च्या मुद्रावर त्याच नावासोबत ‘देवव्रत’ म्हणजे महादेवाचा उपासक अशी उपाधी कोरलेली सापडते. कनिष्क प्रथम पासून तर अंतीम कुशान शासकापर्यंत तत्कालीन नाण्यांवर शिवप्रतिमा दिसते. कुशानांच्या पराभवानंतर उत्तर भारतात भारशिव नागांचे प्रभुत्व स्थापण झाले. ते आपल्या खांद्यावर शिवलिंग वाहून नेत म्हणून त्यांना भारशिव म्हणत. नागांच्या शासन काळात मथुरा, पद्मावती, विदिशा आदि ठिकाणी शैवधर्माचा मोठा विकास झाला.
अशा प्रकारे बौद्ध, जैन, वैदिक, वैष्णव, शैव आदी धर्मानी आपल्या मतांच्या प्रभावासाठी स्तूप, गुहा, मंदिर, मूर्त्या, स्तंभ निर्माण करविल्या त्यामुळे शिल्पकारांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळत गेले.
या कालखंडात जी बौद्ध, जैन आणि अन्य ग्रंथ निर्माण झाले, त्यांनी सुद्धा शिल्पींच्या सर्वांगीन परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. यात अष्टाध्यायी, जातक, मिलिंदपन्हो, अर्थशास्त्र, मनुस्मृती, अमरकोश, सौंदरानंद, बुद्धचरित, दिव्यावदान, कात्यायनाचे वार्तिक, शुक्रनीती, मयमत, मॅगस्थेनिजचे वर्णन (मॅककिंडिल) तसेच हु एन-त्संग, वगैरेचे प्रवासवर्णन महत्वाचे ग्रंथ आहेत. या सर्वामधून तत्कालीन नगरे, राजधान्या, त्यातील समाज जीवन यांचे चित्र उभे राहते.
पाणिनिने आपल्या अष्टाध्यायीत हस्तिनापुर, फलकपुर, मार्येदपुर, अरिष्टपुर, गौडपुर, कापिशी (कपिशा), तक्षशिला, सांकाश्य, कांपिल्य, मथुरा, इत्यादी नगरांचा उल्लेख केला आहे, तर जातकात राजगृह, वाराणशी, वैशाली, श्रावस्ती, पाटलीपुत्र, भरुकच्छ, गिरीनगर अशा अनेक नगरांचा उल्लेख मिळतो. यातील अनेक नगरे ही राजधानीची शहरे होती, तर काही व्यापारी केंद्रे होती. या लोकवस्तीच्या विविध गुणवत्तेवरुन त्यांचे भेद दर्शविणारी नावे म्हणजे राजधानी, पत्तन, द्रोणमुख, पुटभेदन, निगम, स्थानिय, खर्वट व खेट होत. हे आठ प्रकार शिल्पशास्त्रीय तसेच धर्मशास्त्रीय ग्रंथात सापडतात. राजधानी म्हणजे सर्वात मोठया लोकवस्तीचा भाग यात राजप्रासाद असणे आवश्यक होते. शुक्रनीतीनुसार या प्रकारच्या नगरास चारही बाजुस खंदक, प्राकार व नगरद्वारे असणे अनिवार्य होते. तसेच आत रुंद राजमार्ग, सुंदर उपवने मोठमोठ्या वास्तू तसेच सरोवरांची निर्मितीकरणे अपेक्षित असायचे. हेच निकष मानसार आणि मयमताने लावेले होते. राजधानीच्या रक्षणासाठी नगरद्वारासमोर सैनिक शिबिर व सेना तैनात असे. पाटलीपुत्र, कान्यकुब्ज, हस्तीनापुर, द्वारका, मथुरा अशा सर्व नगराच्या निर्मितीत शिल्पशास्त्रात सांगितलेली सारी लक्षणे विद्यमान होती.
पत्तन हा लोकवस्तीचा दुसरा प्रकार. मानसारात समुद्रतटावर वसलेल्या नगराला पत्तन म्हटले आहे. जैन साहित्यात यालाच जलपट्टन नाव आहे. बंदरासाठी पण्यपत्तन शब्द आहे. या पण्यपत्तन किंवा जलपत्तनात व्यापारी खरेदी विक्री करीत. बाहेर प्रांतातून आलेला माल गोदामात ठेवल्या जाई. जहाजाने मालाची ने आण करीत असल्याने जहाज चालविणारे कर्मचारी व व्यापारी यांची रेलचेल असे. अशी नगरे म्हणजे कावेरीपत्तन, मसलीपत्तन होत. भृगुकच्छ हे सुद्धा पश्चिमीतटाचे असेच सर्वात मोठे बंदर होते. इ.सनाच्या पहिल्या शतकात मध्यभारताची सर्व आयात निर्यात याच बंदरातून होत असे. सुप्पारक जातकात भरुकच्छ चे व्यापारी नौकेतून माल नेत असल्याचे म्हटले आहे. शिल्पशास्त्राने पत्तन शब्द कधी कधी राजधानी या अर्थानेही वापरला आहे. जैनसाहित्यात उल्लेख असलेल्या लोकवस्तीचा तिसरा प्रकार म्हणजे द्रोणमुख जे नदीच्या मुखावर वसलेले असे व स्थल तसेच जल या दोन्ही मार्गानी मालची ने आण होत असे. येथे नाना वस्तूचे व्यापारी क्रयविक्रय करीत. शिल्परत्नात नदी आणि समुद्र यांच्या संगमावर वसलेल्या नगराला द्रोणमुख म्हटले आहे. ताम्रलिप्ती नगर असेच संगमावर असून आयात निर्यातीचे प्रतिष्ठित केंद्र होते.
व्यापारी केंद्राचा आणखी एक प्रकार म्हणजे पुटभेदन. या नगरात मालाच्या गाठी मोहर करुन येत. त्यांच्या मोहरांना तोडण्याच्या क्रियेवरुनच पुटभेदन शब्द बनला. मिलिंदपन्होत उल्लेखिलेले शाकल शहर व महापरिनिब्बान सूत्तात वर्णन केलेले पाटलीपुत्र नगर पुटभेदन होते. येथे मथुरेवरुन मोठमोठ्या नावा भरुन माल विक्रीसाठी येत होता. इंद्रप्रस्थ, श्रावस्ती, कौशांबी तसेच वैशाली इत्यादी नगरासोबत येथील नागरिकांनी व्यापार सबंध प्रस्थापित केले होते. मथुरेला सुद्धा मोठा बाजार भरत असे. तेथे अनेक दुकाने लागत असत. इ. स. पूर्व दुसऱ्या शतकात मथुरा भारताचे सांस्कृतिक केंद्र होते. येथे सुंदर प्रासाद, रम्य उपवने, हत्ती, रथ, घोडे तसेच वीर पुरुष होते. येथिल नागरिक संपन्न व प्रसन्नचित असत. या नगराच्या सांस्कृतिक महत्तेकडे पाहून पतंजलीने मथुरा निवासियांना पाटलीपुत्राच्या निवासी पेक्षा सभ्य म्हटले आहे.
निगम हा आणखी एक व्यापारी शहराचा प्रकार. त्यात वस्तू विनिमयाचा व व्याज बट्ट्याचा व्यवहार चालत असे (सार्थवाह, पृ. १६३). बसाढ येथे सापडलेल्या एका नाण्यावर ‘कुलिक निगम’ असा शब्द कोरला आहे. कुलीक शब्दावरुन स्पष्ट होते की ते कारागीराचे नगर होते. कारण शिल्पशास्त्रात निगम शब्द कारागीरांनी परिपूर्ण असल्याचे म्हटले आहे. जातक कथांवरुन तर असे समजते की वाराणशी जवळ वसलेल्या एक विशाल वस्तीत एक हजार सुतार राहत होते. तसेच एक हजार कर्मकारांचे (लोहारांचे) ‘कम्मारग्राम’ होते. यावरुन शिल्पशास्त्रातील उल्लेखित निगम म्हणजे कारागीरांच्या वस्तीचे विस्तारलेले नगर असावे. जे मूळात गाव होते आणि विशिष्ट उद्योगी कारागीरांनी वस्तूनिर्मितीसाठी वसविले होते. अशा ग्राम वस्त्याही त्या काळात मोठ्या प्रमाणात होत्या. ८०० ग्रामांचा मिळून एक जनसन्निवेश असे. जनसन्निवेशाची जेथून प्रशासनिक व्यवस्था पाहिल्या जात असे त्याला ‘स्थानीय’ म्हणत. हा एक लोकवस्तीचा प्रकार होता. कारण अर्थशास्त्रात अशा स्थानीयची सीमा १ ते २ कोस सांगितली असून त्यात १०० ते ५०० कुटूंब राहत असल्याचे म्हटले आहे. प्राचीन सोळा जनपदे प्रख्यात होती, ज्यांना आज जिल्हे म्हणता येईल. शक्य आहे की, जनसन्निवेशचा दुसरा शब्द जनपद असावा की, ज्याच्या अंतर्गत ८०० गावे होती. मानसार अशी माहिती पुरवितो की जनसन्निवेशात रक्षकाची एक तुकडी (सेना) राहत असे. म्हणजे स्थानीय किंवा जनसन्निवेश हे जिल्ह्याचे स्थळ म्हणजे महत्वाचे नगर असून त्याचे महत्व ओळखूनच त्याच्या रक्षणाची व्यवस्था केली जात असे.
यानंतर लहान लोकवस्तीचा प्रकार म्हणजे खर्वट ज्यात केवळ २०० ग्रामेच समाविष्ट असत. हा आजचा तहसिलीचा प्रकार होता. खेट किंवा खेटक हा सुद्धा असाच लहान लोकवस्तीचा प्रकार होता परंतु अशा गावात शूद्रांची संख्या जास्त असायची.
कृष्णदत्त वाजपेयी, ऐतिहासिक भारतीय अभिलेख, पृ. ४५.
तत्रैव, पृ. ४५.
तत्रैव, पृ. ४६.
तत्रैव, पृ. ४६.
तत्रैव, पृ. ४६.
तत्रैव, पृ. ४६,४७.
तत्रैव, पृ. ४७,४८.
अष्टाध्यायी, ६.२.१००, १०१, ४.२९९,४.३.९३;
जयशंकर मिश्र, प्राचीन भारत का सामाजिक इतिहास, पृ. ३७८.
उदयनारायण राय, प्राचीन भारत में नगर तथा नगर जीवन, पृ. १८.
तत्रैव, पृ. १८.
तत्रैव, पृ. १९.
तत्रैव, पृ. २०.
तत्रैव, पृ. ६३.
यावच्च मथुरा यावच्च पाटलीपुत्र अन्तरान नौसड़. मो ऽ वस्थापितः।
दिव्यावदान, पृ. ३८६.
बहुकर्म करैर्युक्त निगमं तदुदाहृतम् । मानसार, अं. १०.
बहुकर्मकार युक्तं यन्निमतत समुदिष्टम् । मयमत, अ. १०;
उदयनारायण राय, पूर्वोद्धृत, पृ. २०.
महावड्ढकीगामो जातक ४.१५९, व कम्मारगामो जातक ३.२८१;
उदयनारायण राय, पूर्वोद्धृत, पृ. २०.
अष्टाशत ग्राम्या मध्ये स्थानियम- अर्थशास्त्र;
उदयनारायण राय, पूर्वोद्धृत, पृ. २०.
उदयनारायण राय, पूर्वोद्धृत, पृ. २१.
तत्रेव, पृ. २२.
तत्रेव, पृ. २४,२५.
डॉ. चक्रपाणी चोप्पावार


Leave a Reply