नवीन लेखन...

विज्ञान आणि अध्यात्म ः विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता-गीतेत सामावलेले विज्ञान.

 

रविवार ५ फेब्रुवारी २०१२.

अधिकृत अशा, गीतेवरील कोणत्याही भाष्यग्रंथात, गीतेसंबंधी माहिती आणि त्या ग्रंथाची महती सांगितलेली असते. थोड्या अधिक फरकाने ती अशी……

सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी, आपला परमभक्त आणि परममित्र, तिसरा पांडव, म्हणजे वीर अर्जुन, याला भगवतगीता सांगितली. त्यांच्यातील संवादरुपी तत्वज्ञान म्हणजे मानवी इतिहासातील सर्वात महान सनातन धर्माचे तत्वज्ञान समजले जाते. हा संवाद, एक महायुद्ध सुरु होण्यापूर्वी घडला आहे.

गीतेच्या चवथ्या अध्यायातील श्लोक १ ते ३ यामध्ये गीतेचा इतिहास सांगितलेला आहे. भगवंतांनी, ही गीता आपला शिष्य सूर्यदेव विवस्वान याला, मनूच्या जन्मापूर्वी १२ कोटी ४ लाख वर्षांपूर्वी सांगितली. मनूने, त्रेतायुगात म्हणजे २० लाख ५ हजार वर्षांपूर्वी आपला पुत्र आणि शिष्य , पृथ्वीलोकाचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला सांगितली. याप्रमाणे गुरुशिष्य परंपरेनुसार संक्रमित होत होती. परंतू कालांतराने ही परंपरा खुंटली. म्हणून भगवंतांना ती पुन्हा, कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगावी लागली.

भगवतगीता, महाभारत या महाकाव्यात संस्कृतात सांगितलेली आहे. अनेक विद्वानांनी गीतेवर भाष्ये लिहिली आहेत. महाभारतात, कलीयुगापर्यंतच्या काळातील घटनांचे वर्णन आहे. भगवान श्रीविष्णूचा नववा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण….परिपूर्ण विवेकी मानव. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे महानिर्वाण झाले त्या दिवसापासून कलियुगास सुरुवात झाली. संगणक तज्ञांच्या गणितानुसार, श्रीकृष्णांचा अवतार, इसवीसनापूर्वी १८ फेब्रुवारी ३१०२ रोजी संपला. त्या दिवसापासूनच कलियुगास सुरुवात झाली. म्हणजे कलियुगाच्या ४ लाख ३२ हजार वर्षांपैकी फक्त सुमारे ५ हजार वर्षेच झाली आहेत.

धार्मिक ग्रंथांची महती ::

जवळजवळ सर्वच धार्मिक ग्रंथकर्त्यांनी आपापल्या धर्मग्रंथांची महती, अनुयायांच्या बुद्धीला पटविण्यासाठी, ते ग्रंथ, भगवान, ईश्वर, देव, वगैरेंनी आपापल्या प्रेषितांना, दृष्टांत देवून सांगितले आणि त्या प्रेषितांनी नंतर ते लिहिले असे कथन केलेआहे. एक बाब विचारात घ्यावीशी वाटते….या पृथ्वीवर साडे तीन अब्ज वर्षांपासून सजीवांचे अस्तित्व आहे. मानव सुमारे ७० लाख वर्षांपूर्वी, कपिपासून उत्क्रांत झाला. त्यानंतर जेव्हा त्याचा मेंदू विचार करण्या इतका उत्क्रांत झाला तेव्हाच अध्यात्माचा उदय झाला. त्यापूर्वी कोणत्याही आध्यत्मिक संकल्पना अस्तित्वात नव्हत्या. अध्यात्म हे मानवनिर्मित आहे.

पुरातन काळातील ऋषीमुनींची, धर्म संस्थापकांची आणि विचारवंतांची अशी कळकळीची इच्छा होती की सर्व प्रजा ज्ञानी, विद्वान, सुसंस्कृत, सुशील, नैतिक मूल्यांचे पालन करणारी, आरोग्यदायी वगैरे सदगुणांनी परिपूर्ण असावी. म्हणजे त्यांची संततीही तशीच गुणवान निपजावी. हे उद्दिष्ठ साधण्यासाठी त्यांनी सात्विक दिनचर्या सांगितली. धर्माचरणे सांगितली. धार्मिक ग्रंथ रचना केल्या, धर्म संस्थापिले, ईश्वर, आत्मा, जन्म मृत्यूचे फेरे, मोक्ष, पुनर्जन्म, बर्‍यावाईट कर्मांची गोडकडू फळे, मृत्युनंतर सुख किंवा शिक्षा वगैरे संकल्पना रूढ केल्या.

आता थोडा विचार करा. मला जर कोणाला माझे विचार पटवावयाचे असतील तर ते त्यांना समजेल अशा भाषेत सांगावे लागतील. माझ्या विचारानुसार त्यांनी आचरण करावे अशी इच्छा असेल तर त्यांना थोडी प्रलोभने दाखवावी लागतील थोडी भीती दाखवावी लागेल वगैरे वगैरे.

विचारवंतानी नेमके हेच केले. पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, या जन्मीच्या वाईट कर्मांची फळे पुढच्या जन्मी भोगावी लागतील, चांगली कर्मे केली तर देवाला तुम्ही आवडाल, वाईट कामे केली तर देव तुम्हाला शिक्षा करील, तुमच्या वाईट कर्माची फळे तुमच्या संततीला भोगावी लागतील वगैरे वगैरे. या सर्व अमूर्त संकल्पना होत्या असे मला वाटते.

नंतरच्या शिष्यांनी, त्यांच्या फायद्यासाठी आणि स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी या प्रलोभनात आणि भीतीच्या परिमाणात आणखी भर तर घातलीच, शिवाय जपजाप्य, नवससायास, उपासतापास, दानधर्म, कर्मकांडे वगैरेंची भरही घातली.

धार्मिक ग्रंथांचे आधुनिकीकरण ::

जवळजवळ सर्वच धार्मिक ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी निर्माण केले गेले. प्रथम ते मौखिक माध्यमातून गुरुशिष्य परंपरेतून प्रसारित झाले. नंतर, भोजपत्र, झाडांच्या साली, जनावरांची चामडी, धातू, रेशमी आणि कापडी वस्त्रे वगैरेंवर हस्तलिखित केले गेले.

आता आपल्याला हे सर्व ग्रंथ सुबक छापील स्वरूपात मिळतात. हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेले हे धार्मिक ग्रंथ, जसेच्या तसेच आपल्यापर्यंत पोचले आहेत असे म्हणता येत नाही. बरेचसे विचार लुप्त झाले असावेत आणि काहींची भर घातली गेली असेल हे नाकारता येत नाही.

सध्याच्या गीतेच्या छापील पुस्तकांच्या प्रती पहा. त्यात चित्रे आहेत. आपल्यासारखे कपडे, साधने, सुखसोयी आणि अलंकार आहेत.

पृथ्वीवर सापडलेले निसर्ग घटक, खडक, भौगोलिक परिस्थिती, जीवाश्म वगैरेंच्या अभ्यासातून, विज्ञानाने, पृथ्वीच्या आयुष्यातील बराचसा इतिहास उलगडला आहे. त्यामुळे अनेक अध्यात्मिक संकल्पनांना विज्ञानीय पुरावे सादर केले आहेत. त्यानुसार त्या त्या आध्यत्मिक संकल्पना बदलविण्यास हरकत नसावी.

भगवतगीतेसारख्या महान ग्रंथाचे जितके पैलू अनुभवावे तितके थोडेच आहेत. या ग्रंथाचे मुखपृष्ठ पहा. काही निरीक्षणे येथे देत आहे.

१. रथामध्ये अर्जुन उभा आहे. रथ हे, युद्ध भूमीवरील सोयीचे आणि सुरक्षित वाहन आहे.
२. अर्जुन, डाव्या हातात धनुष्य धरून उजव्या हाताने भात्यातील बाण काढण्याच्या तयारीत आहे.
३. भगवान श्रीकृष्ण सारथ्याच्या जागी बसले आहेत. त्यांच्या डाव्या हातात लगाम आणि उजव्या हातात चाबूक आहे.
४. रथाला चार चाके असून चार घोडे जुंपले आहेत.
५. अर्जुनाने छातीवर, हातांवर, खांद्यांवर चिलखते आणि डोक्यावर चिलखतरुपी मुकुट धारण केले आहेत.
६. रथावर ध्वज आहे. वगैरे वगैरे….

विज्ञानीय दृष्टीकोनातून अन्वयार्थ ::

१. रथाला चार चाके असून त्याच्या आसाचा आधारावर रथाची बांधणी केली आहे. याचा अर्थ असा की, चाक आणि आस या विज्ञानीय शोधाचा वापर केला आहे. चाकावर लोखंडी धाव लावलीच असणार. सारथी जेथे बसतो त्या जागेखाली दोन चाके आहेत. त्यामुळे रथातील माणसांचा भार, घोड्यांच्या मानांवर पडत नाही. गुरुत्वमध्य म्हणजे काय, याची जाणीव होती.

२. धनुष्यबाण हे शस्त्र, धातूची स्थितीस्थापकता, ताणलेल्या दोरीमुळे वाकविलेल्या धनुष्यात साठविलेली उर्जा, बाणाला, गतीउर्जेच्या स्वरूपात देता येते या विज्ञानीय तत्वाचा वापर. बाणाला तीक्ष्ण टोक केल्यामुळे, प्रती एकक क्षेत्रफळावरील बल वाढविता येते हे विज्ञानीय तत्व वापरले.

३. लगाम आणि चाबूक या साधनांनी, घोड्यांशी संवाद साधता येतो या तत्वाचा वापर. घोड्यांनी केव्हा हळू चालावे, केव्हा पळावे कोणत्या वेळी कोणत्या बाजूस वळावे वगैरे आज्ञा देता येतात.

४. घोडे म्हणजे रथाचे उर्जास्त्रोत. घोड्याच्या आहारातून निर्माण झालेली रासायनिक/यांत्रिक उर्जा म्हणजे रथाच्या इंजिनाचे ईंधन !!!

५. चिलखतासाठी धातूच्या पत्र्याची आवश्यकता असते. ब्राँझ या धातूचा शोध इसविसनपूर्व ३००० या काळात लागला. म्हणजे ही चिलखते ब्राँझची कदाचित नसावीत. सोने आणि चांदी मुबलक होती. त्यांचे पत्रे करून चिलखते आणि मुकुट बनविले असणार. म्हणजे धातुशास्त्राचे ज्ञानही पूर्णावस्थेत झाले होते.

६. ध्वज, शंखनाद वगैरेंचा वापर म्हणजे कुणाचेतरी अस्तित्व जाहीर करण्याची पद्धत होती, तंत्र होते.

धार्मिक ग्रंथात विज्ञान सामावलेले आहे.
शोधा म्हणजे सापडेल, पहा म्हणजे दिसेल आणि विचार करा म्हणजे कळेल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..