‘विदर्भातील अष्टविनायक’ प्रेक्षणीय आहेत. त्यांच्याशी विविध दंतकथाहि जोडल्या गेल्या आहेत. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये वैविधता आढळते.
१) टेकडी गणपती – नागपूर
विदर्भातील अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती म्हणजे नागपूरचा ‘टेकडी गणपती’ किंवा ‘वरद विनायक’ होय. हे गणपती मंदिर नागपूर रेल्वे स्टेशनच्या समोर आहे. हा गणपती स्वयंभू समजला जातो. हे देवस्थान नागपूरामध्ये प्रसिद्ध आहे. ही गणेशमूर्ति पिंपळाच्या झाडाखाली पहायला मिळते. हे मंदिर यादवांच्या काळात बांधले होते. नंतर ह्या मंदिराचा विध्वंस झाला. रघुजी भोसल्यांनी मंदिराची पुर्नबांधणी करून तेथे पुनश्च गणपती स्थापन केला. भोसला आणि इंग्रजांची लढाई सीताबर्डी परिसरात झाली. तिथे ते गणपती मंदिर उभे आहे. ही गणेशाची मूर्ति एका प्राचीन मंदिराच्या भग्न अवशेषांमध्ये मिळाली असेही सांगितले जाते.
नागपूरातील हे एक भव्य देवस्थान आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या मध्यावर एक झाड आहे. त्या झाडाखाली श्री गणेशाची मूर्ति आहे. ही मूर्ति उत्तराभिमुख आहे.
गणपतीच्या मूर्तीच्या मागे शिवशंकराची पिंड आहे. या शिवपिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या जागी नंदि बसवलेला आहे. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर दुसऱ्या टेकडीवर आणखी एक गणपती मंदिर बांधलेले आहे. हे दोन्ही गणपती एकमेकांचे बंधु आहेत असे भक्त मानतात.
२) अठरा भुजा गणपती रामटेक
रामटेक येथील अठरा हात असलेला गणपती हा रामटेक टेकडीवर आहे. या अठरा हाताच्या गणपतीच्या डोक्यावर पांच फणे असलेला नाग सावली धरून आहे. याच्या गळ्यात नागाचे जानवे असून कमरेला पट्ट्यासारखा नाग बांधलेला दिसतो. विदर्भातील अष्टविनायकांपैकी हा रामटेकचा गणपती वनवासात असतांना रामाचा मुक्काम रामटेक येथे होता. रामटेक हे ठिकाण ‘नंदिवर्धन’ या शहराजवळ आहे. रामटेक येथे कवि कुलगुरु कालिदास यांनी आपले ‘मेघदूत’ काव्य लिहिले असे मानतात. रामटेक हे छोट्या पर्वतरांगावर वसलेले ठिकाण असून हा सर्वच परिसर अति रम्य आहे. वळणे घेत जाणारे रस्ते, डोंगर शिखरावरून वाहणारे झरे, व गर्द हिरवी झाडी यांनी हा प्रदेश नितांत सुंदर झाला आहे. अष्टदशभुजा गणपतीचे मंदिर हे उत्तराभिमुख असून या मंदिराला तीन गाभारे आहेत. या तीनहि गाभाऱ्यात गणपतीच्याच मूर्ति आहेत. अठरा हाताची ही गणपतीची मूर्ति वैशिष्ठ्यपूर्ण व आगळी-वेगळीच आहे. ही मूर्ति अतिशय देखणी असून ही पद्मासन घालून बसलेली दिसते. या गणपतीच्या अठरा हातात वेगवेगळी आयुधे दाखविली आहेत. पांच फूट उंचीच्या या गणपतीच्या एका हातात त्रिशूळ आहे. दुसऱ्या हातात फास आहे. तिसऱ्या हातात अंकुश आहे. अशी निरनिराळ्या हातात वेगवेगळी आयुधे दाखवली आहेत. यापैकी एका हातात मोदकहि आहे. तसेच एका हातात मोरपंख असलेली लेखणीसुद्धा दिसते.
भक्तांच्या मते या गणपतीला अठरा विज्ञानाचे ज्ञान आहे. आणि म्हणूनच त्याला अठरा हात दाखवले आहेत. कांही लोकांच्या मते याला अठरा सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक असेहि म्हटले जाते. या गणपतीचे विशेष म्हणजे हा उजव्या सोंडेचा गणपती आहे. ही गणेशमूर्ति भोसल्यांच्या काळात एका तलावात सापडली असे लोक सांगतात. या गणेशाच्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती सुद्धा आहेत.
३) सिद्धिविनायक केळझर
नागपूर वर्धा मार्गावर वर्ध्यापासून २५ कि. मीटर अंतरावर केळझर नांवाचा किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावर प्राचीन गणेशाचे मंदिर आहे. याला पांडवकालिन गणेशस्थान म्हणतात. भीमाने बकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. आणि ‘एकचक्रा’ गावातील लोकांची बकासूराच्या तावडीतून सुटका केली. या कथेच्या पुढे असेहि सांगतात की, पांडवांनी बकासूराचा वध केल्यानंतर या गणेशाची स्थापना केली. आणि केळझर हे गांव म्हणजेच पूर्वीची ‘एकचक्रा’ नगरी. म्हणून या गणपतीला एकचक्रा गणेश म्हणून ओळखले जाते. या गणेशमंदिरातील गणेशमूर्ति उजव्या सोंडेची आहे. त्यामुळे याला सिद्धिविनायक असेही म्हणतात. केळझर किल्ल्यावरील उंच जागेवर एकचक्रा गणपतीचे मंदिर आहे.
४) भृशुंड गणेश – मेंढा भंगरा
भंगरा जिल्ह्यातील मेंढा या गावी वैनगंगा नदीच्या तीरावर हा गणपती वसलेला आहे. या गणपतीला ‘भृशुंड गणपती’ हे नाव मिळाले. गणेश पुराणांत त्याची एक नितांत सुंदर कथा आपणांस वाचावयास मिळते. ती कथा साधारण रामायणातील वाल्ह्या कोळ्यासारखी आहे.
‘नामा’ नावांचा एक कोळी होता. त्याचा वाटमारीचा धंदा होता. तेथील रानांत तो वाटसरूंना अडवी. आणि त्यांच्या चीजवस्तू काढून घेई. एकदा या रानांतून ‘मुद्गल’ ऋषि चालले असता. नामा कोळ्याने त्यांना ठार मारण्यासाठी आपली तलवार बाहेर काढली आणि तो तलवारीने मुद्गल ऋषिंचे डोके धडावेगळे करणार तोच ती तलवार त्याच्या हातातून उडाली आणि दूर जमिनीवर जाऊन पडली. ‘नामा’ चकीत होऊन त्यांच्याकडे पाहू लागला. मुद्गल ऋषि ‘ॐ गणपतये नमः’ या मंत्राचा जप करत होते. मुद्गल ऋषिंच्या तपसामथ्याने त्याला पश्चाताप झाला आणि माझी पूर्वीची पापे धुण्यासाठी मी काय करू? असे नाम्याने मुद्गल ऋषिंना विचारले. ऋषिंनी त्याला एक काठी दिली आणि ती जमिनीत खुपसली. त्या काठीला तू ‘रोज पाणी घाल’ असे नामाला सांगितले व तोंडाने ‘ॐ गणपतये य नमः’ असा जप कर. म्हणजे तुझी सर्व पापे नष्ट होतील’ असे व सांगितले.
‘आपण परत कधी याल?’ असे नामाने विचारले. ‘या काठीला पालवी फुटेल तेव्हां मी परत येईन!’
नामा अनेक वर्षे इथे जप करीत राहीला. त्या काठीचा आता एक महान वृक्ष झाला होता. मुद्गल ऋषि जेव्हा परत आले तेव्हां वृक्षाखाली एक मोठे मुंग्यांचे वारूळ तयार झाले होते. वारूळातून ‘ॐ गणपतये नमः’ असा क्षीण आवाज येत होता. ऋषिंनी वारूळ फोडले तेव्हा त्यांना नामा कोळी गणपतीचे नामस्मरण करतांना दिसला. तो गणेश साधनेत रममाण झाला होता. त्याच्या नाकावर गणपतीसारखी मोठी सोंड तयार झाली होती. त्याची सोंड पाहून मुद्गल ऋषींनी तेथे गणपतीची मूर्तीची स्थापना केली. तोच हा ‘भृशुंड गणपती’. या गणेशाची मूर्ति आठ फूट उंचीची असून ती आसन घालून बसलेली आहे. गणेशाच्या पायाशी नाग आहे. त्या नागावर उंदर असून ‘भृशुंड गणपती’ विराजमान झाला आहे. हा गणप चतुर्भुज आहे. याच्या एका हातात ‘अंकूश’. दुसऱ्या हातात ‘पाश’ तिसरा हात ‘वरद मुद्रेत’ असून चौथ्या हातात ‘मोदकांनी’ भरलेले ताट दिसते.
५) शमी विघ्नेश – आदासा
‘आदासा’ हे गणेश क्षेत्र नागपूर छिंदवाडा या लोहमार्गावरील ‘पाटण सावंगी’ या स्थानकापासून १२ कि.मी. अंतरावर असून या मंदिरात शेंदूरलेपन केलेली गणेशाची भव्य मूर्ति दिसते. ही गणेशमूर्ति उजव्या सोंडेची असून हा गणेश नर्तन करीत आहे असे मानले जाते. येथे भक्तांसाठी नारळ फोडण्याचे यंत्र आहे.
‘शमी विघ्नेश’ या गणेशाची एक स्वतंत्र कथा आहे. संकष्ट, शत्रू, महापाप या ती राक्षसांनी पृथ्वीवरील सर्व लोकांचा छळ मांडला होता. या राक्षसांनी देवांनाहि सळो की पळो करून सोडले होते. या राक्षसांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी शमी वृक्षाखाली बसून गणपती नामस्मरण केले तेव्हां त्या वृक्षांच्या मूळांतून गणपती प्रगट झाला आणि त्याने तीनहि दोनवांच्या छातीवर नाचून त्यांचा संहार केला. म्हणून याला नृत्यगणेश असे म्हणतात. व हा गणपती शमीच्या झाडाखाली प्रगट झाल्यामुळे याला ‘शमी – विघ्नेश’ असे म्हणतात. या गणपतीबद्दल आणखीही एक कथा सांगतात. बळीराजाच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी श्री विष्णूंनी वामनावतार घेतला. वामनावतारात आपणाला शक्ति प्राप्त व्हावी म्हणून श्री विष्णूंनी शमी विघ्नेशाची भक्ति केली. शमी-विघ्नेशाने दिलेल्या वरामुळे वामनाने बळीच्या यज्ञाचा विध्वंस केला व बळीच्या मस्तकावर आपले पाऊल ठेवून त्याला पाताळात गाडले. असेहि सांगितात की वामनाने या विजयामुळे ‘वक्रतुंड’ नामक गणेशाची मूर्ति येथे स्थापन केली. म्हणून हे क्षेत्र ‘वामन वरद वक्रतुंड क्षेत्र’ या नावाने प्रसिद्धीस आले. येथे ‘माघ – शुद्ध चतुर्थीला’ फार मोठा उत्सव होतो. शमी-विघ्नेशाचा एक वेगळा विशेषहि सांगितला जातो. ज्या तरूण-तरूणींची लग्ने जमत नाहीत त्यांनी शमी गणेशाला साकडे घातले की त्यांची लग्ने जमतात. तसेच ज्या प्रेमिकांच्या लग्नात अडथळे येतात किंवा वडिलधाऱ्यांचा विरोध असतो. त्यांनी जोडीने येऊन शमी-विघ्नेशाचे दर्शन घेतल्यास त्यांच्या प्रेमाची परिणीती सुद्धा विवाहात होते.
श्री गणेशाच्या २१ स्थानांपैकी हे जागृत देवस्थान आहे. असे मानतात.
६) चिंतामणि गणेश – कळंब
नागपूर – यवतमाळ मार्गावरील ‘कळंब’ या गावी चिंतामणि गणेशाचे मंदिर आहे. २१ गणपती क्षेत्रांपैकी गणपतीचे हे एक क्षेत्र ‘कळंब’ किंवा ‘कदंबपूर’. हे गणपती मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे.
‘चिंतामणि गणेश’ ही मूर्ति जमिनीखाली खोल स्थापित केलेली आहे. त्यासाठी पायऱ्या उतरून आपणांस जमिनीखाली जावे लागते. या गणेशाच्या जवळच एक पाण्याचे कुंड असून त्या कुंडातील पाण्याने त्वचेचे अनेक रोग बरे होतात. या जमिनीखाली पाण्याचे प्रवाह आहेत. ते पाणी वाढू लागले की ते गणपतीच्या गाभाऱ्यात येऊ लागते. गाभारा पाण्याने भरू न लागतो. पण गणेशमूर्तीच्या पायाचा स्पर्श पाण्याला झाला की ते पाणी तत्काळ ओसरते. हे नवल १२ वर्षांतून एकदां पाहायला मिळते.
या गणपतीला ‘चिंतामणि गणेश’ म्हणतात. या गणपती समोर उभे राहिले की भक्ताच्या सर्व काळज्या हा गणपती दूर ळे करतो असे मानतात. गणपती जेव्हा भक्ताकडे बघतो तेव्हां तो भक्ताच्या चिंता आपल्याला घेतो. आणि भक्ताला चिंतामुक्त करतो. असा हा ‘चिंतामणि गणेश.’
७) सर्वतोभद्र गणेश – पौनी
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या ‘पौनी’ गावी सर्वतोभ्दर गणपतीचे मंदिर आहे. ‘पोनी’ गावांतील हा गणपती म्हणजे विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. हा एक आगळा वेगळा गणपती आहे. पौनी गावापासूनचे हे आगळे वेगळेपण सुरू होते. या गावाभोवती एका तटबंदी बांधलेली दिसते. या गावात आजूबाजूच्या गावांसाठी एक महत्त्वाची व्यापारी पेठ आहे. गावाच्या मधोमध हे गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर छोटे असून तेथे या गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या मंदिराची मालकी गेल्या १३ पिढ्यांपासून भटांकडे आहे. या गणपतीचे वैशिष्ठ्य असे की ही गणपतीची मूर्ति नसून हा गणपती एक सरळसोट उभा पाषाण आहे. त्याला पाच बाजूंनी पांच तोंडे आहेत. याची गोष्ट अशी की एका भक्ताला बारीक सारीक चोऱ्या करायची सवय होती. पुढे त्याचा त्यालाच पश्चाताप होऊन त्याने या गणपतीला माझा उद्धार कर. असे सांगितले. पण तरी देखाली तो चोऱ्या करतच राहिला. जेव्हां तो भक्त गणपतीकडे आला तेव्हा गणपतीने त्याच्या या दुर्गुणाचा पाढा वाचून त्याने कोठे कोठे चोऱ्या केल्या हे सांगितले. भक्त चकित झाला. गणपती म्हणाला, ‘मी तुला सर्व बाजूंनी पाहू शकतो. तू कोठल्याहि दिशेला गेलास तरी तुझे दुष्कृत्य मला कळेल.’ म्हमूनच या आगळ्या वेगळ्या गणपतीला ‘सर्वतोभद्र गणपती’ किंवा ‘पांचमुखी’ गणपती, ‘पंचानन’ अशी विविध नांवे आहेत.
गणपतीची तोंडे सर्व बाजूंनी असल्यामुळे सर्व दिशांनी याचे दर्शन घेता येते. त्याचबरोबर भक्तांवर याची ते कुठेहि असले तरी दृष्टि असते. स्वतःतील दुर्गुणांचा नाश करण्यासाठी या गणेशमूर्तीचे दर्शन घ्यावे, असे म्हणतात.
८) वरदविनायक गौराळा – भद्रावती
विदर्भातील अष्टविनायकांपैकी असलेला वरद विनायक हा एका टेकडीवर आहे. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील भद्रावती येथे हे वरदविनायकाचे मंदिर आहे. त्या टेकडीवर पूर्वी गावकरी गाई चरायला सोडत असत. म्हणून या परिसरातला ‘गौराळा’ असे म्हटले जाते. ‘वाकाटक’ नावाच्या बलाढ्य राजा फार पूर्वी या प्रदेशावर राज्य करत होता. तो मूर्तिपूजक होता. त्याचे अवशेष आजहि पाह्यला मिळतात. ‘वरदविनायका’च्या दर्शनासाठी आपण टेकडी चढतांना वाटेत अनेक मूर्ति पाहायला मिळतात. टेकडीखाली एक गुहा आहे. यात गणपती, नागावर बसलेले विष्णू वगैरे अनेक मूर्ति पाहायला मिळतात. नरसिंहाची भव्य मूर्ति देखील येथे बघायला मिळते. या गणपती मंदिराला १६ खांबी भव्य सभा मंडप आहे. गणपती दर्शनासाठी पायऱ्या उतरून आधी गाभाऱ्यात जावे लागते. गाभाऱ्यात गणेसमूर्ति बसलेल्या स्थितीत आहे. या गणपतीमूर्तिला दोनच हात असून दोन्ही हातात मोदकाचे भरलेले ताट दिसते. त्यामुळे हा गणपती प्रसन्नचित्त व तृप्त असा दिसतो. या गणपतीच्या पोटात खूप धन होते. व ते चोरांनी काढून नेले अशी आख्यायिका येथे सांगतात.
गणेश पुराणांत या गणपतीची एक पौराणिक कथा सांगितलेली आहे. देवांचा राजा इंद्र आणि एका ऋषिंची पत्नी ‘मुकुंदा’ या दोघांचा संबंध होता. त्या दोघांच्या मिलनातून ‘गृत्समद’ या नावाचा पुत्र जन्माला आला. ‘गृत्समद’ हे पुढे ऋषि झाले. पण इतर ऋषि त्यांना अनौरसपुत्र आहेत असे हिणवू लागले. या ऋषिंनी येथे त्यांच्यावरील कलंक जाण्यासाठी तपश्चर्या केली. इथे गणपती त्यांना प्रसन्न झाला. व या ऋषिंवरील सर्व किटाळ गजाननाने दूर केले. त्याची सदैव आठवण रहावी म्हणून गौरालाच्या वरद विनायकाची त्याने स्थापना केली.
तर असे हे ‘विदर्भातील अष्टविनायक’ हे अष्टविनायक फारच थोड्या लोकांना माहित आहेत. विदर्भातील अष्टविनायकांबद्दल अनेक गणपतीभक्तांना उत्सुकता वाटते. या अष्टविनायकांचे दर्शन नागपूर पासून सुरू केले की आपली वैदर्भिय अष्टविनायक यात्रा सफल होते. गणेशभक्तांनी याहि अष्टविनायकांचे दर्शन घ्यावे.
विदर्भातील या आठहि गणपतींना भक्तिभावपूर्वक साष्टांग दंडवत घालून मी ‘वैदर्भिय अष्टविनायक’ कथन संपवते.
-आशा कोनकर, ठाणे
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०२१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply