नवीन लेखन...

वाईट व्यसनांच्या विळख्यात !

इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकला तर असे दिसते की व्यसनापाई बरेच राजे आणि त्यांची राज्ये पार धुळीला मिळाली. व्यसनापाई कित्येक कुटुंबे बरबाद झाली.

दिनांक १८ जुन २०१५ रोजी मालाड, मालावणी येथे विषारी दारू पिऊन १३ जणांना प्राण गमवावे लागले ही बातमी वाचनात आली. असा दुर्दैवी अंत एखाद्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलणाऱ्या प्रमुखाचा झाल्यास त्या कुटुंबावर काय बिकट प्रसंग ओढवेल? अश्या कुटुंबाला समाजात वावरतांना किती यातना सहन कराव्या लागत असतील याची कल्पना करवत नाही.

असो. वाईट व्यसनं का लागतात? कशी लागतात? त्यांची कारण शोधून त्यापासून कसे दूर राहता येईल आणि त्यांना स्वत:च्या आयुष्यातून कसे हद्दपार करता येईल हे बघण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

जीवनात आलेल्या संकटांशी सामना करताना आलेल्या नैराश्यातून व्यसनाला सुरुवात होते. तसेच मनाचा कमकुवतपणाही कारणीभूत आहे म्हणजेच व्यसनाधीनता हे मानसिक रोगाचे कारण आहे. दारू, चरस, गांजा, ब्राऊन शुगर, ड्रग्ज, यांच्या सेवनानेच जीवनात आलेल्या संकटांवर मात करता येते ह्या गैरसमजुतीतून व्यसनाला सुरुवात होते आणि नंतर त्याच्या आहारी माणूस कधी जातो हे त्यालाही कळत नाही. केवळ गंमत किंवा आग्रह म्हणून सुरुवात होऊन नंतर ते व्यसन माणसाच्या नसानसात भिनत आणि ते करण्याचे बंद केल्याने पुन्हा नैराश्य येतं आणि मग त्याची शृंखला बनते. दारू, तंबाखू, हुक्का, ड्रग्ज मिळाले नाहीतर त्या व्यक्तीला मानसिक तसेच शारीरिक त्रास होतो. व्यसन हे केवळ गरिबीमुळे जडते असे नाही तर गरिबांपेक्षा श्रीमंतांमध्ये व्यसनांचे प्रमाण जास्त दिसून येते. अलीकडच्या काळात तरुण आणि तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर तंबाखू, सिगरेट, हुक्का, चरस, ड्रग्स या व्यसनांचे प्रमाण जास्त वाढलेले दिसून येते.

गेल्या काही वर्षांमध्ये काही विशिष्ठ औषधाच्या अतिसेवानातून उदा. खोकल्याच्या, झोपेच्या आणि वेदनाशामक औषधांतून नशा मिळविण्याचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे.

वाईट व्यसन मग ते कुठलेही असो ते शरीराला घातकच आहे. फक्त याची जाणीव काही जणांना खूप लौकर होते तर काही जणांना विलंबाने होते आणि अश्यावेळी खूप उशीर झालेला असतो, युटर्न कधीच येणार नाही असे मन मानते, मनोधैर्य संपत, सगळे मार्ग बंद झाल्यासारखे होते आणि त्याचे पर्यावसान व्यसनाधीन व्यक्तीच्या आत्महत्येत किंवा मृत्यूत होते.

तंबाखूला हळूहळू भिनणारे विष मानतात कारण त्याचे परिणाम लगेचच दिसून येत नाहीत. तंबाखू खाण्यामुळे संसार विस्कटत नाही. कुटुंबाच नुकसान होत नाही आणि पैश्याचही फार मोठ नुकसान होत नाही असा एक गैरसमज आहे. त्यामुळे तंबाखूच्या व्यसनाकडे फार गंभिरतेने बघितले जात नाही.

जगात तोंडाच्या कँन्सरचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. याचे कारण तंबाखू खाणारे सर्वाधिक लोक भारतात आहेत. जबड्याचा कँन्सर, अन्ननलिकेचा कँसर, जिभेचा कँसर तंबाखूमुळे होतो. माणसाला हमखास मॄत्युकडे नेणारे हे आजार तंबाखूनिर्मित आहेत. पण लक्षात कोण घेतो?

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारणही त्यांच्या तंबाखू खाण्याच्या वाईट व्यसनाने झाले असे सर्वत्र बोलले जाते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर सर्वांना जागा येते, व्यसन सोडण्याच्या शपथा घेतल्या जातात, त्यावर खबरदारीचे उपाय सांगितले जातात. परंतु कालांतराने सर्वच हे विसरतात आणि ‘येरे माझ्या मागल्या” होते.

वाईट व्यसनं जडण्याची अनेक कारणे आहेत. वाईट व्यसनांच्या आहारी जाण्याने शरीराची, कुटुंबाची आणि आर्थिकदृष्ट्या कशी नासाडी होते हे कितीही कोकलून सांगा, उदाहरणे दया, तरी व्यसनाधिता कमी झालेली दिसत नाही. भावी पिढी, मुले-मुली या व्यसनाच्या आहारी जावू नयेत, यासाठी खर्‍या अर्थाने प्रयत्नांची गरज आहे आणि ही जबाबदारी प्रत्येक पालकांच्या बरोबरीने समाजाची सुद्धा आहे. आपापल्या मुलांच्या बाबतीत जरी प्रत्येकाने काळजी घेतली तरी मोठा बदल घडून येऊ शकतो. यासाठी आपल्या मुलांसमवेत सकारात्मक संवाद साधावा. व्यसनाचे दुष्परिणाम सांगावेत, दुष्परिणाम झालेल्या व्यक्तींची उदाहरणे द्यावीत, मुले दिवसभर काय करतात, त्यांना काय आवडते, याचा बारकाईने अभ्यास करावा, मुलांचे मित्र कोण आहेत, त्यांच्या आवडी-निवडी काय आहेत हे जाणून घ्यावे. व्यसनाधिनतेविषयी अधिकाधिक चर्चा करावी. व्यसनांमुळे होणार्‍या आजारांची माहिती मुलांना द्यावी. शाळा-कॉलेजातून याचा प्रचार-प्रसार केल्यास भावी पिढीच्या व्यसनमुक्तीसाठी सकारात्मक पावले उचलली जाऊ शकतात. व्यसनमुक्तीची जनजागृती, व्यसनांचे वाढलेले प्रमाण यांच्या सर्वेक्षण-सेवेचे काम विद्यार्थ्यांकडून करुन घेतल्यास त्यांना त्याचे गांभीर्य कळेल आणि आपोआपच विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांपासून दूर राहण्याची प्रवृत्ती बळावू शकते. तरुण पिढीत तंबाखू सेवन हे व्यसन नव्हे, तर फॅशन बनले आहे. हीच फॅशन जिवघेणी ठरणारी आहे. त्यामुळे आज पालकांवर फार मोठी जबाबदारी आहे. कुटुंबप्रमुख व्यसनमुक्त असेल तर त्यांच्या कुटुंबातील मुलांवर ते संस्कार आपोआपच होतात. व्यसन म्हणजे मृत्यूला निमंत्रण हे मुलांच्या मनावर बिंबवायला हवं. आपण सकाळी झोपून उठल्यावर ‘कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती’ हा श्लोक म्हणतो पण व्यसनी माणूस त्याच हातावर तंबाखू आणि चुना लाऊन लक्ष्मी आणि सरस्वतीचा अपमान करतो हे त्याच्या लक्षात येत नाही. व्यसनांवर आळा घालण्यासाठी मनावर चांगल्या विचारांचा प्रभाव व चांगल्या मित्र-मैत्रिणींची संगत असायला हवी, व्यसनाधिनतेमुळे जीवनातील राम निघून जातो. व्यसनमुक्त जीवनच खर्‍या जीवनाला आकार देऊ शकते. व्यसनी माणसांना व्यसन कायमचे हद्दपार करण्यासाठी प्रबळ मानसिक इच्छाशक्ती आणि आपल्या मनावर ताबा असणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे मन शांत असणे गरजेचे आहे. मन शांत होण्यासाठी देवावर आणि स्वत:वर पूर्ण विश्वास असावा लागतो.

जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..