नवीन लेखन...

वैभवशाली भूप

“न्हालेल्या जणु गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर.
सचेतनांचा हुरूप शीतल;अचेतनांचा वास कोवळा;
हवेंत जाती मिसळूनी दोन्ही, पितात सारे गोड हिंवाळा!”
कविवर्य मर्ढेकरांच्या एका कवितेच्या या सुरवातीच्या ओळी म्हणजे भल्या पहाटेच्या, काहीशा अंधाऱ्या पण उजेडाची जाणीव देणाऱ्या  गारव्यातील मुंबईचे अप्रतिम शब्दचित्र आहे. अर्थात, पुढे कविता वेगळ्या वळणावर जाते. भूप रागाची वेळ, जी शास्त्रात सांगितलेली आहे, तिला अत्यंत सुयोग्य अशा या कवितेच्या ओळी आहेत.
शहरातील प्रशस्त मार्गीकेवरून एखादी अजस्त्र अंबारी, गजराजाच्या गंडस्थलावर ठेऊन, आलिशान मिरवणूक अतिशय मंद गतीने परंतु साम्राज्याच्या अलौकिक संपन्नतेचे दर्शन घडवीत मार्गक्रमण करीत असावी आणि मार्गावरील जनसामान्य जन अवघे डोळे विस्फारून त्या मिरवणुकीकडे बघत रहावी त्याप्रमाणे मैफिलीत भूप राग सुरु झाला की वातावरण पसरते. वास्तविक  भूप रागाचा संसार केवळ ५ स्वरांचा आणि सगळे सूर शुद्ध स्वरूपात लागतात पण, हेच “शुद्ध” स्वर वातावरण “शुद्धी” करतात. या रागात “मध्यम” आणि “निषाद” स्वर वर्ज्य तर बाकी सगळे शुद्ध स्वर. तसे बघितले “औडव – औडव” जातीचा राग असून त्याचा विस्तार इतका प्रचंड कसा? हा प्रश्न कुणालाही पडण्यासारखा आहे पण, हेच “नेटकेपण” या रागाचे वेगळेपण आहे. प्रत्येक सुराला विस्तार करायला भरपूर अवकाश आहे. आता थोडे वेगळे बघूया. आपल्या सप्तकात, “मध्यम” स्वर कसा बरोबर “मध्ये” म्हणजे सात स्वरांमध्ये, चौथा स्वर आहे. म्हणून या स्वराला “मध्यम” असे नाव आहे का? असो, हा भाषाशास्त्रीय विषय झाला. पण, या रागात इथेच सप्तकाचे दोन खंड पडतात आणि तसेच सप्तकातील शेवटचा स्वर नसल्याने, “धैवत” स्वरानंतर सरळ, अवरोही सप्तकाकडे सुरावट वळते. इथेच तर या रागाची खुमारी आहे.
एखाद्या कलाकाराचा एखाद्या रागाशी इतका जवळचा ऋणानुबंध जमतो की तो राग म्हणजे त्या कलाकाराची ओळख बनून जाते, सगळे सूर, त्या गायकीत असे काही एकजीव होऊन जातात की कलाकार आणि ते सूर यांचे एक सुंदर द्वैत निर्माण होते आणि रसिकांना त्याचा अनिर्वचनीय अनुभव मिळतो. भूप रागाबाबत, किशोरी आमोणकरांच्या गायकीचा संबंध असाच अतूट निर्माण झाला आणि तो इतका अतूट आहे की, त्यांनी द्रुत लयीत गायलेली “सहेला रे” ही बंदिश म्हणजे भूप राग कसा सादर करावा, याचा असामान्य मानदंड बनून गेला आहे.
ही बंदिश ऐकताना, शास्त्रीय गायकी कशी आणि किती समृद्ध असू शकते आणि तिचा रसिकांवर कसा व्यापक परिणाम होतो, याचे अप्रतिम उदाहरण आहे. या बंदिशीतील प्रत्येक स्वर हा इतका “सुरेल” आहे आणि तो स्वर कसा दुसऱ्या सुराशी नाते जोडून आहे, हे ऐकण्यासारखे आहे. बंदिशीतील, प्रत्येक तान, बोलतान, हरकत याचे, बंदिशीच्या आशयाशी नाते जोडून, एक प्रयोजन निर्माण केले आहे. असे, फार कमी वेळा, रागदारी संगीतात आढळते. मुळात, रागदारी संगीत म्हणजे स्वरांचे संगीत आणि तिथे शब्द माध्यम हे नेहमीच परके असते. हाच विचार वर्षानुवर्षे प्रचलित आहे. परंतु इथे या पारंपारिक विचाराला छेद दिलेला दिसून येतो. बंदिशीत असलेला समर्पण भाव इथे असामान्यरीत्या व्यक्त होतो.
आता आपण, एक प्रसिद्ध नाट्यगीत गीत ऐकुया. स्वयंवर नाटकातील “सुजन कसा मन चोरी”.
वास्तविक, भूप रागातील “फुलवन की सेज” या प्रसिद्ध बंदिशीवर बरेचसे आधारित आहे पण तरीही जर का गायला पं. कुमार गन्धर्वांसारखा असामान्य गायक असेल तर त्यात किती विलोभनीय “जागा” घेता येतात, याचे अनोखे प्रत्यंतर घेता येइल.
तसे बघितले तर कुमार गंधर्वांची गायन शैली बघितली तर, सूर घेताना, सुरांवर झडप टाकून, त्याला आपल्या ताब्यात कसा ठेवायचा, असा एकूण प्रयत्न असतो पण इथे बऱ्याच ठिकाणी, जो मुलायमपणा दिसतो, तो मुद्दामून ऐकण्यासारखा आहे. वास्तविक, गाण्याची चाल(च) इतकी मृदू आहे की तिथे अवघड वळणाच्या ताना फार विसंगत दिसतील आणि याचे नेमके भान ठेऊन, इथे गायकाने ताना घेताना, त्याचा स्वभाव, त्यानुसार अवलंबलेला आहे. गाण्याच्या पहिल्या आलापीपासून आपल्याला “निखळ” भूप ऐकायला मिळतो.
मराठी गाण्यांत तर भूप प्रचंड पसरलेला आहे. एकतर आपल्या मराठी संस्कृतीत, “भूपाळी” याला फार महत्व असल्याने आणि मराठी चित्रपटात, त्याचा विपुल आढळ असल्याने, भूप रागावर आधारित, गाणी भरपूर आढळतात.  आपण इथे अशीच मराठी चित्रपटात चिरस्मरणीय झालेली भूपाळी बघणार आहोत. “घनश्याम सुंदरा” हीच ती भूपाळी.
“घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला,
उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला”
पंडिती काव्यात सूर्याला “मित्र” म्हणतात आणि त्याच अर्थाने इथे या कवितेत “मित्र” हा शब्द योजलेला आहे आणि हा शब्द एकूण सगळ्या रचनेत अतिशय चपखल बसलेला आहे.
मराठी चित्रपटातील “आद्य” भूपाळी असे सार्थ वर्णन करता येईल, अशी ही रचना. या गाण्याच्या सुरवातीचे सूर भूप रागाशी नाते सांगतात पण पुढे, “आनंदकंदा प्रभात झाली” इथे मात्र भूपाशी फारकत होते. ही संगीतकार म्हणून कै. वसंत देसायांची कमाल. खरतर भूप रागाचा मूळचाच मृदू स्वभाव, भूपाळीशी सहज जुळण्यायोग्य असल्याने, या रागात अशा प्रकारच्या रचना झाल्या असाव्यात.
आता आपण मराठीतील अशीच एक अजरामर रचना बघुया. “माझे जीवन गाणे”!! मंगेश पाडगावकरांनी रेडियोवरील “बिल्हण”  या श्रुतीकेसाठी प्रस्तुत कविता लिहिली होती.
“माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे;
व्यथा असो आनंद असू दे,
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा ना दिसू दे
गात पुढे मज जाणे”.
गाण्यामध्ये कविता कशी मिसळावी,याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मंगेश पाडगांवकरांची भावगीते. एका बाजूने सुबोध शब्दकळा तर दुसऱ्या बाजूने आशयाची श्रीमंत अभिव्यक्ती!!
पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांनी प्रसिद्ध केलेले हे गाणे. याची गंमत अशी आहे, बऱ्याचजणांना असे वाटते की, या गाण्याचे संगीत पंडितजींनी केले आहे पण प्रत्यक्षात ही चाल, पु.लं. ची आहे!! पु.लं. च्या अनेक अंगापैकी, संगीतकार हे अंग तितकेसे लोकांच्या पुढे आले नाही किंबहुना, मला असे वाटते, त्यांच्यातील, लेखक, भाषण इत्यादी बाबींच्या समोर हा गुण थोडा झाकोळला गेला आणि त्यांनी देखील, मला वाटते, त्याबाबत, फारशी उत्सुकता दाखवली नाही. पाडगावकरांची सुंदर प्रासादिक रचना आणि त्याला तितकीच सक्षम चाल, याचा सुरेख संगम या गाण्यात दिसतो.
प्रथमत: नाट्यगीताच्या अंगाने जाणारी चाल, पुढे इतक्या सहजपणे भावगीत म्हणून समोर येते, हे बघून, आपल्याला संगीतकाराच्या बुद्धिमत्तेची कल्पना येऊ शकते. चाल गायकी ढंगाची आहे, हे तर उघडपणे समजते. गायक, शास्त्रीय संगीताचा अभ्यासक आहे आणि त्याच्या गळ्यावर तसेच संस्कार झाले आहेत, हे ध्यानात ठेऊन, संगीतकाराने, गाण्यात अनेक हरकती, ताना यांचा वापर केला आहे परंतु आपण, एक भावगीत सादर करीत आहोत, याचे नेमके भान ठेऊन, गाण्यात या अलंकारांचा वापर केलेला आहे. हे गाणे, सहजपणे, बंदिश म्हणून सादर होऊ शकले असते. इथेच भावगीत संगीतकार आणि रागदारी संगीतकार, यातला फरक ध्यानात घेता येतो.
भूप राग म्हणजे मांगल्य, शुचिर्भूतता असा काहीसा एकांगी समज होण्याआधी(च) आपण आता, एका हिंदी गाण्याचा
परिचय करून घेऊया. वरील गाण्याच्या रचना, आशय तसेच सादरीकरण, याच्याशी कसलेच साम्य न दर्शविणारे किंबहुना अगदी दुसऱ्या टोकाच्या संस्कृतीचे शृंगारिक दर्शन घडवणारी ही रचना. असे असले तरीही अत्यंत विलोभनीय असे हे गाणे आहे. “उमराव जान” या गाजलेल्या चित्रपटातील “इन आंखो की मस्ती” हे “उमराव जान” या चित्रपटातील अतिशय लोकप्रिय गाणे.
शहरयार या मुळातल्या प्रख्यात शायराची ही रचना आहे आणि केवळ शायरी म्हणून देखील तितकीच आशयसंपन्न आहे. खरतर उर्दू भाषा आणि तिची संस्कृती हा सगळाच “वैभवशाली” आणि “लखलखाटी” झोताचा आविष्कार असतो. त्यातून, इथे तर कोठीवरील मुजरा गीत!!
“इन आंखो की मस्ती के मस्ताने हजारो है,
इन आंखो से वाबस्ता अफसाने हजारो है”
ठुमरीच्या अंगाने जाणारे गाणे, अतिशय अवघड हरकतींनी सजलेले. खरतर या गाण्यात, नेमका भूप राग असा सरळ समोर येत नाही. एकतर कोठीवर गायले जाणारे गाणे असल्याने, गाण्यात नखरा ओतप्रोत भरलेला आहे. गाण्यातील खटके, हरकती इतक्या अप्रतिम आहेत की प्रत्येक ओळ ही त्या नजाकतीने भरलेली आहे. कोठीवरील संयत शृंगारिक गाणे कसे असावे, यासाठी, हे गाणे सुंदर उदाहरण ठरावे.  इथे आणखी एक गंमत आहे. गाण्यात सुरवातीच्या ओळीत पारंपारिक “भूप” राग दिसत नाही पण गाण्याच्या दुसऱ्या ओळीत “भूप” रागाची “झलक” दिसते आणि त्यानुसार गाण्याचा पुढे विस्तार होतो.
“सूर संगम” चित्रपटातील हे गाणे असेच भूप रागाच्या अनुषंगाने जाणारे विस्तारत जाणारे सुंदर गाणे.
“जाऊ तोरे चरन कमल पर वारी,
हे गोपाल गोविंद मुरारी
शरणागत हुं बाल तिहारी”
प्रसिध्द कवी वसंत देवांची ही रचना आहे. रचनेचा तोंडावळा जरी बघितला तरी लगेच त्याच्या आशयाचे स्वरूप कळून घेता येते आणि सुगम संगीतात याच गुणांची फार आवश्यकता असते. कवितेत चटपटीतपणा असावा पण त्याच्बारीबार आशयाची अभिव्यक्ती देखील तितकीच समृद्ध असणे गरजेचे असते.
पंडित राजन मिश्रा आणि लताबाई यांच्या अवीट गायनाने सजलेले हे गाणे. वास्तविक, पंडित राजन मिश्रा ही रागदारी संगीत गाणारे गायक आणि त्यांच्या गळ्याची “बैठक” देखील त्याच अंगाने तयार झालेली पण तरीही गाण्यात हरकती घेताना, त्यात जरा देखील “जडत्व” न येण्याची काळजी घेऊन, गायले गेले आहे. अगदी सुरवातीपासून, इथे भूप राग स्पष्ट दिसतो, तंबोऱ्याच्या सुरात सुरु होणारी ही रचना, पुढे इतकी अनपेक्षित वळणे आणि हरकती घेत, विस्तारत जाते की आपल्या मनाचा कब्जा कशी आणि कधी घेते, तेच समजत नाही.
अशीच एक सुंदर भूपाळी मराठी चित्रपटात ऐकायला मिळते – तुझ्या कांतिसम रक्तपताका हेच ते गाणे. संगीतकार स्नेहल भाटकरांनी, ग.दि.माडगुळकरांच्या प्रासादिक रचनेला इतका अप्रतिम स्वरसाज चढवला आहे, हे गाणे चित्रपटातले न वाटता, एखादे खाजगी गीत असावे असे वाटते. सुमन कल्याणपूर यांनी अतिशय मन लावून हे गाणे गायले आहे. सुरवातीच्या सतारीच्या सुरांतून, ही चाल आपल्या मनाचा कब्जा घेते, ते गाणे संपेपर्यंत. गाण्यात कुठेही लय, किंचित देखील दुरावत नाही तसेच वाद्यमेळ आणि त्यांची रचना देखील, चालीच्याच अंगाने सूर पुरवत आहे परिणामस्वरूप गाण्याचा दाट विणीचा परिणाम मनावर होतो.
मराठीत एकूणच बहुतेक सगळ्या भूपाळ्या या भूप रागाच्या सावलीत तरी आहेत किंवा रागावर आधारित आहेत. मी वर म्हटल्याप्रमाणे सकाळच्या वेळेचा शुचिर्भूत भाव आणि प्रसन्न मनोवस्था, यांचा भूपालीच्या रचनेत अंतर्भाव होत असल्याने, चालीसाठी भूप राग जवळचा वाटणे साहजिक आहे.
— अनिल गोविलकर 

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..