नवीन लेखन...

उपचारांची दिशा बरे वाटावे की बरे व्हावे ?

अग्निशेषं ऋणशेषं व्याधिशेषं विशेषतः । वर्धमाने तु वर्धन्ते तस्मात् शेषं न कारयेत् ।।

अर्थात पूर्णपणे न विझलेला अग्नि ( आगीची ठिणगी ) , पूर्णपणे न फिटलेले कर्ज आणि विशेषतः उपचार घेऊन पूर्ण बरी न झालेली व्याधी , हे नेहमीच वाढत राहतात ! अर्थात त्यांचा निःशेष अंत झाल्या खेरीज शहाण्या माणसाने स्वस्थ बसू नये.

एखादा दहशतवादी हल्ला परतवून लावणे म्हणजे दहशतवादाविरुद्धचे युद्ध जिंकणे नाही .अधून मधून होणारे दहशतवादी हल्ले ज्याप्रमाणे दहशतवाद ह्या मूळच्या सामाजिक रोगाचे केवळ लक्षण आहे . दहशतवाद कसा वाढतो , त्याची नेमकी कारणे , त्यासाठी आर्थिक पाठबळ कसे मिळते , ह्याचा जगात वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास झाला आहे आणि निष्कर्ष हेच सांगतो की हे हल्ले हा पूर्ण प्रक्रियेतला केवळ समाजात भीती निर्माण करण्याचा एक भाग आहे . मूलतत्त्ववादी उद्दिष्टे ही याहून खूप वेगळी आहेत .

रोगाच्या बाबतीत हुबेहूब असेच घडत असते ! मला काहीतरी होत आहे . काही त्रास जाणवतो ही कोणत्याही रोगाची दिसणारी- जाणवणारी लक्षणे असतात . पण त्यांचा समग्र अभ्यास , त्यांची कारणे शोधणे आणि त्यांच्या बंदोबस्ताची व्यवस्था करणे , असे पुनः होऊ नये म्हणून उपाययोजना करणे हे काम वैद्यांचे असते . ऐनवेळी निर्माण झालेली लक्षणे शमवणे , त्यात आराम पडणे हे आवश्यक आहेच पण त्याहून अधिक , असे का झाले ह्याची शहानिशा तपासणी ही देखील त्याहून आवश्यक ठरते . हा रोग ( हल्ला ) आत्ताच का ? ह्याची कारणे कोणती ? ( key conspirators of the terrorist attack ) , रोगाची प्रारंभीपासूनची आतापर्यंतची वाटचाल शरीरात कुठे कुठे कशी झाली ? ( revealing terror plot ) ही शहानिशा करणे म्हणजेच रोगाची संप्राप्ती समजून घेणे ! आणि ही साखळी तोडणे म्हणजे खरी चिकित्सा ! पण आपण तोवर धीर धरणार का ?

आजारपणात बरे वाटणे आणि पूर्ण बरे होणे हे दोन्ही महत्त्वाचे असले तरी त्याचा दुसरा भाग हा अधिक महत्त्वाचा आहे . कधी कधी उपचारात तर बरे वाटणे ह्याला बाजूला ठेवून प्रसंगी थोडा त्रास झाला तरी पूर्ण बरे होण्यासाठी कष्टप्रद उपचार करणे भाग असते ( शस्त्रकर्म ) . आयुर्वेद इथे सुख आणि हिताचा विचार मांडतो . सुखकारक असेल ते सगळे हितकर असेलच असे नाहीच . आपली दिशा हितकर काय त्याकडेच असावी.

नेहमी येणारा ताप – हेच उदाहरण घेतले तरी फक्त वाढलेले शरीराचे तपमान कमी करणे इतकाच काही उद्देश पूर्ण करणे म्हणजे शुद्ध चिकित्सा होत नाही . असे असते तर केवळ ताप कमी झाल्यावर आपण लगेच पूर्वीप्रमाणे स्वस्थ झालो असतो . अनुभव असा असतो की ताप उतरला तरी अशक्तपणा , अरुची , भूक न लागणे , स्नायू दुखणे , प्रसंगी पूर्वी नसलेल्या खोकल्यासारखी नवीच लक्षणे समोर येतात . पण सर्वसामान्य रुग्ण ताप कमी झाला की लगेच पूर्वीचे आहार – आचरण सुरू करतात . ह्यामुळे पुढे जाऊन सांधेदुखी , अशक्तपणा , डोकेदुखी , जुनाट सर्दी , पौष्टिक अन्न घेऊन ते अंगी न लागणे हे किंवा ह्या प्रकारचे अन्य त्रास तुलनेने दीर्घकाळ सहन करावे लागतात . असेच कावीळ ह्या आजारात सुद्धा बघण्यास मिळते . केवळ काही रिपोर्ट नॉर्मल आणणे इथवरच जर आपण लक्ष ठेवणार आणि की पूर्वी प्रमाणे मनसोक्त खाणे – पिणे करण्यास मोकळे असे समजतो . आपण ‘ रिपोर्ट नॉर्मल म्हणजेच स्वास्थ्य ‘ अशी आपली व्याख्या का केलेली आहे ?

प्रत्येक दहशतवादी संघटनेची स्वतःची विशिष्ट कार्यपद्धती ( modus operandi -modules ) असते आणि ती समजून घेणे हे तिचा नायनाट करण्यास , पाळेमुळे खणून काढण्यास अत्यावश्यक असते . असे संघटन मोडून काढण्यासाठीच देशाच्या वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणा कार्यरत असतात . अशीच प्रत्येक रोगाची स्वतःची अशी शैली – संप्राप्ति असते . तिची साखळी तोडणे हीच खरी चिकित्सा आणि यासाठीच वैद्यवर्ग कार्यरत असतो . अनेकदा तर काही संघटना जशी एकत्र आघाडी उघडून सुरक्षा यंत्रणेला त्रस्त करतात , त्या प्रमाणेच काही रोग एकत्र होऊन नवीनच असे काही स्वरूप धारण करतात . जसे अगोदर केवळ अॅसिडिटी असते , त्यासाठी बाजारातील पित्तशामक औषध घेऊन ‘ बरे वाटून जाते ! ‘ . ‘ पोट साफ होत नाही ! ‘ ही तर वैश्विक समस्या . त्यावर बाजारातील काही चूर्ण घेण्याची ‘ कायम’ची सवय आहे . पण पुढे जाऊन सांधे दुखणे सुरू होतात . त्यासाठी सुद्धा वेदनाशामक घेणे आणि बरे वाटणे सुरू असते . मग अचानक अस्वस्थ होणे , डोके दुखणे , अंगाला जडपणा असे काही गंभीर आजार सुरू झाले की ‘ लाईफ – स्टाइल ‘ डिसऑर्डर्स म्हणून गौरवप्राप्त रोग झाल्याचे ‘ निदान ‘ होते . इतकेही होऊन कॅन्सर सारखे काही छुपे – रूस्तम असतात , ज्यांची लक्षणे लवकर लक्षात सुद्धा येत नाहीत .

अशी केवळ लक्षणं बघून औषध घेणे ( प्रसंगी स्वतःच ठरवून ) आणि थोडं बरे वाटले की पुनः गाडी रुळावर ! असे करणे म्हणजे रोगाचा पुढचा हल्ला / टप्पा येण्याची वाट बघत बसणे असेच नव्हे का ?

असे असेल तर कधीपर्यंत उपचार घ्यावेत ? की कायमच औषध घेत राहावे का ?

नक्कीच असे नाही . काय झाले म्हणजे उपचार थांबवावे ह्याचा विवेक आपल्या वैद्यांना असलाच पाहिजे . आणि त्यांना तसे आपण रुग्ण म्हणून विचारणे आवश्यकच आहे .

उपचार कुठवर तर इथवर !
आपण रोगमुक्त होत आहोत ह्या दिशेला नेणारी ही लक्षणे दिसू लागली की उपचार थांबवता येतात . ज्यासाठी दवाखाना गाठला त्या त्रासातून मुक्ती, शरीराचा रंग ( complexion ) , दृढता , आवाजाचा पोत पूर्ववत चांगला होणे , शारीरिक बळ पुन्हा प्राप्त होणे ( काम करण्याचा स्टॅमिना पुन्हा येणे ) , अन्नावरची वासना निर्माण होणे , खाण्याची इच्छा होणे , जेवणाचे वेळी तोंडाला चव असणे , जेवलेल्या अन्नाचे वेळच्यावेळी व्यवस्थित पचन होणे ( अॅसिडिटी , पोटफुगी किंवा बद्धकोष्ठ न होता ) , वेळेवर पुरेशी झोप येणे ( ह्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते , पण शारीरिक दोष कमी – अधिक झाल्याने झोपेची गुणवत्ता सतत बदलत असते , तेव्हा कोणतेही झोप आणणारी औषध न घेता हे होणे ) , झोपेत सुद्धा चित्र – विचित्र स्वप्न न येणे ( हो आयुर्वेदात स्वप्न देखील आरोग्याचे निदर्शक आहेत ! ) , झोप पुरेशी झाल्यावर सुखाने , आनंदात जाग येणे पण तितकेच महत्त्वाचे . पचन पूर्ण होऊन तयार होणारे वायू , मल आणि मूत्र सहज , सुखाने शरीरातून बाहेर पडणे . ( इथे अनेकांना हे सुख दुर्लभ असते ) .

आणि सर्व प्रकारे मन – बुद्धी आणि आपले कान नाक – डोळे- जीभ – त्वचा ह्यांच्या कामात प्रसन्नता येणे , त्यांचे काम न अडणे . कोणत्याही रोगात वरील लक्षणे दिसणे म्हणजेच शरीरातील रोगाची साखळी तुटली आहे .

आपली उपचार पद्धतीची दिशा केवळ रोगाचे लक्षण नाही तर आपल्या आहार – निद्रा – भय ह्यांना एकत्रित समोर ठेवून रचलेली असावी ही आयुर्वेदाची दिशा आहे .

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग !
आजचा कोरोना- ( चायनीज ताप ) साथीचा काळ हा असाच युद्ध प्रसंग आहे . सैन्यात असे म्हणतात की शांतता काळात गाळलेला घाम हा युद्धाच्या काळात गळलेल्या रक्ताचे थेंब शतपटीने वाचवतो . अर्थात हल्ल्याची वाट न बघता होण्यापूर्वीच तो निरस्त करण्याला , झालाच तर तो चटकन उधळण्याला खूप महत्त्व आहे . त्यासाठी तयारी – सज्जता असावी लागते .

आपण शरीर – मन इंद्रिय ह्यांना बलवान ठेवणे हेच आज अगत्याचे आहे . त्यासाठी सुयोग्य आहार , आपली योग्य दिनचर्या , कालानुरूप वर्तणुकीत बदल , पुरेसा व्यायाम आणि उच्च आदर्श , जीवन मूल्यांची सकारात्मकता ह्यांनी आपले शारीरिक , मानसिक आणि आत्मिक बळ वाढते . ह्याच बळाला आपण आज रोग – प्रतिकार शक्ति असे म्हणतो . अर्थात आपल्या लहान सहान तक्रारी , पूर्वीचे आजार आपण नेहमी प्रमाणेच अर्धवट उपचार करून सोडून दिले तर तर कोणतेही औषध , उत्तम आहार , व्यायाम हे सुद्धा प्रसंगी अपुरे पडतात . कारण अर्धवट सोडलेल्या उपचारांनी आपला पूर्वीचा रोगरूपी शत्रू मधल्या वेळात बलवान होऊन नवीन आलेल्या रोगाला मदत करतो . आणि मग ही रोगांची संघटित दहशत आपल्याला मोडून काढणे कठीण जाते.

तेव्हा यापुढे आपल्याला रुग्ण म्हणून जे बरे वाटते .. त्याहून आपले मुळातून बरे होणे ह्या दोहोंत होणारा ‘ गोंधळ ‘ आपण आपल्या वैद्यांचे मदतीने जरूर सोडवूया . त्यासाठी आपल्या वैद्यांना प्रश्न विचारूया !!

वैद्य . सौरभ अच्युत जोशी
आयुर्वेद सौरभ ,
नाशिक
९ ४२३ ९ ६४५१६ , ७०२०१५७२१०

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..