नवीन लेखन...

माध्यमांची भाषा

कार्यकारी संपादक दै. ऐक्य सातारा

कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात ‘मराठी भाषा दिन’ साजरा होतो. या दिनानिमित्त मराठी भाषेचे वैभव, सौंदर्य, प्राचीन परंपरा, मराठी भाषेची थोरवी आणि मराठी भाषेतील संपन्न साहित्याचा वारसा यावर गोडवे गाणारे लेख प्रसिध्द होतात. व्याख्याने होतात. आम्ही मराठी भाषक आहोत, असेही टाळ्यांच्या गजरात वक्ते सांगतात.

लाभले आम्हांस भाग्य
जाहलो मराठी
आमुच्या रगारगात
खेळते मराठी ।।

असेही अभिमानाने सांगितले जाते. पण प्रत्यक्षात मात्र मराठीच्या जन्मभूमीत आणि मराठी भाषक महाराष्ट्रात मातृभाषा मराठीची प्रचंड अवहेलना आणि विटंबना सुरू आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेली मराठी ही अभिजात भाषा आहे. जगातल्या प्रमुख भाषात तिचा समावेश होतो. सोलापूर जवळच्या कुडलसंगम जवळच्या मंदिरात अलीकडेच सापडलेल्या हजार वर्षापूर्वीच्या शिलालेखात ‘वाचिल तो विजयी होवो असे म्हटले आहे.

मराठीतला हा प्राचीन शिलालेख महाराष्ट्राच्या अनेक भागात गेल्या शंभर वर्षात मराठी भाषेतले शिलालेख सापडले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषक साहित्य संस्था आणि राज्य सरकारकडूनही केंद्र सरकारकडे गेली पाच वर्षे प्रयत्नही सुरू आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा, मराठी भाषेचा सन्मान व्हायलाच हवा. पण, त्या बरोबरच गेल्या चाळीस वर्षात मराठी भाषेतील विशेषतः प्रादेशिक साखळी वृत्तपत्रे, मनोरंजन आणि वृत्तवाहिन्या, मराठी साहित्यातल्या विविध लेखन प्रकारांनीच, समाज माध्यमांनी मराठी भाषेच्या केलेल्या प्रचंड आणि अक्षम्य विटंबनेचा गांभिर्याने विचार करून मराठी भाषेच्या शुध्दिकरणासाठी सर्व थरावर प्रयत्न व्हायला हवेत.

इंग्रजी राजवट भारतात रुजल्यावर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ या वृत्तपत्राद्वारे मराठी वृत्तपत्र माध्यमाचा पाया घातला. पुढच्या काळात तेव्हाच्या मुंबई राज्यात आणि मराठी भाषक प्रदेशात अनेक वृत्तपत्रे सुरू झाली. त्या वृत्तपत्रांची भाषा पंडिती होती तरी, ती शुध्द होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक, आगरकर यांच्या वृत्तपत्रांमुळे मराठी भाषेत तेजस्वी पत्रकारितेचा उदय झाला. स्वातंत्र्य चळवळीचा प्रसार आणि समाजप्रबोधन हे त्या काळातल्या वृत्तपत्रांचे ध्येय होते आणि त्यासाठी लोकमान्यांच्यासह अनेक संपादकांनी, पत्रकारांनी ब्रिटिश राजवटीत तुरुंगवासही भोगला. ज्यांना मराठी भाषा उत्तम यायची असेल, त्यांनी ‘केसरी’ अग्रलेख वाचायला हवेत, असे त्या काळात विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना आवर्जून सांगितले जाई. वृत्तपत्रे हेच स्वातंत्र्यपूर्व काळातले जनजागरण घडवणारे महत्त्वाचे प्रसार माध्यम होते. तेव्हाच्या संपादक, पत्रकार, साहित्यिकांना, कवींना मराठी भाषेचा सार्थ अभिमान होता. तरीही इंग्रजी ही राजभाषा असल्याने इंग्रजीचे आक्रमणही मराठी भाषेवर संथ गतीने सुरू होते. इंग्रजी साहित्य आणि जागतिक तत्वज्ञानाचा प्रभाव मराठी साहित्यासह पत्रकारितेवरही सांस्कृतिक क्षेत्रावर होता. तो मोडून काढत स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्माचा स्फुल्लिंग देशभक्त पत्रकार आणि साहित्यिकांनी जनतेत पेटवला. मोरो केशव दामले, मो. ख. वाळींबे यांच्यासह अनेक संशोधकांनी मराठी भाषेचे व्याकरणही सिध्द केले. मराठी भाषेच्या अभिमानी समाज माध्यमकारांनी स्वभाषा आणि स्वातंत्र्याची निर्माण केलेली ही प्रेरणा मराठी भाषेला नवसंजीवनी देणारी आणि जागतिक साहित्य, पत्रकारितेच्या क्षेत्रात स्थान मिळवणारी ठरली. ब्रिटिश राजवटीतही इंग्रजीचा अभिमान असणारा समाज होताच. विशेषतः ब्रिटिश धार्जिण्यांना इंग्रजी भाषेचा विलक्षण अभिमान वाटत असे. परिणामी मराठीवरही सुरू झालेल्या इंग्रजी भाषेच्या अतिक्रमणाने मराठी भाषा हळूहळू भ्रष्ट व्हायला लागली. तेव्हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि कविवर्य माधव ज्युलियन यांनी मराठी भाषेच्या शुध्दिकरणाची चळवळ सुरू केली. सावरकरांनी मराठी भाषेत रुळलेल्या अनेक इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्दही दिले. अखिल भारतीय साहित्य संमेलनातही मराठी भाषेच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत असे.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भाषावार प्रांतरचना झाली. प्रत्येक राज्याची मातृभाषा हेच शालेय शिक्षणाचे माध्यम असावे आणि त्याबरोबर इंग्रजी- राष्ट्रभाषा हिंदीचीही सक्ती प्राथमिक शिक्षणातही असावी, असे त्रिभाषा सूत्र अंमलात आणले गेले. १९६० मध्ये विदर्भ, मराठी भाषकांचे मराठी राज्य महाराष्ट्र स्थापन झाले. संत तुकोबा, संत ज्ञानेश्वर अशा थोर संतांच्या साहित्याची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला राजभाषेबरोबरच मानाचे स्थान मिळेल, ही कविवर्य माधव ज्युलियन यांची अपेक्षा मात्र खोटी ठरली. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असली तरी तिला मान-सन्मान मात्र मिळत नाही. उलट तिची खुल्या आणि उदारमतवादी अर्थव्यवस्थेच्या धडाकेबाज अंमलबजावणीनंतर प्रचंड अवहेलना सुरू झाली आहे. प्रादेशिक साखळी वृत्तपत्रे आणि विविध वृत्त – मनोरंजन वाहिन्या मराठी असल्या तरी, मराठी भाषेचा मुडदा पाडायचा उद्योग मायबोली मराठीच्या भूमीतच निर्लज्जपणे, राजरोसपणे सुरू आहे. मायबोली मराठीच आता प्रसार माध्यमांच्या अक्राळ-विक्राळ आक्रमणामुळे संकटात सापडली आहे. जागतिकीकरणाच्या लाटेनंतर इंग्रजी भाषेचे स्तोम महाराष्ट्रात अधिकच वाढले. परिणामी ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा हजारोच्या संख्येने सुरू झाल्या आहेत. आपल्या मुलाला फाड फाड इंग्रजी बोलता आले, म्हणजे त्याला पदवीधर झाल्यावर लाख/ दोन लाख रुपयाची नोकरी मिळणार, अशा भ्रमात असलेल्या पालकांना आपण आपल्या मुलांचे मातृभाषा मराठीपासून वंचित करून त्याच्या आयुष्याचे वाटोळे करीत आहोत, याचे भान नाही. आपला वाचक वर्ग आणि श्रोतावर्ग इंग्रजी भाषकच असल्याच्या भ्रमात असलेल्या प्रादेशिक मराठी वृत्तपत्रांनी आणि मनोरंजन, वृत्तवाहिन्यांनीही बातम्या आणि मालिकांसह इंग्रजी शब्दांचा भडीमार करायचा तडाखाच लावला आहे. प्रादेशिक वृत्तपत्रांच्या बातम्यांची शीर्षकेही अशीच इंग्रजी शब्दांचा भडीमार करणारी असतात ‘वर्षानंतरही प्लॅस्टिक बंदी फेल’, ‘सुजय विखे यांचा सेफ गेम’, ‘लोकसभेपासूनच सेनेची फिल्डिीग’, ‘भाषणांची स्क्रिप्ट बारामतीतून’, ‘काँग्रेसमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरूच’, ‘हवामानाचे अलर्ट आता मोबाईलवर मिळणार’, ‘सध्या इलेक्शनचा फिवर सुरू झाला आहे’, ‘लोकांशी कनेक्ट होण्यासाठी पोलिटिकल पार्टीजनी न्यू टेक्निकचा वापर वाढवला आहे.’

ही झाली काही बातम्यांची शीर्षके! आता लेखातील मराठी भाषेवरचे हे अत्याचार पहा. कोणतीही फॅशन जेव्हा समाजमाध्यमातून नावलौकिक असलेल्या सोहळ्यातून येते, तेव्हा ती फॅशन ट्रेंडमध्ये यायला सामान्य माणसाच्या नजरेतून मग तो एक ट्रेंड बनतो की अमूक एक अभिनेत्री किंवा अभिनेत्याने काय घातलं होतं? कोणतं फॅब्रिक्स होतं, यावर चर्चा करून लोक ते फॉलो करतात. रेड कार्पेटवर येणाऱ्या सेलिब्रेटीमध्ये आऊट फिटस् आणि ड्रेसेसबाबतीत स्पर्धा असतेच. अख्या जगात ती फॅशन ‘स्टँड आऊट’ होईल, त्यामुळे आपल्या देशातील फॅशन ग्लोबली स्टँड आऊट म्हणजेच फॉलो व्हावी अशी डिझायनरची इच्छा असते. ‘

‘चॉकलेटचे प्रॉडक्ट तयार करताना कलर आणि स्मेल यांचा सुरेख मेळ साधून आला तरच ते प्रॉडक्ट उत्तम ठरतं. रिअल चॉकलेट ओळखायचं कसं तर, तुम्ही ते तोंडात टाकल्यावर तुमच्या तोंडातील उष्णतेमुळे ते पटकन मेल्ट होतं, ते रिअल चॉकलेट असतं.’

‘एका बाजूला स्टीमर वा कुकरमध्ये पाणी घालून गॅसवर ठेवा, भिजलेल्या पिठात सॉल्ट घालून ते ढोकळ्याच्या ताटलीला ऑईल लावून ओता. स्टीमरमध्ये पंधरा मिनिटे वाफवा आणि नंतर ते तयार झाल्यावर सर्व्ह करा.’

‘हा ड्रेस प्रत्येक नववधूकडे असावा, कारण या पेहरावासोबत खूप काही मॅच करता येतं, यामध्ये सध्या बेल्ट स्लिव्हची फॅशन आहे. तुम्हाला हा लुक आणखी ट्रॅडिशनल हवा असेल तर तुम्ही तो अनारकली पॅटर्नमध्ये डिझाईन करू शकता. स्ट्रेट फिट कुर्त्याची सध्या चलती असताना तो लेहंग्यासोबत उठून दिसतो. तसेच त्यावर एखादा शॉर्ट कुडताही चांगला दिसेल. तुम्हाला एखाद्या राजकुमारीसारखं लोक वेडिंग सेरिमनीत ट्रीट करीत असतात. त्यावेळी तुम्ही एखादा क्लच कॅरी केला तर त्यात तुमचं बेसिकचं सामान आणि मोबाईल बसू शकेल. तसेच ते फॅशन स्टेटमेंटही होवू शकेल. लग्नात तुम्हाला दोन्ही कुटुंबाकडून कंटेपरिरी ज्वेलरी मिळत असते. पण तुम्ही त्यातल्या काही ज्वेलरी आताच्या काळाला सूट होतील, याची दक्षता घ्यावी.

‘रोमँटिक कॉमेडी पट हे अशाच प्रकारच्या प्लॉटवर आधारीत असतात. बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक स्टार किडस् दाखल झाले आहेत. मराठीत स्टार किडस् फारसे दिसत नाहीत.’

‘फेस्टिव्हल सिझनमध्ये हमखास स्कर्ट घातले जातात. ट्रॅडिशनल स्कर्ट वरती वेस्टर्न टॉप किंवा वेस्टर्न स्कर्ट वरती ट्रॅडिशनल टॉप असं काँबिनेशन घालू शकतो.

‘ उपग्रह वाहिन्यांवरच्या मालिका आणि बातम्यात तर इंग्रजीतल्या शब्दांचे प्रचंड भरताडच असते. अॅक्ट, अॅक्टर, एपिसोड, हेअरफॉल, डेस्टिनेशन, ब्रेकिंग न्यूज, नॉस्टॉलझिया, ब्रेकफास्ट, आयडेंटीटी, गिल्टी, सेलिब्रिटी, सेलेब्ज, हायपर टेंशन, एक्साईट, शॉलोफ्राय, रेसिपी, ग्रँड फिनाले यासह अक्षरश: हजारो शब्द मराठीत घुसडले गेले आहेत. काही मराठी इंग्रजी मिश्रीत वाक्ये तर खुद्द लिहिणाऱ्यांना बोलणाऱ्यांना, छापणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना समजतात की नाही, अशी शंका येते. ‘मला खूप गिल्टी वाटतंय’, ‘तू नॉस्टॉलजिक होवू नकोस’, ‘मी फुडी आहे’, ‘हे मेडिसीन ट्राय कर’, ‘मी करेक्टलीच सांगतो’, ‘प्रत्येक प्र स्त्रीला तिचा स्पेस मिळायलाच हवा’, ‘टिपीकल र मिडल क्लास सोसायटीतले हे लोक आहेत.’ ही वाक्ये म पाहिली तर मराठीच्या व्याकरणाचा कसा मुडदा पाडला जातो, हे अनुभवायला मिळते. इंग्रजीत बोलणे म्हणजे प्रतिष्ठितपणा, अशा भंपक वेडाने तथाकथित उच्चभ्रू समाजाला आणि लोकप्रबोधनाचा वारसा असलेल्या प्रसार माध्यमानाच घेरले गेल्यानेच मराठीवर हे अत्याचार सुरू आहेत. मराठी भाषेवर अधिक अत्याचार करणारी माध्यमांची ही इंग्रजाळलेली मिश्र भाषा. मराठी भाषेच्या वैभवी परंपरेवर घाव घालणारी आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळावा, असा टाहो फोडायचा आणि महाराष्ट्रातच मराठी भाषेचा आणि मराठीच्या व्याकरणाचा मुडदा पाडायचा ही ढोंगबाजी झाली.

जेव्हा भाषा मरते तेव्हा देशही मरतो. संस्कृतीचाही हास होतो. भाषक गुलामगिरी संस्कृतीला खग्रास ग्रहण लावते. स्वाभिमान आणि स्वत्वाला चूड लावते. ही भाषक गुलामगिरी मराठी भाषेच्या अस्तित्वावरच वर्मी घाव घालणारी ठरते आहे. आम्ही मराठीचे अभिमानी आहोत, अशा गर्जना करायच्या आणि मायबोली मराठी भाषेच्या अस्तित्वावरच घाव घालायचे हा कृतघ्नपणा झाला. मराठी वृत्तपत्रे आणि उपग्रह वृत्त, मनोरंजन वाहिन्यांवर सुरू असलेली मराठी भाषेची ही विटंबना तिच्यावरचे अत्याचार रोखायला हवेत. मराठी भाषेचे शुध्दिकरण करायला हवे. कुसुमाग्रजांच्या शब्दात,

भाषा मरता देशही मरतो,
संस्कृतीचाही दिवा विझे
गुलामभाषक होवून आपल्या
प्रगतीचे शिर कापू नका ॥

मराठी भाषेतल्या वृत्तपत्रे, साहित्य आणि मनोरंजन, वृत्तवाहिन्यांनी आपण महाराष्ट्रातल्या १२ कोटी मराठी भाषकांसाठी वृत्तपत्रे प्रसिध्द करीत आहोत, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत, याचे भान ठेवायला हवे. सध्याची माध्यमांची ही भाषा महाराष्ट्रातल्या दहा टक्के मराठी भाषकांनासुध्दा समजणारी तर नाहीच, पण ती मराठीचा अवमान करणारी आहे.

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात वासुदेव कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..