नवीन लेखन...

सूर बदला, जग बदलेल

लता मंगेशकर यांनी गायलेले, हसरत जयपुरी यांनी लिहीलेले ‘कैदी नंबर ९११‘ ह्या हिन्दी सिनेमातले –

मीठी मीठी बातों से बचना जरा।
दुनिया के लोगों मे है जादु भरा ॥

हे गाणे गेल्या शतकांत, साठव्या दशकांत खुप प्रसिध्दीला आले होते. त्यांतले लहान मुलाचे’ तुफानो से नही डरूंगा, हिंमत से मै निकल पडुंगा’ हे कडवे तर मुलांमध्ये शौर्याचे व आत्मविश्वासाचे स्फुरण जागृत करते. गाण्यात म्हटले आहे तसे खरच लोकांमध्ये जादु असते, ते गोड गोड बोलुन आपले काम करुन घेतात म्हणुन आपण सावध राहायला हवे. हे तर खरे आहे मग प्रश्न येतो की आपण सुध्दा आपल्या गोड बोलण्याने आजुबाजुच्या लोकांना आपलेसे नाही कां करु शकत ?

प्रत्यक्षात बघितलेल्या एका घटनेचा उल्लेख इथे करावासा वाटतो कारण, अशा तर्हेच्या घटना वेगवेगळ्या संदर्भात विवीध निमित्ताने सर्वत्र घटतच असतात. एका व्यक्तीचा मुलगा न सांगता स्कुटर घेऊन मित्राकडे जातो. परत येताना नेमका तो वळताना घसरून पडतो. त्याला थाडेफार लागते व तो कसाबसा गाडी ढकलत घरी येतो. घरी येताच वडील त्याचेवर तोंडसुख घेतात. म्हणतात “ न सांगता स्कुटर घेऊन कां गेला होता? धड चालवता येत नाही तर कां गेला?आता दुरुस्तीचा खर्च कोण करणार? पाय तुटला असता तर काय भाव पडले असते ? मुर्ख कुठला ! पैसे काय झाडाला लागतात ?पैसे कमवायला काय कष्ट पडतात माहित आहे कां ? वगैरे “. त्यावेळी मुलाची आई मध्ये आली नसती तर अजुन काही, काही सुरु राहिले असते. मुलगा आधीच ओशाळवाणा झाला होता व त्याला चुक कळली होती. जखम दुखत होती ते निराळे. अपघात काही मुद्दाम केला नव्हता व तो सांगुन होत नाही. अपघातच म्हटला तर कोणाचा पण होऊ शकला असता. अशा वेळी त्याला दिलासा देणे, जखमेचे बघणे जास्त गरजेचे होते. “आता पुन्हा असे करायचे नाही हं, स्कुटरचे जाऊ दे, बघु तुला कुठे लागले आहे, तुझ्या मुळे अजुन दुसर्या कोणाला तर लागले नाही नं?” असे पण सौम्यपणे शांतपणे, सहानुभुतीपुर्वक म्हणता आले असते. ओरडुन, चिडून विषेश काही मिळाले नाही. उलट तसे झाले असते तर मुलाला वडिलांबद्दल जास्त विश्वास आदर वाटला असता. असेच बरेचदा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण करतो जसे दुध ऊतु जाणे, वस्तु पडणे, फुटणे, न सांगता पैसे घेणे, पंखा लाईट रात्रभर चालु राहाणे वगैरे. मुलांवर लहान वयात वचक (धाक ) प्रेमानी पण ठेवतां येऊ शकतो. चिडचिड करूनच काही विशेष मिळते असे नाही.

बोलक्या गाण्यांचा जसा एक “सुर” असतो तसा आपल्या सर्वांच्या बोलण्याचा पण “सुर” ( tone ) असतो उदा: तिरसट, टोचुन बोलण्याचा, राग, प्रेम, तिरस्कारपुर्ण, अलिप्ततापुर्ण, उपहासात्मक, आदरपुर्वक वगैरे. आपल्या बोलण्यामध्ये असल्या भावनांचा परिणाम लगेच संवादामध्ये होऊ न देतां सुर जर सामान्य अर्थात मृदु ठेवला तरी बरेंच काही साध्य होऊ शकते. सुदैवाने गोड बोलायला काही मेहनत पडत नाही व पैसेही पडत नाही, फक्त तशी खुणगांठ मात्र मनांत सतत लक्षांत ठेवावी लागते.

‘बीग एफ एम ९५ पुणे’, रेडिओवर सकाळी एक कार्यक्रम येतो- ‘धुन बदलके तो देखो’, त्यांत छान छान हिन्दी गाणी लावतात. गाण्यांची धुन (चाल) खरोखरीच बदललेली असते कां ते माहित नाही पण गाणी ऐकली की मुड कसे फ्रेश होऊन जाते, बरेचदा तर गाणी श्रृंगार, दारूण्य, वैराग्य, आनंद, भक्ती, वात्सल्य, क्रोध, भय, शोक, विरह, आदी भावनांची सुंदर अनुभुती करुन देतात. धुन म्हणजे tune व मराठीत “सुर”. संगीतात मुळ ‘सप्त ‘सुर असले तरी एकुण १२ सुर मानले जातात, ७ शुध्द व ५ विकृत. (सा, रे, ग, म, प, ध, नि, सां) या चढत्या क्रमाला आरोह व (सां, नि, ध, प, म, ग, रे, सा) या उतरत्या क्रमाला अवरोह म्हणतात. या स्वरांच्या विवीध समुहाने विवीध रागांची निर्मिती होते. जेव्हा हे स्वर, शब्द आणी ताल यांच्या सहाय्याने गायल्या जातात व विशिष्ट रागांच्या चौकडीत बांधल्या जातात तेव्हा ती बंदिश म्हटल्या जाते. गीत आणी वाद्य यांच्या संमिश्र क्रियेला संगीत म्हणतात. नृत्य ही पण एक कला आहे व त्यासाठी अनुशंगानी गाण्याची संगत किंवा पार्श्वसंगीत गरजेचे असते. अशा मधुर गाण्यात मुड बदलण्याची, वातावरण बदलण्याची शक्ती असते ह्यामुळेच सरकारने बॅंक, शासकीय संस्थाने, रेल्वे सारख्या सार्वजनिक ठिकाणांवर हा प्रयोग राबवला होता. परिणाम सकारात्मक असला पाहिजे कारण बर्याच ठिकाणी ते अजुन सुरु आहे. वरील “धुन बदलके तो देखो” या मथळ्यानी मला कां आकृष्ट केले माहीत नाही पण मनांत विचार आला की आपण आपल्या” बोलण्यातला सूर “ म्हणजे ‘बोलायचा टोन ‘बदलला तर खरच आपल्या आजुबाजुचा नूरच बदलु शकतो, पर्यायाने जगच बदलेल, तसा प्रयत्न मात्र करायला हवा. गाण्यांच्या संदर्भात ‘बायकोचा भाऊ’ या सिनेमातले वसंत प्रभु यांनी रचलेले व आशा भोंसले यांनी गायलेले खालील गाणे खुप अर्थपुर्ण आहे –

भूलोकी च्या गंधर्वा तू अमृत संगीत गा..
गा रे कोकीळा गा
सप्त सुरांचा स्वर्ग उभारून
चराचरा ला दे संजीवन. …

हे भुतलावरच्या गंधर्वा, तु अमृत वर्षवणारे संगीत गा, कोकिळा तु पण गा, सात सुरांचा स्वर्ग उभारुन सर्व जगताला संजीवन दे… तर इतकी शक्ती गाण्यात असते. अकबराच्या दरबारातील गायक तानसेन जेव्हा ‘ मेघमल्हार ‘ राग गायचे तेव्हा खरोखरीच पाऊस यायचा असे म्हणतात. सामान्य माणसाला संगीताबद्दल ज्ञान नसते म्हणुन बहुतेक जागरूकता करुन देण्यासाठी ॲाल इंडिया रेडीओ वर ‘ सुर व ताल ‘ असा कार्यक्रम येतो. त्यांत कोणा एका जेष्ठ कलाकाराला आमंत्रित करून त्यांचेकडुन वेगवेगळे राग गावऊन श्रोत्यांना जागरूक करतात. असेच एक भावनांना स्पर्श करणारे गीत आहे.

मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा ।
सुर की नदिया हर दिशा से, बह के सागर में मिले…

पियुष पांडे यांनी लिहीलेले १४ भाषांमधील समागम दर्शवणारे हे गीत पं भिमसेन जोशी, लता मंगेशकर व अन्य तीन गायकांनी गायले व १५ आगस्ट १९८८ ला प्रथम प्रसारित झाले. देशप्रेमाच्या एकतेचे गीत म्हणुन ते आजही तितक्याच आत्मियतेने ऐकल्या जाते. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या एकत्र येऊन समुद्र बनतो तद्वतच आपण व आपल्या अवती भोवतीचे लोक गोड बोलुन एकमेका सहाय्य करुन प्रेमपुर्वक राहिलो तर देश नक्कीच संघटित राहिल व कोणी परदेशी भारताकडे वाकड्या दृष्टीने पाहु शकणार नाही. ही संकल्पना राबविणे हा या गाण्यामागचा उद्देश.

दैनंदिन संवादा व्यतिरिक्त आपल्या व्यक्त होण्या करता बोलण्या/भाषणा साठी गद्य आणी गायकी साठी पद्य असे सशक्त माध्यम असते. पद्य म्हणजे काव्य व ते जेव्हा भक्ती, विरह, प्रेम आदी भाव अथवा नृत्या करता श्रृंगार रसानी चालबध्द केल्या जाते तशा कवितेला आपण गाणे म्हणतो. कवितेच्या महत्तेबद्दल ज्ञानेश्वरीत म्हटले आहे –

वाणीस शोभें कवित्व। कवित्वा खुलवी रसिकत्व॥
रसिकत्वाचें वाढे महत्व ।परतत्वाच्या स्पर्शे जसे ॥

स्वरबध्द गाण्याला जेव्हा विवीध वाद्यांची ( नाद ) संगत मिळते तेव्हा संगीत पुर्णत्वाला येते. गाण्यातुन व्यक्त होणार्या अशा भावना, येणार्या पिढ्यांना शिकवल्या गेल्या पाहिजेत कारण आय टी प्रणीत युगामध्ये भावना लुप्त होत चालल्या आहेत. संगीतावर आधारीत एक स्पर्धात्मक कार्यक्रम टी व्ही वर “सुर नवा ध्यास नवा “हा कलर्स मराठी या वाहिनी वर येतो जो बहुतेक महाराष्ट्रियन निश्चीतपणे बघतात. नवे नवे सुर घेऊन प्रतिभावान होतकरु कलाकार जिंकण्याचा ध्यास घेऊन येतात व जिंकले नाही तरी बरेच काही शिकुन जातात. अशाच तर्हेनी “जग बदलेल” हा ‘ध्यास’ घेऊन आपण सर्व आपल्या बोलण्यातला “ सुर “ बदलवुन टाकू या !

आपल्या गळ्यात एक पोकळी असते त्यातुन आवाज निघतो. त्या अवयवाला स्वरयंत्र ( lyrinex ) म्हणतात. त्यातुन आपला आवाज निघतो. मुल जेव्हा मोठे होते तेव्हा भाषा, उच्चार, शब्द व वाक्यांच्या सरावानंतर त्याला बोलण्याचे मुर्त रूप येते. बोलण्याच्या व्यतिरिक्त, आवाज हा नादाच्या रूपात जसे ॐकार, शिटी, फुत्कार, किंचाळणे रडणे असापण निघतो. असाच नाद तोंडाने फुंकून शंखनाद, बांसरी, बीगुल वगैरे वाद्यातुन सुध्दा निघतात. तोंड बंद ठेवले तर आवाजा अभावी हसता पण येत नाही ( स्मित करता येते एवढेच ). कंठातून ध्वनी हा ध्वनी लहरींच्या रुपात निघतो. त्या लहरींचे कंपन कानातल्या पडद्यावर पडुन आपणांस ऐकु येते, असे म्हणतात की प्रभु श्रीरामांच्या ॐकाराचे कंपनामुळे तर वृक्ष हालत असत. ह्या लहरी शरिरातील सप्त चक्रांवर आदळून त्या चक्राच्या अधिनस्थ अवयवांवर परिणाम करतात. म्हणुनच वाईट बातमी ऐकली तर हाता-पायातील शक्ती जाते, घाबरायला होते, बी पी वाढते वगैरे. विशिष्ट सिक्रेशन्स पाझरल्याने हे होते, याउलट आनंदाची बातमी कानावर आली तर आपण नाचायला लागतो. त्यामुळेच आपण सांभाळून, तोल राखुनच बोलायला हवे. अमेरिकनांच्या बाबतीत एक चांगली बाब सांगितल्या जाते ती ही, की ते संवादाची सुरवात चांगल्या गोष्टीनेच करतात. उदा: डॅाक्टर खुप चांगले आहे, उपचार चांगले चालले होते, पेशंटपण खुप चांगला प्रतिसाद देत होता पण पेशंटला ते वाचवू शकले नाहीत म्हणजे ऐकणार्यावर परिणाम हळुहळु होत जातो व धक्का बसत नाही. ध्वनीलहरी ह्या नुसत्या भौतीक कंपनात्मकच असतात असे नाही तर अदृष्य वैचारीक लहरी (wireless)सुध्दा दुरपर्यंत परिणाम करतात. आजकाल आपण “ॲान-लाईन पुजा “ नाही कां सांगत? ब्रम्हकुमारी च्या प्रसिध्द मेंटर बी के शिवानी ह्या तर याही पुढे जाऊन हे सांगतात की आपण कोणाबद्दल वाईट/दुषीत बोललो तर त्या लहरी संबंधितापाशी पोचतात( telepathy )व त्यांचा परिणाम संबंधितांवर नकारात्मक होतो. तसे झाल्याने त्याच्या न कळत त्याचा आपल्याविषयी ग्रह वाईट होतो व वागणुकीत तसा फरक दिसतो. हे असे चालु राहिले की संबंध आपोआपच दुरावतात. वैदिक शास्त्रात असे म्हणतात की सर्वत्र प्रत्येक स्थानाची अशी ‘स्थान देवता’ असते व प्रत्येक वास्तुमधे “ वास्तु देवता” असते. ह्या देवता सतत ‘तथास्तु ‘ म्हणत असतात, म्हणुनच नेहमी चांगलेच बोलायला हवे, वाईट तर कधीच नाही.

विद्येचे आराध्य दैवत असते ‘शारदा देवी ‘( सरस्वती ). विद्या म्हणजे ‘ज्ञान’ ज्यांत लिहीणे, वाचणे, मनन, वाणी ( म्हणजे वैखरीतुन बोलणे) व नृत्य सगळे आले, ओघाने येते गद्य (भाषण ) व पद्य (कविता व गायन ). आपण बोलतो ती झाली “वाचा”, व यांचे दैवत असते “वाचस्पती “. जसे वैभव, संपत्ती याचे दैवत झाले ‘लक्ष्मी’ पण पैसे( धन ) याचे दैवत असते “कुबेर”. तेव्हा सुमधुर वाचेसाठी आपण “वाचस्पती” ला नमन करुन सगळ्यांच्याच तोंडी गोड बोल असु दे म्हणुन प्रार्थना करु या ! वेदकाळात लिखाण नगण्य असे, महत्व होते पाठांतराला, कालांतराने लिखाण व वाक्चातुर्याला प्राधान्यता आली. अर्थपुर्ण शब्द संचयाला आपण वाक्य म्हणतो व व्यक्त होण्याकरता आवश्यक अशा वाक्यांनी बनतो संवाद, भाषण, वक्तृत्व. बोलण्याला कारक असते ती “वाक् शक्ती”. बोलणे हे एक प्रकारचे शस्त्र असते असे म्हणतात कारण बोलण्याने भरुन न येऊ शकणार्या जखमा होऊ शकतात, इतके वाक् शक्तीचे महत्व त्यामुळेच ऋग्वेदाने ‘वाक् शक्तीला देवतेचे ‘रूप दिले व तिची प्रार्थना केली. सारऱ्या कला व जगाचे चलनवलन तिच्यामुळेच घडते. वाक् ही दृष्ट्यांना ज्ञान देते, सर्व वेदांची ती जननी होय व सारे जगच तिच्यात सामावलेले आहे म्हणुन अथर्व वेदाने तर तिला जगन्माता च मानले आहे. पद्मपुराणात तिला दक्षाची मुलगी आणी गंधर्व व अप्त्सरांची जननी म्हटले आहे.

लहान असताना मुले गोड गोड आवाजात गोडच बोलतात व सगळ्यांना आपलेसे करून घेतात, मग एके काळी गोड बोलणारे आपण मोठे झाल्यावर एकदम तिखट, ओरडुन कां बरे बोलतो? आपल्या स्वभावानुसार प्रत्येकाचा बोलण्याचा एक सुर असतो. तिरसट, रागीट अशा सुरां मुळे समोरच्याचे मन दुखावते व त्याची प्रतिक्रिया म्हणुन तोपण तसेच बोलतो. यातुन चांगले काहीच निष्पन्न होत नाही. बोलताना आपण स्वत:ला समोरच्याच्या जागी ठेऊन पहावे. माणसामध्ये षड्रिपू म्हणजे सहा शत्रुंचे वास्तव्य असते. ते क्रमश: १ काम: कामवासना पुर्ण न होणे, २ क्रोध: मनाविरुध्द काही झाल्यास राग येणे, ३ लोभ: एखाद्या गोष्टींचा हव्यास पुर्ण न होणे, ४ मोह: अज्ञानामुळे क्षणभंगुर गोष्टीतले आकर्षणाची पुर्तता न होणे, ५ मद: वृथा अहंकार अभिमान आड येणे, ६ मत्सर: दुसर्याची प्रगती सहन न होणे, हे होत. हे शत्रु जेव्हा मनांतल्या प्रेमळ भावनांवर मात करतात तेव्हा आपले बोलणे तिरसट, उपहासात्मक, अलिप्ततेचे वा टोचुन बोलणारे होते. असे बोलण्यापेक्षा तर निर्वाच्च असणे बरे अर्थात ‘मौनं सर्वार्थ साधनम. ‘मौन व्रत आचरल्याने दुसर्यावरच नाही तर आपल्या स्वत: वर चांगला परिणाम होतो व मनशांती मिळते. विनोबा भावे, महात्मा गांधी, अण्णा हजारे इतकेच काय राजनितीचा प्रचंड बोझ सांभाळणारे पंतप्रधान मा. मोदी असे मौन पाळणारे सत् पुरूष उदाहरणादाखल आहेतच. रागावर नियंत्रण ठेवण्याकरता “ इदम् न मम “ म्हणजे माझे काही नाही, हा भाव सतत असु द्यायला हवा. हिंदी आरती ‘ओम जय जगदीश हरे ‘ मधे एक कडवे आहे “ तेरा तुझको अर्पण, क्या लागत मेरा ? म्हणजे सगळे तुझेच आहे, माझे काहीच नाही !“ आपल्या पुजे-अर्चनेनंतर आपण समर्पणाचा श्लोक म्हणतो, त्याचा भागवतां मध्ये पण उल्लेख आहे तो असा – –

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा।
बुध्दात्मना वा प्रकृतिस्वंभावात् ॥
करोमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणाति समर्पयामि ॥

भावार्थ हा की हे नारायणा, माझे शरीर, वाचा, मन, वचन, इंद्रिय, बुध्दि, आत्मा यांचे द्वारे जाणीवपुर्वक वा अजाणतेपणाने माझे हातुन जे काही होत आहे ते मी सर्व तुलाच अर्पण करतो ! आता देवाला कोणी वाईट गोष्ट देईल कां? नाही, म्हणजेच आपण जे काही करु ते सर्व दृष्ट्या उत्तमच असायला हवे. एकदा स्वत: चे स्वत: ला कळले की रागामुळे आपले बोलणे दुसर्याला दुखावणारे होते तर मग उपाय करता येऊ शकतो. मनांत सावकाश दहा मोजा किंवा घरी बॅाक्सिंगची पंचींग बॅग आणुन ठेवा व कधी राग आलाच तर बॅगवर फटके हाणुन आपला राग तिच्यावर काढुन टाका. सराव होइपर्यंत दुसर्या खोलीत जाऊन ‘ नालायक, बेअक्कल, मुर्ख वगैरे काय काय म्हणणार होतात ते ‘स्वगत’ म्हणा, जेणेकरुन त्या व्यक्तिला ऐकु येणार नाही. एकदा सराव झाला की स्वभावात आपोआप मृदुता येईल. ह्या सगळ्यांचा उद्देश हा की तुम्हाला न आवडणारी जशी काही परिस्थिती येईल ती स्पर्धात्मक मनोधारणेनी स्विकारायला शिकावे. ह्या तत्वा संबंधी एक गोष्ट आहे.

प्रसिध्द वैज्ञानिक थॅामस एडीसन यांच्या प्रयोग शाळेला एक दिवस अचानक आग लागली. सर्वकाही जळुन खाक झाले. ही बातमी त्यांना समजताच त्यांनी मुलाला बोलावले व त्याला त्याच्या आईला बोलावण्यास सांगितले. ती येतांच ते म्हणाले “बघ बघ एवढी मोठी आग तुला पुन्हा बघायला मिळणार नाही”. बायको व मुलगा आश्चर्यचकीत होतात की हे असे काय बोलताहेत. एडीसन म्हणाले “एक प्रकारे बरेंच झाले, माझ्या सर्व चुका व अपयश नष्ट होऊन गेले. ” वास्तविक एडीसन सुध्दा एवढे नुकसान बघुन हाय मोकलून शोक करू शकले असते, परंतु बायको संतापण्यापुर्वीच त्यांनी परिस्थितीतील गांभीर्याला थट्टेची कलाटणी दिली. जे व्हायला नको होते ते होऊन गेले होते म्हणुन परिस्थिती स्विकारण्याखेरीज गत्यंतर नव्हते. आता ही गोष्ट वेगळी की त्यांनी एके काळी मोटारगाड्यांचा प्रसिध्द उद्योजक फोर्ड यांना प्रोत्साहीत केले होते व त्यामुळे त्याला खुप यश मिळाले होते. आगीच्या घटने नंतर फोर्ड ने एडीसनला प्रयोगशाळा पुन्हा उभारण्यासांठी निर्व्याज आर्थिक मदत केली. एडीसन विद्युत प्रवाहांवर शोध करत होते व फोर्ड यांचे विद्युत आधारीत गाड्या बनवण्याचे स्वप्न साकारण्यात मदत होणार होती. तात्पर्य हे की आपल्याला परिस्थितीवर मात करुन सत्य स्वीकारतां आले पाहिजे.

गांभीर्याला सहजपणे स्विकारून मनांवर नियंत्रण मिळवण्याकरता खुप परिणामकारक अशी “झेन तत्वज्ञानावर “आधारीत फार पुरातन उपचार पध्दती हल्ली प्रचलनात येत आहे. साधारण ५०० वर्षे ईस्वी पुर्वी बौध्द पंथाचा उपपंथ म्हणुन’ झेन तत्वज्ञानाचा’ ‘चिंतन ’ साठी जपानी शब्द’ झेन्ना’ वरुन झेन) उदय झाला. दक्षीण भारतातील ब्राम्हण राजाचा मुलगा असुन बोधीधर्म ने एक भिक्षुक बनुन, तो चीन मध्ये बौध्द धर्मातील शिकवणुकींचा अभ्यास करण्या साठी गेला. शिकवणुकीने प्रभावीत होऊन त्याने ‘झेन संस्क्रृतीची’ चीन मध्ये स्थापना केली व जपानमध्ये प्रचार, प्रसार केला. त्या जीवनशैलीचे सार म्हणजे विद्यमान सत्य आणी वास्तव्याचा स्विकार करून चिंतेतुन मुक्तता करुन घेणे व आपल्या “दासबोधात” प्रतिपादिले आहे तसे आपण खरे कोण, जगात आपले ध्येय काय वगैरे मुलभुत विषयांवर आत्मज्ञान प्राप्ती साठी व आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी ध्यान चिंतन, मनन ह्याकडे सगळे चित्त लावणे.

आपल्यातील सुप्त षड्रिपूं वर मात करण्यासाठी जाणीवपुर्वक सकारात्मक बदल करणे ‘ गोडबोले ‘बनणे गरजेचे असते. डब केलेले काही उर्दु सिरियल बघुन मला असे वाटते की गोड बोलण्याच्या बाबतीत उर्दु खुपच मृदुभाषा आहे. लहान मुले काय, मोठी माणसं काय खुपच मिठ्ठास बोलतात इतकी की ‘वास्तवात सत्यता नाही ‘हे माहित नसले तर माणसाची फसवणुकच व्हायची. पाकिस्तानला लागुनचे राज्य म्हणुन असेल पण पंजाबी पण अशीच मृदु भाषा आहे, त्यामानाने आपण मराठी मौळी माणसं जरा रफ टफ किंवा जेवढ्यास तेवढे व स्पष्ट बोलतो. ( कोणी या माझ्या मताशी कदाचीत असहमत होतील. ) क्वचित प्रसंगी चांगले बोलणे जमत नसेल तर निदान एकदम बाणासारखे घांव करणार्या शब्दांऐवजी थोडेसे मृदु पर्यायी ( soft skill )शब्द वापरावे. माझ्या वाचण्यात कुठेतरी ते आले, ते असे-

नालायक ऐवजी कुचकामी,
मुर्ख व बावळट ऐवजी भाबडा,
आळशी व ऐतखाऊ ऐवजी जीवनशैली आरामदायी,
कृतघ्न/नमकहराम ऐवजी उपकाराची जाण नाही,
लबाड अन् भ्रष्टाचारी ऐवजी बिलंदर,
विश्वासघातकी ऐवजी बेभरवशाचा,
दारू पितो ऐवजी ड्रिंक्स घेतोस,
कपटी, कारस्थानी ऐवजी धुर्त,
मेंटल आहे ऐवजी पटकन भावनांच्या आहारी जातोस.

असे शब्दप्रयोग केल्यास वाईट प्रतिक्रिया दिली असे न वाटतां सकारात्मक प्रतिसाद दिला असे वाटेल व भावना बोचर्या न होता बोथट होतील. दुसरे महत्वाचे म्हणजे शब्दांइतकेच आपला “टोन”, आपली बॅाडी लॅंगवेज ( हविर्भाव )व बोलण्याचा सुर कसा असतो हे ही तितकेच महत्वाचे असते.

कधी कधी तर न बोलता, न सांगता पण भावना पोचतात. वसंत प्रभू व पी सावळाराम यांनी काव्यबध्द केलेल्या, लता मंगेशकर यांनी गायलेल्या या भावगीतातच बघा —

प्रेम तुझ्यावर करिते मी रे ।
सांगितल्याविण ओळख तू रे॥

मग गोडबोल्यांच्या भावना कां नाही समोरच्या पाशी पोचणार ?

— सतिश परांजपे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..