नवीन लेखन...

समंजस (मंगळ) सूत्र

ना ना, मला पंचवीस हजार रुपये द्या. शारदा या सुनेनं नाना या सासऱ्यांच्या जवळ सहजपणे मागणी केली.

पंचवीस हजार? कशासाठी? नानांना बसलेला आश्चर्याचा प्रचंड धक्का त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटला.

शारदा, सून म्हणून या घरात आल्यापासून गेले कित्येक महिने, एक तारखेला आपल्या पगाराचा पंचावन्न हजारांचा चेक नानांच्या हातावर ठेवत होती. तेव्हा नानांना किरकोळ धक्काही जाणवला नव्हता.

नाना, मी मंगळसूत्र विकत घेतलं आहे. पूर्ण सोन्याचं वगैरे नाही, पण देखणं आहे. मला आवडलं म्हणून घेतलं.

नाना म्हणाले, ‘नशीब माझं. आवडला म्हणून तू राजवाडा विकत आणला नाहीस! शारदा, तू मंगळसूत्र परत कर. माझ्या बजेटमध्ये दागिना बसत नाही.’

शारदा बरं म्हणाली. तिनं विषय वाढवला नाही. पण असा संवाद पुन्हा घडू द्यायचा नाही हे तिनं ठरवलं.

विवाहानंतर, शरदनं पत्नीला सांगितलं होतं, ‘शारदा, घरातील आर्थिक व इतर व्यवहार नानाच पाहतात. त्यांचं व माझं संयुक्त खातं आहे. तसंच ते, त्यांचं व तुझं खातं उघडतील. नानांना पैसे गुंतवणुकीतील ज्ञान आहे. शेअर, म्युच्युअल फंड याबाबत त्यांचा अभ्यास आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. पैशाचे व्यवहार पाहणं हा त्यांचा विरंगुळा आहे. तुला पैसे लागले की तू माग. ते देतील. आईच्या माघारी स्वयंपाकीण काकूंच्या मदतीनं घरही तेच सांभाळतात.’

सासऱ्यांचा स्वभाव, त्यांचे छंद-नाद याविषयी शारदाला लग्नाआधी काहीही माहिती नव्हती. ती तिच्या ऑफिसात येणाऱ्या शरद या इंजिनिअर-बिल्डर क्लायंटच्या प्रेमात पडली. ती स्वतः आर्किटेक्ट, इंटिरिअर डेकोरेटर म्हणून नोकरी करत होती.

सासूबाई हयात नाहीत, प्रकृतीच्या कारणास्तव सासऱ्यांनी रेल्वेच्या नोकरीतून निवृत्ती घेतली आहे, घाटकोपरला त्यांचा हाऊसिंग सोसायटीत चार खोल्यांचा ब्लॉक आहे. एवढी माहिती शारदा व तिच्या घरच्यांना पुरेशी वाटली होती. शरदची कामं व त्याची ऑफिसमार्फत दिली जाणारी बिलं ती पाहतच होती.

विवाह होऊन आल्यावर, नानांच्या काही बाबी तिला खटकल्या. कन्येनं ज्या प्रेमानं व अधिकारानं पित्याला सांगितलं असतं त्या प्रेमानं शारदा बोलली होती.

‘नाना, तुमचं रायटिंग टेबल खोलीच्या दारापासून मी हलवलं आहे व रस्त्याच्या बाजूच्या खिडकीजवळ, टोकाला ठेवलं आहे. तुमच्या खोलीत येणाऱ्याला तुमची व तुमच्या टेबलाची अडचण व्हायची. खोली लहान झाली आहे असं त्या टेबलामुळं वाटायचं. नाना, मी इंटिरिअर डेकोरेटर आहे. मला कळतं.

शारदानं खोलीतील नानांची कॉट, खुर्च्या यांची मांडणी बदलली, लाकडी अवजड टीपॉय खोलीबाहेर काढलं व दोन आटोपशीर, प्लॅस्टिकची टीपॉय आणली. कॉटवर कॉयरची गादी घातली.

नाना म्हणाले, ‘माझ्या रेल्वेच्या पेन्शनीत हा खर्च बसत नाही.’

शारदा उत्तरली, ‘पण नाना, तुमच्या सुनेच्या पगारात बसतो.’

नानांच्या चेहऱ्यावर खुषी पसरली.

नाना सारखे खोकतात त्याचं एक कारण त्यांच्या सततच्या विडी ओढण्यात आहे असा अंदाज शारदानं बांधला. वळलेल्या विड्यांचं स्वस्त बंडल नाना आणतात आणि विडीमागून विडी पेटवत राहतात व खोकत असतात.

मधून मधून पत्र्याच्या डब्यात थुंकतात. विड्यांचा उग्र दर्प नानांची खोली व्यापून घरभर पसरतो. नानांची विडी आपण कशी काय बंद करणार? आपल्याला तसा अधिकार काय? शारदानं उंची, सुगंधी, फिल्टर लावलेल्या, आरोग्याला कमी धोकादायक सिगरेटच्या पाकिटांचा कार्टन विकत घेतला व तो नानांच्या पुढ्यात ठेवला. नानांचे डोळे पेटलेल्या विडीप्रमाणे आनंदानं चमकले! शारदा म्हणाली, ‘नाना, मला ऑफिसात बोनस मिळाला. फार नाही, फक्त दहा हजार. तुमच्याकरिता मी सिगरेटची पाकिटं आणली आहेत. यापुढं विडी बंद.’

नानांनी उंची सिगरेटच्या पाकिटांचा ढीग तृप्त नजरेनं पुन्हा पुन्हा पाहिला. रेल्वेत असताना, कामगारांच्या संगतीत, नानांना विडीनं पकडलं होतं. नानांना सिगरेटकडं पहावं असं वाटे. पण आपल्याला ही श्रीमंती चैन परवडणार नाही हे नाना ओळखून होते. सिगरेटचं पाकीट हातात नाचवत नाना म्हणाले, ‘बाप रे! एवढी पाकिटं? माझ्यासाठी?’

‘नाना, विड्या बंद झाल्यावर तुमचा खोकलाही कमी होईल. हा खर्च फार नाही. तुमच्या पेन्शनमध्ये बसत नसेल, पण तुमच्या सुनेच्या पगारात सहज बसतो. मला माझे नाना आनंदात रहायला हवेत.’

नाना म्हणाले होते, ‘शारदा, मी भाग्यवान सासरा आहे.’

या पार्श्वभूमीवर, नानांनी आपल्याला मंगळसूत्र परत करायला सांगितलं. हे शारदाला चांगलंच खटकलं. पण शारदा काय करणार? ती दुसरे दिवशी भवनानी ज्वेलर्सच्या दुकानात गेली. तिनं भवनानींच्या पुढ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्र खरेदीची पावती व एक हजार रुपये ठेवले. भवनानींना काही समजलं नाही. शारदानं तोंड उघडलं, ‘हे माझं व्हिजिटिंग कार्ड. काल मी एक दिलं होतं. कालचं कार्ड आपल्या काऊंटरच्या काचेखाली आहे.’

‘मी शारदा वाकनीस. मी शहा असोसिएटसकडे नोकरी करते. काल मी आपल्याकडून मंगळसूत्र विकत घेतलं. उधारीवर, एक रुपयाही न देता. माझ्याकडच्या पावतीवर पैसे येणे आहेत अशा प्रकारची नोंद आहे. आमच्या कंपनीशी बोला हवं तर!’ असं मी म्हणाले होते.

‘काही गरज नाही. खुद्द शहाच आमचे क्लायंट आहेत’, असं आपण म्हणाला होता.

‘काल माझ्याकडं पैसे नव्हते, आपल्याकडं हा एकच नग होता. काल मी मंगळसूत्र उधारीवर घेतलं कारण हे मंगळसूत्र दुसरी कोणीतरी विकत घेईल या भीतीपोटी. मी आज पैसे आणून देते असा शब्द दिला होता. आपण माझ्यावर विश्वास ठेवलात.’

भवनानी उत्सुकतेनं ऐकत होते. ही तरुण स्त्री उधारीवर नेलेलं मंगळसूत्र परत करून, वरती एक हजार रुपये का देते आहे हे जाणण्याची उत्सुकता भवनानींना होती. शारदा सांगू लागली. ‘पण माझा अंदाज चुकला. मी पैशाची व्यवस्था करू शकले नाही. पंधरा दिवसांनी माझा पगार होईल. मी पैसे आणून देईन व मंगळसूत्र घेऊन जाईन. तोपर्यंत मंगळसूत्र माझं म्हणून राखून ठेवण्यासाठी, दुसऱ्या कोणाला न विकण्यासाठी मी हजार रुपये देते आहे. हे हजार रुपये मला परत नकोत. दंड समजा हवं तर. माझ्या पावतीवर तशी नोंद करून पावती मला द्या.’

भवनानी हसत म्हणाले, ‘मॅडम, तुमचे शहासाहेब माझे मोठे क्लायंट आहेतच, यापुढं तुम्हीही माझ्या मोठ्याच क्लायंट आहात! मला चांगला क्लायंट ओळखता येतो. आपण मंगळसूत्र व आपले हजार रुपये घेऊन जा. पगार झाल्यावर मला पैसे द्या. आज ठरल्याप्रमाणे आपण आलात व शब्दांनी सर्व व्यवहार सांभाळलात! मला आपलं कौतुक वाटतं.’

एक तारीख आली. पगार झाला. शारदानं ऑफिसजवळच्या बँकेत खातं उघडलं. पूर्ण पगार आपल्या नव्या खात्यात जमा केला. नव्या खात्यावरचा पहिला बेअरर चेक भवनानी ज्वेलर्सच्या नावे काढला.

दोन दिवसांचा लांबलचक संयम संपल्यावर, नानांनी विचारलं, ‘शारदा, तुझा पगार अद्याप झाला नाही का पगाराचा चेक मला द्यायला तू विसरलीस?’

शारदाच्या गळ्यात मंगळसूत्र भवनानी ज्वेलर्सचा चेक काढल्यानंतरच, होतं. शारदानं गळ्यात घालण्यासाठी ते बाहेर काढलं होतं. शारदा नानांना म्हणाली, ‘आमच्या फर्मनं जवळच्या बँकेत खातं उघडणं कंपल्सरी केलं आहे. पगाराचा चेक हातात न देता, फर्म पगार थेट खात्यातच भरते. तसा तो भरला आहे. नाना, सिगरेटची पाकिटं संपत आली की मला कळेलच. मी नवा कार्टन आणून देईन. माझ्या पगारात तो बसतो.’

नाना हे सासरे आहेत, वडीलधारे आहेत, त्यांचं सिगरेटचं व्यसन हे आपल्या वडिलांचंच व्यसन हे शारदा ही समंजस ‘सून’ विसरली नव्हती. सून ही आपली कन्याच आहे हे नाना ‘सासरे’ विसरले होते. नाना वयस्कर आहेत. पुढच्या वयात स्मरणशक्ती अधू होते म्हणे! शारदानं तेही समजून घेतलं होतं.

– भा. ल. महाबळ

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..