नवीन लेखन...

गुलामांचं बेट

सन १८४० ते १८७० या सुमारे तीन दशकांच्या काळात, मुक्त केलेले एकूण सुमारे सत्तावीस हजार गुलाम सेंट हेलेना बेटावर पाठवले गेल्याचं उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येतं. या सर्वांची, तिथल्या रुपर्ट्स व्हॅली या ठिकाणी उभारलेल्या, तात्पुरत्या वसाहतींत काही काळासाठी व्यवस्था केली जात असे. कालांतरानं यांतील बहुतेकांना कॅरिबिअन बेटं, दक्षिण आफ्रिका, अशा ब्रिटिश वसाहती असलेल्या विविध ठिकाणी पाठवलं जायचं. परंतु, या मुक्त केलेल्या गुलामांना जेव्हा प्रथम सेंट हेलेना बेटावर आणलं जायचं, तेव्हा त्या बहुतेकांची शारीरिक स्थिती अत्यंत वाईट झालेली असायची. त्यामुळे इथे तात्पुरत्या वास्तव्याला आलेल्या या लोकांपैकी, सुमारे आठ हजार लोकांचा अल्पकाळातच विविध रोगांमुळे आणि कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. मृत्यू पावलेल्या या लोकांचं रुपर्ट्स व्हॅलीमध्येच दफन केलं गेलं. त्यानंतरचा दीड शतकांहून अधिक काळ, पूर्णपणे विस्मरणात गेलेल्या या मृत लोकांचा सन २००७-०८ या काळात अचानक शोध लागला. या बेटावर बांधण्यात येणाऱ्या विमानतळाकडे जाण्यासाठी, रुपर्ट्स व्हॅलीतून रस्ता तयार केला जात होता. या रस्त्यासाठी केल्या जात असलेल्या खोदकामादरम्यान, तिथे दोन जुन्या स्मशानभूमी अस्तित्वात असल्याचं आढळलं. या स्मशानभूमींमध्ये १७८ खड्ड्यांत पुरलेल्या, एकूण ३२५ व्यक्तींचे अवशेष सापडले. यांतील काही व्यक्तींची शवं ही शवपेट्यांत ठेवून पुरली होती, तर काही शवं शवपेट्यांशिवाय पुरली होती. हे अवशेष, एकोणिसाव्या शतकात इथे तात्पुरत्या वास्तव्याला असलेल्या, गुलामगिरीतून मुक्त केल्या गेलेल्या व्यक्तींचे असल्याचं स्पष्ट झालं.

सेंट हेलेना येथे पाठवले गेलेले हे गुलाम मुख्यतः पश्चिम आफ्रिकेतून आणले गेले असल्याचं, उपलब्ध कागदपत्रांवरून दिसत होतं. मात्र हे गुलाम नक्की कोणत्या देशांतून आणले गेले असावेत, याबद्दल आतापर्यंत निश्चित स्वरूपाची माहिती उपलब्ध नव्हती. या लोकांचे अवशेष मिळाल्यानं, या लोकांचे मूळ देश कळण्याची शक्यता आता निर्माण झाली. या लोकांचं, त्यांच्या अवशेषांद्वारे मूळ शोधण्याच्या दृष्टीनं, सेंट हेलेना बेटावर आज वास्तव्याला असलेल्या लोकांशी चर्चा केली गेली. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. कारण, गुलामगिरीतून मुक्त झालेले काही लोक तेव्हा याच बेटावर स्थायिक झाले आणि या स्थायिक झालेल्या लोकांचे काही वंशज आजही तिथे राहत आहेत. तिथेच राहत असलेल्या या लोकांना आपल्या मूळ देशाबद्दल उत्सुकता असणं, हे स्वाभाविक आहे. या अवशेषांचं जनुकीय विश्लेषण केल्यास, त्यावरून मुक्त केले गेलेले गुलाम हे कोणकोणत्या देशांतले होते, याची कल्पना तर येणार होतीच; परंतु त्याचबरोबर माणुसकीला लांच्छन ठरणाऱ्या, गुलामांच्या या व्यापारावरही प्रकाश टाकला जाणार होता. डेनमार्कमधील कोपेनहॅगेन विद्यापीठातील मार्सेला सँडोव्हाल-व्हेलास्को आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संशोधनात सहभागी होऊन, या अवशेषांचं तपशीलवार जनुकीय विश्लेषण केलं. या विश्लेषणावरून काढले गेलेले निष्कर्ष ‘दी अमेरिकन जर्नल ऑफ ह्युमन जेनिटिक्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत.

मार्सेला सँडोव्हाल-व्हेलास्को आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संशोधनासाठी एकूण ६३ शवांच्या अवशेषांची निवड केली. यांत ३२ पुरुष आणि १६ स्त्रियांचा समावेश होता. उर्वरित १५ जण हे किशोरवयीन होते. रुपर्ट्स व्हॅलीत सापडलेल्या या सर्व शवांना कालांतरानं सन्मानानं पुनः पुरायचं होतं. साहजिकच या शवांचं नुकसान कमीत कमी होणं, हे अपेक्षित होतं. त्यामुळे या संशोधनासाठी, या प्रत्येक व्यक्तीचा फक्त एक दात काढून घेण्यात आला. त्यानंतर कोपेनहॅगन विद्यापीठातील प्रयोगशाळेत, या प्रत्येक दाताच्या मुळाचा एक अगदी छोटासा नमुना काढून त्याचं जनुकीय विश्लेषण केलं गेलं. या विश्लेषणात, संशोधकांनी प्रथम प्रत्येक नमुन्यातील डीएनए रेणू वेगळे केले आणि त्यानंतर या डीएनए रेणूंची रचना अभ्यासली. या अभ्यासातून मिळालेल्या माहितीची त्यानंतर या संशोधकांनी, जगभरच्या (आजच्या) विविध वंशांच्या लोकांच्या जनुकीय माहितीशी तुलना केली. यांत आफ्रिकेतल्या वेगवेगळ्या सव्वाशे ठिकाणच्या, सुमारे चार हजारांहून अधिक व्यक्तींच्या जनुकीय माहितीचा समावेश होता. या जनुकीय तुलनेवरून, मुक्त केलेले हे गुलाम मुख्यतः मध्य-पश्चिम आफ्रिकेतल्या, अँगोला आणि गॅबॉन या देशांच्या परिसरातून आले असल्याचं, स्पष्ट झालं.

मार्सेला सँडोव्हाल-व्हेलास्को आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन आतापर्यंतच्या उपलब्ध माहितीला पूरक ठरलं आहे. एकोणिसाव्या शतकात, मध्य आफ्रिकेतील व्यापाराचं केंद्र हे अँगोलाच्या मध्यभागातून, अँगोलाच्या उत्तर भागाकडे म्हणजे गॅबॉनच्या दिशेनं सरकलं होतं. किंबहुना या काळात, उत्तर अँगोलातून होणाऱ्या व्यापाराचं प्रमाण, इथल्या इतर भागांतून होणाऱ्या व्यापाराच्या तुलनेत कितीतरी पट मोठं होतं. साहजिकच या काळातला गुलामांचा व्यापार हा, मुख्यतः उत्तर अँगोलातून झाला असण्याच्या शक्यतेला या संशोधनानं दुजोरा दिला आहे. सेंट हेलेना बेटावर आणले गेलेले हे गुलाम, ‘बांटू’ या एकत्रित नावानं ओळखल्या जाणाऱ्या वंशांतल्या, वेगवेगळ्या जमातींतून आले असून ते वेगवेगळ्या भाषा बोलत असल्याचं, पूर्वी उपलब्ध झालेली माहिती दर्शवते. मार्सेला सँडोव्हाल-व्हेलास्को आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधनसुद्धा, हे गुलाम बांटू गटातले असण्याची शक्यता व्यक्त करतं. अमेरिकेत गुलाम म्हणून नेल्या गेलेल्या आफ्रिकन लोकांत पुरुषांचं प्रमाण दोन-तृतीयांश इतकं मोठं असल्याचं, इतर नोंदींवरून दिसून येतं. रुपर्ट्स व्हॅलीत सापडलेल्या एकूण सव्वातीनशे शवांपैकी ऐंशी टक्क्यांहून अधिक शवं हीसुद्धा पुरुषांचीच होती. या गुलामांकडून प्रचंड श्रमाची कामं करून घेतली जाणं, अपेक्षित होतं.

आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांवर लादलेली ही गुलामगिरी म्हणजे जागतिक इतिहासातली काळी पानं आहेत. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका हे खंड या काळ्या इतिहासानं एकमेकांना जोडले गेले आहेत. दक्षिण आणि उत्तर अमेरिकेत हाल-अपेष्टांचं जीवन जगायला भाग पाडल्या गेलेल्या या कृष्णवर्णीय गुलामांचा, आफ्रिकेशी असलेला मूळचा संबंध हा अर्थातच ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. मार्सेला सँडोव्हाल-व्हेलास्को आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन म्हणजे एका अर्थी, या सर्व काळ्या इतिहासाचाच घेतला जात असलेला शोध आहे. आणि या शोधात सेंट हेलेना हे बेट अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..