नवीन लेखन...

शालेय अभ्यासक्रमात स्वदेशी

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला प्रा. गणेश राऊत यांचा लेख


आपण सर्वच क्षेत्रात स्वदेशीचा विचार करीत आहोत. इतिहासाचे क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. इतिहासाच्या क्षेत्रात आपण स्वदेशीचा विचार कसा करणार असा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील इतिहास लेखनाचे शास्त्रशुद्ध प्रयत्न अलिकडच्या काळातील आहेत. पुराणे, रामायण, महाभारत यांमधून इतिहास गाळून घ्यावा लागतो. प्राचीन कालखंडाचा शेवट आणि मध्ययुगाची सुरुवात या सीमारेषेवर कल्हण यांचा ‘राजतरंगिणी’ ग्रंथ महत्त्वाचा आहे. या ग्रंथामधून आपणांस काश्मीरच्या राजघराण्यातील संगतवार इतिहास सापडतो. त्याच्या आगेमागे आपणांस असा शास्त्रशुद्ध इतिहास शोधावा लागतो.

इतिहास हा शब्द ‘इति+ह+आस’ असा तयार झालेला आहे. याचा अर्थ ‘असे घडले’ असा आहे. भूतकाळात होऊन गेलेल्या विविध घटनांची सूत्रबद्ध व संगतवार मांडणी म्हणजे इतिहास. याचा अर्थ असा नव्हे की, भूतकाळात घडलेली प्रत्येक घटना ही इतिहासाचा भाग होय. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. घडून गेलेल्या घटनांचे तर्कशुद्ध, विवेकनिष्ठ विवेचन, विश्लेषण व परिशीलन म्हणजे इतिहास होय. हे परिशीलन प्रत्येक इतिहासकार स्वतःच्या दृष्टिकोनातून करत असतो. हा दृष्टिकोन त्या इतिहासकाराचा स्वतःचा असू शकतो. प्रत्येक कालखंडातील लोक स्थलकालपरत्वे आणि जीवनविकासाच्या प्रक्रियेत बदलत जाणाऱ्या जाणिवांच्या अनुरोधाने इतिहासाचे अवलोकन करतात. त्यामुळे इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद आहे असे म्हणतात. समाजजीवनाची उद्दिष्टे बदलली, तंत्रज्ञान बदलले व त्या अनुषंगाने आर्थिक परिमाणे बदलली, राजकीय व सामाजिक मूल्यव्यवस्था बदलली की, इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. घटना त्याच असल्या तरी त्या समजावून घेण्याचे संदर्भ बदलतात. याचा अर्थ इतिहास समजून घेण्याची आपली (वाचणाऱ्याची) जाणीव व भूमिका बदलते.

आपला वर्तमानकाळ कल्याणकारी करण्यासाठी इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते, कारण ‘घडलेला इतिहास’ आणि ‘लिहिलेला इतिहास’ या दोन्हीमध्ये फरक असतो. यामुळेच इतिहासाची सार्वत्रिक आणि सार्वकालिक मान्य होणारी व्याख्या करणे अवघड असते. मान्यतेच्या जवळ जाणारी व्याख्या करायची झाल्यास, ‘इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या मानवीदृष्ट्या महत्त्वाच्या घटनांचे क्रमवार, सुसंगत वर्णन, विश्लेषण, त्यांची कारणे, परिणाम व या सगळ्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न’ अशीही करता येऊ शकेल.

इतिहासाच्या रचनेत साधने महत्त्वाची भूमिका बजावतात. शिलालेख, इमारती, स्थापत्य, मानवी सांगाडे, चलन, दैनंदिन वापरातील गोष्टी, शस्त्रास्त्रे, अवजारे, वाहतुकीची साधने, धातूंच्या वस्तू, वजनमापे इत्यादी गोष्टींना इतिहासकार बोलते करतो. जुन्या गोष्टींवर प्रकाश टाकून नवा अर्थ शोधणे या पद्धतीने इतिहासकार आपल्या साधनांची मांडणी करतात.

आतापर्यंत आपण इतिहासाची तात्त्विक वा शास्त्रीय पद्धतीने चर्चा केली. शास्त्रशुद्ध पद्धती वापरून आपणांस ‘स्वदेशी’ इतिहास लिहिता येईल का? त्यास ‘स्वदेशी’चे आंगडे-टोपडे घालता येईल का? याचा विचार होणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने पाहता अशा प्रकारचे अनेक प्रयोग करण्यास जागा आहे असे मानता येईल. आपल्याकडे महाराष्ट्र पातळीवर इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंत इतिहास हा विषय अभ्यासक्रमात आहे.

इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंत स्वदेशी अभ्यास आणायचा कसा, हाच कळीचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात विद्यार्थी दहावीपर्यंत प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत असा अभ्यास करतात. गेल्या काही वर्षात विद्यार्थी इ.स. २००० पर्यंतचा इतिहास शिकत आहेत. या इतिहासात ‘स्थानिक इतिहास’ हा एक महत्त्वाचा घटक विद्यार्थी अभ्यासतात. इयत्ता चौथीचे विद्यार्थी ‘शिवछत्रपती’ या भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घडामोडी अभ्यासात असून, गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रातील हे एक अत्यंत विद्यार्थीप्रिय पुस्तक आहे. मुलांना त्यात गोष्टीरूपाने शिवचरित्र समजते. शिक्षक अनेक चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवू शकतात. स्थानिक इतिहासाला प्राधान्य देणारे असे हे पुस्तक आहे.

हेच तर्कशास्त्र इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वापरावे लागणार आहे. ‘प्राचीन-मध्ययुगीन-आधुनिक’ अशा इतिहासाच्या कालखंड त्रयीत ‘महाराष्ट्र’ कितीसा अभ्यासक्रमात येतो आणि उद्याचा एक भारतीय नागरिक म्हणून विद्यार्थी संपूर्ण भारताचा कितीसा अभ्यास करतात? एकच उदाहरण घेऊया की १९४२ ची ‘छोडो भारत’ चळवळ भारतातील सध्या अस्तित्वात असणाऱ्या सर्व राज्यांमध्ये कशी पसरली होती. भारतातील ब्रिटिशांच्या काळातील सशस्त्र क्रांतिकारक चळवळ सर्व राज्यांना सामावून घेणारी आहे का? हे तपासायचे असल्यास आणि ते अभ्यासक्रमात आणायचे असल्यास काय करावे लागेल? १५ ऑगस्ट १९४७ हा आपला स्वातंत्र्य दिन सर्व राज्यांमध्ये कसा साजरा झाला? असे काही समान घटक आपणांस पाठ्यपुस्तकातून आणता येतील का?

केवळ इतिहासच विषय नाही तर पाठ्यक्रमातील इतर विषयांतूनही आपण आपल्या देशाचा, संस्कृतीचा समावेश करणार आहोत का? इंग्रजी साहित्यिक महान आहेतच. शेक्सपीयर, विल्यम वर्डसवर्थ यांचे साहित्य आपण अभ्यासतो, पण रवींद्रनाथांच्या इंग्रजी कथा, अमृता प्रीतम यांच्या अनुवादित कविता, चेतन भगत यांच्या कथा, यांना कितपत स्थान देतो. आपली संस्कृती, आपले ज्ञान-विज्ञान, आपले संशोधन विद्यार्थ्यांना बालवयापासून त्यांच्या मनात रुजवणं गरजेचं आहे. गणितातील शोध असतील, सायन्समधील शोध असतील त्याची मूळ जननी आपला देश गरजेचं आहे.

स्वदेशी ही भावना शालेय जीवनापासूनच मुलांच्या मनात रुजवली तरच ही विचार चळवळ यशस्वी होईल. या अनुषंगाने अनेक पाठ नव्याने लिहिता येतील प्राचीन – मध्ययुगीन – आधुनिक भारत नव्याने लिहिता येईल. ‘माहिती जुनी, दृष्टिकोन नवा’ अंगीकारता येईल. या दृष्टीने विचारमंथन करता येईल. ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर | सुंदर लेणी त्यात खोदू ।’ हा आशावाद खरा ठरवता येऊ शकेल.

(पुणे विद्यापीठात इतिहास विभाग प्रमुख. महाराष्ट शासनाच्या बालभारती बोर्डाचे सदस्य. शालेय पाठ्यक्रम निवड सल्लागार आणि निर्मिती सहयोग. पुणे विद्यापीठाच्या मास्टर ऑफ जर्नालिजमचे संशोधन गाईड. १५०० हून अधिक विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. डायमंड आणि ब्लु बर्ड प्रकाशनाचे संपादक. दत्तक गावांचा इतिहास या दोन खंडातील पुस्तकाचे संपादन आणि लेखन.)

प्रा. गणेश राऊत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..