नवीन लेखन...

संघर्ष

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील शुभम देशमुख यांची ही पूर्वप्रकाशित कथा


‘” आता आठ वाजले आहेत. विजय, सगळी मशिनरी आणि माणसं घेऊन तू निघ आता.”
“जी मालक.””
“आणि हो, लक्षात ठेव, जंगलातील फक्त मोठमोठी आणि जुनी झाडं कापायची, म्हणजे बक्कळ लाकूडफाटा एकाच ठिकाणी मिळतो. ‘ “जी मालक. चला रे! सगळ्यांनी गाडीत बसा.
सगळे कामगार गाड्या आणि मशिनरी घेऊन शहराच्या जवळ असणाऱ्या जंगलाकडे जाणाऱ्या वाटेने निघून गेले. दुर्गेशही आपल्या बंगल्यात परतला.
दुर्गेश लाकडांचा एक तस्कर होता. शहराच्या स्ट्रीट लाइट्सच्या पिवळ्या प्रकाशापासून दूर, एका टेकडीमागे, थोड्या सुनसान जागेत दुर्गेशचा बंगला होता. रात्रीचा एक वाजून गेला होता. दुर्गेश आपल्या रूममध्ये गाढ झोपला होता. तेवढ्यात शेजारच्या टेबलावरील फोन खणाणला. त्याने डोळे चोळत एकदा घड्याळाकडे पाहिले. त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याने फोन उचलला.
“हॅलो! मालक, झाडांनी आमच्यावर हल्ला केलाय!”
“अरे विज्या! थोडंस तूही झोपून घे. स्वप्न पाहत असशील.” दुर्गेश जांभई देत म्हणाला.
“नाही मालक, मी खरं बोलतोय! आम्ही वड कापत होतो आणि आ… आ… वाचवा… वाचवा!” आणि फोन कट झाला. दुर्गेश वेड्यासारखा पाहतच राहिला. सकाळी पेपरमध्ये बातमी आली

‘चंद्रपूरच्या जंगलात वृक्षतोडीची मशिनरी व अज्ञात माणसांचे मृतदेह आढळले. मशिनरी पोलिसांकडून जप्त, तर मृतांच्या नातेवाइकांचा शोध सुरू. ‘

हळूहळू त्यांच्या नातेवाइकांचा शोध लागला. “तो कोणा अज्ञात माणसाकडे रात्रपाळीचं काम करायचा व सकाळी येताना पैसे घेऊन यायचा, ” एवढेच त्यांना सांगता आले. पुढे पोलिसांना एका विजय मोरे नावाच्या माणसाच्या मृतदेहाजवळ मोबाइल सापडला. त्या मोबाइलवरून त्यांनी दुर्गेशचा ठावठिकाणा मिळवला. काही दिवसांनी त्यांनी दुर्गेशच्या बंगल्यावर छापा टाकला व त्याची सर्व इस्टेट आणि काळे धन जप्त केले. त्यालाही तुरुंगात टाकले. एवढ्या घडामोडी घडून गेल्या, पण कामगारांची हत्या करणारा मात्र काही सापडला नाही.

भिवा आज तणतणतच घरी आला. आज त्याने तोडलेल्या लाकडाला व्यापाऱ्याने चांगला भाव दिला नव्हता. घरी आल्याआल्या त्याने बाजेवर अंग टाकले व मनातल्यामनात तो धुमसत राहिला. तेवढ्यात, त्याची बायको लता घरी आली.
‘कुठं हिंडायला गेली व्हतीस गं लते?”
“काय नाय, हितच आक्केकडे गेली व्हती.
“बरं बरं च्या टाक पयले.” भिवा थोड्या घुश्श्यातच म्हणाला. आता कायचा चाहा, जेवनच करा आता.” भिवालाही तिचे टले; कारण त्यालाही उद्या सकाळी लवकर उठून लाकडे तोडायला जायचे होते. तो रात्री जेवून झोपला व सकाळी लवकर उठला. उठल्यानंतर त्याने लवकर आवरले व तो जंगलात जायला निघाला.
“आवो, आज लवकर या बरं का!”
“ठीक हाय. तू हिंडायला जाऊ नको म्हंजे झालं.”
भिवा कुऱ्हाड व मोळी बांधायला दोरी घेऊन निघाला. जंगलाच्या मधोमध आल्यावर त्याने एक बऱ्यापैकी मोठे झाड निवडले व त्याच्या फांद्या छाटायला सुरुवात केली. काही फांद्या छाटून झाल्यावर तो खाली उतरला. त्याने फांद्यांचे अनावश्यक भाग काढायला सुरुवात केली. भिवाची लाकडांची मोळीही बांधून झाली होती. तेवढ्यात, त्याच्यामागून एक भक्कम दोर सापासारखा वळवळत आला व त्याचा गळा आवळू लागला.
त्या वेळी तिथून शिवा चालला होता. शिवा चालला होता म्हणण्यापेक्षा, शिवा झोकांड्या खात चालला होता हे म्हणणे जास्त सयुक्तिक राहील. कारण, त्याने रात्री भरपूर दारू ढोसली होती. म्हणूनच एवढ्या निर्जन जंगलातून जाण्याची त्याची हिम्मत झाली होती. त्याने भिवाचे ते दृश्य पाहिले व तो डोळे चोळू लागला. त्याने ते वळवळणाऱ्या वेलींचे दृश्य पाहिले व “भू… भू… भूत… भूत!!” असे ओरडत तो गावाकडे पळाला. आत्तापर्यंत झिंगलेली त्याची नजर मृत्यूचे दर्शन घेताच खाडकन स्वच्छ झाली. आत्तापर्यंत न आठवणारा रस्ता त्याला पूर्ण आठवू लागला. पळताना गावाच्या वेशीवरच्या पारापर्यंत पोहोचेस्तो त्याने मागेही वळून पाहिले नाही. तो धापा टाकतच वेशीवर पोहोचला. तो पोहोचल्यावर काही जण त्याच्याभोवती जमले.

‘अरे, एवढ्या जोरात का पळत आलास?
““काय झालं रे शिवा? भूत- बीत पाहिलंस का काय?”
“व्हय! त्या भिवाला भुतानं पछाडलंय.”
तेव्हा त्याने पाहिलेली घटना गावकऱ्यांना सांगितली. तेव्हा सर्व गावकऱ्यांनी एकत्र चर्चा केली व सर्वांनी सोबत जाऊन भिवाला सोडवून आणायचे ठरवले. सर्व गावकरी घाबरतघाबरत, जंगलात एकत्र जाऊ लागले. जेव्हा ते जंगलात थोड्या आतल्या भागात पोहोचले, त्या वेळेस त्यांना एक माणूस जमिनीवर पडलेला दिसला. बऱ्याच जणांनी तिथे जायचे धाडस केले नाही, पण काही धाडसी लोक पुढे गेले, तेव्हा त्यांना भिवा जमिनीवर पडलेला दिसला. काही जण त्याला हलवून जागे करायचा प्रयत्न करू लागले. मागे असलेल्या गावकऱ्यांपैकी एक जण ओरडून सांगू लागला, “अरे, त्याला उचलून गावातल्या डागदराकडे नेऊ.” “व्हय व्हय, आणा त्याला उचलून.” गावच्या सरपंचांनीही त्याच्या म्हणण्याला अनुमोदन दिले. भिवाला लोकांनी उचलून सरकारी दवाखान्यात आणून ठेवले. त्याची बायको लताही दवाखान्यात आली होती. दवाखान्यात आणल्यापासून डॉक्टर येईपर्यंत ती भिवाशेजारीच बसून होती.
थोड्या वेळाने डॉक्टर आले व त्यांनी भिवाला तपासले. डॉक्टरांनी त्याला तत्काळ मृत घोषित केले. लतेने तर हंबरडाच फोडला.

गावातल्या इतर बायका तिचे सांत्वन करू लागल्या. दुसऱ्या दिवशी पोलिसांना बोलावण्यात आले. त्यांनी सगळ्यांच्या जबान्या घेतल्या. शिवाही त्या वेळी तिथे होता, पण प्यायलेला होता. त्याची जबानी न घेता पोलिसांनी त्याला हुडूत करून हाकलून दिले. भरपूर तपास झाला, पण भिवाचा खुनी सापडला नाही. शेवटी पुरावा मिळाला नाही म्हणून केस लालफितीत गुंडाळून ठेवून देण्यात आली व पोलीसदरबारी त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
* *
सुकलाल सकाळचे आन्हिक आटोपण्यासाठी डबा घेऊन घराबाहेर पडला. घरापासून काही अंतरावर त्याचे शेत होते. निघताना त्याने घराजवळच्या कडुलिंबाच्या झाडाची काडी तोडली. ती काडी चघळत, चावत व तिच्यानेच दात घासत तो आपल्या शेताकडे जाणाऱ्या वाटेने निघाला. त्याला अनेक लोकांनी घरात किंवा घरासमोर अंगणात सुलभ शौचालय बांधण्यास सांगितले होते; पण ऐकेल तो सुकलाल कसला. याच्यामागेही एक कारण होते.

त्याला लग्नानंतर कित्येक वर्ष मूलबाळ नव्हते. पण त्याच्या नागराम बाबांच्या कृपेने त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले होते. (असे तो मानायचा.) एकुलता एक मुलगा असल्याने त्याचे जरा अतिच लाड व्हायचे. त्याला सकाळीसकाळीच काहीतरी खायला लागायचे. आता दररोज सकाळीच, एव्हढ्या लवकर त्याला काय खायला द्यायचे असा त्याच्या आई-वडिलांना प्रश्न पडायचा. यावर उपाय म्हणून सुकलाल येतानाच आजूबाजूच्या शेतातून कधी भुईमूग, कधी ऊस, कधी मका
असे खाद्य घेऊन यायचा. तेव्हढाच त्याचा जास्तीचा खर्च वाचायचा.

तो निघाला तेव्हा नुकतेच झुंजूमुंजू होत होते. तो शेतात शिरला, तसा त्याला एक विचित्र वास जाणवू लागला. तो त्या वासाच्या रोखाने निघाला. शेताच्या एका कोपऱ्यात त्याला एक जांभळ्या रंगाचे छोटेसे झुडूप दिसले. ते काय आहे हे बघण्यासाठी तो पुढे सरसावला. त्याने त्या झुडुपाला हात लावला. पण तेवढ्यात त्या झुडुपातून अजूनच उग्र वास यायला सुरुवात झाली. त्या विषारी वासामुळे तो बेशुद्ध पडला.

विजय, भिवा, सुकलाल यांना जे अनुभव आले, ते हळूहळू भारतात भरपूर ठिकाणी येऊ लागले. भारतासोबत हळूहळू इतर पाश्चात्य देशांतही लोकांना असे अनुभव यायला लागले. त्यामुळे, भारतीय भोळ्या समजुती, अंधश्रद्धा असे म्हणणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन पडले.

पण, दिवसेंदिवस ह्या घटना कमी न होता, वाढतच चालल्या होत्या. भुतांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच होती. अगदी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही पुराव्यांअभावी हाय खाऊन घेतली होती, पण पूर्णत: नाही. विज्ञानावर विश्वास ठेवणारे नि:स्वार्थी कार्यकर्ते मात्र यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. यामागे काहीतरी वैज्ञानिक कोडे आहे, जे मानवाला अजून उलगडलेले नाही, याची त्यांना खात्री होती. असे जे काही भुतांवर विश्वास न ठेवणारे थोडेथोडके गट व सगळे शास्त्रज्ञ होते, त्यांनी सरकारकडे ह्या खुनांचा (?) तपास करण्याची परवानगी पोलिसांसह शास्त्रज्ञांनाही देण्याची मागणी केली. शासनाने बरीच खलबते करून शेवटी एक (सरकारी) शास्त्रज्ञांची समिती स्थापन करून तपास तिच्याकडे सोपवला.

पहिला एक महिना तपास चांगला सुरू ठेवला गेला; पण पुढे तपास ढेपाळला. समिती जुन्याच अहवालांना तिखट-मीठ लावून माहिती नवी आहे असे भासवून प्रकाशात आणू लागली. लोकांना हे समजत होते, परंतु भारतातील ८५ टक्के जनता भुतांवर विश्वास ठेवू लागली होती. यामुळे त्यांचे या तपासाकडे काहीच लक्ष नव्हते.बउरलेसुरले जे तक्रार करत होते, त्यांचा आवाज दाबला जात होता.बमीडियाला फक्त चटकदार बातम्या दाखवायची सवय असल्याने सध्या शास्त्रज्ञांचे या बाबतीतले मत जाणून घेण्याऐवजी ते तांत्रिक-मांत्रिक, बाबा – बुवा यांच्याच मुलाखती घ्यायला त्यांच्या घरी जाऊ लागले. देवऋषींचा धंदा चांगलाच फळफळला होता.

आता मात्र सर्व शास्त्रज्ञ व ‘अंनिस’चे कार्यकर्ते पेटून उठले. अंनिसचे कार्यकर्ते आंदोलन करू लागले, तर शास्त्रज्ञांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. हळूहळू जगातल्या सर्व शास्त्रज्ञांनी उठाव सुरू केला. जगभर अशी शास्त्रज्ञांची साखळीच तयार झाली. या शास्त्रज्ञांना इतर मोठमोठ्या शास्त्रज्ञांनीही समर्थन दिले. सुप्रीम कोर्टानेही शासनाला चांगलेच फटकारले व “शास्त्रज्ञांना पाहिजे ती मदत द्या, सांगितले. आता मात्र शासनाला त्यांचे ऐकावेच लागले. शास्त्रज्ञांनी एक समितीच तपासासाठी व संशोधनासाठी चर्चा करून स्थापन केली.

या नवीन समितीचा अध्यक्ष होता प्रसन्न सावळे. प्रसन्न हा एक तरुण शास्त्रज्ञ होता. वय वर्षे ३२, तरीही अजूनही सडाफटिंग. काळेभोर, कुरळे केस, निळेशार आणि पाणीदार डोळे, गोरीपान त्वचा, डोळ्यांवर टायटन कंपनीचा चश्मा, सरळसोट नाक, बलदंड बाहू, भारदस्त छाती, पावणेसहा फूट उंची. एकूणच आकर्षक, पण त्याच्या पेशाला साजेसे नसलेले व्यक्तिमत्व.

प्रसन्न कुण्या एका विषयाचा नाही, तर विज्ञानाच्या जवळपास सगळ्याच शाखांचा तज्ज्ञ होता. नुसत्या भारतातच नाही, तर संपूर्ण जगात अष्टपैलू शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जायचा. त्याला लहानपणापासूनच विज्ञानात गोडी होती. ‘शाळा शिकला नाही’, ‘लहानपणी जास्त हुशार नव्हता’, ‘घरी गरिबीची परिस्थिती होती’ इ. कॅटेगिरीमध्ये बसणारा शास्त्रज्ञ नव्हता तो! त्याच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती. लहानपणापासून तो अत्यंत हुशार होता. तो सर्व परीक्षांमध्ये चमकत होता. वर्गातल्या इतर मुलांपेक्षा त्याची स्वप्ने वेगळी होती. घरचीही परिस्थिती चांगली असल्याने त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी घरच्यांकडून योग्य ते प्रयत्न केले जायचे.

सध्या तो बंगळुरूला वैज्ञानिक शोधकार्यात व्यस्त होता. समितीच्या बैठकीसाठी त्याला मुंबईला यावे लागणार होते. तो पहाटेच्या फ्लाइटने तिथून निघाला व सकाळी मुंबईला पोहोचला. एअरपोर्टवर त्याचा बालपणीचा मित्र व त्याच्या समितीतील एक शास्त्रज्ञ, निखिल साळगावकर त्याच्या स्वागतासाठी व त्याला थेट समितीच्या सभागृहात नेण्यासाठी आला होता.

निखिल शाळेत प्रसन्न इतकाच हुशार होता. त्या दोघांचे संपूर्ण शिक्षण सोबतच झाले होते. पण प्रसन्न व निखिलचे स्वभाव वेगवेगळे होते.प्रसन्न अगदी शांत व सर्व काही सहन करून घेणारा होता, तर निखिल अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा होता. त्यांच्या स्वभावांचा प्रभाव त्यांच्या करिअरवर पडला. त्या दोघांना एकाच प्रकारचे संशोधनकार्य करायचे होते, पण वरिष्ठांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध निखिलने तक्रार केली; आणि शासनाने त्यावर कारवाई करायची सोडून निखिललाच नोकरीवरून काढून टाकले व कनिष्ठ दर्जाच्या संशोधनकार्यात रुजू केले. इथे आपले काहीच चालणार नाही हे ओळखून आता आहे त्या नोकरीचा त्याने स्वीकार केला व या प्रकरणाची वाच्यता कुठे होऊ नये याची दक्षता घेतली.

त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली.
“काय मग, कसा झाला प्रवास? ” निखिलने विचारले.
“छान झाला. काहीच अडचण नाही आली.” प्रसन्न उत्तरला.
“अरे वा! मस्तच की! बरं, बाकीची बडबड आपण गाडीतच करू,
नाहीतर ट्राफिक आणि सिग्नल्समुळं आपल्याला सभेला पोहोचायला उशीर होईल.”
“ठीक आहे. चल.” ते चालतचालत पार्किंगपर्यंत पोहोचले.
निखिल प्रसन्नला एका गाडीजवळ घेऊन आला.
“अरे वा! नवीन कार घेतलीस काय?”
“हो!”
“मला सांगितलंही नाहीस?”
“अरे, दोन आठवडेच झाले घेऊन, तुला सांगणारच होतो; पण
समितीतील शास्त्रज्ञांची नावं वाचली आणि त्यात तू दिसलास. म्हणून मी असं ठरवलं, की तू येशील तेव्हाच तुला सरप्राइज देऊ!”
“अच्छा ! पेट्रोल आहे की डीझेल? ”
“नाही, इलेक्ट्रिक आहे. झीरो पोल्युशन! इकोफ्रेंडली!” निखिल म्हणाला. त्यानंतर ते दोघे गाडीत बसले व सभागृहाकडे जायला निघाले.
“इकोफ्रेंडलीवरून आठवलं, तुझं इकोसिस्टिमचं शोधकार्य कसं सुरू आहे?” निखिलने विचारले.

“चांगलं सुरू आहे. आमचं सध्या वनस्पतींच्या चेतनाक्षमता व प्रतिसाद यांवर शोधकार्य सुरू आहे. वनस्पती एकमेकांशी संवाद साधू शकतात का? हो, तर कशा?, आम्ही त्यांच्याशी इलेक्ट्रिक पल्सेसच्या साहाय्यानं संवाद साधू शकतो का?, त्या आम्हांला रिस्पॉन्स देतात का?, यावर संशोधन करत आहोत. आणि त्यात आम्हांला चांगले रिझल्ट्स मिळाले. आम्ही आता अशी टेक्नॉलॉजी विकसित करत आहोत, ज्यामुळं आपण वनस्पतींशी थेट संवाद साधू शकतो. आमचा दुसरा प्रॉजेक्ट असा आहे, की वनस्पतींना कमीतकमी वेळात म्यूटेट करणं. या प्रॉजेक्टवर आमच्या संस्थेचं जवळपास ६७ वर्षांपासून काम सुरू आहे. आणि विशेष म्हणजे, आत्तापर्यंत आम्हांला काही विशिष्ट प्रजातीच्या वनस्पती म्यूटेट करण्यात यश आलं आहे. आणि आम्हांला संशोधनात अस आढळून आलं आहे, की कमी वयाच्या वनस्पती उत्परिवर्तित होत नाहीयेत. बरेच मोठमोठे शास्त्रज्ञ या प्रॉजेक्टचे इन्चार्ज होते. आता सध्या मी या प्रॉजेक्टचा इन्चार्ज आहे.
“अरे वा! छान!”
तेवढ्यात निखिलचे डोळे चमकले. त्याला काहीतरी आठवले. तो विचार करू लागला. थोड्या वेळाने त्याची तंद्री भंग पावली ती त्याला ओव्हरटेक करणाऱ्या गाडीच्या हॉर्नने. तो एकदम दचकला. तो गाडीवाला त्याला ओरडत आणि शिव्या घालत ओव्हरटेक करून निघून गेला. प्रसन्न त्याला हसतहसत म्हणाला,
“काय, कुठे हरवला होतास?”
“युरेका! कोड्याचं उत्तर मिळालं!” निखिल म्हणाला.
“काय? कोणतं कोडं? कसला विचार करत होतास?” प्रसन्नने विचारले.
“काही नाही. ते बघ सभागृह जवळच आलं आहे. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.” निखिल स्मितहास्य करत म्हणाला. प्रसन्नचे डोळे विस्फारले.
“म्हणजे, तू त्या रहस्यमय मृत्यूंबद्दल बोलत आहेस का?” “तू आधी चल म्हटलं ना!” निखिल गाडी पार्किंगमध्ये लावत म्हणाला.
ते गाडीतून उतरून थेट सभागृहाकडे निघाले. लवकरच सभा सुरू झाली. सर्व सदस्य शास्त्रज्ञ आपापली मते मांडत होते. जास्तीतजास्त शास्त्रज्ञांचे मत असे होते, की परग्रहावरील जीव असे करत आहेत. पण या शास्त्रज्ञांना, “परग्रहवासी असं का करतील? कोणत्या पद्धतीनं करतील? करत असतील तर आपल्याला ते कळणार कसं? याला पुरावा काय?” अशा प्रश्नांची उत्तरे देता येत नव्हती.
‘आपलं काय मत आहे डॉक्टर निखिल? ” निखिलला विचारले गेले. निखिल उभा राहिला व बोलू लागला, “माझ्याकडे या रहस्यमय मृत्यूंचं कोडं उलगडणारी एक थिअरी आहे…” संपूर्ण सभेत खळबळ माजली.
“कोणती थिअरी? जरा स्पष्ट करून सांगता का?” एका शास्त्रज्ञाने प्रश्न केला.

“सांगतो. आपल्याला माहीत आहे, की कधीकधी मोठ्या व कठीण दिसणाऱ्या प्रश्नांची उत्तरं फार सोपी असतात. इथंही काहीसं असंच आहे असं मला वाटतं. या कोड्याचं उत्तर भौतिकशास्त्रात नाही, तर जीवशास्त्रात आहे असं मला वाटतं. माझं असं मत आहे, की हे मृत्यू झाडांमध्ये झालेल्या म्युटेशन्समुळं आहेत. झाडं विचारक्षम झालेली आहेत.” सभेला दुसरा धक्का बसला.

“तुम्ही जे म्हणत आहात, त्याला काही वैज्ञानिक पुरावा आहे का?” “आहे. १९९७ साली कॅनडीयन शास्त्रज्ञ डॉ. सुझन सीमार्ड यांनी एका प्रॉजेक्टवर काम केलं होतं, ज्याचं नाव होतं ‘द मदर ट्री’. ज्यात त्यांनी व त्यांच्या टीमनं हा शोध लावला होता, की झाडं त्यांच्या मुळांजवळील वाढलेल्या बुरशींच्या जाळ्याद्वारे एकमेकांशी पोषकतत्त्वांची, संदेशांची देवाणघेवाण करू शकतात. या इंटरनेटसारख्या जाळ्याला त्यांनी ‘वुड वाइड वेब’ असं नाव दिलं. जर वनस्पती विचारक्षम झाल्या असतील, तर त्यांना हे मृत्यू घडवून आणणं कठीण नाही. कारण, एकात जरी उत्परिवर्तन झालं असेल, तरी त्याला लवकर पसरायला या वुड वाइड वेबनं मदत झाली असेल. मी आधी सांगितल्याप्रमाणे, ही एक थिअरी आहे. आपल्याला यावर अजून काम करावं लागेल. आणि यावर काही प्रमाणात काम झालेलं आहे, ज्यावरून मी तुम्हांला या थिअरीमागील अजून काही वैज्ञानिक स्पष्टीकरणं देऊ शकतो. डॉक्टर प्रसन्न सध्या याच विषयावर संशोधन करत आहेत. माझ्या मते, याबद्दल अधिक माहिती ते माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं देऊ शकतात.” असे म्हणून निखिलने प्रसन्नकडे पाहून डोळे मिचकावले.
प्रसन्नला त्याचा इशारा समजला व तो गाडीत कशाबद्दल विचार करत होता हेही कळाले.

प्रसन्नने त्यापुढील सर्व त्या शास्त्रज्ञांना विस्ताराने समजावून सांगितले.
“सध्या मी वनस्पतींमध्ये होणारे जनुकीय बदल, म्हणजेच ‘उत्परिवर्तन’, ज्याला ‘म्युटेशन्स’ म्हणतात, यावर काम करत आहे. सजीवांची आनुवंशिक वैशिष्ट्यं जनुकांवर अवलंबून असतात. उत्परिवर्तनामुळं एखाद्या जनुकावर किंवा अखंड गुणसूत्रावर परिणाम होऊ शकतो. डीएनएच्या रेणूत किंचित रासायनिक बदल झाला, तर जनुकीय उत्परिवर्तन होतं आणि गुणसूत्रांच्या रचनेत बदल झाला, तर, गुणसूत्रीय उत्परिवर्तन होतं. या पद्धतीनं आमच्या टीमला काही वनस्पती म्यूटेट करण्यात यश आलं आहे.

“यावर अजूनही काम सुरू आहे, ज्यामुळं आम्ही जगाला आत्ताच लागलेला हा शोध सांगितला नाही. आपल्या भारतातील काही मोठ्या आणि महत्त्वाच्या शास्त्रज्ञांना आणि शासनाला आमच्या या शोधाबद्दल माहीत आहे; पण आता हा शोध प्रकाशात आणण्याची ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं. सर्वांना माहीतच आहे, की वनस्पतीही सजीव असतात. आमच्या संशोधनातून असं निरीक्षण पुढं आलं आहे, की वनस्पती विचारक्षम होऊ शकतात आणि त्या चेतनेला प्रतिसादही देऊ शकतात.” प्रसन्नने सभेला तिसरा धक्का दिला. “तसंच आम्ही वनस्पतींशी थेट संवाद साधण्यासाठीचं तंत्रज्ञानही विकसित करत आहोत. जर वनस्पती खरंच विचारक्षम झाल्या असतील आणि त्याच हे मृत्यू घडवून आणत असतील, तर आपण त्यांच्याशी संवाद साधून त्या असं का करत आहेत याची माहिती करून घेऊ शकतो!”
“पण वनस्पतींना आपली भाषा कशी समजेल?”
‘आपण त्यासाठी इलेक्ट्रिक पल्सेसचा उपयोग करू शकतो. जशा त्या लहरींच्या माध्यमातून भावना दर्शवू शकतात, तशा त्या विचारक्षम झाल्या असतील, तर आपलीही भाषा समजू शकतील.”
सर्वांना ती थिअरी पटली. पण कोणाकडेही थिअरी खरी सिद्ध करण्यासाठीचा पुरावा नव्हता. यासाठी त्यांना प्रसन्नचे संशोधन पूर्ण व्हायची वाट पाहावी लागणार होती. आणि हे संशोधन होते म्यूटेट वनस्पतींशी संवाद साधण्याचे. पण यासाठीची टेक्नॉलॉजी पूर्णपणे विकसित होण्यासाठी खूप श्रम, वेळ आणि पैसा ओतावा लागणार होता.
शास्त्रीय समितीने यासाठी सरकारकडे मनुष्यबळ व पैशांची मागणी केली.
शासनाने वेळेचे महत्त्व ओळखून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. यामुळे दोन वर्षांचे काम सात महिन्यांमध्ये पूर्ण झाले. शेवटी ती विशिष्ट मशीन तयार झाली. डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केले होते, की वनस्पतींनाही भावना असतात, ज्या त्या विद्युत्लहरी सोडून दर्शवतात. त्याचेच रीडिंग घेऊन वनस्पतींच्या भावना दाखवणाऱ्या मशीन आधीच तयार झाल्या होत्या. त्यांचेच हे सुधारित, पण गुंतागुतीचे रूप होते.
शेवटी तो ऐतिहासिक दिवस उजाडला, जेव्हा पहिल्यांदा एक मनुष्य एका वनस्पतीशी बोलणार होता!
की हे उत्परिवर्तन त्यांच्यातच होत आहे. म्हणून त्याच विशिष्ट प्रकारातली वनस्पती शोधण्यात आली, जिच्याजवळ मृतदेह सापडला होता. त्या वनस्पतीला सर्वांत पहिल्यांदा विद्युत्प्रवाहाचे झटके देऊन व विशिष्ट प्रकारचे औषध फवारून बधिर करण्यात आले, ज्यामुळे तिने कोणाला इजा करू नये.
यानंतर बुलेटप्रूफ काचेचा एक मोठा ठोकळा बनवण्यात आला, ज्यात ते मशीन व एक शास्त्रज्ञ वनस्पतीपासून सुरक्षित राहू शकतील.
त्यानंतर वनस्पतीला इलेक्ट्रोड्स लावण्यात आले. आता त्या काचेच्या पिंजऱ्यात कोण जाणार हा प्रश्न निर्माण झाला.
“मी जाणार. ” प्रसन्न म्हणाला. कोणालाच रिस्क घ्यायची नव्हती, म्हणून सगळ्यांनी होकार दिला. प्रसन्न त्या पिंजऱ्यात शिरला. त्याने मशिनरी सुरू केली आणि त्यानंतर झाला तो फक्त नि:शब्द संवाद. तो विद्युत्लहरींच्या माध्यमातून आपले म्हणणे वनस्पतीपर्यंत पोहोचवत होता आणि वनस्पतीही त्याला त्याच माध्यमातून प्रतिसाद देत होती.
मशीन त्या वेगवेगळ्या तरंगलांबींच्या विद्युत्लहरींना डिकोड करून व त्यांचे भाषांतर करून वनस्पतीचा संदेश प्रसन्नपर्यंत पोहोचवत होते.
“मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हीच हे मृत्यू घडवून आणत आहात का?” प्रसन्नला मनातून थोडी धाकधूक वाटत होती, की वनस्पती खरेच विचारक्षम झाल्या आहेत का? त्या आपल्याला समजून घेतील का? पण थोड्याच वेळात त्याला कळाले, की त्या वनस्पती खरेच विचारक्षम झाल्या आहेत; कारण त्याला त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर काही अक्षरे उमटलेली दिसली. तो वाचू लागला.
“हो.”
“तुम्ही असं का करत आहात?”
“तुम्हांला धडा शिकवण्यासाठी.” प्रसन्नला धक्का बसला.
“म्हणजे?”
“जसं तुम्ही आमच्या नातेवाइकांना एकेक करून नष्ट केलंत, तसं आम्ही तुम्हांलाही नष्ट करू!”
“पण का? सगळेच तर तुम्हांला नष्ट करण्याच्या मागं नाही लागलेत! काही पर्यावरणप्रेमी तुम्हांला वाचवण्याचा प्रयत्नही करत आलेत, मग असं का?”
“होय, त्यांना आमचं महत्त्व कळालं आहे, म्हणून आपल्या स्वार्थासाठी का होईना, पण काही आम्हांला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरी आमच्या नाशातून ज्यांना फायदा मिळतोय असे लोक तुमच्या प्रजातीत किंवा ज्याला तुम्ही समाज संबोधतात, त्यात आहेत.
आणि त्यांची संख्या सर्वांत जास्त आहे. याच कारणामुळं आम्हांला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं.’
“मग आम्ही अन्नधान्य कसे उगवू? आम्ही जेव्हा कापणी करू त्या वेळेस तुम्हांला इजा होणार नाही का? त्या वेळीही तुम्ही असेच मृत्यू घडवून आणणार का?”
“नाही! मानव आणि वनस्पती हे पृथ्वीवर सहजीवी आहेत. जसा आमचा तुम्हांला फायदा आहे, तसेच तुम्ही मानवदेखील आमच्यासाठी उपयुक्त आहात. आम्ही तुम्हांला पूर्णपणे संपवणार नाही; पण आता यापुढं ज्यानं कोणी गरजेपेक्षा जास्त आमचा उपभोग घेतला, तर त्याला आम्ही जिवंत सोडणार नाही. लक्षात ठेवा, की आम्ही वनस्पतीही जमिनीखालून, मुळांच्याद्वारे एकमेकांशी संवाद साधू शकतो.

“मानव जेव्हापासून अतिऔद्योगिकीकरणाच्या वाटेवर आहे, तेव्हापासून आम्ही सतत सहन करून घेत आहोत आणि त्याबरोबर स्वत:ला उत्परिवर्तित करत आहोत. पण आता तर तुम्ही कहरच केला आहे! आता तुम्ही स्वतःला सुधारून घेतलं पाहिजे, नाहीतर हा संघर्ष तुम्ही संपूर्णपणे नष्ट होईपर्यंत आम्ही चालू ठेवू! आणि हाही विचार करा, की आमच्यात झालेलं उत्परिवर्तन आमच्या ठरावीक भाऊबंदांपर्यंत मर्यादित आहे. हे उत्परिवर्तन जर सर्वच वनस्पतींच्या प्रजातींमध्ये झालं, तर तुमचं काय होईल? तसं होण्याची जर वेळ आली, तर तुमचा विनाश अटळ आहे!”

प्रसन्न ते वाचून नि:शब्द झाला. त्याला वनस्पतींच्या ताकदीची माहिती होती. त्यांनी जर विचारक्षम होईपर्यंत उत्परिवर्तन केले असेल, तर त्यांनी मनुष्यांना मात देण्याइतपत ताकद एकत्र केलीच असेल याची त्याला जाणीव होती.

“ठीक आहे.” असा शेवटचा संदेश लॅपटॉपवर टाइप करून व त्याला पाठवून तो बाहेर आला. बाहेर येताना त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. ‘या संघर्षाला मनुष्यच कारणीभूत ठरला होता. आता या चुकीतून काही शिकून मनुष्य स्वतःला सुधारेल का?’
‘किमान लोक या शोधावर तरी विश्वास ठेवतील का?’ ‘की लोकांना ही एखादी काल्पनिक कथाच वाटेल?’ ‘आपण मानव कधी सुधारणारच नाही का?’ ‘ हा संघर्ष किती वेळ सुरू राहील?” “हाही एक मोठा प्रश्नच आहे!” प्रसन्न पुटपुटला.

-शुभम देशमुख
विज्ञान कथालेखक
ssdeshmukh2709@gmail.com

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील शुभम देशमुख यांची ही पूर्वप्रकाशित कथा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..