नवीन लेखन...

संगव्वा…

‘ये कडुभाड्या, तुज्या तोंडात माती घातली तुज्या…’
कोंबडा आरवायच्या आत संगव्वाची अशी शिवी ऐकल्यावरच गल्ली उठायची. तुराट्याच्या झाडूने झाडण्याचा खर्रखर्र आवाज आणि संगव्वाच्या आरडाओरड्याने दिवसाची सुरूवात व्हायची. आजही कुणीतरी मुद्दाम किंवा नकळत तिची खोड काढलेली होती किंवा झाडलेल्या जागेत पचकन थुंकले होते. तिचा तोंडपट्टा तोफेप्रमाणे धडधडू लागला. गल्लीतून वळून ती व्यक्ती दिसेनाशी होईपर्यंत ती आपल्या पोतडीतल्या अगणित शिव्या हासडत होती.
‘ए म्हातारे, गेला त्यो, गप बैस की जरा…’ कांबळ डोक्यावरून काढत सिद्धू ओरडला. त्याची रोज झोपमोड होत असे. डोळे चोळत सिद्धूने रांजणातले पाणी तोंडावर मारून घेतले अन तंबाखूची फक्की मारत टमरेल घेऊन गेला.
ईरकलची गोल साडी, ईरकलचाच ब्लाऊज, त्यावर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे ठिगळ, किरकोळ शरीरयष्टी, काळा रंग, चेहर्यावर असंख्य सुरकुत्या, कपाळावर गोंदलेलं, हातात हिरव्या बांगड्या, चापूनचुपून तेल लावलेल्या भुरकट केसांची एक वेणी, लाल डोळे, अशा अवतारात संगव्वा नेहमी असायची. उजाडायच्या आत सडा रांगोळी झाल्यावर चुल पेटायची अन चारपाच भाकर्या बडवायची. खोलीतच एका कोपर्यात मोरीला आडोसा होता. दोन तांबे अंगावर घेऊन दोरीवरची साडी नेसून बाहेर ओट्यावर केस विंचरत बसायची. दोन साड्या, दोनचार भांडे, एक शिंकाळे, चुल, लाकडे, गोवर्या, एका कोपर्यात ठेंगण्या आकाराचे लाकडी कपाट, एक छोटी ट्रंक, एवढेच सामान खोलीत होते. आठवड्यातून एकदा जमीन सारवून घ्यायची. पोते अंथरून त्यावर जीर्ण झालेली साडी टाकून तिथेच झोपायची. दिवसाचा बहुतेक वेळ तिचा बाहेर ओट्यावरच जायचा. सहसा कुणाला स्वत:हुन बोलत नसे. अपवाद समोरच्या घरात राहणारी हंसाबाई. तिला बोलायचे कारण म्हणजे तिच्याकडे जाते होते. ते रिकामे असेल तेंव्हा ती तिथून ज्वारी दळून आणायची. हंसाबाई, तिची मुलगी आणि नवरा सोडून झाडून गावातल्या सर्वांना तिने काही न काही कारण काढून शिव्या घातल्या होत्या. त्यामुळे सारे गाव तिला टरकून असायचे.
दुपारी संगव्वा झोपायची त्याचवेळी मुलांची आंगणवाडी सुटलेली असायची. पोरं या ओट्यावरून त्या ओट्यावर उड्या मारत खेळायची. ‘ए पिरगाळानु, गप बस्ताव का घालू जळ्कं लाकुड’ हातात लाकुड घेऊनच संगव्वा पवित्र्यात ओट्यावर यायची. पोरं ‘हे…हु…’ करत तिला चिडवत लांब पळायचे. पाच दहा मिनिट असा हुलकावण्याचा खेळ चालायचा. पोरांना हुसकावून लावल्यावर गल्लीत सामसूम असायची.
संगव्वाच्या धास्तीनं चोरही गल्लीत यायचे नाहीत. झोपेतही ती हुशार असायची. खट वाजलं की ‘कोण हाय रे कडुभाड्या…’ म्हणत पटकन उठायची. एकदा हंसाबाईच्या दारात डालीखाली झाकून ठेवलेलं पेंडीचं पोतं घेऊन एक चोर पळून जात होता. म्हातारी काय करेल या ढेकीत त्याने पोते उचलले त्याचवेळी संगव्वा कडाडली ‘ये मुडद्या, ठिव खाली न्हाईतर हे बग’ म्हणत झपझप पावलं टाकत वरवंटाच घातला त्याच्या पाठीत. म्हातारी इतक्या वेगाने येईल हे चोराच्या ध्यानीमनीच नव्हते. पोते टाकून तो ‘ए माय गे…’ म्हणत कळवळला आणि मागच्या कुपाटीवरून उडी मारून पळून गेला. तेव्हापासून एकही चोर गल्लीत फिरकला नाही.
सिद्धू परत आला आणि टमरेल ठेवून रांजणाखालच्या मातीने हात धुतले. अजून उजाडलेही नव्हते तेवढ्यात ‘चल ऐ सिद्धू….’ बैलगाडीतून आलेल्या जोडीदार गड्याने आवाज दिला. धोतराला हात पुसत चिरगुटात म्हातारीने दिलेल्या दोन शिळ्या भाकर्या घेऊन बैलगाडीत चढला अन शेताकडे गेला. यानंतर गल्लीत सर्वत्र शांतता पसरली.
काही वेळातच चांगलं उजाडलं. आजुबाजूच्या बायका उठून सडा सारवण करू लागल्या. संगव्वाच्या खोलीचे दार बंद होते. आंघोळ करत असेल असं वाटलं. बायका आपसात कुजबुजू लागल्या, पण तिच्या दारात जायची कुणाची हिम्मत होईना. सर्वांना आपापलं पडलं होतं. नवर्याला भाकर बांधून द्यायची, पोरांना आंगणवाडीत पाठवायचं, सर्व आवरून खुरपं घेऊन कामावर जायचं, या घाईगडबडीत कुणाला वेळच नव्हता.
पोरीला आंगणावाडीत पाठवून हंसाबाईने जेवणाचं गाठोडं डोक्यावर ठेवलं अन दाराला कुलूप लावून ओट्यावरून खाली उतरली. थोडी पुढे गेल्यावर काय वाटलं काय माहित परत फिरली. संगव्वाच्या ओट्यावर चढली अन दार वाजवलं. दार उघडंच होतं. तिला पाहून अजून एकदोन बायका थांबल्या. खुरपं, गाठोडं ओट्यावर ठेवून त्याही हंसाबाईजवळ गेल्या. हंसाबाईने दार आत धकलले. चुल शांत होती, पण धग होती. म्हातारी आत नव्हती. मोरीत वाकून पाहिले तिथेही नव्हती.
‘वड्याकड गेली का काय माय?’ एक बाई पुटपुटली.
‘ह्या वक्ताला कशी जाईल वो, ती गाव उटायच्या पैलंच जाऊन येती.’
‘शिद्द्याबर्बर गेली नसंन शेताकड?’
‘ती कंदीच जात न्हाई शेतावर. धा वर्साखाली मालकानं डवार्याला बोल्विल्तं तवाच यकदा गेल्ती. पुन्ना कंदीच ग्येली न्हाई.’ हंसाबाई पदर तोंडाला लावत म्हणाली.
‘दुरपदा, तु तुज्या वावरात जायच्या पयलं शिद्द्याला इचारून घे. त्येला म्हाईत असन.’ हंसाबाईने द्रुपदाला कामाला लावले अन म्हातारीचं दार बंद करून घेतलं. कुलूप लावायचा प्रश्नच नव्हता. या दाराला कुलूप काय कडीही माहित नव्हती. दार ओढून घेऊन ‘चला बीगी बीगी, मालक खडुस हाय, पयलंच उशीर झायलंय’ म्हणत झपझप चालत बायका आपापल्या वावराकडं गेल्या.
काही वेळातच सिद्धू धावत आला. म्हातारी घरी नाही हा द्रुपदाने निरोप दिला होता. तो ओढ्याकडे, पांदीकडे, सगळीकडे जाऊन घापा टाकत घरी आला. ट्रंक जागेवर दिसत नव्हती. तो मटकन खाली बसला. परत उठून धावत पळत गल्लीतला कोपरा न कोपरा शोधला पण कुठेच काही मागमुस लागला नाही. आंगणवाडीतून पोरं परत आली. म्हातारी नाही ही बातमी ऐकून पोरंही भेदरून गेली. दोनचार जणांच्या टोळ्या करून आख्खं गाव पालथं घालून ते हात हलवत परत आले. पोरांकडून कळल्यामुळे गावातले म्हातारे गल्लीत जमा झाले.
‘हिरीला बगुन आलैस का?’ बुड टेकत एक म्हातारा म्हणाला.
‘समदं बगुन आलो, पर म्हातारी गावली न्हाई, टरंक बी जाग्यावर न्हाई’ डोळे पुसत सिद्धू म्हणाला.
‘आर्र तिच्या…चोर्यानं डाव सादला जणु’ दुसर्या म्हातार्याने शंका मांडली.
‘चोर गल्लीत शिरत बी नव्हता म्हातारीच्या धाकानं’ दुसरा एकजण म्हणाला.
‘टरंक न्हाई म्हंजी त्येच असंन दुसरं काय’
‘एकल्या दुकल्याचं काम न्हाई, दोन तीन अस्तील कडु बेने’
‘तेबी खरंच हाय. म्हातारी एकल्याला काय जुमान्ती’
अशा चर्चा चालू असतांनाच सरपंच आले. म्हातारी गायब झाल्याची बातमी ऐकून सरपंचासहीत सगळे हवालदिल झाले. दुसर्या दिवशी सरपंचानं सिद्धूला तालुक्यातल्या ठाण्याला पाठवलं. संगव्वाचा एकही फोटो नव्हता. तोंडीच तिचे वर्णन त्याने सांगितले. पोलिसांनी ट्रंकेत काय होतं वगैरे विचारून सरपंचाचा नंबर लिहून घेत ‘काही सुगावा लागला की कळवतो’ म्हणून त्यांना परत पाठवले.
संध्याकाळी ओट्यावर बायका जमल्या. हंसाबाई डोळ्याला पदर लावत म्हणाली ‘नवरा मरून पन्नास वरीस झाले, दोन वावर कोरडवाहू जिमीन हुती. यकुल्ता यक पोरगा अन सुन करजाच्या वज्ज्याखाली बुडून त्यायनी जीव देला. त्येलाबी तीस वरीस झाले. शिद्द्या त्या वक्ताला पाच वर्साचा हुता. म्हातारीनं वावर बेभाव ईकलं, पर त्येनं किती दिसलोक भागंल. लोकायच्या वावरात काम करून शिद्द्याला वाडीवलं. त्यो सालगडी झाला तवाच घरी बस्ली. शिद्द्याचं लगीन जमना म्हुन म्हातारीची वाईस चीड चीड वहाडली हुती. पर आता ह्ये लई वंगाळ हुन बसलं…’
‘टरंकीत काय हुतं की जनु’ एक बाई म्हणाली.
‘काय असन? एकांदा मनीमोती अस्लं तर असंल.’
‘मुडद्यानं फकस्त टरंक न्ह्यायाची, म्हातारीला कुटं गायब केलं की मेल्यानं’
बायकांच्या चर्चांना ऊत आला होता. पाहता पाहता आठ दिवस होवून गेले. रोज पोलिस स्टेशनला चकरा मारून सिद्धूही कंटाळला. चोराने म्हातारीचा काटा काढला यावर सर्वांचे एकमत बनले होते. अजून चार दिवस वाट पाहून तिचे दिवस करायचे ठरले. दुसर्या दिवशी सगळे परत जमले.
‘ठाण्यातून काय खबर आली का’ एका म्हातार्याने विचारले.
‘नुस्तं शोद चालु हाय म्हंत्यात’ सिद्धू नखाने जमीन खुरडत म्हणाला.
‘चोर्यायचंच ह्ये काम हाय बग शिद्दू, म्हातारीवर लई कावून होते बेने’ एकजण म्हणाला.
‘पर दिस करायच्या पयलं ब्वाडी तर घावायला फायजे!’ दुसर्याने प्रश्न केला.
‘कुटं पुरून बीरून टाकलं असन तर काय बावडी घावल’ पहिला म्हणाला.
‘काय झायलं देवास्नी ठाऊक. म्हातारी जीत्ती अस्ती तर आत्तालोक आली अस्ती. आता कायबी बोलून उपेग न्हाई. चार दिसानं तेरावं येतंय, गोड जेवण घाल अन कामास्नी लाग, असं बसून पोट भरतंय व्हय?’ एका पोक्त म्हातार्याने चर्चेची सांगता केली. म्हातारीच्या आत्म्याला शांती लाभेल म्हणून सर्वांनी याला दुजोरा दिला.
तेवढ्यात एक पोरगं हातात काहीतरी घेऊन पळत आलं. ‘टायर रोडवर चाक पळवत गेल्तु, वाटंच्या कडला हे घावलं’ म्हणत त्याने हातातली वस्तु दाखवली. सिद्धूने ती वस्तु बारकाईने न्याहाळली आणि एकदम धाय मोकलून रडू लागला. ‘ही टरंकीची कडी हाय वो…’ म्हणत छाती बडवू लागला. सर्वांनी त्याला सावरले.
आता पक्की खात्री झाली होती. म्हातारीचे तोंड दाबून चोरांनी ट्रंकेसहीत तिला टायर रोडकडं नेले आणि तिथेच कुठेतरी मारून पुरून टाकले अन ट्रंक घेऊन पळाले. पोलिसांना निरोप पाठवला. त्यांनी परिसर पिंजून काढला, पण कुठेही कसले निशाण सापडले नाही. पोलिसांनी तर्क काढला की एखाद्या टेंपोत घालून म्हातारीला कुठंतरी लांब नेवून मारून पुरून टाकले असेल.
यात दोन तीन दिवस गेले. शोध लागायची चिन्हे दिसेनात. सर्वांनी सिद्धूचे सांत्वन करून तेरवीची तयारी सुरू केली. संगव्वाचा फोटो नसल्यामुळे घरातल्या वरवंट्याला हळद कुंकू लावून भिंतीला टेकवून ठेवला. बायकांनी त्याच्यासमोर दिवा लावून ठेवला. सिद्धूने मालकाकडून अर्ध पोतं तांदूळ आणले. दुसर्या दिवशी पातळ वरणासोबत भात तयार झाला. मैदा गुळ खोबर्याचे लाडू तयार झाले.
गावन्हाव्याने वस्तर्याला धार लावली. सिद्धूच्या डोक्याला वस्तरा लावणार तेवढ्यात एक पोरगं ओरडलं ‘आरं ती बगा म्हातारी आली….’ सर्वांनी त्या दिशेकडे पाहिले. म्हातारी एका बाईसोबत लगबगीने चालत येत होती. सगळे लोक आवाक होवून गेले. सोबत कोण बाई आहे कुणालाच समजेना. काहीजण जेवणाच्या वासामुळे भुकेने व्याकूळ होवून गेले होते. कुणाच्याच घरी चुली पेटल्या नव्हत्या. म्हातारी आल्यामुळे जेवण मिळते का नाही ही चिंता त्यांना भेडसावत होती. पण चेहर्यावर आनंद दाखवत सर्वांनी म्हातारीला ओट्यावर बसवलं.
पाणी पित संगव्वा म्हणाली ‘आरं, शिद्द्याच्या आजोळाला ग्येल्ते. मामानं पोरगी देल्नाई म्हुन शिद्द्या कावल्ता त्येच्यावर, बीन मायबापाच्या आन बीनजिमीनीच्या पोरायला पोरगी देत्नै म्हनीत हुता त्यो मुडदा. तवाधरुन लगीनच कराचं न्हाई म्हंतो ह्यो कडुभाड्या. म्हातारी हाय भाकर्या बडवाया, कायबी घोर न्हाई त्येला. त्या दिसी सकाळी गल्ली उटायच्या पयले अंदारातच टरंकेत कापडं घालुन टायर रोडला गेले. एक टरक गावली, गाडीत चडतावक्ती टरंक पडली, त्येची कुंडी तुटली. तसंच चिरगुट बांदुन ग्येले. ही माह्या चुलत भावाच्या पोराची ल्येक हाय. पार्वता. हीची माय धा वर्साखाली साप चाऊन मेली, म्हागल्ल्या साली बापबी वारला. एकलीच र्हात हुती. म्या भेटायाबी गेल्नै. ह्यो मुडदा जाऊ दिना झाल्ता. आत्ती भेटाया आल्नै म्हुन ही बी कावून बस्ली. तिची लई समजूत घातली धा बारा दिस, आन घिऊन आले हिकडं.’
गावकरी आचंबित होवून ऐकू लागले. त्यांच्याकडे पाहुन ती पुढे म्हणाली ‘म्या अशी तशी मराची न्हाय. चोर न्हवं त्येचा बापबी आल्तर त्येचा मुडदा पाडीन म्या एकली. मला मराची न्हाई शिद्द्याची चिंता सुदरत न्हवती. पर आता काय घोर न्हाई. हिच्यासंग शिद्द्याचं लगीन लावून देते तवाच जाते मस्नात. आता म्या जगना का मरना का.’
सिद्धूला आश्चर्याचा धक्काच बसला. पार्वताकडे पाहुन तो गालात हसला. ती पण लाजली. गल्लीतली पोरं ‘हुर्यो…’ करत नाचू लागली. गावकर्यांनी ‘धन्य हो’ म्हणत म्हातारीला हात जोडले आणि तिच्या तेरवीच्या जागी सिद्धूचं लगीन जमलं या खुशीत सर्वांनी जेवणावर आडवा हात मारला…
© नितीन म. कंधारकर
छत्रपती संभाजीनगर.
https://nmkandharkar1965.blogspot.com/2023/07/blog-post_18.html

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..