नवीन लेखन...

समाधान

( सुखाची सात्विक तृप्तता )

जगतद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात….

” ठेविले अनंते तैसेचि रहावे “
” चित्ती असु द्यावे समाधान “

संत तुकारामांच्या अभंगओवीत मानवी जीवनाच संपुर्ण सार पूर्णार्थाने व्यक्त झालेलं आहे. ज्याला जीवनाचा खरा अर्थ समजला आहे आणि म्हणूनच कर्ताकरविता तो एकची भगवंत आहे आणि त्या भगवंतावर श्रद्धा ठेवून तो माणूस सुखी समाधानी जीवन जगतो आहे हेच एकमेव सत्य आहे . याचाच अर्थ आपण स्वतः जीवनात सुखी समाधानी असणं महत्वाचं आहे.

समाधान म्हणजे असीम सुखाची तृप्तता

समाधान म्हणजे व्यक्तीच्या सर्वच अपेक्षित इच्छा फलद्रुप होणे . मानवी जीवन सर्वार्थाने तृप्त होणे , संतुष्ट होणे परिपूर्ण होणे म्हणजे समाधान
असे म्हणणे योग्य ठरेल.

राष्ट्रसंत प.पू. समर्थ रामदासस्वामी म्हणतात……

” सदा सर्वदा देव सन्निध आहे ।
” कृपाळुपणे अल्प धारिष्ट पाहे।
” सुखानंद आनंद कैवल्यदानी।
” नुपेक्षा कदा राम दासाभिमानी।

सदासर्वदा भगवंत आपल्या सोबत आहे . आपल्या या अंतरंगतात त्या परमेश्वराचा सदैव वास आहे , आणि तो आपल्यातच आहे. आणि याच एकमेव सुखानंदाची जाणीव म्हणजेच समाधान त्या कृपावंत , कनवाळू , कल्याणकारी परमेश्वराच्याच नामस्मरणातच आहे. जो कोणी त्या भगवंताच्या सदैव चिंतनात असतो त्यालाच खऱ्याखुऱ्या सात्विक सुखाची निर्मोही अनुभूती येते म्हणजेच त्याला समाधान मिळते. कृतकृत्य धन्यता वाटते.

पण जगतात भगवंत आहे की नाही या बाबतच सर्वत्र द्विधा मनःस्थिती आहे हे आपण पाहतो. कुणी देव मानतात तर कुणी देव मानतही नाहीत ही वस्तूस्थिती आहे. पण प्रत्येकाला सुखाची मात्र तीव्र अपेक्षा आहे. त्यासाठी तो अविरत कार्यरत असतो सुखसौख्याची आसक्ती त्याला गप्प बसू देत नाही. आपल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या , आपले मन तृप्त झाले की आपण समाधानी झालो असे माणसाला वाटते. आपले जीवन परिपुर्ण झाले असे वाटते.

मानवी मन हे विविध भावनांनी प्रेरित आहे आपल्या या विविध अपेक्षा जो पर्यंत पूर्ण होत नाहीत तो पर्यंत ती व्यक्ती सुखी , आनंदी होवू शकत नाही , अतृप्त असते हे आपणास दिसून येते.

सुख भोगण्यापेक्षा सुखप्राप्ती होण्यासाठी प्रथम ते सुख ते सुखऐश्वर्य म्हणजे काय ? हे समजणे महत्वाचे असते. आपण एक गोष्ट ऐकली आहे… आपण कधीकधी विनाकारण दुःखी होतो. आपल्या समोर आलेला एक पाण्याचा ( सुखाचा ) ग्लास अर्धाच आला आहे हे पाहून आपण दुःखी होतो पण किमान अर्धा ग्लास तरी आपल्या समोर आहे , रिकामा तर नाही अशी कल्पना करून आपण त्या अर्धा ग्लासात सुख समाधान कां ? मानत नाही . हा महत्वाचा विषय आहे. दुसरे अगदी रखरखीत तळपत्या भरउन्हात शरीराची लाही लाही होत असताना एखादी हलकीशी थंड वाऱ्याची झुळूक आली किंवा एखाद्या वृक्षाची थंडगार सावली आपल्याला मिळाली किंवा घोटभर पाणी मिळाले तर जी अनपेक्षित सुखशांती लाभते ते सुख समाधान शब्दात व्यक्त करता येत नाही . किंवा एखाद्या दुःखद प्रसंगी कुणाचा अनपेक्षित प्रेमस्पर्शाचा आधारभूत हात जर सांत्वन म्हणून आपल्या पाठीवर पडला तर आपण सर्व वेदना विसरून जातो . या अशा अदृश्य सुखाच्या व्याप्तीचा अर्थ आपण समजून घेणे महत्वाचे आहे.

सुखाची समाधानाची व्याख्या ही व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. सुख कधी पैशावर , संपत्तीवर कधीच अवलंबून नसतं.

खर तर आपल्यावर निर्व्याज प्रेम करणारी , निर्मळ मैत्र भावनां असणारी , आपल्याला सदैव मानसिक आधार देणाऱ्या व्यक्ती ही आपली खरी समाधानी संपत्ती आहे. आणि ती संपत्ती आपल्याला भाग्यानेच लाभते. त्यासाठी आपले पूर्वकर्म चांगले असावे लागते. म्हणून या जन्मात नित्य सत्कर्म करून संचित रचत जावे असे म्हणतात.

प्रत्येक संतांनी आपल्या संतवाङ्मयात याचे अत्यन्त सुंदर विवेचन केले आहे. दृष्टांतही दिलेले आहेत . हे आपल्या दृष्टोत्पत्तीस येते.
या सृष्टीत शाश्वत सुख आणि अशाश्वत सुख ( म्हणजेच ऐहिक सुख आणि भौतिक सुख ) असे दोन प्रकार आहेत. *सर्वांती भगवंताचे चिंतन मनन हे एक सात्विक सुख ( समाधान ) शाश्वत मानले आहे. आणि भौतिक सुखाला अशाश्वत ( क्षणभंगुर ) सुख मानले आहे.

अनेक पौराणिक कथानकातून , संतमहंतांच्या विचारातून आपल्याला त्याचे दृष्टांत प्रत्ययास येतात. म्हणूनच आपण प्राप्त परिस्थीतीत त्या अनामिक भगवंतावर श्रद्धा ठेवून जीवनात समाधानी राहून सातत्याने सात्विक शाश्वत सुख शोधण्याचा अविरत प्रयत्न करीत रहाणे महत्वाचे आहे. आपण स्वतः आत्ममुख होवून आपल्यातील सुसंस्काक्षम निर्मोही परिपूर्णतेचा ध्यास घेतला पाहिजे मग त्यातूनच आपल्याला सुख समाधानाची , आत्मानंदी , आत्मसंतुष्टता प्राप्त होते. आणि केवळ निर्मळ समाधानाची प्रचिती येते.

समाधान हे दातृत्वात आहे , त्यागात आहे , निष्काम प्रेमात आहे. भगवंताच्या भक्तीत , नामस्मरणात आहे. आणी म्हणूनच समाधान ही असीम तृप्ततेची सांगता आहे. आत्म्याची परमानंदी अवस्था आहे. समाधानी व्यक्तीला संतत्वाची झालर असते आणि ती व्यक्ती आपल्या निरपेक्ष आणि भावनिक वृत्तीने स्वभावाने सभोवतालचे वातावरण प्रसन्न करीत असते..म्हणूनच समाधान हा ईश्वरीय सद्गुण आहे.

इती लेखन सीमा……
वि.ग.सातपुते.( साहित्यिक )

संस्थापक अध्यक्ष:-
महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे. मुंबई प्रदेश , ठाणे , मराठवाडा ( महाराष्ट्र )
9766544908

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..