नवीन लेखन...

साईनाचे चायनादहन !

भारताची अव्वल बॅडमिटनपटू साईना नेहवाल हिने ‘हाँगकाँग सुपर सिरीज’ स्पर्धा जिंकून मोठा पराक्रम केला. चीनच्या खेळाडूंवर विजय मिळवणे अशक्य असल्याचा समज खोटा ठरवताना तिने चीनच्याच शिझियान वँग या खेळाडूवर मात केली. या विजयाद्वारे तिने चिनी खेळाडूंच्या योजना अचूक ओळखून त्यावर आपली बिनतोड योजना अंमलात आणली. या स्पर्धेत तिने चिनी खेळाडूंचा ‘कोड क्रॅक’ केल्याचे बोलले जाते.

बॅडमिंटनविश्वात चीनच्या महिला खेळाडूंनी चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. गेली अनेक वर्षे जागतिक क्रमवारीत पहिल्या दोन स्थानांवर चिनी महिलांचेच अस्तित्व दिसून येते. पण, नजिकच्या भूतकाळात साईना नेहवाल या भारतीय बॅडमिंटनपटूने जागतिक स्तरावर झपाट्याने प्रगती केली आहे. तिचे आजवरचे सर्वोत्तम मानांकन दुसरर्‍या क्रमांकाचे राहिले आहे. सर्वत्र उच्च खेळ करूनही ती चिनी खेळाडूंपुढे फिकी पडते असा अनेकांचा आक्षेप होता. परंतु, साईनाने नुकतीच हाँगकाँग खुली बॅडमिंटन स्पर्धा जिकून असा आक्षेप घेणार्‍यांना चोख उत्तर दिले आहे. हाँगकाँग खुल्या स्पर्धेत तिने चीनच्याच शिझियान वँगला 15-21, 21-16, 21-17 असे पराभूत करून या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

चिनी खेळाडूंना हरवणे अशक्य नसल्याचे साईनाने सिद्ध केले आहे. चिनी खेळाडूंच्या खेळातील डावपेच उलगडून त्यांना हरवणे शक्य आहे पण त्यासाठी अंगी आत्मविश्वास असायला हवा, असे साईना म्हणते. एखाद्या खेळाडूचा खेळ उलगडणे शक्य झाले म्हणजेच आजच्या संगणकीय भाषेत त्यांचा कोड क्रॅक केला की, त्यांच्या प्रत्येक डावपेचाला कसे प्रत्त्युत्तर द्यायचे हे ठरवणे सोपे जाते. साईनाने हाँगकाँग खुली स्पर्धा जिंकताना नेमके हेच केले. कोड उलगडण्याबरोबरच तिच्याकडे प्रचंड आत्मविश्वास आणि प्रत्येक डावपेचाला उत्तरही होते. त्यामुळे हे शक्य झाले. साईनाच्या मते, चिनी खेळाडू
ना मैदानावर हरवणे ही सर्वात अवघड बाब असली तरी त्यांची खेळण्याची पद्धत समजून घेणे अतिशय सोपे आहे. चिनी खेळाडू नेहमी एकाच योजनेनुसार (प्लॅन ए) खेळण्याचा प्रयत्न करतात. त्यात काही अडचण

आली तर त्यांच्याकडे दुसरी योजना (प्लॅन बी) तयार असते. ही दुसरी योजना सहसा चुकत नाही. त्यामुळे त्यांना या योजनेच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची सवयच नाही. साईनाने चिनी खेळाडूंच्या या दोन्ही योजनांचा सखोल अभ्यास केला आणि या दोन्ही योजनांवर अचूक उत्तरे शोधून काढली. साईनाने शिझियान वँगच्या सर्व डावपेचांना योग्य उत्तर दिले आणि स्वत:ची तिसरी योजना (प्लॅन सी) वापरून तिच्यावर मात केली.

साईनासाठी हाँगकाँग खुल्या स्पर्धेचे विजेतेपद सर्वात महत्त्वाचे आहे. या वर्षी तिने ‘इंडियन ओपन ग्रां. प्री’, ‘सिंगापूर ओपन सुपर सिरीज’, ‘इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज’ या बॅडमिटनमधील ग्रॅंडस्लॅम समजल्या जाणार्‍या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतही विजेतेपद मिळवले आहे. पण, चीनमधील आशियाई स्पर्धेत तिची कामगिरी अगदीच सुमार झाली. या स्पर्धेत तिला उपांत्यपूर्व फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. या कामगिरीमुळे तिला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. बँडमिंटनच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेतही (वर्ल्ड चॅम्पियनशीप) ती उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाली. या स्पर्धांमधील अपयश तिच्या जिव्हारी लागले होते. हाँगकाँग ओपन सुपर सिरीज स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या पुई इन पिप हिच्यावर मात केली. हाँगकाँगच्या या खेळाडूने आशियाई स्पर्धेत साईनाला हरवले होते. अंतिम सामन्यात शिझियानवर मात करून विजेतेपदावर नाव कोरतानाच तिने जागतिक विजेतेपद स्पर्धेतील पराभवाचा काटा काढला. या स्पर्धेत तिला शिझियानकडूनच हार पत्करावी लागली होती. या दोन्ही स्पर्धकांवर विजय मिळवल्यामुळे हाँगकाँग खुल्या स्पर्धेतील विजेतेपद साईनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे.

साईना म्हणते, ‘आशियाई स्पर्धेत पराभव झाल्याने मी निराश झाले होते. त्यामुळे माझ्यासमोर या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे मोठे आव्हान होते. मी इंडोनेशिनय ओपन सिरीज स्पर्धा जिंकली त्यावेळी त्या स्पर्धेतून अनेक चिनी खेळाडूंनी माघार घेतली होती. त्यामुळे अनेकांनी या विजेतेपदाचे श्रेय मला दिले नाही. परंतु, आता पीप आणि वँग या खेळाडूंना हरवून विजेतेपद मिळवल्याने या वेळी तरी अशी टीका होणार नाही असे वाटते.’

या सामन्यातील पहिला गेम गमावल्यानंतर साईनाने आपल्या नेहमीच्या खेळात बदल करून जोरदार स्मॅशऐवजी दीर्घकाळ चालणार्‍या रॅलिजवर अधिक भर दिला. याचा तिला फायदा झाला पहिल्या गेममध्ये सुरुवातीला 5-5 आणि 7-7 अशी परिस्थिती होती. परंतु, त्यानंतर कोर्टाच्या वेगवान बाजूने खेळणार्‍या साईनाचे लिफ्ट्स बाहेर जाऊ लागले. तसेच तिला शटलवर नियंत्रण ठेवणे अवघड जाऊ लागले. बरेचदा प्रतिस्पर्ध्याच्या फटक्यांबद्दल तिचे अंदाजही चुकले. शटल बाहेर जात आहे असे वाटतानाच ते कोर्टावर पडत होते. दोन्ही खेळाडूंनी कोर्टाच्या बाजूंची अदलाबदल केल्यानंतर साईनाने वर्चस्व मिळवले. तिने शिझियानला चुका करण्यास भाग पाडले. चार-पाच अशी पिछाडीवर असताना साईनाने सलग पाच गुण घेऊन 11-5 अशी आघाडी घेतली. परंतु, शिझियानने पुन्हा चांगला खेळ करत ही आघाडी 10-11 अशी कमी केली. तिसर्‍या गेममध्ये शिझियान 14-13 अशी आघाडीवर होती. परंतु, साईनाने सलग पाच गुण घेत आघाडी मिळवली. यावेळी पंचांचा एक निर्णय (लाईन कॉल) तिच्याविरुद्धही गेला. परंतु, अशा चुकीच्या निर्णयामुळे निराश न होता खेळावर लक्ष केंद्रीत करायला हवे असे साईनाचे मत आहे. तसे झाले नाही तर खेळ हातून निसटण्याचा धोका असतो. या मोक्याच्या वेळी तिचे स्मॅश, नेट ड्रिबल आणि ड्रॉप हे फ
के मदतीला आले आणि तिने 19-16 अशी आघाडी घेतली.

साईना म्हणते, ‘हा सामना फारच अवघड होता. बरेचदा तो हातातून निसटतो की काय असे वाटत होते. परंतु, तिने मोक्याच्या क्षणी आत्मविश्वास न गमावता निर्धाराने खेळ केला आणि विजेतेपद खेचून आणले.’ तिचा मार्गदर्शक पुल्लैला गोपीचंद यानेही या विजयाबद्दल साईनाचे विशेष कौतुक केले आहे. या सामन्याद्वारे साईनाने कौशल्य आणि मानसिक कणखरपणाचे प्रदर्शन केल्याचे त्याचे म्हणणे आहे. आशियाई स्पर्धेच्या काळात साईनाने काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जागतिक क्रमवारीत तिची दुसर्‍या

स्थानावर चौथ्या स्थानावर घसरण झाली होती. या विजयामुळे तिची पुन्हा अव्वल स्थानाकडे आगेकूच सुरू झाली असून लवकरच ती पहिल्या स्थानावर विराजमान होईल असा सर्वांना विश्वास आहे.

— महेश जोशी
(अद्वैत फीचर्स)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..