(हा लेख माझ्या कालच्या ‘भ्रमर’ या लेखावर आलेल्या अनेकांच्या प्रतिसादामुळे लिहीला गेलाय.)
प्रामाणिकपणा ह्या गुणाबद्दल (की दुर्गुणाबद्दल?) मला जबरदस्त कुतूहल आहे. प्रत्येकात प्रामाणिकपणा असायलाच हवा असा माझा आग्रह असतो. पण प्रामाणिक असण्यातं व्रत हे बोलायला सोपं असलं, तरी आचरणात आणायला अत्यंत अवघड असतं. अवघड असतं, अशक्य नसतं, मात्र त्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असावं लागतं. हे एक तप आहे, ते कोणाही ‘हुशार’ माणसाला जमत नाही, येरा-गबाळ्याला मात्र चटकन जमतं. असंही प्रामाणिक माणूस ‘येडा’ असतो असं आपणही किती सहजपणे म्हणतो ना? जो सरकारी अधिकारी असुनही पैसे खात नाही (असा अधिकारी अजून जन्माला यायचाय, तरी), व्यसनं करत नाही, नाकासमोर बघून चालतो (नाक अखिलेश यादवसारखं नसतं बरं का.।!) तो प्रामाणिक म्हणजे वेडा असतो आणि वेड्यांना कुठे लाजलज्जा असते असं आपणच नाही का ठरवलं..?
प्रामाणिकपणे वागायचं तर अनेकांच्या रागाचं धनी व्हावं लागतं, वैयक्तिक फायद्यांना तिलांजली द्यावी लागते आणि अशा अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. मुख्य म्हणजे आपण जसं नसतो, तसं आहोत हे दाखवण्याची सवय सोडून, जसं आहोत तसंच समोरच्याला स्वत:ला प्रेझेन्ट करावं लागतं. कोणता स्मार्ट, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेला, अति उच्चशिक्षित, महत्वाकांक्षी माणूस असं करेल हो? आणि सध्याच्या आतल्या वस्तूपेक्षा चकचकीत पॅकींगलाच महत्व असलेल्या दिवसांत, तर असं करणं म्हणजे सर्व बीयी, यमयस, यमबीये वैगेरे पर्यंतचं शिक्षण म्हंजे पाण्यातच गेलं की हो..!
प्रामाणिकपणे वागायचं, तर प्रथम निर्लज्ज बनावं लागतं ही महत्वाची अट आहे. मी पैसे खात नाही हे सांगायला सध्याच्या दिवसात निर्लज्जपणाच लागतो. प्रामाणिकपणा दोनच गोष्टींत असतो. एक स्वत:शी प्रामाणिक असणं अन् दुसरं म्हणजे दुसऱ्याशी प्रामाणिक असणं. दुसऱ्याशी प्रामाणिक असण्यासाठी प्रथम स्वत:शी प्रामाणिक असावं लागतं. स्वत:शी, स्वत:च्या विचारांशी जो प्रामाणिक असतो, तो दुसऱ्यांशी प्रामाणिक असतोच, त्यामुळे मी या लेखात स्वत:शीच असणाऱ्या प्रामाणिकपणाबद्दल लिहीणार आहे.
स्वत:शी प्रामाणिक असणं म्हणजे काय, तर आपले जे विचार आहेत, ते जसे आहेत तसे सांगणे आणि अर्थातच तसं वागणंही. ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाणं’ असं स्प्लीट वागणं उपयोगाचं नाही. आपण नेहेमी काही बोलताना, ‘त्याला काय वाटेल’ हा विचार करतो व आपल्याला मनातून आणि मनापासून जे वाटत असतं, पटत असतं, ते बोलत नाही. मनातून आपल्याला अनेक गोष्टी कराव्याश्या वाटत असतात, परंतू क्षणाक्षणाला वेगवेगळे मुखवटे घालून खोटं खोटं जगायची सवय लागलेल्या आपल्याला, तसं करता येत नाही हे सोडाच, आपल्याला पटलेलं खरं खरं बोलताही येत नाही. बोलायचं किंवा करायचं ते ‘वाहऽऽवा’ किंवा टाळ्या मिळवण्याकरता किंवा दुसऱ्याला आवडावं म्हणून. वाहवा किंवा टाळ्या क्षणिक असतात तर प्रामाणिक विचार शाश्वत याचा विचार कुणीच करत नाही.
वर म्हटल्याप्रमाणे प्रामाणिकपणे वागायचं, तर प्रथम निर्लज्ज बनावं लागतं प्रामाणिकपणा आणि निर्लज्जपणा यांची जोडी सयामी जुळ्यांसारखी असते. एकमेकाला घट्ट चिकटलेल्या सयामी जुळ्यांच्या शरीरात, एकाचं शरीर कुठं संपतं, आणि दुसऱ्याचं कुठं सुरू होतं हेच कळत नाही, तसं प्रामाणिकपणा आणि निर्लज्जपणा यांचं नातं असतं. निर्लज्जपणा हा खरा तर प्रामाणिकपणाचाच समानार्थी शब्द असावा असं मला वाटतं. किंबहूना ते दोनही शब्द एकच आहेत असं मी मानतो. मग त्यांच्यात नक्की फरक काय?
तुम्ही, म्हणजे आपण, कधी प्रामाणिक असतो आणि कधी निर्लज्ज, हे काही नात्यांवर अवलंबून असतं. तुम्ही, म्हणजे परत आपणच, जेंव्हा एखादं गुपित (म्हणजे चार चौघात सांगू नये अशी किंवा समाजाला मान्य नसलेली एखादी गोष्ट. कारण प्रामाणिकपणा नेहेमी वाईट ठरवलेल्या गोष्टीनेच मोजता येतो.) जवळच्या मित्राला सांगतो, तेंव्हा आपण प्रामाणिक असतो, आपल्याही दृष्टीने व त्याच्याही..! इथं आपण मित्राच्या ‘क्या बिनधास्त बोलता है यार’ अश्या कौतुकाचा भाग होतो. आता तिच गोष्ट जेंव्हा आपण आपल्या घरच्यांना बिनधास्त सांगतो, तेंव्हा आपण आपण ती प्रामाणिकपणेच सांगत असतो, पण घरच्यांच्या दृष्टीने तो निर्लज्जपणा ठरतो. ‘काय मेलो वर तोंड करून सांगताहा’ हा घरचा अहेर प्रामाणिकपणाशी केलेल्या लग्नात वर मिळतो. म्हणजे नातेसंबंधानुसार प्रामाणिकपणात, प्रामाणिक ते निर्लज्ज एवढा फरक पडतो. फरक पडला तरी ते दोन्ही एकच आहेत, दोन वेगळे दिसतात ते बघणाऱ्याच्या दृष्टीला..!
मित्र आणि घरचे यांच्या व्यतिरिक्त आपलं आणखी एक नातं असतं, ते म्हणजे समाजाशी. समाजाला, खरं तर, आपण खरं सांगीतलेलं नको असतं तसंच खोटही नको असतं, समाजाला, खरं म्हणजे, समाजाला आवडेल तेच ऐकायला हवं असतं.
पुढे जाण्यापूर्वी समाज म्हणजे कोण हे ही थोडं स्पष्ट करणं गरजेचं आहे. मी राहातो त्या मुंबंई शहराची लोकसंख्या साधारण १ कोटी २५ लाख आहे व माझं घर असलेल्या दहिसर या उपनगराची लोकसंख्या असेल दोनेक लाख. मुंबई शहर सोडून द्या, पण दहिसरची दोनेक लाख लोकसंख्या माझ्यासाठी समाज झाला. पण तो ‘माझा समाज’ आहे का? तर नाही. माझ्यासाठी ‘समाज’ म्हणजे, मला जे लोक किंवा जो लोकांचा ग्ट ओळखतो किंवा मी ज्या ज्या व्यक्तींना ओळखतो, त्या लोकांचा गट म्हणजे ‘माझा समाज’. असे फार तर पाचेकशे लोक असतील. त्यातही जवळून ओळखणारे शंभरेक, बाकीचे चारेकशे फक्त ओळखणारे. दहिसरचे असे पाचेकशे लोक सोडले तर उर्वरीत लोक माझ्यासाठी ‘माझा समाज’ होत नाहीत व त्यांना मी बोलण्या-वगण्यात प्रामाणिक आहे अथवा नाही याचा काही फरक पजत नाही आणि अर्थात मलाही पडत नाही. (समाज ही संज्ञा एका मोठ्या जनसमुदाया संदर्भात वापरली आहे, ज्ञाती’ या अर्थाने नव्हे.)
जे फक्त ओळखणारे असतात त्यांची आपण फारशी काळजी करत नाही पण जे जवळून ओळखतात, त्यांची मात्र काळजी करावी लागते. उदा. मी सिगारेट पितो ती अगदी आजूबाजूच्या, मी अजिबात ओळखत नसलेल्या, लोकांची फिकीर न करता उघडपणे पितो. पण मी तशी सिगारेट पिताना माझ्या ओळखीचं कोणी येताना दिसलं, की माझ्या हातातली सिगारेट मी त्याला न दिसेल अशी पकडतो. तर अगदी जवळून ओळखणारा येताना दिसला, तर मात्र हातातली सिगारेट चक्क फेकून देतो. म्हणजे मी ‘माझ्या’ समाजाशी मी कसा आहे या पेक्षा कसा नाही हेच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मला असं नाही म्हणायचंय की सर्वच असं करत असतील, मात्र बहुसंख्य असंच करत असतात. आता हेच मी उलट केलं तर? मी सिगारेट पितोय, अनोळखी, ओळखीचं किंवा अगदी जवळून ओळखणारं कुणी येतंय व मी त्यांच्यासमोर बिनधास्त सिगरेट पित उभा राहीलो, तर मी जसा आहे तसाच, म्हणजे प्रामाणिक, वागत असतो, मात्र त्यांच्या नजरेत मात्र निर्लज्ज ठरतो. याचा अर्थ प्रामाणिकपणा व निर्लज्जपणा करणाराच्या आणि बघणाराच्या किंवा बोलणाराच्या व ऐकणाराच्या नात्यावर अवलंबून असतो असं म्हणायला हरकत नाही.
मित्र सोडले तर घरचे व समाजातल्यांशी बहुतेकजण स्वत:शी प्रामाणिक नसल्यासारखेच वागत असतो. जसं नाही तसं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही प्रामाणिक वागण्याचं ठरवलंत तरी मित्राव्यतिरिक्तचे नातेसंबंध तुम्हाला तसं करू देत नाही आणि मग त्यातून खोटेपणाची एक साखळी तयार होत जाते. मारुतीच्या मुर्तीवर शेंदराचे लेपच्या लेप चढत जावेत व मुळ मुर्ती कशी आहे याचा थांगपत्ता लागू नये अशी मग गती होऊन जाते.
माझा कालचा ‘भ्रमर’ हा लेख असाच प्रामाणिकपणाने लिहीला होता. त्या लेखावर आलेल्या प्रतिक्रांमुळे अंतर्मुख होऊन मी हा लेख लिहीलाय. मला निर्लज्ज बनायला आवडेल.
-नितीन साळुंखे
9321811091
छान वाटला लेख…. मस्त लेखन
प्रामाणिक व्यक्ती होणे घडणे स्वतः ला घडविणे एक तप व्रत आहे सन्यास आहे