नवीन लेखन...

ओवाळूं आरती : भाग – ३/५

भाग – ३

आपण आरतीची कांहीं वैशिष्ट्यें पाहूं या.

  • आरतीत आराध्य/उपास्य दैवताचें वर्णन असतें, जसें गणपतीच्या आरतीत, रत्नखचित फरा, चंदनाची उटी, हिरेजडित मुकुट, पायीं घागर्‍या, पीतांबर, इत्यादी वर्णन केलेलें आहे ; शंकराच्या आरतीत, विषें कंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा, व्याघ्रांबर, वगैरे वर्णन आहे ; विठ्ठलाच्या आरतीत, पीतांबर, तुलसीमाळा, कटीवर हात, इत्यादी वर्णन आहे .
  • आराध्य/उपास्य हें ‘संत’ असल्यास, त्या संताच्या कृतींचे/ चमत्कारांचें वर्णन असतें . (त्यातील कांहीं वर्णन पुढे पाहूं).
  • त्याचप्रमाणें, आरतीत भक्त, ‘माझ्यावर कृपा कर’; ‘माझे क्लेशांचे हरण कर’ , ‘मला भवसागराच्या पल्याड ने’ , ‘ माझे भव-पाश तोड’ ; ‘माझा जन्म-मरणाचा फेरा चुकव’, अशा प्रकारची विनवणी करत असतो.
  • मुख्य म्हणजे, सर्वसाधारणपणें आरतीत आराध्याचा ‘जयजयकार’ असतो. या जयकारामुळे, व / किंवा, ‘आरती’ अथवा ‘ओवाळणें’या शब्दाच्या वापरामुळे, तें पद्य, प्रार्थना किंवा भजन वगैरे न ठरतां, ‘आरती’ अशा अभिधानांतर्गत रचना ठरते.

‘चमत्काराशिवाय नमस्कार नाहीं’ अशी म्हणच आहे. संतांच्याशी संबंधित असे अनेक चमत्कार वर्णलेले असतात, जसें ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, भिंत चालवली ;  विठ्ठल स्वत: जनाबाईला दळायला मदत करतो व एकनाथांच्या घरी श्रीखंड्या बनून पाणी भरतो ; गोरा कुंभारानें विठ्ठलनाम-म्हणतां-म्हणतां-तुडवलेली-अर्भकें, जिवंत होतात ; नामदेवांपुढे स्वत: पांडुरंग अवतीर्ण होऊन नैवेद्य खातो ; भानुदासासाठी विठ्ठलमंदिर फिरते, व द्वाराची दिशा बदलते ; कान्होपात्रा पंढरपुरला गेलेली असतांना विठ्ठल तिचें रूप घेऊन तिच्या घरीं रहातो, दामाजींसाठी तो ‘जोहार’ करत रकमेचा भरणा स्वत: करून येतो ,  इत्यादी इत्यादी. हे व  सर्वच चमत्कार प्रत्येक संताच्या आरतीत असतीलच असें नाहीं , पण अनेकदा त्यांचे उल्लेख दिसतात. जसें, स्वामी समर्थांवरील एका आरतीत ‘अघटितलीला करुनी’ असा उल्लेख आहे ; गजानन महाराजांवरील एका आरतीत ‘व्याधिग्रस्तां सहज बरें केलें’ असें वर्णन आहे ; ज्ञानदेवांवरील एका आरतीत ‘कनकाचें ताट करी’ असे शब्द आहेत. नृसिंह सरस्वतींवरील आरती पहा : ‘वंध्या, साठी-वर्षें पुत्रनिधान ; ‘मृत ब्राह्मण उठविला तीर्थ शिंपून’ ; ‘वांझ महिषी, काढी दुग्ध दोहून’ ; ‘अंत्यजमुखें वदवी निगमागम पूर्ण’ (निगमागम : वेदोपनिषदें-शास्त्रें) ; ‘शुष्क काष्ठीं पल्लव दावुन …’ ;           ‘कुष्ठी ब्राह्मण केला शुद्ध …’ ; ‘म्लेंछराजा येउन वंदी श्रीपायीं’ ; असे चमत्कारांचे भरपूर उल्लेख आहेत.

लहानपणीं, आरती म्हणतांना असा, चमत्कारांच्या उल्लेख आल्यावर, खूप  impress व्हायला होत असे. आजही त्या उल्लेखामुळे, भाविकांची भक्तती वाढत असेल.

(जातां जातां  :   चमत्कारांची चर्चा करतांना, आपण एका गोष्टीची नोंद घेऊं या. अशाच प्रकारें, येशू ख्रिस्ताच्या बाबतीत, महारोगी बरें केल्याच्या आख्यायिका आहेत. रोमन कॅथॉलिक ख्रिस्ती पंथात, जर एखाद्या व्यक्तीला ‘संतपद’ बहाल करायचें असेल तर, त्या व्यक्तीच्या नांवावर किमान दोन चमत्कार नोंदलेले असणे आवश्यक आहे ( a must). हल्लीच, मदर तेरेसा यांना (त्यांच्या मृत्युच्या पश्चात्)  ‘संतत्व’ पोपनें प्रदान केले. त्यासाठी मदर तेरेसांच्या नांवावर २ चमत्कारही नोंदले गेले. खरें तर, मदर तेरेसा यांचे humanitarian कार्यच त्यांची महती सांगतें. चमत्कारांची काय आवश्यकता ? मात्र, याचा अर्थ एवढाच की, ख्रिश्चन चर्चमध्येसुद्धा ,  चमत्कारांना महत्व आहे. हिंदूमध्ये तरी ही ‘चमत्कार नोंदवण्याची प्रवृत्ती’ मध्ययुगीन आहे, जी हल्ली दिसत नाहीं; मात्र रोमन कॅथॉलिक चर्च अजूनही त्याच मनोवृत्तीत आहे.असो).

कदाचित थोडें विषयांतर वाटेल, पण आपण हें ध्यानीं घेऊं या की, ‘म्लेंछराजा येऊन वंदतो’  हाही एक चमत्कार म्हणूनच गणलेला आहे. या वंदन-कृतीचें  विश्लेषण आपण धार्मिक दृष्टिकोनाऐवजी सामाजिक दृष्टिकोनातून केलें तरी चालेल. तत्कालीन हिंदू लोक मुस्लिम पीरांचें दर्शन घेत, त्याना ‘मानत’, त्यांना नवस बोलत. ( अगदी ओळखीचें उदाहरण द्यायचें झाले तर, छत्रपती शिवरायांचे पिता शहाजी — शाहजी —- व काका शरीफजी , या दोघांची ही नांवे, ‘शाह शरीफ’ या पीराच्या नांवावरून ठेवलेली आहेत ).  मात्र, मध्ययुगीन- मुस्लिम असे हिंदू विभूतींच्या पायीं वंदन करत नसत.  त्यातून, ही वंदणारी व्यक्ती,   कुणी साधारण व्यक्ती नसून ‘राजा’ आहे. अर्थात्, ‘राजा’ म्हणजे आदिलशहा, कुतुबशहा किंवा निजामशहा नव्हे, कारण तसें असतें तर, कुठेतरी तवारीखांमध्ये ,बखरींमध्ये किंवा तत्कालीन अन्य एखाद्या अन्य गद्य-पद्य रचनेत अथवा ‘रेकॉर्ड’मध्ये त्याचा उल्लेख आला असता. मात्र, त्या काळीं सरदारांनाही ‘राजे‘ म्हणत असत, व हे आदिलशहादि ‘शहा’ आणि मुघल पातशहाही सरदारांना  ‘राजा’, ‘महाराजा’ असा किताबही (ख़िताब) देत असत. (पुढे खुद्द शिवरायांनाही औरंगझेबानें ‘राजा’ हा किताब दिला होता. त्यानंतर कांहीं वर्षांनी शिवराय राज्याभिषेक करवून घेऊन खरेखुरे ‘महाराज’ झाले). शिवरायांचे आजोबा हे लखुजी जाधवराव या निजामशाही सरदाराच्या पदरीं ‘सरदार’ असतांना ‘मालोजी राजे’ म्हणून ओळखले जात. शिवरायांचे पिता शहाजी हेही शहाजीराजे म्हणूनच ओळखले जात. शिवरायही बराच काळ ‘शिवाजी राजे’ म्हनूनच ओळखले जात. शिवकालींच, आदिलशाहचे सरदार असलेले जावळीचे मोरेही ‘राजे’ या नांवानें ओळखले जात असत ( तसेच, इतर वतनदारही ). जावळीचे चंद्रराव मोरे यांनी शिवरायांना लिहिलेल्या पत्राचा हा एक भाग पहा –  ‘तुम्ही काल राजे जाहला. तुम्हांला राज्य कोणे दिधलें ? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलियावरी कोण मानितो ? ……. आम्ही कोंकणचे राजे असून आमचा राजा श्रीमहाबळेश्वर. त्याचे कृपेनें राज्य करतो. आम्हांस श्रीचे कृपेनें पादशहानें राजे किताब, मोरचेल, सिंहासन मेहेरबान होऊन दिघले. … ’ .

थोडक्यात काय, तर हा म्लेंछ ‘राजा’, (म्हणजेच, कुणीतरी मोठा म्लेंच्छ सरदार) येऊन त्या संताला वंदन करतो, हा एक चमत्कारच गणायला हवा, व हें त्या संताच्या थोरवीचें द्योतक म्हणायला हवें, असें आरतीच्या रचयित्याला वाटल्यास नवल नव्हे.

आपण हें ध्यानात ठेवायला हवें की, या तर्‍हेचें चमत्कृति-वर्णन, प्रत्यक्ष त्या त्या संतांनें स्वत: आरतीत लिहिलेलें नाहीं ;  तर, तें फक्त त्या त्या भक्ताच्या श्रद्धेचें  प्रगटीकरण आहे.

*

(पुढे चालू )

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365.  M – 9869002126  .   eMail  : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

लेखकाचे नाव :
सुभाष स. नाईक
लेखकाचा ई-मेल :
vistainfin@yahoo.co.in
सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..