नवीन लेखन...

निरोप्या!

“हणम्या, जरा चहा पाण्याचं बघ! दिवस हातभर वर आलाय. ऊन तापायच्या आधी रानात खेटा मारायचाय!”

हानाम्याने लगबगीने मालकाच्या पुढ्यात, लाल भडक तांब्याचा लोटा अन तांब्याचाच वीतभर उंच पेला ठेवला. पुन्हा घरात फेरी मारून, ताज्या दुधाचा, विलायची-अद्रक घातलेला, वाफाळलेला चहाचा कप आणला.

उंच्यापुऱ्या भारदस्त विष्णुपंतांनी शेजारच्या तांब्याच्या पेल्यातले पाणी, तोंड वर करून नरड्यात ओतले. पांढऱ्याशुभ्र धोतराच्या सोग्याने, ओल्या मिश्या साफ केल्या. गरमागरम चहा बशीत ओतून मन लावून पिला. चहा पिताना, अभिमानाने आपल्या वाडलोपार्जीत, भव्य दगडी तटबंदी असलेल्या वाड्यावरून समाधानाने नजर फिरावी. हत्तीवर अंबारीत बसून त्यांचे पूर्वज, या समोरच्या वीतभर रुंद भरीव लोखंडी दाराच्या कमानीतून येत असत! एखाद्या किल्ल्याला लाजवील असा त्यांचा वाडा होता. एके काळी पंचक्रोशीतली सगळी जमीन त्यांची होती! आता फक्त शंभर एकर शिल्लक होती. तरी पंत समाधानी होते! गावात मान राखून होते. त्यांच्या शिवाय गावचे पान हलायचे नाही.
ओसरीवरल्या शिसवी बंगईत बसून, त्यांनी चांदीचा पानपुडा जवळ घेतला. घुंगराच्या आडकित्याने, छालीया सुपारीचा पसाभर कातर तोंडात टाकला, चुना आणि सुगंधी तंबाखूचा बार भरून, त्याचा स्वाद बराचवेळ तोंडात घोळत ठेवला. त्यांचे डोळे आपसुख मिटले.
कोणी तरी आल्याची त्यांना चाहूल लागली. मोठ्या कष्टाने त्यांनी डोळे उघडले.
अंगणात तो उभा होता. खाली मान घालून. आदबीने. काळाकुट्ट, वाळलेल्या बाभळीच्या खोडासारखे टणक हात-पाय, खप्पड गाल. डोक्याला मळकट पागुट, अंगात मुंडीछाट कोपरी, गुढग्याच्या थोडे खाली आलेले डबल काष्ट्याचे धोतर, तेही मळकट. कमरेला करंगळी एव्हडा जाड करदोडा आणि त्याला लटकलेली बंद्या रुपया एवढी चांदीची पेटी! हाती भरीव वेळूची काठी. उजव्या पायात नजरेत भरणारा चांदीचा घनसर तोडा. त्याची काटकता पाहणाऱ्याच्या नजरेत भरल्या शियाय रहात नव्हती.
बंगईवरून उठून, पंतांनी कोपऱ्यात जाऊन तोंड मोकळे केले. लोट्यात राहिलेल्या पाण्याने चूळ भरली.
“कोण रे तू ?” पंतांनी घसा साफ करून, अंगणातल्या अनोळखी माणसाला विचारले.
“जी, मी निरोप्या हाय!” तो जमिनीकडे पहात नम्रपणे म्हणाला. त्याचा आवाज खोल विहिरीतून आल्या सारखा गार आणि घुमल्या सारखा होता. किमान पंताला तरी तसे वाटले.
“निरोप्या? काय निरोप आहे? आन कुणाचा?”
“जी, तुमासनी आमच्या मालकांनी बोलिवलंय!”
निरोप्या बाळगणारा, पंताशिवाय या पंचक्रोशीत कोणच नव्हते. असा कोण तालेवार असेल, जो मुद्दाम माणूस पाठवून बोलावतोय? पंत क्षणभर विचारात पडले.
“कोण आहे तुझा मालक?”
“जी, आम्ही चाकर मानस, मालकाचं नाव ठाव नाई! अन असलं तरी, आमी आमच्या तोंडानं ते घेत नाई. वडिलोपार्जित तसा रिवाज हाय! पर आसपासची मानस त्यासनी ‘देव’ म्हणत्यात. तुमि येताव नव्ह?”
हे मात्र खरे होते. खानदानी चाकर आपल्या मालकाचे नाव कधीच आपल्या तोंडाने घेत नाहीत. हि परंपरा पंत जाणून होते.
“येतो बाबा, पण अजून काय म्हणाले तुझे मालक?”
“काय नाय! इतकाच निरोप दे मानले. अन हा, येन्याला राजी झाले तर, मातर संगच घेऊन ये, असं मला सांगतील हाय! तवा लै उपकार झाल तुमचं!”
“उपकार? अन ते कसले?”
“जी, तुमि मालकाच्या निरोपाला, ‘येताव’ मानून राजी झालात मानून!”
“बर, कोणतं गाव म्हणालास?, पत्ता काय?”
“आमचं काय गाव कंच मलाच ठाव नाई! पत्या कसा सांगू? पर वाट मातर ध्यानात हाय!”
“बघ, मला सवड असलं तेव्हा,येईन! तुला तुझ्या मालकच नाव, त्यांचा पत्ता माहित नाही, किंवा सांगता येत नाही. तू असे कर, या वाड्यातली दुपारची भाकरी खा. दिवस कलला कि परत जा! पुढच्या शनिवारी ये. मग बघू!” उपरणे झटकत पंत उठले.
संभाषण संपल्याचा संकेत त्या निरोप्याला मिळाला. तो पाठ न दाखवता चार पावले मागे गेला, आणि मग मात्र मागे वळून, ताडताड पावले टाकत दिंडी दारातून नाहीसा झाला.
पंत पायात जोडा घालून शेताकडे निघाले. पायात जोडा घालताना त्यांच्या डाव्या कुशीतून एक बारीक चमक निघाली. जाणवण्या इतपत. क्षणभर ते जागीच थांबले. फक्त क्षणभरच,मग नेहमी प्रमाणे लांब लांब ढांगा टाकायला सुरवात केली. काही तरी बिनसल्याची त्यांच्या मनाने नोंद घेतली होती.
०००
कामाच्या रगाड्यात पंत गुंतले. शुक्रवारी माळावरल्या विरोबाची जत्रा दणक्यात साजरी केली. जत्रेचे नियोजन त्यांच्याकडेच होते. हाताखाली कार्यकर्त्यांची फौज होती तरी, देखरेखीची त्यांना दमवलेच होते. भक्क लाईटीच्या उजेडात कुस्त्यांची दंगल झाली. विजेत्या मानकऱ्याला, अकराहजार रोख अन चांदीची गदा देऊन, त्यांनीच सत्कार केला. जत्रेची सांगता झाली. गुलहौशी मंडळी तमाशाच्या कानातील घुसली. पंत मात्र वाड्यावर परतले. छपरी पलंगावर पडल्या पडल्या त्यांचा डोळा लागला.
मध्यरात्री कधीतरी त्यांना जाग आली. त्यांना बेचैन वाटू लागले. पाठ अगदीच भरून आली होती. काही तरी होतय. पण काय आणि का याचा अंदाज लागत नव्हता.
“आहो, जरा उठता का? आम्हास बेचैन झाल्या सारखे वाटतंय!” त्यांनी हलकेच शेजारी झोपलेल्या रामबाईस आवाज दिला. त्या झटक्यात उठल्या.
“बेचैन?”
“होय, आणि पाठ पण भरून आलीयय!”
एकदा झोपलेले पंत, सकाळी सात शिवाय उठलेले त्यांनी आजवर कधी पहिले नव्हते. पहाडासारखा भक्कम माणूस! कधी, साधी डोकेदुखीची सुद्धा तक्रार नाही आणि आज पाठ भरून आली म्हणतोय!काय झालं?
त्यांनी लगबगीने लिंबाचे सरबत करून आणले. पंतांनी ते पिऊन टाकी पर्यंत, रमाबाईंनी गोबरगॅसच्या बर्नरवर तवा गरम करून आणला. सोबत पाठ शेकायला कापडाचा बोळा पण त्या घेऊन आल्या.
गरम शेक पाठीला दिल्याने पंतांना जरा बरे वाटले.
“मी काय म्हणते?” रमाबाई हलकेच म्हणाल्या.
“काय?”
“आता हि दगदगीचा कामे नका घेऊ अंगावर?”
“कोणती काम?— ते जत्रेचं काम ना?”
“हो! अहो, मागच्याच महिन्यात तुमच्या पन्नाशी निमित्य मी औक्षवण केलंय! आता थोडा शांतच असावं. नाही म्हणाल तरी वय वाढतच असत!”
“इतक्यात काय होतंय आम्हाला? उगाच घाबरताय तुम्ही!”
“आहो, मग हि पाठ —”
“पाठ ना? आता तुम्हाला सांगायला हरकत नाही म्हणा. काय झालं कि संध्याकाळी कुस्त्यांची दंगल होती. त्यासाठी हौद तयार करत होते, उस्तादांची पोर. लाल मातीचा वास आमच्या नाकात घुसला. मग काय? शड्डू ठोकून घेतली उडी हौदात! चार दोन डाव पहिले टाकून. आपल्या हणम्याचा पोरगा होता कि. आता सवय राहिली नाही म्हणा, त्यामुळंच पाठ भरून आली असेल.” इथपर्यंत सत्य होते. पण त्या ‘चार दोन’ डावात, हणम्याच्या पोराने दोनदा आस्मान दाखवले होते पंतांना! नाही म्हटले तरी पाठ सडकून निघाली होती!
सरबताने आणि शेकण्याने पंतांचा सकाळी सकाळी डोळा लागला.
त्या वेळेस सकाळची चांदणी उगवली होती. आणि तिला तो, काळा कुट्ट निरोप्या, ताठ मानेने वाड्या समोरच्या पिंपळाच्या पारावर हातात काठी घेऊन बसलेला, स्पष्ट दिसत होता.  त्याची नजर वाड्याच्या दिंडी दारावर खिळली होती. जणू तो ते उघण्याची वाट पहात होता!
०००
पंतांना नेहमीच्या वेळेलाच जाग आली, पण आज ते लोळत पडले, उठावेच वाटत नव्हते. पण असं लोळून कसे भागेल? तालुक्याला जायचंय, ट्रॅक्टर बघायचाय. तसे, दोन आहेत, पण अजून एक लागणारच आहे. खूप काम खोळंबलीत. या जत्रेच्या नादात चार दिवस वाया गेलं होते. अश्या विचाराने ते झटक्यात उठले. सकाळची आन्हिक उरकून ओसरीवर आले. बंगईवर बसून आपला आवडता पानांचं डबा पुढ्यात ओढला. चांगली टणक बघून, एक छलिया सुपारी डब्याच्या तळातून काढली. घुंगराचा अडकित्ता हाती घेतला, आणि त्यांचे लक्ष अंगणात गेले.
पुन्हा तोच! निरोप्या अंगणात उभा होता! खाली मान घालून!
कामाच्या रगाड्यात पंत तो निरोप्या अन त्याचा निरोप दोन्ही विसरून गेले होते. त्याला समोर पाहून त्यांच्या डाव्या कुशीतून पुन्हा चमक निघाली. ज्या दिवशी हा पहिल्यांदा भेटला होता, तेव्हा निघाली होती तशीच! पण आत्ताची थोडी ज्यास्त तीव्र होती!
“तू आलास पुन्हा?” पंत गरजले.
“जी! तुमीच ‘सनवारी ये’ मनला व्हतात!” तो नम्रतेने म्हणाला.
“आता मला वेळ नाही!”
“जी! म्या थांबतो! तुमच्या सवडीनं हुंद्या!”
तो चार पावले पाठ न दाखवता मागे गेला, आणि मग ताडताड पावले टाकत दिंडी दारातून बाहेर गेला.
पंत पुन्हा उगाच बेचैन झाले. तोवर पंढरीने जीप दारात आणली. ते त्यात बसून तालुक्याला निघून गेले.
०००
पंतांना तालुक्यातून परतायला रात्री उशीर झाला. म्हणून ते आणि पंढरी राणूबाईच्या हॉटेलात, अपेय पान आणि सामिष भोजन करूनच आले.  हे त्यांचे नेहमीचेच होते. राणूबाईच्या हातच्या कोंबडीच्या रस्स्याला आगळीच खुमारी असते, हे कोणीच अमान्य करणार नाही! त्या रश्श्यात, तिच्या हातची गरमागरम भाकरी कुस्करून खाल्यावर जे समाधान मिळत ते, रमाबाईंच्या हातच्या उकडीच्या मोदकात कुठून असणार?
पंतांनी प्रसन्न आणि तृप्त मनाने अंथरून जवळ केले. आज सगळेच त्यांच्या मनाप्रमाणे झाले होते. चार दिवसात नवा कोरा ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉल्या, आरटीओ पाससिंग करून वाड्यावर दाखल होणार होत्या. दोन दिवसांनी, शेती कॉलेजची एक टीम, माती परीक्षण आणि इतर मार्गदर्शनासाठी येणार होती. त्यांच्या कडून काय, काय माहिती घ्यायची, कोणाकोणाला या टीमचा फायदा घेऊ द्यायचा, या आणि असल्या विचारात त्यांचा डोळा लागला.
“उठा मालक! निघायचंय ना?”त्यांच्या काना जवळ कोणी तरी म्हणत होते. तो निरोप्याचा आवाज होता!थंडगार, घुमल्या सारखा!
खाड्कन त्यांनी डोळे उघडले. त्यांना स्वप्न पडले होते. दरदरून घाम आला होता! त्यांनी कपाळावरला घाम पुसला. कसला तो, फडतूस निरोप्या, आत्तापर्यंत कंटाळून निघून हि गेला असेल! उगाच आपण त्याचा आठव करतोय. म्हणून तर असली स्वप्न पडतात. आणि आपण नाहीच गेलो तर, तो काय उचलून नेणार आहे? उगाच आपण त्याची धास्ती घेतोय! त्यांनी स्वतःच्या मनाची समजूत घातली. पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप लागेना.
आजून वाड्याबाहेरच असेल का तो? थांबतो म्हणाला होता!
पंतांनी फडताळातली चार सेलची हातभार लांब बॅटरी बाहेर काढली. आणि ते दुसऱ्या मजल्याच्या माळवदावर आले. रेडिअमच्या मनगटावरल्या घड्याळात नजर टाकली. रात्रीचे दोन वाजून काही मिनिटे झाली होती. माळवदावरून, सगळीकडे पसरलेले टिपूर चांदणे दिसत होते. आकाशात चंद्र मात्र नव्हता. आमावस्या होती. चंद्र कसा दिसेल? चांदण्याच्या उजेडात त्यांनी आसपासचा परिसर न्याहाळला. सर्वत्र निबिड शांतता होती. एक सुंदर अशी चंदेरी चादर सर्वत्र पसरली होती, त्या खाली सर्व झाकून गेले होते.  वाड्यासमोरचा पिंपळ हि ध्यानस्थ होता. पंतांची नजर त्या पिंपळाच्या वरच्या टोकापासून तळाच्या पारा पर्यंत आली. तेथे कोणी तरी होते. पंतांनी हातातल्या बॅटरीचे बटन दाबून, प्रकाश झोत त्यावर टाकला.
आणि त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली!
कारण, हातात काठी घेऊन बसलेला ‘निरोप्या’ त्यांना स्पष्ट दिसत होता! झोपलेला नव्हता, तर ताठ बसलेला होता!
पंतांनी स्वतः सावरले. असे दहशतीखाली ते कधीच जगले नव्हते. सकाळी या ‘निरोप्या’चा, काय तो सोक्ष मोक्ष लावायचा! ‘निरोप्याचा’ प्रकरणाचा उद्या शेवटचा दिवस! हे पक्के ठरले!
०००
आज पंत नेहमी पेक्षा लवकरच उठले. सकाळची आन्हिक उरकून घेतली. आणि बंगईवर येऊन बसले.
“हणम्या!” त्यांनी आवाज दिला.
“जी.” हणम्या हजर झाला.
“आरे, तो परवा आलेला निरोप्या बाहेर आहे का पहा.”
“कोणता, निरोप्या मालक?” हणम्याने गांगरून विचारले.
“बेकूफ, कुठं लक्ष असत तुझं? शनिवारी मी असाच बंगईवर बसलो होतो, तेव्हा तो अंगणात उभा होता. तू केर काढत होतास. तुझ्याच तर समोरून तो आला कि, काळा, उंचेला, हातात काठी होती!”
“नाई, मालक मला काय कुणी परक माणूस नाई दिसलं!”
“बर, न दिसू दे. समोरच्या पिंपळाच्या पारावर असेल बघ बसलेला! बोलावं त्याला!”
हणम्या मुंडी हलवून निघून गेला. आणि रात्री गस्त घालणारा तुकाराम अंगणात येऊन उभा राहिला.
“काय तुका, आज सकाळी सकाळी?”
“मालक, जरा गरिबाकडं बगा कि! चार म्हयन झाली. पंचायतीतून काय पगार आली नाय! भुक्क मरायची येळ आलिया!”
“बरं, बर, गेला तालुक्याला तर, भाऊसाहेबाला भेटून येतो. तुझा विषय पण काढीन. ये तू आता!”
“जी.” मुजरा करून तो निघाला. तेव्हा हणम्या परत आला.
“भेटला का रे, तो निरोप्या?” पंतांनी विचारले.
“जी, पारावर कुणीच न्हाई! आसपास पण कुणी परका माणूस नाय घावला!”
कुठं गेला? रात्री होता आणि आता नाही!
“अरे तुका! जरा थांब!”
दारापर्यंत गेलेला तुकाराम परत फिरला.
“जी, काय मालक?”
“अरे, रात्री गस्त घालताना, तुला कोणी समोरच्या पिंपळाच्या पारावर बसलेला माणूस दिसला का?”
“नाही मालक! काल रातच्या चार फेऱ्या मारल्यात या वाड्यावरन. कोण पन नव्हतं बगा पारावर!”
हरामखोर! सगळे वेंधळे आहेत!
का, हा निरोप्या फक्त आपल्यालाच दिसतोय? आणि बोलतोय! छट! असं कस होईल? हा हणम्या अन तुक्या वेंधळे आहेत. अधून मधून गांजा पितात. त्यांचे लक्ष नसते.
तुकाराम आणि हणम्या दोघेही आपापल्या कामाला निघून गेले.
चला त्या निरोप्याची पीडा गेली, या समाधानात पंत बंगईवरून उठले आणि घरात जाण्यासाठी वळले. तेव्हड्यात मागून आवाज आला.
“मला याद केली जनु!”
तो निरोप्याचा होता! हातात काठी घेऊन तो अंगणाच्या मध्यभागी उभा होता!
पंतांनी क्षणभर त्याला डोळे भरून पहिले. हा असा अचानक कसा उगवला? आपण फक्त पाठमोरे वळलो आणि हा तेव्हड्या वेळात दिंडीदारापासून अंगणाच्या मध्यापर्यंत कसा पोहंचला?
” जा, नाही येत तुझ्या बरोबर!” पंतांनी निक्षून सांगितले.
“तुमासनी पैल इचारलं व्हतं! तुमि येतो मनालात! मला सनीवरी बलिवलंत! अन अता येत नाई? मालक, आमच्या ‘देवाचा’ इस्वास हाय तुमच्या जबानीवर! म्या काय? निरोप्या मानूस, म्हागारी जाणार अन, तुमि जबान पलटली, येतु मनून नाई आले, असाच आमच्या मालकासनीं सांगनार! बेअदबी तुमचीच हुईन मालक! तवा आनी एकवार हात जोडतो, आता माग सुरू नगा!”
हा निरोप्या बुद्धिमान होता! मूर्ख सांगकाम्या नव्हता. पंतांनी क्षणभर विचार केला. आणि निर्णय घेतला. ‘विषुपंतांनी दिलेला शब्द पळाला नाही!’ असे आजवर झाले नाही, आणि या पुढेहि होणार नाही!
“ठीक आहे! चाल तर! आज तुझ्या ‘देवाला’ भेटूनच येतो!”
“जी! म्या वाड्या भाईर हुबा हाय. येवा भिगीन!” तो नेहमी प्रमाणे चारपावले पाठ न दाखवता मागे गेला आणि मग मागे वळून ताडताड पावले टाकत वाड्या बाहेर निघून गेला.
पंतांनी मग फार वेळ गमावला नाही. समोरच्या खुंटीवरचे  उपरणे खांद्यावर टाकले. डोक्यावर फेटा घातला. देवळीतले जोडे काढून जमिनीवर ठेवले आणि त्यात पाय सारले. सवयीने वाड्यावरून नजर फिरवली. थोडे रेंगाळल्या सारखे झाले. पण असे रेंगाळून चालणार नव्हते. लवकरात लवकर परत येण्यासाठी लवकर जाणे गरजेचे होते.
“हणम्या, आम्ही जाऊन येतोय. जेवण वेळेपर्यंत येतोच. पण उशीर झाला तर, मुक्कामी वाड्यावर येतोय!, घरात निरोप दे!” दिंडी दाराकडे झपाझप पावले टाकत, पंतांनी अंगणाच्या कोपऱ्यात काम करणाऱ्या हणम्याला, थोडे मोठ्या आवाजात बजावले.
दिंडी दारातून एक पाय बाहेर टाकला, घाईघाईमुळे धोतराचा काठ पायाच्या अंगठ्यात अडकला. त्यांचा तोल गेला.
“मालsss क!” मागून हणम्या ओरडला.
०००”दम्मान घ्या मालक!” पण दाराबाहेर उभा असलेल्या त्या निरोप्याने त्यांना लगेच सावरले!
पंतांनी त्याचा हातात आपला हात दिला. त्याच्या भक्कम आधाराने ते चटकन सावरले. त्याचा तो स्पर्श, आश्वासक आणि सरंक्षक होता. हा सोबत आहे तो पर्यंत घाबरण्याचे कारण नाही. याच्या सानिध्यात आपण पूर्ण सुरक्षित आहोंत. हि भावना पंतांच्या मनात भरून राहिली.
“चल, कसे जायचे? मी पंढरीला जीप घेऊन बोलावतो! मग जाऊ बसून त्यात!”
“नका, मालक! मी चाकर मानुस, तुमच्या संग नाय बसता येत आमाला! तुमास घोड घडलाय आमच्या  मालकांनी!”
चारी पायाच्या खुरा भोवती आणि भरदार आयाळीला पांढरे शुभ्र रेशमी केस असलेला, उभ्या पांढऱ्या कानाचा, तो खांद्याइतका उंच, कृष्ण वर्णाचा घोडा सावकाश पावले टाकत येउन, पंताजवळ उभा राहील. उंची खोगीर पाठीवर घेतलेलं, ते उमदं जनावर अनोख्या तेजानं झळाळत होत. असा उमदा घोडा आपल्या पागेत असायलाच हवा. आता भेटल्यावर याच्या मालकाकडून, हा पंचकल्याणी अश्व विकत घेऊन टाकू! पंतांनी मनात ठरवून टाकले.
झटक्यात रिकेबित पाय टाकून पंतांनी घोड्याचा पाठीवर मांड ठोकली.
“कोणत्या बाजूला जायचंय आपल्याला?” पंतांनी त्या निरोप्याला विचारले.
“विरोबाच्या माळाकडं! ”
पंतांनी माळाकडे घोडा वळवला. टाच मारली, तशी घोड्याने चाल धरली. मागून तो निरोप्या धावत होता. पंतांनी लगाम खेचून घोडा थांबवला.
“अरे, असा किती वेळ या घोड्या मागे धावणार? बस माझ्या मागे!”
“नका!” निरोप्याने ठाम नकार दिला.
“मग, या घोड्याचा काय उपयोग? रस्ता तुला ठाऊक, तू मागचं आणि मी घोड्यावर पुढे! असं कस जमेल?”
“माजी नका फिकीर करू. म्या हाय तुमच्या संगच. अन ह्या घोड्याला हाय रस्ता ठाव! लगाम द्या मोकळा सोडून, त्यो नेईल तुमासनी मुक्कामी!”
हे खरच अजब होत. पण पंताला यात काही विशेष वाटलं नाही. जनावरांना असे ज्ञान उपजतच असते. त्यांनी लगाम सैल केला. घोड्याच्या पोटावर दोन्ही पायानी टाच मारली. घोडयाला इशारा समजला. तो दौडत निघाला. विरोबाच्या माळाकडे! त्या माळावर विरोबाचे छोटेसे मंदिर होते. आणि तो माळ गावाच्या दक्षिणेस होता!
त्या घोड्याने आता बराच वेग घेतला होता. वीरोबाचा माळ मागे पडला होता. पंतांना तो निरोप्या जवळ पास दिसत नव्हता. त्या वेगवान घोड्यावर बसून मागे पहाता येत नव्हते. इतक्या वेगातल्या घोड्याचा लगाम सावकाश खेचायचा असतो, पण ठीक आहे, घोडा लयीत आणि न बुजता दौडत आहे. म्हणजे तो योग्य मार्गावरच आहे. समोर कातर डोंगर रांग दिसत होती. पंतांनी सहज जमिनीकडे पहिले. पंढरी जीप चालवताना, जसा गाडीखालचा रस्ता पाळतो, त्यापेक्षा ज्यास्त गतीने जमीन मागे पडत होती! घोड्याचा वेग वाढतच होता. कातर डोंगराच्या आडव्या रांगेतून आपण केव्हा आणि कसे बाहेर आलो ते पंतांना समजलेच नाही! आता हिरवेगार मैदान लागले होते. समोर मैदानाच्या कडेला निळे आकाश मिळाले होते. क्षितिज! घोडा दौडत होता तसे ते दूर जायला हवे होते, पण ते एका जागी स्थिर होते आणि क्षणा क्षणाला जवळ येत होते! पंतांचा धीर सुटू लागला. काहीतरी विचित्र घडत होते. जगातला कोणताच प्राणी या घोड्याच्या गतीने धावू शकणार नाही याची त्यांना खात्री पटू लागली. त्यांनी समोर पहिले. जमिनीचा हिरवा पट्टा संपत आला होता, त्यासमोरचे अथांग आकाश स्पष्ट दिसत होते! पंतांनी मागचा पुढचा विचार न करता घोड्याचा लगाम पूर्ण शक्ती लावून खेचला. त्या निळाईत घोड्यासगट जाणे म्हणजे, खूप उंचावून जमिनीवर कोसळण्या सारखे होते. पण भलतेच झाले. खेचलेला लगाम, घोड्याचा तोंडातून तुटून पंतांच्या हाती आला! घोड्याच्या गतीत तसूभरही फरक पडला नव्हता! लगाम नसल्याने पंतांनी घोड्याच्या मानेला दोन्ही हातानी पकडले!आणि गच्च डोळे मिटून घेतले. काय होईल ते होईल,या निर्धाराने! आणि तसेही त्यांच्या हाती काहीच उरले नव्हते!
०००
शेवटी तो अश्व एकदाचा थांबला. पंतांनी डोळे किलकिले करून पहिले. आसपासचा परिसर रम्य होता. एखाद्या राज्याच्या उद्यानं सारखा. फुलझाडांनी भरलेला. समोर एक भव्य पांढरा शुभ्र प्रासाद उभा होता! राजवाडा नसला तरी एका गर्भश्रीमंत माणसाची हवेली नक्कीच होती!
पंतांनी त्या वास्तूच्या प्रवेश द्वारावर असलेली घंटा वाजवली.
ते विशाल दार आवाज न करता उघडले. आणि उघडणारा, तो निरोप्या होता!
“तू? माझ्या आधी कसा आलास?” आश्चर्याचा धक्का ओसरल्यावर पंतांनी विचारले.
तो फक्त गूढ हसला!
“या, आपले स्वागत आहे, विष्णुपंत! हेच ना आपले नाव?”
विचारणारी, धवल वस्त्रातील वृद्ध व्यक्ती होती. रेशमी धोतर, खांद्यावर उपरणे आणि डोक्यावर विपुल पांढरे मुलायम केस, मागे फिरवलेले. तेजस्वी चेहरा आणि चमकदार डोळे होते! हाती एक सुवर्ण दंड होता. त्याच्या अधिकाराचे प्रतीक.
“हो! पण आपण कोण? आणि काय काम आहे माझ्या कडे?” पंतांनी आसपार नजर फिरवली. त्या विशाल हॉल मध्ये, फक्त दोनच आसने होती. एक, ज्यावर ती वृद्ध व्यक्ती बसली होती, ते एखाद्या सिहासना सारखे, परंतु पांढऱ्या दगडाचे आणि थोडीश्या उंचावर होते, म्हणजे चार पायऱ्या वर. बहुदा संगमरवरी असावे. आणि दुसरे आसन, शिसवी लाकडाचे. ते मात्र रिक्त होते. या दोन आसनाखेरीज, त्या भवनात इतर कोणतीहि वस्तू नव्हती! कडेला फक्त पांढऱ्या भिंती!
“आपण माझे पाहुणे आहेत. तेव्हा आसनस्थ व्हा. म्हणजे वार्तालाप करणे सोईचे होईल!” तो म्हातारा, लाकडी आसनाकडे निर्देश करत म्हणाला.
पंत त्या लाकडी आसनावर बसले.
“आधी मी माझी आणि या भवनाची ओळख करून देतो. हे मुक्ती द्वार भवन आहे! आणि मी या भावनांचा सध्याचा स्वामी! माझ्या बद्दल खूप दंत कथा आहेत. कोणी मला ‘काळ’ म्हणतो, कोणी ‘यम’ तर कोणी ‘मृत्यू!’म्हणतो! पण हे एक पद आहे!
आता आपणास ‘निरोप’ पाठवून बोलावू घेण्याचा प्रश्न!कारण होते, आपला ‘सजीव’ राहण्याच्या कालावधी संपला होता!”
हा म्हातारा काय बरळतोय? हा स्वतःस ‘यमदेव’ म्हणवतोय! आणि ‘सजीव रहाण्याचा कालावधी संपला काय?’
“तुम्ही काय बोलताय मला समजत नाही. मला माझ्या वाड्यावर परत जायचे आहे! तुम्ही कोणीही असा. मी परतणार!” पंत ताव तावाने म्हणाले.
“कोठे जाणार आता? परतीचे मार्ग बंद झालेत! मला वाटले होते, एव्हाना आपणास कल्पना आली असेल! असो. मी, ती तुम्हाला जाणीव करून देतो! आपल्या समोरच्या भिंतीवरती पहा. तेथे तुमचा भूत काळ दिसेल!”
पंतांनी समोर पहिले. तेथे त्यांचा वाडा दिसत होता. ते जणू वाड्याच्या माळवादावर उभे होते. अंगणात गावकऱ्यांची गर्दी दाटली होती. तरी सर्वत्र विचित्र शांतता होती.
“मालक सकाळा बंगईवर बसले होते. मी अन तुका बोलून निगालो. कायतर ‘निरोप्या-निरोप्या’ म्हनत व्हते. मग बंगई वरन उटून वाड्यात निगाले, मग काय झालं ठाव नाय. येकायेक मागारी फिरले, उपरन घेतलं अन भाईर निगाले. सांचाला वाड्यावर मुक्कामी यतो मनले, अन लगबगीनं दिंडी दारातन भाईर पडताना, घेरी आली जनू, तितच पडले. म्या धावलो. डाक्तर आलते. काळीज बंद झाल्यानं गेलं, असं काय त सांगत होते!” हणम्या कोणाला तरी हलक्या आवाजात सांगत होता!
पंतांना परिस्थितीची स्पष्ट जाणीव झाली!
“म्हणजे, मला फसवून तुम्ही मारून टाकलंय!” ते गरजले.
“नाही मुळीच नाही! तुमच्या परवानगीनेच येथे आणलय!”
“आणि नाही तरी तुम्हाला, आमच्या सारख्या मृत मानवाच्या परवानगीची गरजच काय? अधिकार आणि शक्ती आहेत, तुमच्या कडे! कुणाचाही, केव्हाही, अन कसाही मुडदा पाडू शकता!”
“मित्र, असे वैतागून नाही जमणार! मृत्यू पूर्वी आम्ही प्रत्येकाला, देहातून विलग करण्याची संमती मागत असतोच! हे सत्य सांगायला कोणी जिवंतच नसत, म्हणून ते तुम्हास माहित नाही! असो तो प्रश्नही आता गौणच आहे!”
“मग खरा प्रश्न काय आहे?”
“तेच तर सांगणार आहे! आता येथे एक सोहळा होणार आहे. तो तुम्ही पाहिलात तर ‘पुढे काय?’ हे तुम्हास कळणार आहे. तुम्हास आमच्या दूताने येथे, तुमच्या परवानगीने आणले आहे. तसेच, तुम्हास एक ‘जीव’ आणावयाचा आहे! तरच पुढील प्रवास करता येईल! माझ्या सारखा! मी आता तो सोहळा सुरु करत आहे. आपल्या आदरणीय दूतास मी माझ्या समीप बोलावतो.”
तो काळा निरोप्या चार पायऱ्या चढून, त्या पांढऱ्या केसाच्या म्हाताऱ्या जवळ गेला. म्हातारा आसन सोडून उभा राहिला. त्याने आपल्या हातातील तो दंड, सन्मान पूर्वक त्या निरोप्याच्या हाती दिला. त्याने तो दंड प्रथम माथ्याशी लावून, उजव्या हातात धरला. म्हाताऱ्याने आदरपूर्वक त्या निरोप्याला आसनावर बसवले. तो हि ऐटीत बसला. म्हाताऱ्याने अत्यंत नम्रपणे दोन्ही हात जोडून त्या आसनस्थ निरोप्याला नमस्कार केला!
“या क्षणा पासून, आपणास या आसनाचे, सर्व अधिकार आणि शक्ती मी प्रदान करतो!” म्हातारा म्हणाला. आणि त्याने आपले दोन्ही हाताचे तळवे, त्या आसनस्थ निरोप्याच्या मस्तकावर ठेवले. तसे त्या निरोप्याचे रूप पालटले. अंगावर भरजरी रेशमी धोतर, खांद्यावर उपरणे आणि मस्तकावर धवल केश समभार, मानेवर रुळणारा आला! तो आता राजबिंडा दिसू लागला.
“देवा, आता माझे कार्य संपन्न झाले. माझ्या जागी आता आपण दायित्व सांभाळावे. आणि मला पुढील प्रवासाची परवानगी द्यावी!” त्या म्हाताऱ्याने आसनस्थ नव्या शासकाला विनंती केली.
” अहो, जरा थांबा! हे -हे नक्की काय होतंय? मला कळले नाही. आणि यात माझे काय काम?” पंतांना साधारण कल्पना आली होती. तरीहि त्यांनी विचारलेच.
“काही नाही. तुम्ही जेव्हा या आसनाने सांगितलेला ‘जीव’, यमदूत बनून, या मुक्ती द्वारा पर्यंत आणलं, तेव्हा, हे सत्ताधीश तुम्हास या आसनावर बसवतील! आणि आज मी जसा पुढील गमनासाठी सज्ज्य आहे, तसे आत्ता आसनस्थ आहेत ते सज्ज्य होतील! आणि तुम्ही यांच्या जागी ‘यमराज’ म्हणून बसला! या राज्यात यमराज आणि यमदूत हे स्थायी सेवक कधीच नसतात! येणाऱ्या जीवांना हि जवाबदारी पार पडूनच, पुढील गती साठी जावे लागते!म्हणजे जन्म -मृत्यूचा फेरा सुरळीत चालू रहातो.”
“प्रस्तानची परवानगी हे सिहासन प्रदान करते!” त्या आसनावरून हातातील दंड उंचावून घोषणा झाली.
म्हाताऱ्याने दोन्ही हात उंच केले. आणि क्षणात तो वातावरणात विरून गेला!
०००
सकाळी साधारण आकाराची वेळ होती.  शालिनी मॅडम खूप बिझी होत्या. नुकतीच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग सुरु झाली होती. पॉमिला, मॅडमची पर्सनल सेक्रेटरी, त्या मध्यम वयीन गृहस्थाकडे टक लावून पहात होती. पन्नाशीच्या आसपास त्याच वय असावं. ब्रँडेड जीन आणि व्हाईट शर्ट. त्यावर वेल टेलर्ड कोट! म्हटलं तर फॉर्मल, म्हटलंतर नाही. त्याने ट्रिम केली दाढी राखली होती. एकंदर भारदस्त आसामी होती. त्याला शालिनी मॅडमची पर्सनल भेट हवी हाती आणि त्याच्या कडे अपॉइंटमेंट नव्हती! तो सकाळी साडे नऊलाच येऊन बसला होता. शालिनी मॅडम दुपारी बाराच्या दरम्यान फ्री होणार होत्या, आणि त्यानंतर आणि लंचच्या आधी काही मिनिटे त्यांना मिळणार होते, त्यात त्या त्याला भेटणार होत्या.
“काय काम आहे? माझ्या कडे सांगा, मी निरोप देईन त्याना!” या पॉमिलाच्या प्रस्तावाला त्याने नकार दिला होता! तेव्हा पासून तो समोरच्या सोफ्यावर बसून एक टक मिटिंग हॉलच्या दारा कडे पहात होता. जणू तो ते उघडण्याचीच वाट पहात होता!
मिटिंग संपली शालिनी मॅडम आपल्या केबिन मध्ये गेल्या. त्यांनी पॉमिलाला इंटरकॉम वर, त्या माणसाला आत पाठवण्यास सांगितले.
तो केबिन मध्ये आला.
“मॅडम, मी विष्णू! एक विशेष दूत आहे. आपणासाठी एक महत्वाचा निरोप घेऊन आलोय! आमच्या बॉसनी आपणास आग्रहाची विनंती केली, आहे कि, आपण, माझ्या सवेत, त्यांच्या भेटीस यावे! मी आपल्यासाठी कार घेऊन आलोय! तेव्हा येणार ना?”
तो उत्तरासाठी कानात जीव आणून वाट पहात राहिला.——–
— सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. बाय!

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..