नवीन लेखन...

राष्ट्रीय विज्ञान दिवस

सध्या , शुध्द विज्ञानाचा अभ्यास करण्याची, विद्यार्थ्यांची आवड आणी निकड कमीकमी होते आहे. अुपयोजित आणि व्यावसायिक विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकण्याकडे आणि तोच व्यवसाय निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे.

२८ फेब्रुवारी या दिवशी, दरवर्षी, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. १९८७ सालापासून ही प्रथा रूढ झाली आहे. म्हणजे १९८७ साली १ ला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय विज्ञान दिवस हा आधुनिक भारताचा आधुनिक सण आहे. १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर, २६ जानेवारी हे आपल्या देशाचे आधुनिक सण तर गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी, नाताळ, अीद, वगैरे भारतीय सण आहेत. मकर संक्रांत, अेकादशा, चतुर्थ्या, संकष्ट्या, महाशिवरात्री, कुंभमेळे, काही पौर्णिमा, अमावास्या वगैरे पारंपारिक सण आहेत.

राष्ट्राच्या प्रगतीत, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांचा बराच मोठा सहयोग असतो. शेतकरी आणि सैन्यातले जवान यांचा वाटा तर खूपच मोठा असतो. शेतकर्‍याची मेहनत आणि जवानांचं मनोधैर्य अजोड असतात. परंतू नुसत्या मेहनतीवर शेती अवलंबून नसते आणि केवळ मनोधैयानं लढाया जिंकता येत नाहीत. भारतीय कृषिशास्त्राचा प्रयत्नपूर्वक विकास झाला म्हणून हरितक्रांती साधता आली आणि शस्त्रास्त्रांचा विकास आणि अुत्पादन झालं म्हणून शत्रूला दूर ठेवण्यात यश आलं. या सर्वात विज्ञान आणि तंत्रज्ञान सहाय्यभूत ठरलं आहे.

भारतीय वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण व्हावं म्हणून आणि त्यानिमित्तानं विज्ञानाविषयी जनजागृती व्हावी आणि जनमानसात विज्ञानीय दृष्टीकोन रुजावा म्हणून दरवर्षी, राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. या दिवसासाठी २८ फेब्रुवारी ही तारीख निवडावी याही संयोजकांनी फार मोठं औचित्य साधलं आहे.

७ नोव्हेबर १८८८ हा डॉ. चंद्रशेखर रामन यांचा जन्मदिवस आहे, म्हणजे ७ नोव्हेंबर १९९७ सालापासून त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं. त्याच वर्षीपासून, डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या पुढाकारानं, २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करावा असं ठरलं. म्हणजे २८ फेब्रुवारी १९८७ रोजी १ ला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा झाला. त्यादिवशी, आंतरराष्ट्रीय किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंतराव नारळीकर यांचं व्याख्यान झालं.

मुंबअीची मराठी विज्ञान परिषद तर, अख्खा फेब्रुवारी महिनाच, निरनिराळे भरगच्च  विज्ञानीय कार्यक्रम करून `विज्ञान मास` साजरा करते.

प्रा. रामन यांच्या विज्ञानीय प्रयोगांची साधनं आणि अुपकरणं, पूर्णतया भारतीय बनावटीची होती. त्यांची किंमत, त्या काळी फक्त २०० रुपये होती. आता भारतातील प्रयोगशाळा, आधुनिक आणि सुसज्ज आहेत, तरीही भारतीय नागरिकत्त्व असलेल्या आणि भारतातच संशोधन केलेल्या शास्त्रज्ञाला, दुसरं नोबेल पारितोषिक मिळालं नाही.

प्रा. सर डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांना ‘रामन परीणाम’ या शोधाबद्दल १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला आहे. रामन परीणामाचा शोध २८ फेब्रुवारी १९२८ रोजी लागला. हा शोध अितका महत्वाचा होता की केवळ दीड वर्षातच चंद्रशेखर व्यंकट रामन यांना, त्या शोधासाठी, भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं. कित्येक शास्त्रज्ञांना हा बहुमान मिळण्यासाठी तीनचार दशकं वाट पहावी लागली आहे.

१९९६ साली केलेल्या अेका पाहणीत असं आढळलं आहे की भारतात वैज्ञानिकांचं प्रमाण दर हजारी लोकसंख्येत फक्त ६.९ अितकं अत्यल्प आहे. पाश्चिमात्य देशात ते ७० च्या आसपास म्हणजे १० पट आढळतं. राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या जागृतीनं हे प्रमाण भराभर वाढेल अशी अपेक्षा करू या.

विज्ञानाची आंतरिक तळमळ असणारया वैज्ञानिकाला, आधुनिक  अुपकरणांची आणि साधनांची गरज असतेच असं नाही. या बाबतीत थॉमस अल्वा अेडिसन किंवा डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांना, साधनं आणि अुपकरणं विकत घेण्याची गरज भासली नाही. तरी देखील त्यांनी असामान्य विज्ञानीय शोध लावले. याचं कारण म्हणजे, त्यांना हवी असलेली अुपकरणं, त्यांनी स्वत:च तयार करवून घेतली आणि आवश्यक असलेली साधनसामुग्री स्वत:च प्रयत्नपूर्वक मिळवली.

भारतात जन्मलेल्या आणि भारतीय नागरीकत्व असलेल्या शास्त्रज्ञाला, भारतातच केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कार मिळण्याचं हे अेकमेव अुदाहरण आहे. आणि ते ही भारत स्वतंत्र होण्यापूर्वी, ब्रिटिशांच्या राजवटीत. डॉ. हरगोविंद खोराना आणि डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांचे पुतणे डॉ. चंद्रशेखर सुब्रमण्यम  या दोन भारतीय शास्त्रज्ञांनाही नोबेल पुरस्कार मिळाला आहे. परंतू ते दोघेही अमेरिकन नागरीक आणि त्यांचं संशोधनही अमेरिकेतच झालं.

आफ्रिकन वंशाचे अमेरिकन संशोधक डॉ. कार्व्हर यांनी शेंगदाण्याचं रासायनिक पृथ:करण करून, विघटन करून, विघटीत केलेल्या घटकांचं विविध पध्तींनी संयोग करून, त्याआधारे, सुमारे ३०० वस्तू तयार केल्या. अुदा. चरबी, रेझीन, साखर, शाअी, बूटपॉलिश, रंग, दाढीचा साबण, खतं, मअू गुळगुळीत कागद, कृत्रिम फरशा, ग्रीज, लोणी, प्लॅस्टिक, दूध, चीज, सौदर्यप्रसाधनं, शांपू, व्हिनेगर, लाकडासाठी रंग, केसातील कोंडा नाहिसा करणारं अौषध, खाद्य तेल अित्यादी मानवी जीवनास आवश्यक अशा अनेक वस्तू बनवून दाखविल्या.

अर्थात, आता मात्र हि परिस्थिती बदलली आहे. पाश्चिमात्य देशात, कोणत्या विषयावर आणि कोणतं संशोधन करावं हे आधी ठरतं आणि त्यानुसार साधनसामुग्रीची जुळवाजुळव केली जाते. प्रयोगाला लागणारी अुपकरणं जर अुपलब्ध नसतील तर त्यावर, दुसरं कोणी संशोधन करून, पाहिजे त्या प्रकारची अुपकरणं, अिच्छित प्रयोगासाठी वापरली जातात.

भारतात मात्र परिस्थिती नेमकी अुलटी आहे. अेखादं अद्ययावत अुपकरण आयात केलं जातं आणि त्या अुपकरणाच्या सहाय्यानं जे संशोधन करणं शक्य असेल तेच संशोधन केलं जातं. म्हणूनच, नवनवीन शास्त्रीय तंत्रं वापरून, नव्या विज्ञानीय अुपकरणांचा विकास, भारतात फारसा झाला नाही.

कोणत्याही देशात, अुपलब्ध असलेलं विज्ञान आणि तंत्रज्ञान, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अुपयोगी पडेल या साठीच वापरलं तर देशाच्या साधनसामुग्रीचं सार्थक होतं. या बाबतीत, भारतातील अेक दोन अुदाहरणं द्यावीशी वाटतात.

भारतात सध्या जैव-अविनाशी पॉलिथीन आणि प्लॅस्टिक यांचाच वापर होत असल्यानं, संपूर्ण परिसरात पॉलिथीन पिशव्या आणि प्लॅस्टिकचे तुकडे, पिण्याच्या शुध्द पाण्याच्या कचकड्याच्या बाटल्या जिकडेतिकडे पडलेल्या असतात आणि त्यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या अुद्भवतात. वास्तविक, दैनंदिन जीवनात, प्लॅस्टिकच्या वस्तू फार सोयीच्या आहेत. पण आपण प्लॅस्टिक व्यवस्थापनात कमी पडतो.

कित्येक वेळा असं आढळतं की नगरपालिकेचे रस्त्यावरील विजेचे दिवे, कित्येक दिवसरात्र जळत असतात. सध्या बांधण्यात आलेल्या अनेक अुड्डाणपुलाखालच्या रिकाम्या जागांचा सुयोग्य वापर कसा करावा या बाबत कोणत्याही योजना नाहीत. या जागा झोपडपट्टीवासियांना फुकट वापरावयास मिळतात. त्यांची मुलं तेथे खेळत असतात.

भारतात अण्वस्त्रं तयार करण्याचं, त्यांची चाचणी घेण्याचं तसंच दळणवळण अुपग्रह पृथ्वीभोवती फिरत ठेवण्याचं तंत्रज्ञान आहे. परंतू जैवविनाशी प्लॅस्टिक तयार करण्याचं तंत्रज्ञान नाही. रस्त्यावरच्या विजेच्या दिव्यांसाठी स्वयंचलित टायमर किंवा सूर्यप्रकाशाची वीज साठवून ती रात्री, दिव्यांसाठी वापरणं आणि महामार्गावरील पुलांवर प्लॅस्टिकचे प्रकाशपरावर्तक वापरणं अजून का जमत नाही याचं आश्चर्य वाटतं. साधं, सोपं विज्ञान आणि तंत्रज्ञान अनेक ठिकाणी वापरलं जाअू शकतं पण ते वापरलं जात नाही याची खंत वाटते.

कोणत्याही पाश्चिमात्य प्रगत राष्ट्रांमध्ये, कोणत्या प्रकारचं विज्ञानीय संशोधन व्हावं आणि ते कुणी करावं या विषयी सरकारच निर्णय घेते आणि त्यानुसार संशोधनाची दिशा ठरते. आपल्याकडे मात्र तसं होत नाही.

टीव्ही सारखं प्रभावी माध्यम, फक्त बातम्या सोडल्या तर, विशेष अुपयोगी नाही असं वाटतं. कारण साबण, टूथपेस्ट, शांपू, सौदर्यप्रसाधनं आणि अुत्पादनांच्या भडक जाहिराती करण्यातच या माध्यमाचा जास्त वापर केला जातो. जनतेच्या अुपयोगी असं आरोग्य, शिक्षण, राहणीमान वगैरे साठी, त्याचा फारसा अुपयोग न होता, केवळ खोट्या करमणूकीसाठीच ते माध्यम वापरलं जातं. त्यामूळे नागरिकांचे, विशेषत: विद्यार्थ्याचे, कित्येक तास वाया जातात. संगणकाच्या माहितीजालावर, ज्ञानकोशासारखी माहिती मिळते. पण त्यावरही अश्लील चित्रं आणि बनवाबनवी चालते. अीमेल द्वारे, संगणकीय विषाणू घालून अनेक संगणकातील माहिती चोरली जाते आणि तिचा गैरवापर केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्तानं, देशाच्या विज्ञानीय आणि तांत्रिक बाबींचा वापर सार्थकी लागावा असं वाटतं.

विज्ञान हे कालातीत असलं तरी विज्ञानीय संशोधनाच्या सुविधा, संधी, दृष्टीकोन, आर्थिक सहाय्य, संकल्पना, विषय, दिशा, अुद्देश वगैरे काळानुसार बदलत असतात. देशाचा नागरिक खर्‍या अर्थानं मूलभूत रितीनं जेथे घडतो त्या शिक्षणसंस्था म्हणजे शाळा, महाविद्यालयं, त्यातील विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग अतीशय महत्त्वाचा आहे. सध्या शुद्ध विज्ञानाचा अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांची आवड आणि निकड कमी कमी होत चालली आहे. अुपयोजित आणि व्यावसायिक विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकण्याकडे आणि तोच व्यवसाय निवडणं अिकडे अधिक कल वाढतो आहे. वास्तविक शुद्धविज्ञान विकसीत झालं नाही तर तंत्रज्ञान आणि अुपयोजित/व्यावसायिक विज्ञान यांचाही विकास होणार नाही.

शुद्ध विज्ञानही तंत्रज्ञानावर अवलंबून असतं कारण शुद्धविज्ञानाच्या प्रयोगांची जुळणी करायची, निरीक्षणं करायची म्हणजे भरवश्याची अुपकरणं हवीतच. विकसीत तंत्रज्ञानामुळे अद्ययावत अुपकरणांची निर्मिती होअू शकते.

अशारितीनं विज्ञान/तंत्रज्ञान, व्यावसायिक विज्ञान/तंत्रज्ञान ही सर्व विज्ञान क्षेत्रं परस्परावलंबी आहेत.

विज्ञान क्षेत्रातील व्यक्तींची संख्या प्रतिवर्षी वाढायला हवी. देशातील राजकारणी आणि सामाजिक पुढार्‍यंानी वैज्ञानिकांचा सल्ला घेतला पाहिजे. वैज्ञानिकांनीही तो न्यायाधिशाच्या भूमिकेतून दिला पाहिजे आणि तो सर्वस्वी मानला गेला पाहिजे. तरच देशाच्या विकासयोजना सफल होतील. म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिवसाचा आदर केला पाहिजे. हाच राष्ट्रीय विज्ञान दिवसाचा संदेश आहे.

आपल्या प्रिय देशातील जनतेत, विज्ञानीय दृष्टीकोन रुजला तर, तिच्या दैनंदिन जीवनातील व्यवहारात नक्कीच फरक पडेल आणि राष्ट्रीय पातळीवरील समस्या सोडवितांनाही वेगळे मार्ग सापडतील. या वेगळ्या मार्गांना जनतेचंही सहकार्य मिळेल.

— गजानन वामनाचार्य.

संपादकीय : मराठी विज्ञान परिषद पत्रिका : फेब्रुवारी २००२.

मनबोली : मुंबअी तरूण भारत : गुरूवार २८ फेब्रुवारी २००२. (१६ वा रा. वि. दिवस)  

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..