नवीन लेखन...

नागपंचमीची धमाल

नागपंचिमीचा सण व्हता.गावात सगळीकडं धामधूम व्हती. आमच्या गावात पंचिमीच्या सणालं लय महत्त्व होतं. सगळं गाव एकवटून सन साजरा करायचं.दूर शहरात पोटापाण्यासाठी गेलेला चाकरमानी पण या निमतानं गावी यायचा.गावच्या सासुरवाशीण पोरीसोरीबी पंचीमीनिमित्त माहेरी यायच्या. दिवाळसनापेक्षाबी गावात नागपंचीमीलं महत्व व्हतं.गावाचं आराध्य दैवत नागनाथ व्हतं. गावातले लोकं त्यालं पाटीमाय मणायचे. अंदाजे दीड बाय अडीच फुटाच्या एका लाकडी पाटीवर नागांच्या विविध जातीयचे चित्र कोरलेली ही अखंड मुर्ती व्हती.चंदनशेष,गुलालशेष,कालिया,तक्षक,वासुकी,पद्मिनी आदी नागदेवतांच्या मुर्त्या पाटीमायवर कोरलेल्या व्हत्या. नागपंचमीच्या सणालं गावातं जत्रा भरायची. गावातल्या झाड नं झाडावर झोके बांधलेले दिसायचे. त्यावर लहान ,मोठे,लेकरं-बाळं,सगळेचं हिंदोळायचे.आसपासच्या खेड्यापाड्यातून भाविकभक्त नागनाथाच्या दर्शनासाठी यायचे. गावात या काळातं उत्साह ओसंडून वाहयचा. गावच्या जतरतं शिनिमाच्या टाक्या यायच्या.मौत का कुंवा,हिरालाल पन्नालाल, आगास पाळणा,कुरकुंजी,बिरेक डॅन्स,तसचं लोकनाट्य,पण येयाचे.परिसरातले मसनजोगी,वासुदेव,गुडगुड्या,पाकोळ,वाघ्या मुरळीसारके लोककलावंतबी या जत्रलं येयाचे. जतरनिमीत्त कबड्डी,कुस्ती,क्रिकेट,शंकरपट,कोंबड्याच्या झुंजी,उत्साहात पारं पडायच्या.

या सणाला काही वाईट प्रथा पण चिकटलेल्या व्हत्या. लोक पंचमीलं गंजीपत्त्यायचा डाव मांडून बसायचे. गावातल्या बाया माणसं सोडल्या तर हरेक लहान सहान मुलं,माणसं जागोजागी गंजीपत्त्याचे डाव मांडून खेळायचे. लोकांमध्ये एक समज व्हती की बाप्पा पंचिमीच्या सणाला एखादा तरी रूपया पत्त्यात हारावा नायं तं जितावा तरी…!!!या परंपरे पायी खेळाची चटक लागून कित्येकायनं आपली जमीन जायदात फुकली,तं कोणी बायकांयचे दागिने मोडले, तं कोणालं लोकांयचे सालं धरावं लागले.

पंचिमीच्या सणालं अजून एक प्रथा चिकटलेली होती. दूर दुरून लोक इथं करणी, भूतबाधा, भानामती,चेटुक आसे भुतं काढायसाठी झपाटलेल्या झाडालं घेऊन यायचे.नागनाथाच्या पारावर भली मोठी गर्दी व्हायची.पाराचा परीघ द़ोन अडीच एकरावर पसरलेला व्हता.सगळ्या परिसरात भुतं घुमायचे.त्या गर्दीतील झपाटलेल्या झाडायचा वावर पाहून घाबरगुंडी उडायची.केस मोकळे सोडलेले,एका जागी बसुन घुमणारे,झाडावरून चढ उतार करणारे, चित्रविचित्र आवाज काढुन रडणारे,हसणारे आसे येगयेगळे भुतायचे झाडं तिथं जमायचे.आरबडे मंडळी भुतं लागलेल्या झाडालं बेताच्या छडीनं सपके मारून भुतालं पळवायचे मनं…!!!आजुनबी बर्‍याचं अस्या प्रथा व्हत्या.नागपंचिमीलं गावात कोणीबी चुलीवर तवा टाकतं नसे.यादिशी घरोघरी खायलं चुलीवर उकडलेले कान्हुटे करतात,तसचं ज्वारी,नाचणी,भादली,साळीच्या लाह्या फोडतातं.वारूळालं पुंजुन नागदेवालं लाह्या,दुध,आन कान्हुट्याचा निवद दाखवतात.

गावात नागनाथाची सेवा करणारा आरबडी नावाचा एक पंथ होता.हा पंथ आस्तिक ऋषींना मानतो.ते नागवंशीय होते.त्यांचे बाबा जरत्कारू तर आई मानसा होती.ज्यावेळी जनमेजय राजानं सर्पयज्ञ करून तक्षक नावाच्या सापालं यज्ञाग्नी देण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे समजताच अगस्ती ऋषींनी ताबडतोब यज्ञस्थळी जाऊनं जनमेजय राजालं समजाऊन सांगुन,त्याच्याकडून वरदान मागुन सर्पवंशालं वाचवलं व्हतं,अशी अख्यायिका मथारे कोथारे सांगतातं.आस्तिक ऋषींनं सर्पायलं वाचवलं मनुनं आजही कुणालं साप चावला तं आस्तीक ऋषींचं वचन देऊन आरबडे पांढाळ करत्यात.आरबडे हा पंथ नागनाथाचा सेवकं असतो.आरबडी मंडळ जे भजन करतातं त्यालं बारी असं मंतातं.

सोमवार,एकादस, चतुर्थी,आण आवस-पुनवलं बारी व्हायची.बारी ऐकाय सगळं गाव पारावरं जमायचं.लोकबोलीतील हे गाणे आरबड्यायनंच रचलेले असतांतं.बरं बारी मंडळाचे वाद्य ते काय तं,एक हंडा,त्यावर एक पितळी परात; त्यालं थाळा मंतात, एका लोखंडी कडीनं थाळा वाजवतातं. ,संगट खंजिरी,झांज,तुंतूनं आणि ढोलकीचा ताल असतो.

म्या चौथी पाचवीत असतानी एकदा जत्रतं अशीच मही फजिती झाली व्हती.तं झालं असं की म्या, सद्या, पांडू,रम्या,,राधी,गोदी,सुरकी असे भावकीतले भावंडं भावंडं मिळून जत्रतं गेलतो.सगळी जत्रा फिरू लागलो.पोरीसोरीयन तेह्यलं मातीचे जातं, बाव्हल्या,असे खेळणे घेतले.रिबीना,गंध,पावडर अस्या बायकायच्या जिनसाबी घेतल्या.आम्ही पोर्‍हायनंबी गोचीडीच्या फोकायची डमनी,मातीचे बैलं,आन खेळण्याच्या बंदुकी ईकतं घेतल्या.बजारं झाला की मंग एक हात जिलबी-भाज्यांवर मारून आम्ही पाटीमायच्या देवळाकडं निंघालो. आरबड्यायनं पाच दिवसाचा घट् मांडला व्हता. बारी सुरू व्हयाची येळ झालती. मंदिराच्या परिसरात भूतबाधा झालेले शेकडो झाडं जमले व्हते.कोणी मोकळे केस सोडून’अंहऽऽ अंहऽऽ‘म्हणून घुमत व्हतं तं कोणी आचकट ईचकट हसत अंगालं आळुखे पिळुखे देत उड्या मारतं व्होतं.कोणी देवळाबाहेरच्या झाडावर चढत उतरत होतं तं कोणाला दोरखंडानं बांधून टाकलं व्हतं. नथू आरबड्या हातात वेताची छडी घेऊन त्या झाडांयमधून ऐटीत फिरत व्हता.दिसल त्याच्या पाठीत जोरजोरात बेताचे फटके मारत व्हता.ती झाड किंचाळायची नायतं हसायची,आणि पुन्हा तेह्यचं तेच चालू करायची.तिथं लिंबाची आरास पडलेली व्हती. ते लिंब त्या झाडाच्या अंगावून भारून,ववाळून टाकले जात व्हते. काही झाडं तं तिथल्ले ते लिंबं उचलून सालपटासकट कडकड खाऊन टाकायचे.हे पाहून मह्या तं अंगावर काटाच येयाचा.आम्ही लहान लेकरं,कवळ्या काळजाची माणसं तिथून जरा दूरच उभं राहून हे सगळं पाहातं व्हतो. तिथलं वातावरण एकदम झपाटलेलं वाटत व्हतं. कडकड दात खाणारे ते झाडं पाहून आमच्या मनात भीतीचा गोळा येत व्हता.

थाळ्यावर थाप पडली,ढोलकी वाजली, आनं खंजिरी, झांज,तुंतून यांनी नाद केला. एकदाची नमनाची बारी सुरू झाली,

“अलंकावती पुण्य भूमी पवित्र,
तेथे नांदतो नागराज सुखात,
तया करिता महा पुण्य राशी,
साष्टांग नमन महे
चंदनशेषाशी……!!!
जय जय राम कृष्ण हरी हो राम कृष्ण हरी”…………
जय जय राम कृष्ण हरी हो राम कृष्ण हरी”………..
…….
……….
………
……….
”चंदनशेष महाराज की जय”

नमनाची बारी आटपली व्हती.आता आरबड्याईत बारी मनायची चढावढ रंगु लागली.जसजशा बाऱ्या रंगात येऊ लागल्या तसतसं इथं परसातले झाडं बी जोरजोरात झिंगु लागले. कोणी एका जागी बसून घुमत व्हतं, कोणी आळुखे पिळुखे देत व्हतं. जशी जशी बारी रंगात येऊ लागली तशी तशी भूत बी रंगात येऊ लागली. तेवढ्यात पाहता पाहता एक झाडं बांबूच्या काठीवरूनं सर सर चढत टोकावर गेलं व्हतं.टोकावर भगवं निशाण व्हतं.निशानाच्या टोकावर जाऊन दोन्ही हात आभाळाकडं करून मोठ्यांनं आरूळ्या देवू लागलं. मंदिरातून सगळे लोक पळतच बाहेर आले. निशाण्यावरच्या त्या झाडालं पाहू लागले. जमलेली गर्दी पाहून झाड आजूनच चेकाळून जात व्हतं. मोठ्यांनं गवरत व्हतं. गावातल्याच कुण्या धामण्याचं नाव घेऊन घात केला, करणी केली, असं बरळखयचं. लय बोंबललं….जीवाच्या आकांताने ओरडलं…..अन गार होऊन घटकाभर शांत पडलं…. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी भयान शांतता तिथं व्हती.झाड निशाण्यावरून खाली पडलं याची लोकायलं चिंता लागली व्हती. खाली आरबडे लोकंबीक त्या झाडांनं खाली उतरावं मणून जंतर मंतर करू लागले. तेवढ्यात परलाद आरबड्यानं अकरा लिंबं भारले अन् त्या झाडाच्या दिशेनं फेकले. जशे लिंब त्या झाडाच्या अंगालं लागले तसं अंगात विज संचाराव अशी ताकद त्या झाडातं आली.ते झाडं एकदम ताठरलं.त्याच्या धमन्या फुरफुरू लागल्या.त्याचे मोठमोठाले डोळे,जाड जाड भुवया, पिंजारलेले केस,आण राकेसी वरडणं ऐकून लहान लेकरन तं रडूचं लागले. कच्च्या काळजाची माणसं तं घामेजुन मटकन खालीचं बसले व्हते.तं बाया बापड्याबीक चार पावलं माघे सरकल्या व्हत्या.मी कोपऱ्यातच एका लाकडी खुर्चीवर बसलो व्हतो. त्या खुर्चीचा एक पाय आधू असल्यानं ती खुर्ची सारखं मागं पुढं हलतं डूलतं व्हती. खुर्चीचे दोन्ही हात मात्र मजबूत व्हते.

परलाद आरबड्यानं भारलेले लिंबं त्या झाडाच्या दिशेने फेकल्यानं ते झाड बरंच खवळलं व्हतं. त्याचे लालबुंद डोळे, कडकड दात खायची पद्धत,लोकांकडं पाहून चित्र विचित्रपणे आवाज काढणं यामुळं आफसूकच आमची भंबेरीच उडाली व्हती.तेवढ्यात त्या झाडांनं गगणभेदी आवाजात,

”धामनखोका काय ………
त्याचा मळा कुनकडं हाय……”

अशी आरोळी देत त्या बारा फुटी उंच निशाण्यावरून खाली उडी मारली.ते झाड खाली येतांना,

” लकाऽऽलकाऽऽ लकाऽऽलकाऽऽ लकाऽऽलकाऽऽ लकाऽऽलकाऽऽ“

असं जिबीवूनं हातं फिरवतं बोंबलत व्हतं. त्याचं ते भयंकर रूपडं पाव्हून आम्ही लय घाबराया लागलो व्हतो. त्याची उडी नेमकी मह्या खुडचीकडचं येत व्हती.मही फाटारली होती मी चिरकतच रडाया लागलो, ”आयो मायो ये ऽऽ काय करू ये ऽऽ आता मी मरतोयंऽऽ….”

असं म्हणून हडबडीत खुर्चीवरून उठाया लागलो. जसा मी उठाय लागलो तशी खुर्ची एका आडंगावर लवंडली. मी खुडचीच्या एका साईडच्या हाताकडून पळायचा प्रयत्न केला आणि त्या हाताच्या खाली मी पक्का अडकलो.ते झाड मह्याकडचं येत व्हतं,”लकाऽऽलकाऽऽ लकाऽऽलकाऽऽ“ खीदळतं व्हतं.मही धडधड वाढायलं लागली.तसा मी मोठ्यानं चिरकायलं लागलो.ते झाड माह्या पुढंच पडलं व्हतं. तव्हा दोन-चार आरबडे आनं गावातले धटींग माणसं मिळूनं तेह्यनं झाडाला घट्ट धरलं. दोरखंडानं त्यालं बांधून टाकलं. आरबड्यायनं झाडाच्या डोस्क्यावरं हात ठुवून काय तरी जंतर मंतर केलं आनं मंग कुठं ते झाड शांत निपचित पडलं.इकडं मातर मही भंबेरीच उडाली व्हती.

मी अडकल्याची खबर कोणंतरी मह्या घरी पव्हचवली व्हती.मही माय धावत पळतचं आली.एव्हाना आतापर्यंत लोकांयनं मलं खुर्चीतून सोडवलं व्हतं. महे अश्रू काय थांबत नवते.पण दोन-चार लोक जवळ असल्यानं थोडा धीरबी येत व्हता.तेवढ्यात समोरून मही माय पळत येतांनं दिसली. मलं बी लय बरं वाटलं.मी जोरात पळतच तिच्याकडं गेलो आनं आवेगाने तिला बीलगलो.माय मह्या पाठीवर हातानं कोंभाळतं व्हती.डोस्क्यावून हात फिरवत मलं कुरवाळत महे पटापटा मुके घेतं व्हती.तीलं पाहुन मलं उमाळा आवरता आला नाही.मी ओक्साबोक्शी रडाया लागलो.रडून झाल्यावरं माईच्या कुशीत मी बऱ्यापैकी शांत झालो व्हत़ो.

आजही लहानपणचा तो किस्सा आठवला की मलं खूप खुप हसू येतं.ते झाड,ते सणाचे वातावरण,त्या परंपरांना मी खुप मिस करतो. त्या सगळ्या गमती जमती आता इतिहास झाल्यातं असं वाटाया लागतं..आताशा गावंही बदललीतं,हिरवाई कमी होऊन तिथबी सिमेंटचे जंगलं वाढलीतं.काळासंगटच परंपराबी बदलल्यातं…आठवणी मात्र तशाच आहेत….!!!

©गोडाती बबनराव काळे
9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..