नवीन लेखन...

मृत्यूदिन ते दहा आकरा बारा/ तेरावं अर्थात दिवसकार्य.

कुणा घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अकाली वयात गेल्याचं दुःख सोडलं तर खूप वय झालेल्या व्यक्तीं गेल्याचं दुःख फार काळ टिकत नाही. अर्थात आपल्या जवळच्या व्यक्तीचा कायमचा दुरावा दुःख देतच असतो. स्मशानातले सगळे विधी पार पाडतात आणि मृत शरीर अनंतात विलिन होतं. आलेली मंडळी आपापल्या घरी परततात.

पूर्वी, स्त्रियांनी स्मशानात जायचं नाही, लहान मुलांनी प्रेतयात्रा पहायची नाही
ज्यांचे आईवडील हयात आहेत त्यांनी अंत्यविधीच्या कामात भाग घ्यायचा नाही,
मृत्यू झालेल्या घरात त्या दिवशी घरचे सोडून कुणी मुक्काम करायचा नाही, राहिल्यास तेरा दिवस रहावं लागतं. एक ना दोन, असे अनेक चालत आलेले नियम होते. पुढे सोयीनुसार या सगळ्यात शिथिलता आणि सोय या गोष्टी येत गेल्या. बरेचसे नियम कुणी पाळेनासे झाले. ते किती बरोबर किती योग्य आणि चुकीचे किंवा अयोग्य हा चर्चेचा आणि वादाचा विषय. आज मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या लेकी पुढचे सगळे दिवसकार्य करू लागल्या आहेत. स्त्रिया मुली स्मशानात येऊ लागल्यायत.
स्पष्ट विचारतात,
“का नाही यायचं आम्ही ?
आमच्या लहानपणी इमारतीमधलं कुणी गेलं की आम्हा मुलांना घरात गप्प बसवून ठेवायचे. बाल्कनीत सुद्धा येण्याला परवानगी नसायची.
का ? असा प्रश्न विचारायची तेव्हा हिम्मत नव्हती. का? चं उत्तर तोंडाने नाही तर हाताने दिलं गेलं असतं.
आज इमारतीमध्ये कुणी गेलं, की घरातली लहान मुलं चौकसपणे सगळं न्याहाळत बाल्कनीमध्ये उभी असतात आणि तयारीची running commentary आई वडीलाना देत असतात. विचार करून अनेक प्रश्न विचारत असतात. थोडक्यात काय ? मृत्यूची दाहकता, भीती कमी होऊ लागली. दुःख आवरून एक दोन दिवसात सगळं सुरळीत होऊ लागलं.
अहो, पूर्वी स्मशानातलं वातावरण भीतीदायक असायचं, कुंद वातावरण, आजूबाजूला झाडी, आपण येण्यापूर्वी जळत असलेली चीता, मिणमिणते दिवे. रात्री हे वातावरण फारच भीतीदायक वाटायचं.
आज हे वातावरण संपूर्ण नाहीसं झालंय.
तर सांगत काय होतो ? पुढे दहा, अकरा बारा तेरा ही दिवसकार्य केली जातात. परंतु त्यामध्येही सुटसुटीतपणा आला. सगळ्या दिवस कार्याचं एकत्रित पॅकेज दिलं की आपल्याला त्या दिवशी तिकडे हजर रहाणं एवढंच काम उरतं. तर हे दहाव्या अकराव्या दिवसांचं कार्य ठराविक ठिकाणी पार पडतं, सुतक नावाचं बंधन उठतं आणि घरात करण्याचा बारा किंवा तेरावा दिवस उजाडतो. हे झाल्यावर आपण सगळ्या दिवसकार्यातून मोकळे होणार असतो. एव्हाना दुःखाचा प्रभाव बराचसा कमी झालेला असतो. पण भेटायला येणारी मंडळी त्या कुटुंबाला त्या प्रभावातून बाहेर न येण्याला मनापासून मदत करत असतात. आपण सकाळ दुपार संध्याकाळ, कधीही गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटायला जातो. अनेकदा दरवाजाबाहेर आल्यावर घरातून टीव्हीचा आवाज येतो, किंवा हसण्या बोलण्याचा आवाज येत असतो. आलेल्या मंडळींच्या, एकमेकांकडे पाहून भुवया उंचावल्या जातात आणि बेल वाजवली जाते. क्षणात टीव्हीचा आवाज बंद होतो आणि चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवत दरवाजा उघडला जातो. लहान मुलं आत पळतात. जरा मोठी अवेळी आलेल्या मंडळींवर मनातल्या मनात वैतागत तिथेच बसतात. मोठी मंडळी मनावरचा ताण आणि डोळ्यावरची झोप परतवत बैठक घेतात. घरातल्या मंडळींची ही फार मोठी सर्कस सुरू असते, कारण रोज दिवसभर कुणी ना कुणी येऊन दुःखाची खपली काढत असतं. काय झालं ? कसं झालं ? हे सगळं पुनःपुन्हा सांगत रहावं लागतं. येणाऱ्या व्यक्तींमध्ये अगदी प्रेमभावाने भेटायला येणारे कमीच असतात. बहुतेक मंडळी,
सगळे भेटून आले मग आपणच नाही गेलो तर कसं दिसेल,? किंवा
एकदा जाऊन तोंड दाखवून येऊया. अथवा
आपल्याकडे अमुक घडलं होतं तेव्हा ते आले होते, म्हणून आपल्यालाही जायला हवं.
काही थोडी मात्र,
त्यांना काय हवं नको पाहून येऊया. सैभैर झाली असतील बिचारी. आपण शेजाऱ्यांनीच आधार द्यायला हवा या विचाराची आणि तो विचार प्रत्यक्षात आणणारी असतात.
कुटुंबातल्या मंडळींनाही सतत चेहरा पाडून बसण्याचा कंटाळा आलेला असतो, अर्थात त्यालाही इलाज नसतो म्हणा.
यातच मृत्यू झालेल्या दिवसापासून,
“हे करायलाच हवं रे बाबा “!
“काय सांगतोस गुरुजी म्हणाले ? ते झालंच पाहिजे ! गुरुजींना सांगायला काय जातंय ?”
“अमुक करण्याशिवाय पर्याय नाही तुला सांगतो !”
“तमुक केलं नाही तर चालतं का काही कल्पना नाही.”
असं, आपण काडीची मदत न करता फक्त सूचना देत राहून आणि सगळ्यांना गोंधळात टाकून भंडावून सोडणारी माणसंही असतात. तशीच,
“तुम्हाला जी मदत लागेल ती अगदी निःशंकपणे सांगा, मी आहे मदतीला.”

असं सांगून खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी माणसंही असतात.
दहावं अकरावं दिवसकार्य पार पडून बारा किंवा तेरावा, म्हणजे या सगळ्या ताणातून सुटण्याचा दिवस उजाडतो. हा विधी घरी होणार असतो. पिंडाला नमस्कार करायला येण्याची वेळ गुरुजींनी दिलेली असते, सगळी तयारी झालेली असते. जवळची मंडळी एक एक करून घरातलं वातावरण किती निवळलय याचा अंदाज घेत, त्यानुसार चेहऱ्यावर माफक हास्य ठेवत प्रवेशत असतात. या दिवसापर्यंत बहुधा दुःखाचं वातावरण बरचसं नाहिसं झालेलं असतं. हळुहळु आलेली मंडळी विसावतात आणि माफक हास्य विनोद, थट्टा मस्करी, चर्चा, चौकशा सुरू होतात, मध्येच एखाद्याच्या येण्याचं कारण लक्षात येतं आणि गेलेल्या व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देत समतोल साधला जातो. बरं, त्यातल्या अनेकांना कळत नसतं, की आपण या गप्पा, हास्य विनोद यामध्ये भाग घ्यावा का ? बरं दिसेल का ? की असेच चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवून ताटकळत बसून राहावं ? बरीच मंडळी तास दोन तासांपूर्वी घरून निघालेली असतात. चहा व्यतिरिक्त इथे तशी पोटपुजेची काही सोय नसते, जेवण होईपर्यंत दुपार होऊन जाणार असते. काही दूरदर्शी येतानाच थोडीफार पोटपूजा हॉटेलमध्ये करून आलेले असतात, त्यामुळे ते यांच्या मुखावर टवटवीतपणा नांदत असतो, ज्यांनी हे केलेलं नसतं त्यांची अवस्था भूकही आवरत नाही आणि मध्येच बाहेर जाताही येत नाही अशी झालेली असते. आतल्या खोलीत, बाल्कनीमध्ये, जिथे जागा मिळेल तिथे बसून, टेकून, उभं राहून गप्पा सुरू असतात. या सगळ्यात काही स्त्रिया असतात त्यांना आपण काय करायला हवंय हेच कळत नसतं. म्हणजे आपण काही मदत करावी, की बसून राहावं, की इतर गप्पा मारत असतात त्यात भाग घ्यावा, की अजून काही…. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक हवालदिल भाव असतो. त्या झटक्यात बसतात, उठतात, कुणाच्या विनोदावर हसतात आणि क्षणात इकडे तिकडे पहात गंभीर होतात, मध्येच उठून किचनमध्ये जातात आणि परत येतात. उगीचच इकडचं स्टूल तिकडे ठेवतात.. असं त्यांचं सुरू असतं. काही पुरुष आणि स्त्रिया मात्र या सगळ्यात गुंतून न पडता अगदी मन:पूर्वक कामात व्यग्र असतात.
कुणीतरी, गुरुजींनी नमस्काराला बोलावलंय म्हणून सांगत येतं आणि आळसावलेली मंडळी पटापटा उठून नमस्काराला हजर होतात. ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे किचन मध्ये स्त्रियांची अथवा कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल तर त्या लोकांची हालचाल सुरू होते. सगळेच भुकेले असतात. जमिनीवर पंगती वाढणं शक्यच नसतं. ताटात वाढून ते प्रत्येकाच्या हातात दिलं जातं, अगदीच वयस्कर व्यक्तींना पुढ्यात स्टूल दिलं जातं. अनेकदा जेवण चवदार झालेलं असतं. शुभ कार्यात कसं आपण,
“आमटी, भाजी मस्तच झालीय बरं का वहिनी !”
“सोलकढी झक्कास ताई !”
“श्रीखंड अप्रतिम, घरी की विकतचं ?”
अशी उत्स्फूर्त दाद देत असतो.
इथे अशी दाद देणं बरोबर वाटणार नाही असं वाटून अनेकजण काही न बोलता, एक दुसऱ्याकडे पहात हाताच्या, ?, ? अशा खुणा करत असतात. तरीही एखादा खवैय्या न राहून आणि प्रसंग विसरून म्हणतोच,
“वाह !, सगळे पदार्थ मस्तच झालेयत, चविष्ट. खीर तर best, मस्त झालं जेवण.”
इतक्यात कुणीतरी त्याच्याकडे पाहून नेत्रपल्लवी करतं आणि क्षणात भानावर येऊन तो नकळत घडून गेलेलं सावरून घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचं नाव घेऊन म्हणतो, “नानकाकाना, किंवा दादांना किंवा आणि कुणी(जो कुणी मृत्यू पावलाय तो) हा अमुक पदार्थ फार आवडायचा नाही ? अगदी मनापासून खायचे.आज असते तर खुश झाले असते( अरे लेका ते आज असते तर तुला खायला मिळणार होता का तो पदार्थ ?)
गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील मंडळींनाही भूक लागलेली असते. पण आजूबाजूला इतकी मंडळी असतात, की पोटभर जेवणंही त्यांना शक्य होत नाही.

आलेली मंडळी घरातून बाहेर पडतात आणि सुरू होतं,
“वहिनी तशा सावरल्यायत नाही ?”
“कशावरून ?” दुसरं कुणी विचारतं,
“नाही म्हणजे व्यवस्थित जेवल्या बिवल्या”.
“आणि अगदी नॉर्मल गप्पा मारत होत्या”, तिसरं कुणीतरी.
“आजकाल काय….. जाऊदे उगाच आपण कशाला बोला”.
लोकांची अपेक्षा तरी काय असते कळत नाही.
जेवणावळी आटोपतात आणि एकेक जण घरच्या मंडळींची भेट घेऊन मार्गाला लागतो. बाहेर ऊन फार असतं, पण घरी जाऊनच पडूया असा विचार करून सगळे निघतात, आणि दिवसकार्य नावाचा धार्मिक सोहळा संपतो.
आज हे सगळं कमी होत चाललय म्हणा. अनेक जण हे सगळं न करता, एखाद्या समाजसेवी संस्थेला गेलेल्या व्यक्तीच्या नावाने यथाशक्ती आर्थिक मदत देतात. अनाथाश्रमात अन्नदान करतात किंवा एखाद्या वृद्धाश्रमाला देणगी देतात.

बऱ्याच जणांना अगदी हेच करायचं असतं, परंतु त्यांचा ठाम निर्णय होत नसतो की हे करतोय ते बरोबर आहे की चुकीचं. कारण इतक्या वर्षांचा मनावर बसलेला पगडा. त्यातच जवळच्या अनेक व्यक्ती घाबरवतात,
“तू म्हणतोयस, पण हे दिवसकार्य केलेलं चांगलं असतं. उगीच काही बाधा नको लागायला.”
“तू कर सगळं व्यवस्थित, मग पाहिजे तर एखाद्या संस्थेला कर मदत त्यांच्या नावाने.”
“रीतीनुसार कर बाबा सगळं. नान्याचाही विश्वास होता या सगळ्यावर.”
पण काही व्यक्ती मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहून, मनाला पटणारच करतात.
पिंड, कावळा, दिवसकार्य, जेवणावळी…. काय खरं काय खोटं? काय चूक काय बरोबर ? कुणास ठाऊक.
हे सगळं आपण किती श्रद्धेने करतो ? की भीतीने ? की समाज काय म्हणेल म्हणून ?
अनेकदा आयुष्यभर त्या व्यक्तीचं काहीही न करता, तो गेल्यावर हे सगळं करून काय होणार ?
माणूस हयात असेपर्यंत त्याच्यासाठी होईल तेव्हढं करावं, नंतर साग्रसंगीत दिवसकार्य करून काय उपयोग ? असं आपलं मला वाटतं इतकंच.

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 370 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..